जून-जुलै महिन्यापासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांच्या आई-बाबांची तिकडे जाण्यासाठी तयारी सुरू होते. काहींचा हा प्रवास पहिलाच असल्यामुळे मानसिक ताण असतो. या प्रवासाची मानसिक व शारीरिक तयारी करावी लागते. हवाई प्रवास मुख्यत्वे कित्येक तासांचा प्रवास एका बंदिस्त जागेत करावा लागतो.
एवढा काळ फारशी हालचाल करायला वाव नसतो. पन्नाशी ओलांडलेल्या बहुसंख्य व्यक्तींना एवढा काळ वातानुकूललित जागेत बसण्याची सवय नसते. जोडीदाराखेरीज अन्य कोणी बोलायला नसते. हॅण्डबॅगमध्ये पुस्तके व मासिके ठेवावीत. सर्व स्थिरस्थावर होण्यासाठी तासभर लागतो. नंतर श्वसनाचा व्यायाम करावा. एक ते तीन अंक मोजत खोल श्वास घ्यावा, तेवढाच वेळ श्वास धरून ठेवावा व सोडावा. सर्व व्यायाम पाच वेळा करावे. प्रवासात व्यायाम बसल्याबसल्याच करावे. खुर्चीत ताठ बसावे, डोके हळूहळू वरखाली करावे, नंतर डाव्या-उजव्या बाजूस करावे. नंतर मुठी बंद करून हात शरीराला काटकोन करतील असे खांद्यापर्यंत उचलावे, कोपरात दुमडावे, नंतर सरळ करावे, मूठ उघडत खाली करावे. पायाची बोटे वरखाली हलवावी, पाय दुमडून छातीपर्यंत न्यावेत व खाली आणावेत. पोटाच्या व्यायामासाठी हात मांडीवर ठेवून ताकत पायापर्यंत न्यावेत नंतर वर आणत सरळ व्हावे. मधूनमधून दीर्घश्वसन करावे.
जेट विमाने खूप उंचीवरून उडत असल्यामुळे गतिजन्य विकार, चक्कर येणे, ओकाऱ्या होणे सहसा होत नाही. उड्डाणकाळात हलका आहार घ्यावा, शुष्कता टाळण्यासाठी पाणी भरपूर प्यावे, दीर्घश्वसन व शरीर शिथील केल्यास उड्डाणाचा ताण कमी होतो, मळमळल्यास वांतीरोधक गोळी घेऊन स्वस्थ पडावे. विमानातील हवेचा दाब हवेत झेप घेताना (टेक ऑफ) व उतरताना कमी-जास्त होतो व कानात दडे बसतात. म्हणून टॉफी चघळावी/जांभया द्याव्यात, नाहीतर नाक दाबून हवा कानात हलकेच ढकलावी. हवेचा दाब कमी झाल्यामुळे आतड्यातील हवा प्रसरण पावून पोट फुगते, बेचैन वाटते. म्हणून उड्डाणकाळात कमीच खावे. शरीर शिथील केल्यास मानसिक ताणही कमी होतो.
लांबच्या प्रवासात काळाचे विभाग (टाईम झोन) ओलांडावे लागतात. त्यासाठी मधूनच डुलक्या काढणे हितावह असते. वातानुकूलित हवा कोरडी असते. त्यामुळे शरीरात शुष्कता येते. म्हणून पाणी भरपूर प्यावे.
– डॉ. अविनाश वळवडे, पुणे
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार
Leave a Reply