मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील द. व्यं. जहागीरदार यांची ही पूर्वप्रकाशित कथा
स्वागत कक्ष स्त्री-पुरुषांनी भरून गेला होता. एकही खुर्ची रिकामी नव्हती. सरांनी उभे राहणेच पसंत केले. कागदाच्या कपट्यावर स्वत:चे नाव लिहिले. निवृत्त प्रोफेसर, बीड असा पत्ता लिहिला.
“साहेब, दोन-तीन तास थांबावं लागेल. आतसुद्धा सर्व खुर्च्या भरल्या आहेत.” गेटमन म्हणाला. तो चिठ्ठी घेऊन आत गेला आणि त्याच पावली परत आला.
“सर, मॅडमनी आत पाठवायला सांगितलं आहे.
त्यांना पाहताच मॅडम स्वत: चालत आल्या.
“या सर! कित्ती वर्षांनी भेटतो आहोत आपण!” मॅडमच्या चेहऱ्यावर खळाळते हास्य होते.
“खरं आहे तुमचं, पंधरा-वीस वर्षं झाली असतील. तुम्ही खूप पुढं गेलात, आयएएस झालात. आज आमच्या शहराच्या कॉर्पोरेशनच्या कमिशनर, अभिमान वाटतो तुमचा !” सरांच्या शब्दांत कौतुक होते.
“सर तुम्ही मला हे अहो – जाहो का करता आहात? मी स्टुडन्ट आहे तुमची. ”
“साधी नाही, आवडती ! स्कॉलर, गोल्ड मेडलिस्ट. आज केवढं मोठं पद सांभाळता आहात, या करोनाच्या काळात. ”
““बरं, ते राहू द्या. काय काम काढलं सर? अस करू आपण, आतल्या चेंबरमध्ये बसू.
बसू.”
” कमिशनर म्हणाल्या.
चेंबरमध्ये दोन सोफा, मॅचिंग खुर्च्या, स्वच्छ, ऐसपैस.
“मॅडम!”
“सर, पुन: म्हणालात मॅडम. ”
“चूक झाली, आता सुधारतो. अलका सारंगपाणी; रोल कॉल घेताना मी हेच नाव म्हणायचो.” सर क्षणभर थांबले, पाण्याचा घोट घेतला.
“मी पारिजात सोसायटीत राहतो. आमची सोसायटी शहरात प्रसिद्ध आहे. खूप हिरवळ, फुलांचे लतामंडप, लांबचलांब डांबरी रस्ते.
या सर्वांमुळं, लांब डांबरी रस्ता शोभून दिसतो. सरांची प्रस्तावना लांबते आहे असे मॅडमला जाणवले. त्यांना मध्येच थांबवून त्या म्हणाल्या, “बरं मग? आत्ता प्रश्न काय आहे?”
““मॅडम, मागील आठवड्यापासून आमच्या सोसायटीत नुसती दुर्गंधी पसरली आहे. आम्ही पाहणी केली. सोसायटीच्या आतील पाइप व गेटच्या बाहेरील नाला कचरा, घाणीनं तुडुंब भरला आहे. “लॉकडाउनमुळं नेहमी स्वच्छता करणारी मुलं, कामगार आपल्या गावी निघून गेलेत. रोजंदारीवर आणलेली या कामाचा कंटाळा करतात.
कचरा गाडीत न टाकता नाल्यात टाकतात. कचरागाडी दूर उभी राहते, त्यामुळं लांब जाण्याचा कंटाळा करतात ही मुलं. सोसायटीत सर्वदूर दुर्गंधी पसरली आहे. घराबाहेर पडणं मुश्कील झालं आहे.” “तुमचा प्रॉब्लेम आला माझ्या लक्षात.” मॅडम म्हणाल्या. वर्गात नेटके बोलणारे सर, आता जरा जास्तच बोलताहेत, अघळपघळ म्हातारपण, दुसरे काय? मॅडमना सरांची काळजी वाटली मॅडमनी स्विच प्रेस केला. पीए धावत आला. “कामोठे, उद्या सकाळी ठीक नऊ वाजता मी पारिजात सोसायटीला भेट देईन. सर्व संबंधित ऑफिसर्स, कॉन्ट्रॅक्टर, नगरसेवक यांना ठीक नऊ वाजता पारिजातच्या गेटसमोर उभं राहण्यास सांगा.” मॅडम उठल्या. “बरंय सर, उद्या भेटू.” जाताना म्हणाल्या.
पारिजात कॉलनीत हां हां म्हणता बातमी पसरली. प्रत्यक्ष कमिशनर पाहणी करणार हे ऐकून सर्वांना आनंद झाला, त्यापेक्षा जास्त आश्चर्य वाटले. करमरकर सरांचा भाव मात्र एकदम वधारला. एरवी जनरल बॉडी मीटिंगमध्ये उगाच प्रश्न विचारणारा म्हातारा एवढाच त्यांचा लौकिक होता.
सर्व रहिवासी पन्नाशीच्या आतील, अध्यक्ष व कार्यवाह तर चाळिशीच्या आतील. या म्हाताऱ्यांना वेळ भरपूर म्हणून प्रश्न फार. सोसायटीचे काम म्हणजे किती कष्ट आणि काळज्या? ते या म्हाताऱ्यांना समजत नाही.
एकदा प्रश्न विचारायला उभे राहिले की थांबायला तयार नाही. सर्व जण कंटाळतात. जमेची बाजू एकच – त्यांचे उत्तम इंग्रजी. ऐकत राहावे इतके भारदस्त आणि मधुर. पण करमरकरांची कमिशनर मॅडमशी इतकी
ओळख? त्या प्रत्यक्ष येणार? म्हणजे ओळख दाट असावी.
सकाळी साडेआठ वाजताच सर्व रहिवासी पोर्चसमोर जमले.
गोकुळधामच जणू – तारक मेहतातील सर्व सदस्यांचे चेहरे जसे बोलके, तसेच जमलेल्यांचा आनंद. ठीक नऊ वाजता पोर्चसमोर कमिशनरची बी. एम. डब्ल्यू. आत शिरली. सिक्युरिटीने दरवाजा उघडला. मॅडम उतरल्या. सरांनी स्वागत केले. अध्यक्षांनी भलामोठा पुष्पगुच्छ दिला. मॅडमनी सर्वांना हात उंचावून प्रणाम केला – हसतमुखाने. “सर, चला आता परीक्षण करू. तुमच्या अध्यक्षांना व कार्यवाहांना फक्त येऊ देत. मॅडमच्या मागे त्यांची टीम होती. “अलका सारंगपाणी, कमिशनर मॅडम झाल्या क्षणात ! चेहरा कडक, इतरांना जरब वाटावा असा. बोलणे कडक, शब्द मोजके, चालणे वेगाचे प्रश्न थेट आणि नेमके.
बिल्डिंगच्या पाइपपासून त्यांनी सुरुवात केली. सर्व पाइप्स गच्च भरले होते. पी.ए.ने मॅडमला ग्लोज, मास्क, प्लॅस्टिक कोट दिला. प्रश्नांची फैर सुरू झाली. खाली मान घालून सर्व ऑफिसर्स उत्तरे देत होते.
“पाच-सहा सोसायट्यांकडून माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. सूर, एकच कचरा साफ करणारे गैरहजर. कचऱ्याची गाडी दूर उभी राहते म्हणून तो नाल्यात विसर्जित केला जातो. “भाकरे? तो गाडीवाला सिग्नलपाशी गाडी का उभी करतो, तुम्ही ऑर्डर दिली आहे?” ““होय मॅडम ! सर्वांची सोय व्हावी म्हणून मी बदल केला मॅडम.
“वॉर्ड ऑफिसरची परवानगी घेतली होती?”
“नाही मॅडम. ”
“कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? रोजंदारीचे मजूर तोच पुरवीत असेल. मग त्याला का बदलला नाही?”
““मॅडम, चांगलं काम करतो आहे तो. भाकरे, तुमचं फार चांगलं मत दिसतंय त्याच्याबद्दल. मैत्री दिसते तुमची. साधी का देण्याघेण्याची?” मॅडमच्या प्रश्नात जरब होती. क्षणभर त्या शांत राहिल्या. नंतर एकदम कडक. “भाकरे ! दोघांबद्दल, तुमच्या मैत्रीबद्दलच्या तक्रारी आल्या आहेत माझ्याकडे. तुम्हांला या क्षणी मी सस्पेंड करू शकते, पण पोराबाळांचा धनी म्हणून तुम्हांला आणखी एक चान्स देते. सुधारा, करप्ट प्रॅक्टिस सोडा., “संपूर्ण ग्रूप हादरला. भाकरे तर सुन्न! त्यांचा दरारा जाणवला सर्वांना. पाहणी आटोपली. “माझ्या सर्व लक्षात आलंय. आधी तुम्हांला दुर्गंधीमुक्त करणं आवश्यक आहे. चोवीस तासांत हे काम पूर्ण होईल. मॅडम सर्वांना उद्देशून बोलल्या.
“मॅडम चहा…” अध्यक्षांनी विचारले.
“नको, मला तीन मिनिटांनी निघायला हवं. ‘
“मॅडम, मला काही सांगायचं आहे. दोन मिनिटांत आटपेन मी!” अभय पुढे येऊन म्हणाला.
“सांग, ओन्ली टू मिनिट्स फॉर यू” मॅडम म्हणाल्या.
“जपानमध्ये रोबोटिक्स कंपनीत मी काम करतो. भारतात यंत्रमानवाचा उपयोग आपण सर्जरी, मोठे उद्योग, शिक्षण या क्षेत्रांत करून घेतो. ही कामं स्वच्छ आहेत. दुर्गंधींनी भरलेली, खालची कामं आपण माणसांकडून करून घेतो. माणसाला या कामाचा कंटाळा येणं, नकोशी वाटणं अगदी साहजिकच आहे. म्हणून अशी कामं टाळण्याचा त्याचा प्रयत्न असतो. अशी कामं यंत्रमानवाकडून करून घ्यावी यासाठी माझी कंपनी खास रोबोट तयार करते. त्याचा प्रचार व उपयोग करून पाहण्यासाठी कंपनीनं तीन महिन्यांकरिता, आमची काही मॉडेल्स घेऊन मला इथं पाठवलंय. ”
“तुझ्याकडे काही भरीव योजना आहेत का?”
“हो, मॅडम !”
मॅडमनी पी.ए.ला बोलाविले. “दुपारी तीन वाजता अभयबरोबर चर्चा ठेवा. काउन्सेलर इंजिनिअर यांच्याबरोबर चर्चासत्र ठेवा. आपल्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवा. मीही हजर राहीन. वेळ थोडा आहे, पण काम महत्त्वाचं म्हणून एवढी घाई. ठीक अडीच वाजता अभयला आणण्यासाठी गाडी पाठवा. चर्चा ठीक तीन वाजता सुरू झाली पाहिजे. हरी अप, बी फास्ट. ” मॅडम झपाझप आपल्या गाडीकडे चालू लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अभय व त्याचे बाबा गेटसमोर उभे होते. ठीक आठ वाजता गेटसमोर पांढऱ्या रंगाची होंडा सिटी उभी राहिली. काल आलेले इंजिनिअर सावंत प्रथम उतरले. त्यांच्या मागे दोन तरुण उतरले. दोघांचीही उंची पाच फूट सहा इंच, रंग सावळा, अंगात जीन्स व तपकिरी रंगाचा टी-शर्ट. चेहरा हसरा, आनंदी, डोक्यावरचे केस लेटेस्ट स्टाइलप्रमाणे अस्ताव्यस्त. त्यांनी फावडे, कुदळ, प्लॅस्टिकची मोठी बादली, झाडू बरोबर आणले होते. त्यांनी सोसायटीच्या आत असलेल्या पाइपपासून कामाला सुरुवात केली. काम अखंड, विसावा नाही. बिडी नाही, तंबाखू नाही, गप्पा तर नाहीच. डक्टपासून डक्टपासून गेटपर्यंत चोक झालेला पाइप पूर्ण भरला होता. ते दोघे घाण काढीत होते, बाहेर टाकत होते. मध्ये उभे राहून गंमत पाहणारे एकदम मागे हटले. सोसायटीचे लोक तर गेटच्या आत गेले, पण दोघांचे काम सुरूच होते. अर्धा पाइप सुटा झाला तेव्हा ठीक अकरा वाजले होते. लांब लोखंडी सळईने ते कचरा भरत होते. काम चालू, तक्रार नाही, उगाच बडबड नाही. दुपारचा एक वाजला. पाइप पूर्ण रिकामा, कचरामुक्त झाला होता. सावंतांनी बदलीचे तरुण आणले होते. त्यांनी नाकाला मास्क लावून पालिकेच्या गाडीत कचरा भरण्याचे काम सुरू केले. दुर्गंधी संपूर्णपणे मिटली होती. वातावरण प्रसन्न झाले होते. रमेश, सुरेश बाहेर आले. ते थकले नव्हते. दुर्गंधीने त्रासले नव्हते, चिडले नव्हते. आपण काहीतरी महत्त्वाचे काम केल्याची प्रौढी नव्हती. ते अबोल होते. एकदम मुके. “अभय सर, पुढं काय काम?” सावंतांनी प्रश्न केला. “सावंत मला वाटतं, आधी गेट ते सिग्नल, जवळपास अर्धा किलोमीटर लांब, चोक झालेला संपूर्ण नाला साफ करू.” “उत्तम!” सावंत म्हणाले. ते स्वत: अक्षरश: स्तंभित झाले. काहीतरी अघटित घडले होते.
प्रत्यक्षात, त्यांच्यासमोर. ‘या वेगानं सफाई झाली, तर संपूर्ण शहरातील नाले एका महिन्याच्या आत साफ होतील. आपल्या शहराचं नाव होईल. राज्यात, देशात!’ रात्रीचा अंधार पडला, सर्व लाइट्स लागले, रस्ता उजळला. ते दोघे नाल्यात उतरले. डोक्यावर सर्चलाइट पट्ट्याने बांधले.
काम संपले तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. त्यांना सांगितलेल्या जागेवर येऊन ते उभे राहिले; पहिल्यासारखे स्तब्ध, अबोल, चेहरा हसरा. गंगाराम रोजंदारीवर आलेला, शिकला सवरलेला, इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेतलेला. तिकडून लांबून आलेला – थेट उदगीरचा. रोजंदारी चांगली दोनशे रुपये, पण त्यातले पन्नास, कॉन्ट्रॅक्टर आधीच कापून घ्यायचा. हातात मिळायचे फक्त दीडशे रुपये. घरी आई, धाकटा भाऊ, कसे जगायचे सर्वांनी? काल सावंत सरांचा रात्री निरोप आला म्हणून सकाळी लवकर उठला, सातला हजर. आज काम मिळायलाच हवे. रमेश, सुरेशचे काम, झपाटा पाहून थक्क झाला तो. ‘हे दोघे मिळून आमच्यासारख्या आठ-दहा तरुणांइतकं काम करतील. न थकता, न जेवता, तर मग आम्ही आणखी उपाशी राहणार? आमच्या पोटावर हे दोघे पाय देतील. म्हणूनच आम्हांला काय फायदा? प्रश्नांचा गुंता सुटत नव्हता. उत्तर गंगारामजवळ नव्हते. अभय सरांनाच विचारू…’ त्याने विचार केला.
तो अभयजवळच उभा होता. ‘सुरेश, रमेशचं आजचं काम संपलं; पण त्यांची राहण्याची व्यवस्था काय? कोण सांभाळणार त्यांना?’ त्यानेच गंगारामला प्रश्न केला.
“सर, मी राहतो यांच्या सोबत.” गंगाराम उत्तरला.
“गंगाराम, त्यांना सोबतीची मुळीसुद्धा आवश्यकता नाही. त्यांना कशाचीही भीती वाटत नाही, किंबहुना भीती कशी असते हेही त्यांना समजत नाही.
“म्हणजे सर? यांना मानवी भावना नाहीत. त्यांना जेवण नको, पाणी नको, आराम नको, मात्र कामात यशस्वी, शंभर टक्के! मग त्यांना देवच का म्हणू नये?”
“खूप हुशारीचा निष्कर्ष काढलास तू! हुशार दिसतोस. किती शिकला आहेस?”
“इंजिनिअरिंगचा डिप्लोमा…”
“खूप शिकला आहेस, तरीही इतकं हलकं काम करतोस?”
“नाइलाज आहे सर. पोटाची खळगी भरण्यासाठी कधीकधी दोन-दोन दिवस काम मिळत नाही. जीव वैतागून जातो. कशाला जगायचं? उद्यापासून मला झोपडी सोडायला सांगितलं आहे. कुठे जाऊ? आम्हांला थोडंफार मिळत ते तुम्ही हिसकावून घेता. उद्या-परवा हे रोबो आमची अशा नोकरीतून हकालपट्टी करतील. तुम्हां उच्चभ्रू, श्रीमंत लोकांना हे
उपकारी असतील, लाभदायक असतील. आमचे मात्र हे वैरी आहेत. ”
गंगारामच्या विचारांत कडवटपणाची झाक होती. अभयला ती जाणवली. “वैरी? काय बोलतोस तू गंगाराम! मानवाला जे काम अस्वच्छ, गलिच्छ वाटतं, ते करण्यासाठी तर यांना आणलंय आपण. यांच्या कामामुळं शहर स्वच्छ राहील.”
“अभय सर, शहर स्वच्छ राहील; पण ते आमच्या उपाशी पोटांना काय उपयोगाचं? आम्हांलाही वाटतं स्वच्छ रहावं, नाल्याकाठी राहू नये, घाण पाणी पिऊ नये, पण आमचा नाइलाज आहे. अस्वच्छ राहण्याचा आम्हांलाही तिटकारा येतो; चिडतो आम्ही, समाजावर; पण पिऊन टाकतो हा संताप, केवळ पोटासाठी. “गंगाराम तू हुशार दिसतोस, खूप विचार करतोस. आत्ता रात्री तू या दोघांचा सांभाळ कर. मी तुला रोजंदारीचे पैसे देईन. गेटच्या आत, ओट्यावर बस तू, हे दोघे तुझ्या शेजारी उभे राहतील. रात्रभर तू जागा राहा, झोपू नकोस. तुझ्या झोपडीतून तुला कोणीही हाकलणार नाही. मी हमी देतो.” अभयनी काम दिले, राहण्याची व्यवस्थापण केली. आय अॅम लकी. प्रथमच एक आनंदी घटना घडली आपल्या आयुष्यात. गंगारामचा चेहरा फुलला.
रस्ता अगदी शांत होता. रात्री एक-दीडचा समय म्हणजे खरी मध्यरात्र. सोसायटीच्या सर्व फ्लॅट्समध्ये अंधार पसरला. मेन गेटवरचा एक पॉवरफुल बल्ब ऑन होता. गंगाराम जागा होता. पोट रिकामे म्हणून झोपही येणार नव्हती. अभयच्या प्रॉमिसचा आनंद, पोट भरण्यास पुरेसा होता! रात्रीचे ठीक तीन वाजले होते. शांतता व अंधार गडद झाले होते.
गेटसमोर काळ्या रंगाची कार थांबली. साहेबराव कॉन्ट्रॅक्टर व त्याचे तीन कामगार गाडीतून उतरले. सर्वांच्या हातांत लोखंडी सळ्या होत्या. साहेबरावाने गंगारामची मानगूट पकडली, दोन-चार सर्वोच्च शिव्या हासडल्या. कामगारांना तो ओरडून म्हणाला, “अरे, हेच ते दोघे! रमेश व सुरेश. ठोका त्यांना पायावर, पाठीवर जबरदस्त हाणा. गुडघे जायबंदी करा. आत्ता उभे आहेत, त्यांना आडवे करा. पुन: उठले नाही पाहिजेत. माझे काम हिसकावता काय? जित्ता सोडतो आत्ता, पुनः आलात इकडे, तर खतम करीन.” दोघेही जमिनीवर पडले. ओरडले नाहीत, विव्हळले नाहीत.
“मेले वाटते, लई बेस, मरू द्या साल्यांना.’
“गंग्या, तोंड उघडशील तर तूही मरशील. ”
त्या दोघांच्या शरीरावर साहेबरावाने लाथा हाणल्या. सारा खेळ दहा मिनिटांत आटोपला. गंगारामचे पाय लटपटू लागले.
छाती धपापली. तो खूप घाबरला. पळून जावे इथून. पण त्याने तसे काही केले नाही. तसाच ओट्यावर बसून राहिला.
ठीक सात वाजता मॅडमचा फोन आला. “अभय, रमेश, सुरेशचा झपाटा कळला मला. अभिनंदन तुझं! अजूनही बातमी टी. व्ही. वर आली नाही. म्हणूनच आज सकाळी ठीक दहा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊ आपण, टी. व्ही. वर दाखवू, नालेसफाईचा कार्यक्रम, रमेश- सुरेशचा पराक्रम. खूश होतील सर्व नागरिक. देशात घडलेली ही अशी पहिली घटना आहे. कळू दे सर्वांना, आपली डिस्कव्हरी. ” ““मॅडम, इकडे थोडी गडबड झाली आहे. रात्री कोणीतरी अज्ञात इसमांनी त्या दोघांवर हल्ला केला. जायबंदी केलं त्यांना, हातपाय तोडलेत. या क्षणी ते आडवे पडले आहेत, त्यांना उठता येत नाहीय. ” “हॉरिबल! आय अॅम शॉकड् !” मॅडमचा संताप अभयला फोनवर जाणवत होता. “कॅन्सल करू माझा प्लॅन. ”
“त्याची काही आवश्यकता नाही, फक्त प्रक्षेपणाची वेळ बदला. तुमची सकाळी दहा वाजताची कॉन्फरन्स आपण दुपारी चार वाजता घेऊ.’
““पण ते दोघे? झोपलेले दाखवणार आपण?”
“नाही मॅडम, चार वाजता ते अगदी फिट, उभे असतील.”
“व्हॉट? ते पुन: पायांवर उभे? कसं शक्य आहे? ”
“मॅडम, अगदी पायांवर उभे. आमच्या कंपनीचा दुरुस्ती विभाग
टोकियोला आहे. तेथील रिपेअरिंग सेक्शनला मी त्या दोघांचे फोटो ट्रान्स्फर केलेत. त्यांच्या शरीरातील चिप्सचे फोटो ट्रान्समिट केले. त्यांचा मेसेज आला आहे. भारतीय वेळेनुसार ते दोघेही, दुपारी चार वाजता आपल्या पायांवर उभे राहतील. ”
मॅडम थक्क झाल्या.
“सिंम्प्ली अनबिलेव्हेबल”
“बट, इट इज टू. यू विल वॉच अॅट फोर ओ क्लॉक.’
“अभय आर यू शुअर?”
“येस मॅडम, हंड्रेड पर्सेट.’
कॉन्फरन्स ठीक दुपारी चार वाजता. टी. व्ही. वर दर पंधरा
मिनिटांनी घोषणा येत होती.
साहेबरावाच्या घरी, हॉलमध्ये पाच-सहा मंडळी बसली होती. “साहेबराव, तुमच्या पोरांनी लई विचका करून ठेवला! सगळा कचरा झाला आहे. ” भाकरेनी चिंता व्यक्त केली. “भाकरे, ही घोषणा म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. मी स्वतः त्यांचे दोन्ही हातपाय उचलून पाहिले. पार लुळे, पांगळे झाले होते. “साहेबराव, तुम्ही शुद्धीवर नसाल. जास्तच घेतली होती का रात्री?” भाकरेचा प्रश्न बोचक, तसाच खोचकही होता. ‘भाकरे, माझी थट्टा करू नकोस, महागात पडेल!” साडेतीन वाजले. सर्व जण चारची वाट पाहत होते. “साहेबराव, काढा बाटली. आधीच साजरा करू आपला विजय! मॅडमचा पराभव, डिफीट!” “अवश्य! माझा अपमान केला सर्वांसमक्ष माझा इन्सल्ट? ” भाकरेला आधीच चढली होती.
दुपारचे चार वाजत होते, प्रत्येक घरातला टी. व्ही. ऑन होता. मॅडमनी प्रस्तावना केली. चोक झालेले पाइप्स, नाले दाखविले. त्यानंतर स्वच्छ दाखविले. स्वच्छ, कचऱ्याचा तुकडाही नाही. पाणी, गटार स्वच्छ वाहत होते. कुठेही न थांबता.
“आता येत आहेत रमेश व सुरेश, खरे किमयागार!” मॅडमनी जाहीर केले. दोघेही स्ट्रेचरवर झोपलेले होते. अभयने आपल्या लॅपटॉपवरून मेसेज दिला. ‘ओके’, जपानच्या मुख्य ऑफिसचा संदेश आला. अभयने स्विच प्रेस केला.
प्रदीर्घ झोपेतून जागे झाल्यासारखी त्या दोघांची हालचाल सुरू झाली, पायांत बळ आले, हात लांब झाले, पाठ ताठ झाली.
दोघेही चक्क उभे, स्वत:च्या पायांवर! घरोघरी टाळ्यांचा गजर! “कमाल केलीस तू अभय !” मॅडमनी पाठ थोपटली अभयची.
“काय जादू केलीस?’
“नाही मॅडम, ही जादू नाही. हा आहे तंत्रज्ञानाचा, रोबोटिक विज्ञानाचा दृश्य आविष्कार; अंतरिक्षातील बिघाड पृथ्वीवरून दुरुस्त करतो आपण, तसलाच हा यशस्वी प्रयोग.” “अभय, ज्यांनी हल्ला केला, त्यांची कृती, आवाज, चेहरा पाहू शकू आपण? त्यांचं बोलणं ऐकू शकू? ” “अवश्य ऐकू शकतो! त्यांना मेमरी आहे, त्यांच्यासमोर जे घडलं, ते प्रत्यक्षच पाहा.” अभयचा आत्मविश्वास जबरदस्त होता. “पाहा ही चित्रं.” पडद्यावर भराभर चित्रे येऊ लागली.
“साहेबरावाचा आवाज स्पष्ट होता, “तोडा त्यांचे हातपाय! पुनः साले उभे नाही राहिले पाहिजेत! गंग्या, जे पाहिलं ते विसरून जायचं, नाहीतर जित्ता गाडीन!” साहेबराव उभा, स्वच्छ दिसला. कामोठे, रमेश-सुरेशला चोवीस तासांचं पोलीस -संरक्षण द्या. डीएसपी सरांना फोन करा, साहेबरावाला ताब्यात घ्या म्हणाव! आणि हो, अभयच्या नागरी सत्काराची तयारी करा.
द. व्यं. जहागीरदार
विज्ञान कथालेखक
dattatrayajahagirdar@gmail.com
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील द. व्यं. जहागीरदार यांची ही पूर्वप्रकाशित कथा
Leave a Reply