नवीन लेखन...

मूर्ती लहान पण …

कॉँकॉर्ड

काळ – १९९७ चा ऑगस्ट महिना. स्थळ – क्वीन्स बिल्डिंग, टर्मिनल २ जवळ, हीथ्रो विमानतळ, लंडन. या बिल्डिंगच्या वर, ६०-७० फुट उंचावर  ‘Spectators view’ म्हणून एक  टेरेस ओळखलं जात होतं. मी, बायको व मुलगा जिना चढून वर गेलो. बघ्यांची गर्दी होती.  त्यात विमान अभ्यासक होते.  हे विमान अभ्यासक म्हणजे एक वेगळीच जमात आहे. हॅम रेडियोवरुन नियंत्रण कक्षाकडून याना माहिती मिळते. तज्ञ असतात हे लोक. कॅमेरे, दुर्बिण, रेकॉर्डर वगैरे घेऊन आलेले असतात. पाण्याची बाटली, सॅंडविच, बर्गर असा जामानिमा करून आराम खुर्ची वर वाचत पडलेले असतात. पाहिजे त्या विमानाची चाहूल लागली की पुढे होतात.

येणार्‍या  विमानाच्या दिशेने सर्वांचे डोळे लागले होते. एका पाठोपाठ चार दिवे ठिपक्या सारखे हवेत दिसत होते. उतरण्यासाठी रांगेत असलेली विमाने होती ती. पुढे असलेले विमान आता दिसू लागले. विमानाचा प्रकार, विमान कंपनी, मानचिन्ह, आकार, वैमानिकाची खिडकी स्पष्ट दिसू लागले. ते विमान उतरले. मग एका विमानाचे उड्डाण झाले. त्यानंतर विमान अभ्यासक व प्रेक्षक पुढील आगमन पाहण्यासाठी चांगली जागा शोधू लागले. चलचित्रण, फोटो, ध्वनिमुद्रण यांची तयारी झाली.  दुर्बिणी सज्ज झाल्या. दिव्याचा ठिपका जाऊन एक पक्षी येत असल्याचे दिसले. ताठ उंच मान, जमिनीला टेकण्यास तयार झालेले पाय असा गरूड येत आहे असे वाटले. पण ते विमान होते. आकार लहानच होता, पण आवाज मोठा. विजांचा कडकडाट व्हावा तसा ध्वनी करीत विमानाने चाके टेकवली. वेग कमी झाला व ते टर्मिनल कडे वळले. या अर्ध्या- एक मिनिटात घडून गेलेले नाट्य अनेकानी कॅमेराबद्ध केले. आणलेले सामान बॅगेत भरले व काही जण तेथून परत निघाले. ‘लग्नात अक्षता पडल्यावर कशाला थांबायचे?’ च्या चालीवर, ‘आता आणखी काय पाहायचे?’ अशा विचारात मंडळी निघाली. आत्ता उतरलेला तो छोटा पक्षी म्हणजे कॉँकॉर्ड विमान. आम्हीही हेच दृष्य पाहण्यासाठी गेलो होतो. हीच ती लहान मूर्ती. खरोखर, हा थरार अनुभवल्यावर, इतर विमाने उतरताना दिवाळीतला बॉम्ब फुटल्या नंतर लवंगी फटाका वाजावा तशी वाटली. त्यानंतर अनेक वेळा मी कॉँकॉर्डचे उड्डाण व उतरणे वेळापत्रकानुसार ठरवून बघितले.

कॉँकॉर्ड ची लहान मूर्ती दिसते कशी? जंबोजेट (747) च्या शेजारी हे उभे असेल तर बाबा व छोटे मूल यांच्या जोडीसारखे दिसते. कॉँकॉर्ड सर्वच बाबतीत इतर विमानांपेक्षा वेगळे आहे. नाकापासून चाकापर्यंत व पंखापर्यंत  सगळं वेगळं. स्वनातीत (Supersonic) प्रकारातलं  हे काही पहिलं विमान नाही. वायुदलाकडे अशी लढाउ विमान आधीपासून आहेत. पण प्रवासी वाहतुकीच्या निकषावर मात्र पहिले. याची प्रवासी सेवा २७ वर्ष चालली. British Airways व Air France ने ही सेवा पुरवली. १९७६ मधे सुरू होऊन २००३ मधे ती बंद झाली. मग आता ही विमाने आहेत कुठे? जगभरात प्रदर्शनीय वस्तू म्हणून ठेवली आहेत. हीथ्रो च्या टर्मिनल ४ च्या जवळ हे अजुनही दिसेल.  कॉँकॉर्ड चे नाक १६ फुट लांब असते. टॅक्सीईंग आणि लाइन-अप च्या वेळेला पायलटला याचे भान ठेवावे लागते. उडताना व उतरताना पायलटला धावपट्टी दिसावी म्हणून त्याचे नाक चार प्रकारे हलविता येते.  कॉँकॉर्ड  विमान उभे असताना बगळा वाटते तर 747 हे बदकासारखे दिसते. एकाचे पाय थोडे उंच तर दुसर्‍याचे आखूड. कॉँकॉर्डचे  पंख  फुलपाखरसारखे मोठे व पसरट तर 747 चे पंख चतुरासारखे लांब. कॉँकॉर्डची चार इंजिन्स लपवून ठेवलेली वाटतात तर 747 ची चार इंजिन्स खुल्लं खुल्ला दिसतात.  कॉँकॉर्डचा उड्डाणाचा व उतरण्याचा वेग  इतर विमानपेक्षा जास्त आहे. प्रति तास १३५० मैल वेग गाठण्यासाठी ते ५५,००० – ६०,००० फुट (११ हून जास्त मैल) उंचीवरुन उडते. पृथ्वीची वक्रता या उंचीवरुन लक्षात येते. पृथ्वीच्या स्वांगभ्रमणापेक्षा या विमानाचा वेग अधिक असल्याने सूर्य पश्चिमेला उगवत असल्याचे दिसते. हाच प्रकार काही सबसॉनिक विमानाने प्रवास करताना Iceland च्या उत्तरेकडून जाताना दिसतो. कॉँकॉर्ड ३ तासात लंडन हून न्यूयॉर्कला जाते तर 747 ला ७ तास लागतात. (टायटॅनिकचा प्रवास १३७ तासांचा ठरला होता.)

कॉँकॉर्डचे उड्डाणही खासच. Line-up साठी जाणार्‍या विमानांच्या रांगेत ते शोधावे लागते. पण उड्डाण करण्यास सज्ज होताच सर्व बघे आणि नियंत्रण कक्षातले कर्मचारी सुद्धा माना वळवून त्याची भरारी बघतात. अफाट वेग, कडकडाट यासह हे यांत्रिक गरूड झेपावते. काही वेळात ते दिसेनासे होते व स्फोटक ध्वनीलहरी  निर्माण होतात, एक मोठा आवाज कानावर आदळतो, (Sonic Boom). हाच तो काचा फोडणारा व इमारती हादरवणारा आवाज.  लंडनहून निघालेले प्रवासी पेय-पान करून थोड्या गप्पा मारतात  न मारतात तोच अट्लॅंटिक महासागर पार केल्याची वार्ता कळते व उतरण्याची तयारी सुरू होते. एकदा कॉँकॉर्डने २ तास ५३ मिनिटे इतक्या कमी वेळात हा प्रवास केला आहे.

त्या काळी असे संवाद होत.

जेसन आपल्या मित्राला  सांगतोय,

“हेलो जॉन, उद्या  मी लंडनहून नाश्ता करून निघतो. आपण न्यूयॉर्कमधे ब्रेकफास्ट मीटिंग घेऊ. दुसरे एक काम उरकून मला संध्याकाळी लंडनला परत आलेच पाहिजे. उद्या माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे”.

आणि  दुसर्‍या दिवशी  पत्नीला सांगतोय,

“हाय स्वीटहार्ट जेनी, मी हा गेलो आणि हा आलो. काळजी करू नकोस”.

एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी नाश्ता करण्याची काय सोय आहे बघा. ठिकाणामधील अंतर फक्त ३४७० मैल आहे.

Concord म्हणजे सामंजस्य, मान्यता. ब्रिटन व फ्रांस यांच्यात करार होऊन Supersonic विमानांची निर्मिती करण्याचे ठरले. विमानाला नाव देताना ‘e’ जोडला गेला Concord च्या पुढे. म्हणून ‘Concorde’ असे त्याचे बारसे झाले.  Air France च्या कॉँकॉर्डला इ.स. २००० मधे अपघात झाला. पॅरिसच्या  द गॉल विमानतळावरून उड्डाण होत असताना टायर फुटला, त्याचा तुकडा इंधन टाकीवर आदळला, आग लागली. दोन  मिनिटात विमान कोसळले. विमानातील सर्व १०९ व जमिनीवरची ४ माणसे दगावली.  नंतर ९/११ ची घटना घडली. पण ही सेवा बंद होण्यास आर्थिक कारण होते.  हवाई वाहतुक क्षेत्रातली ही दुर्दैवी घटना होती. पुढे मला कळले की हीथ्रो वरील प्रेक्षक गॅलरीही बंद झाली. अनेकानी या गोष्टीचा निषेध केला. मलाही खूप वाईट वाटले. आता ऐकतो की कुठेतरी हायवेच्या कडेला थांबून विमाने पाहावी लागतात लंडनला. कॉँकॉर्डशिवाय विमाने पाहणे म्हणजे सचिन शिवाय क्रिकेटची मॅच पाहणे.  दोघांची मूर्ती लहानच होती, पण…   खरं ना?

— रविंद्रनाथ गांगल 

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

1 Comment on मूर्ती लहान पण …

  1. मस्त माहिती मिळाली.सहज आणि सोप्या भाषेत.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..