जहाजावर सहकाऱ्यांकडून (बऱ्याच वेळा पदाने वरिष्ठ) खाण्याच्या बाबतीत नेहमी येणारा अनुभव आणि एका स्टेशनवर पाहिलेल्या एका प्रसंगातील विरोधाभास. जहाजावर महिन्याला हजारो डॉलर्स किंवा एका हाताची पाचही बोटं मोजायला कमी पडावीत एव्हढे लाख रूपये पगार घेणारे सहकाऱ्यांची कीव वाटावी आणि वयाची एंशी ओलांडलेल्या एका गरीब आजीच्या हातातील घास पाहून मन हेलावणारा प्रसंग. शेळ्या मेंढ्या आणि गुर ढोरं गवत झाडाचा पाला आणि राखण नसलेल्या शेतातील भाजीपाला पीकं खातात. मनुष्यप्राणी आगीचा शोध लागण्यापूर्वी इतर प्राण्यां सारखाच कच्चा भाजीपाला किंवा मांस मच्छी खात होता. मनुष्यप्राण्याची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसा आजचा माणूस म्हणून तो शिजवलेले , तेल, मीठ, मसाला घातलेले चवदार अन्न खाऊ लागला. असं म्हणतात की आजचा माणूस हा पोटासाठी कमवतो म्हणजे पोटभर आणि तेही चवदार खाणं खाण्यासाठी. काही काही लोकं तर असं बोलतात ज्या पोटासाठी कमवायचे त्या पोटाला चांगलं खायला मिळालं नाही तर त्या कमावण्याचा काय उपयोग. हल्ली बाहेरचे चमचमीत खाणे लहान मोठे निमित्त काढून हॉटेल मध्ये जेवायला जाणे बऱ्याच जणांना परवडते. हॉटेल मध्ये अन्न ज्या पाण्यात शिजवले जाते, इतर द्रव पदार्थ ज्या पाण्यात बनवले जातात, ते पाणी पिण्यायोग्य नसेल असं समजून बिसलेरीचे बाटली बंद पाणी छापील किंमती पेक्षा जास्त पैसे मोजून विकत घेऊन पितो. अन्न शिजवताना पाणी उकळले जाते, पण हॉटेल मधील सर्व पदार्थात खरेच असे घडते का. खरं म्हणजे हा सुद्धा एक विरोधाभासच आहे. असो.
जहाजावर सगळ्यांसाठी कॅप्टन पासून ते सर्वात खालच्या रँक वरील ट्रेनी साठी एकाच प्रकारचे अन्न शिजवले जाते. कोणासाठीही काही वेगळं किंवा स्पेशल केले जात नाही. बारा तेरा वर्षांपूर्वी चाळीशी ओलांडलेला एक कॅप्टन जहाजावर जॉईन झाला होता, मी त्यावेळी त्या जहाजावर फोर्थ इंजिनिअर होतो. संध्याकाळी साडे सहा वाजल्यापसून डिनर साठी इंजिनीअर्स आणि डेक ऑफिसर्स मेस रुम मध्ये येऊन आपापले जेवण वाढून घेत होते. चपाती, चिकन करी, अंडा भुर्जी,मिक्स भाजी, डाळ आणि राईस असं सगळं नेहमी प्रमाणे वेगवेगळ्या बाऊल्स मध्ये मांडून ठेवले होते. आज त्या बाऊल्स मध्ये आणखीन एका बाऊल ची भर पडली होती. ज्यामधे गाजर, बटाटे, ब्रोकोली, फ्लॉवर, मटार, बीन्स अशा सगळ्या भाज्यांचे मध्यम आकारांचे काप करून त्या उकडून ठेवल्या होत्या. मी अंडा भुर्जी आणि भातावर चिकन करी वाढून घेतली माझ्या मागे बत्ती साब आला. त्याने चलो आज बॉइल्ड व्हेजिटेबल लेके देखते हैं म्हणून त्या उकडलेल्या भाज्या प्लेट मध्ये वाढून घेतल्या. आम्ही दोघं बाजू बाजूला बसलो, चार साब आपने आज नया डिश नही लिया असं विचारले, मी म्हटले उसमे ना तो तेल हैं ना मसाले मैं नही खा पाऊंगा असे बोलून मी चिकन करी आणि भात कालवून जेवायला लागलो.
बत्ती साब बोलला अरे इसमे तेल और मसाले क्या नमक भी नहीं हैं. त्याने स्टिवर्डला हाक मारली आणि सांगितले ओय यार इन बॉइल्ड व्हेजिटेबल मे नमक डालना भुल गया क्या चीफ कुक? त्यावर स्टिवर्ड म्हणाला अरे नंही बत्ती साब , कॅप्टन साब दो बार आके बताके गये सिर्फ बॉईल करना उसमे नमक भी नहीं होना चाहिए. बत्ती साब ने दोन्ही हाताने ये क्या चीज हैं भई असं सुचवत स्प्रिंकलर मधुन मीठ आणि काळी मिरी उकडलेल्या भाजीवर शिंपडली आणि जेवायला सुरुवात केली. पाच मिनिटांनी चीफ इंजिनिअर आणि कॅप्टन जेवायला आले, चीफ इंजिनिअर ने पण स्टीवर्डला बॉईल्ड व्हेज बघून डोळ्यांनी ये क्या हैं असे विचारले, स्टिवर्ड ने त्याला डोळ्यानेच कॅप्टन कडे इशारा करून कॅप्टनची ऑर्डर असल्याचे खुणावले. जहाजावर रूटीन पेक्षा वेगळं काही दिसलं की प्रत्येकाच्या मनात आज ये नया क्या हैं क्यूँ हैं असे प्रश्न पडतात.
चीफ इंजिनिअर पन्नाशी ओलांडलेला होता, कॅप्टन पेक्षा वयाने जवळपास दहा वर्ष जास्त मोठा असेल.
कॅप्टन ने त्याच्या प्लेट मध्ये एक चपाती थोडा भात आणि फक्त बॉईल्ड व्हेजिटेबल घेतल्या. चपाती आणि भाता पेक्षा भाज्या जास्त घेतल्या.
कॅप्टन आणि चीफ इंजिनिअर दोघेही बाजूच्या टेबल वर जेवायला बसले. कॅप्टन ने जेवायला सुरुवात केली. चीफ इंजिनिअरने उकडलेल्या भाजीचा एक घास खाल्ला आणि त्यावर मीठ टाकून मिठाचे स्प्रींकलर कॅप्टन कडे द्यायला लागला, कॅप्टन ने हातानेच मला नकोय असं खुणावले. कॅप्टन बोलला बडा साब मुझे हार्ट का डर लगता हैं मैं पिछले दो साल से ऐसे ही खाना खा रहा हुं. चीफ इंजिनिअर म्हणाला आपको पहले अटॅक आ चुका हैं क्या? मेडिकल रिपोर्ट्स मे इंडीकेशन्स हैं क्या? कॅप्टन म्हणाला नही बडा साब, इट्स लाईक आप इंजिन मे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करते हैं ना ब्रेकडाऊन अवॉइड करने के लिये. या फिर बोलते हैं ना प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. चीफ इंजिनिअर हसला आणि बोलला, कॅप्टन साब हम इन्सान हैं मशीन नही हैं,अरे साब आपको हार्ट का डर लगता हैं लेकीन हम तो भुके मर जायेंगे लेकीन ऐसा खाना मशीन के तरह रोज रोज नही खा पायेंगे. जहाजावर नोकरी करतांना त्या कॅप्टन सारखेच आणखीन बरेच जण मिळाले कधी सेकंड इंजिनिअर कधी चिफ इंजिनिअर जे बिन साखरेचा , बिन दुधाचा चहा प्यायचे, अंड्यातील पिवळा बलक वेगळा काढून फक्त एग व्हाईट चे ऑमलेट, एवढंच काय त्या ऑमलेट ला लागलेले तेल टिश्यू पेपर ने टिपून मगच खाणारे. दिवसातील तासन तास ट्रेडमिल वर धावणारे. शिप वर सुद्धा बाटली बंद पाणी पिणारे. महिन्याला लाखो रुपये कमावणारे लोकं खाण्याच्या बाबतीत जेवणात तेल नाही मीठ नाही मसाले नाहीत नुसतं उकडलेले खाताना आरोग्याच्या बाबतीत एव्हढी काळजी घेत असताना बघून त्यांची खरोखरच कीव यायची. एका दिवशी स्टेशन वर एक आजी दुपारी तीनच्या सुमारास प्लॅटफॉर्म वर जेवताना नजरेस पडली. तिचे डोळ्याचे ऑपरेशन झाले असल्याने बहुधा तिने काळा गॉगल घातला असावा. जेवायला बसताना तिने पायातील चपला बाजूला काढून ठेवल्या होत्या. प्लॅटफॉर्मवर खाली कागद किंवा स्वतःच्या चपलांवर न बसता ती धुळीत बसली होती. तिने पुढ्यात एका पेपर वर गुंडाळलेल्या चपात्या सोडल्या होत्या. एक घास नुसत्या कोरड्या चपातीचा तोंडात घातल्यावर ती तीच्याकडील असलेल्या प्लास्टिकच्या पिशवी मध्ये असलेल्या मेथीच्या जुडीतील मेथीची काही पानं खुडून खात होती. तोंडात जास्त दात नसल्याने शांतपणे एक एक घास ती चघळून चघळून आणि चवीने खात होती. तिच्याकडे असलेल्या चपात्या तिने खाल्ल्या प्लास्टिक च्या पिशवीत असलेल्या मेथीच्या जुडीतील सगळ्या काड्या एकवटून व्यवस्थित केल्या. जवळच्या बाटलीत प्लॅटफॉर्म वरील नळाचे भरून आणलेले पाणी घटा घटा प्यायली. मेथीची कच्ची पानं अशा कोरड्या चपातीच्या सोबत खाताना पाहून मला वाईट वाटले, कारण आमच्या घरी तेल, कांदा, लसूण , राई जिरे यांच्या फोडणी शिवाय मेथीची भाजी बनत नाही, त्या फोडणी दिलेल्या भाजीवर किसलेले खोबरे सुद्धा घातले जाते. वाफवलेल्या मेथीच्या भाजीत सुद्धा लसूण आंनी थोडेस तेल व कांदा आणि चवीपुरते मीठ घातलेच जाते ना. कदाचित असे मेथीच्या नुसत्या कच्च्या पाल्या सोबत कोणी खात देखील असतील. त्या आजीने पिशवीत घेतलेली मेथीची जुडी संध्याकाळच्या भाजी साठी घेतली होती की पुन्हा संध्याकाळी ती तसेच चपाती सोबत खाणार होती? तिच्या घरी कोण कोण असेल ? चपात्या बनवून देणारे असेल तर मग त्यांवर भाजी नाहीतर निदान लोणच्याची एखादी फोड किंवा थोडीशी चटणी पण कोणी का दिली नसावी? नाईट ड्युटी करणारा पंच्याहत्तरी ओलांडलेल्या एका वॉचमनला मी रात्री साडे नऊ च्या सुमारास फक्त लाह्या पाण्यात भिजवून खाताना पहिले आहे. त्याला विचारले की घरसे खाना खाके आये हो क्या, त्यावर तो म्हणाला की नहीं आज रात यही हमारा रात का खाना हैं. कभी कोई बचा हुआ खाना लाके देते हैं,जीस दिन कोई कूछ देता नही उस दीन ऐसे ही पेट भरता हुं.
शिजवलेल्या गरमागरम भात आणि त्या भातासोबत ताटात एका कोपऱ्यात अर्धा चमचाभर मीठ वाढून घेऊन. फक्त मीठ आणि भात खाणारा एक तरुण परप्रांतीय सुद्धा नजरेला पडला होता. कोणाला खाताना बघु नये, कोणाच्या ताटात कोण काय आहे पाहू नये ते उगाच म्हणत नसावेत. ज्यांना खायला चांगले मिळत नाही त्यांना ताटात पंचपक्वान्न बघून हेवा वाटल्याशिवाय रहात नसेल. ज्यांना चांगल खायला मिळत असेल त्यांना कोरड्या आणि रिकाम्या ताटाकडे बघून हळहळ वाटत असेल. कच्ची मिरची, किंवा ठेचा आणि कांद्या सोबत भाकरी खाताना ऐकले आणि पाहिले आहे. आपण घरी बनवलेल्या, आईने ,बायकोने बनवलेल्या जेवणाला कधी कधी किती नावं ठेवतो, जेवणावर राग काढतो, ही भाजी अशी का केली, ह्याच्यात हे कमी आहे ,ते कमी आहे अशी नावं ठेवतो. पण कितीतरी जणांच्या नशिबात अशा भाज्याच नसतात आणि कितीतरी जणांच्या ताटात चार चार भाज्या मिळत असुनही त्यांना खायच्या नसतात. वयाची चाळिशी उलटल्यावर आजारपणाची भीती बाळगणारी लोकं आणि एंशी पलीकडील वृद्धत्व येऊनही असहायपणे फिरणारी लोकं किती विरोधाभास. एकीकडे भरपूर असूनही जे हवं ते खाता येत नाहीत अशी असमाधानी लोकं आणि काहीच नसूनही जे मिळेल ते खाणारी समाधानी लोकं म्हणजे किती विरोधाभास.
051223
-प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
कोन, भिवंडी,ठाणे.
Leave a Reply