रात्री दहाची वेळ होती. डाॅक्टर रुग्णालयातील कोरोना पेशंटना त्यांच्या राऊंडमध्ये भेट देत होते. सोबतच्या नर्सला आवश्यक त्या सूचना देत होते. शेवटच्या स्त्री पेशंटकडे आल्यावर त्यांनी तिला नाव विचारले. ‘पार्वतीबाई’ असे सत्तरीतल्या त्या मावशींनी सांगितले. डाॅक्टरांनी केस पेपर पाहून नर्सला तिला उद्या डिस्चार्ज द्या, असे सांगितले. पार्वतीने डाॅक्टरांचे बोलणे ऐकून काहीच प्रतिक्रिया दिली नाही, याचे नर्सला आश्र्चर्य वाटले. कारण गेले पंधरा दिवस कोरोनाशी सामना करुन पार्वती आता पूर्णपणे बरी झाली होती.
सकाळी दहाच्या सुमारास डाॅक्टरांच्या समोर पार्वतीची फाईल आली. त्यांनी पेशंटच्या संपर्काच्या चौकटीतील तिच्या मुलाचा मोबाईल लावला. पलीकडून बेल वाजत होती, मात्र फोन काही उचलला गेला नाही. डाॅक्टरांना आठवले, पार्वतीबाईंचा मुलगा सुधीर, हा रिक्षा ड्रायव्हर होता. कदाचित ट्रॅफिकमध्ये असल्याने त्याने फोन उचलला नसावा. तासाभराने डाॅक्टरांनी पुन्हा प्रयत्न केला, तेव्हा सुधीरने फोन उचलला. त्याची आई बरी झाल्याचे सांगून, तिला घेऊन जाण्याची विनंती डाॅक्टरांनी त्याला केली. ते ऐकून गणेश आनंदी होण्याऐवजी गप्प झाला. डाॅक्टर ‘हॅलोऽ हॅलोऽ’ करीत राहिले, मात्र प्रतिसाद काही मिळाला नाही.
अनेकदा प्रयत्न केल्यानंतर डाॅक्टरांनी हे प्रकरण पोलीसांकडे सोपवलं. कारण नियमानुसार बऱ्या झालेल्या पेशंटना रुग्णालयात ठेवले जात नाही. पोलीस आले. त्यांनी पार्वतीला गाडीत घेऊन सुधीरचे घर गाठले. एव्हाना संध्याकाळ झाली होती.
घराशी गाडी पोहचल्यावर पोलीस पार्वतीला घेऊन उतरले आणि पाहतात तो काय? सुधीरच्या घराला कुलूप होते! पोलीस चक्रावून गेले. त्यांनी फोन लावला. सुधीरने उत्तर दिले, ‘मी पत्नीसह बाहेरगावी आलोय. मी काही आता माझ्या आईला घरात घेणार नाही. तुम्ही तिला कुठेही ठेवा. मला कोरोना झालेली आई घरात नको आहे.’ पोलीस हतबल झाले. आता पार्वतीला कुठे ठेवायचं? त्यांनी गाडी पुन्हा रुग्णालयाकडे वळवली. डाॅक्टरांना घडलेली परिस्थिती सांगितली व पार्वतीला काही दिवसांसाठी ठेवून घेण्यास सांगितले. डाॅक्टरामधील ‘देवदूता’ने ते मान्य केले व पार्वती पुन्हा बेडवर येऊन झोपी गेली.
ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना पुणे शहरात घडल्याची बातमी आजच्या ‘दैनिक लोकमत’ मध्ये आली आहे. आई हे ‘दैवत’ मानणारी आपली संस्कृती आता लोप पावत चालली आहे. ज्या माउलीनं जन्म दिला, हे जग दाखवलं, तिला सांभाळण्यास नकार देणारा हा सुपुत्र किती कठोर हृदयाचा असेल. एकवेळ पुरुष कसेही व कुठेही दिवस काढू शकतो, मात्र स्त्री, तीदेखील सत्तरी गाठलेली. ती घराबाहेर कशी राहू शकेल? याचा साधा विचारही या मुलाच्या मनाला शिवला नसेल का? आईबद्दल काही मतभेद असतीलही, तरीदेखील त्याची एवढी क्रूर शिक्षा तिला तो कशी देऊ शकतो? पार्वतीची सून, ती सुद्धा एक स्त्रीच आहे ना? तिला आपल्या सासूबद्दल थोडीदेखील सहानुभूती असू नये? उद्या त्यांनाही वृद्धत्व येणार आहे, याची थोडी तरी जाणीव ठेवावी.
या सुधीरने शाळेत ‘श्यामची आई’ हा धडा वाचला असता तर त्याला ‘आईची महती’ कळली असती. संस्कार नसतील, संगत चांगली नसेल तर माणूस आणि पशू यात फरक काही रहात नाही. काळ बदलत चालला आहे, माणसंही बदलत चालली आहेत.
रात्रीचे नऊ वाजले होते, पार्वतीबाईंना जेवणासाठी नर्स उठवत होती. पार्वती उठली. समोर जेवणाचे ताट पाहून तिच्या मनात विचार आला ‘माझा सुधीर जेवला असेल का? त्याला भूक लागली की, काही एक सुचत नाही.’
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२४-३-२१.
Leave a Reply