सी. टी. अॅन्जियोग्राफीत जर कॉरोनरी धमनीत अडथळा दिसला तर पारंपरिक अॅन्जियोग्राफी करावीच लागते. पारंपरिक अॅन्जियोग्राफी ही ‘गोल्ड स्टॅण्डर्ड’ तपासणी समजली जाते. या तपासणीसाठी एक दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते.
हृदरोगतज्ज्ञ स्वतः ही तपासणी करतात. या हृदीय सुशिरीकरणासाठी (अॅन्जियोग्राफी) जांघेतील ‘फिमोरल’ नावाची धमनी किंवा हातातील ‘रेडियल’ धमनी वापरतात.
तेवढाच भाग बधिर करून त्या धमनीत सुई टोचून त्यातून एक नलिका (कॅथेरट) टाकून ती हृदयातील रक्तवाहिनीपर्यंत नेतात व त्यातून एक रंजक द्रव्य क्ष-किरण अपारदर्शक सोडतात व क्ष-किरण चित्रे घेतात. कॉरोनरी धमनीतील अडथळे या चित्रांमध्ये स्पष्ट दिसतात. अडथळे असल्यास पुढील उपाय विचारात घेतात… १) अॅन्जियोप्लॅस्टी विथ स्टेण्टस्- कॉरोनरी धमनी रुंद केली जाते व स्टेण्टस् टाकतात. नलिका घालण्यासाठी जी धमनी वापरली जाते तेवढाच भाग बधिर केला जातो. २) कॉरोनरी बायपास अभिरोपणाची शस्त्रक्रिया ३) अडथळे नगण्य असल्यास फक्त औषधोपचार. अॅन्जियोप्लॅस्टी स्टेण्टसह करावयाची असल्यास अॅन्जियोग्राफीबरोबरच करणे सोयिस्कर असते. म्हणून अॅन्जियोग्राफी करण्याअगोदर रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना त्याची कल्पना दिल्यास त्यांची मानसिक व आर्थिक तयारी होते. रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी स्वतःच्या शंकानिरसनासाठी पुढील प्रश्न विचारावेत. १) ही कार्यप्रणाली (प्रोसिजर) सुरक्षित आहे का? २) यात तातडीची बायपास शस्त्रक्रिया करायला लागण्याची शक्यता किती आहे? ३) स्टेण्टस् टाकल्यावर ते किती काळ मोकळे राहू शकतात? त्यात अडथळे निर्माण होण्याची/ बंद होण्याचीशक्यता किती आहे? ४) एकूण खर्च किती येणार? स्टेण्टस् अगदी नवीन वापरणार ‘का? याबाबतीत दुसऱ्या तज्ज्ञाचे मत घेण्यासही हरकत नसावी. दोन हृदरोगतज्ज्ञ किंवा कार्डियाक सर्जन यांचे एकाच अॅन्जियोग्रामवर दुमत होऊ शकते; कारण वैद्यकीय शास्त्र हे गणितीशास्त्रासारखे दोन+दोन-चार इतके अचूक नसते.
रुग्णाला मधुमेह असेल तर अॅन्जियोप्लॅस्टीऐवजी बायपासची शस्त्रक्रिया चांगली ठरते. अॅन्जियोप्लॅस्टी ही शस्त्रक्रिया नाही.
डॉ. मनोज प्रधान
मराठी विज्ञान परिषद,
Leave a Reply