नवीन लेखन...

‘कॉटन ग्रीन..’

मुंबईची हार्बर रेल्वे लाईन पश्चिम व मध्य रेल्वेवर राहणाऱ्या मुंबईच्या पांढरपेशा समाजाच्या दृष्टिनं काहीशी दुर्लक्षितच..या हार्बर लाईन मुळे आपल्याला दाना-पाण्याची रसद मिळत असते याची जाणीव फार थोड्या मुंबईकरांना असते. अशा या हार्बर रेल्वे लाईनवरचं ‘कॉटन ग्रीन’ हे एक सर्वसाधारण रेल्वे स्टेशन. या स्टेशनात काही खास आहे याची जाणीव न होणारं..अशा या ‘कॉटन ग्रीन रेलवे स्टेशन’ या चार शब्दात एके काळी बेटा-बेटात विखुरलेल्या आणि रोगट हवामान असलेल्या मुंबई नामक बेटाचं एका महानगरात कसं रुपांतर झालं याचं गुपित सामावलेलं आहे याची आपल्याला कल्पनाच नसते..

‘कॉटन ग्रीन रेलवे स्टेशन’ या चार शब्दातले ‘कॉटन’ आणि ‘रेलवे’ हे दोन शब्द मुंबईला ‘महामुंबई’ बनवण्यास कारणीभूत आहेत. ‘कॉटन’ म्हणजे कापूस म्हणजे मुंबईतल्या गिरण्या आणि १८५३ साली मुंबईत सुरु झालेली ‘रेल वे’ या दोन्ही गोष्टीनी मुंबईला महामुंबई बनवलं. गिरणी आणि रेल्वे यांना मुंबईच्या ‘हेरॉल्डर हिरॉइन्स’ असं म्ह्टलं जायचं. या ‘दोघी’नीच सबंध देशभरातून कष्टकऱ्यांना मुंबईत येण्याचं आवतण दिल व पुढे या कष्टकऱ्यानी आपल्या मेहेनतीने मुंबईला महामुंबई बनवलं. या ‘दोघीं’नी मुंबईला देशाची आर्थिक राजधानी असं बिरूद मिळवून दिलं ते आजतागायत देशातलं इतर कोणतही शहर हिरावून घेऊ शकलेलं नाही..आजही मुंबई वाढतेय, समृद्ध आणि बकालही होतेय त्याला आता गिरण्या नसल्या तरी ‘रेल वे’ कारणीभूत आहेच हे कोणीही नाकबूल करू शकणार नाही..इथे आपण केवळ ‘कॉटन’चा विचार करणार आहोत.

मुंबई3च्या समृद्धीचा आणि ‘कॉटन ग्रीन‘चा खूप जवळचा, म्हणजे आई-मुलाचा, संबंध आहे. मुंबई समृद्ध होण्यास सुरुवात झाली ती सन १७५० नंतर. ह्या पूर्वी कापसाचा व्यापार कल्याण बंदरातून व्हायचा तो १७५० नंतर मुंबईत शिफ्ट झाला आणि नंतर मुंबईने कधीच मागं वळून बघितलं नाही..

पूर्वीच्या ‘अपोलो बंदरा’च्या म्हणजे आताच्या ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या वरच्या अंगाला, म्हणजे आताच्या रेडीओ क्लबच्या जवळपास, ‘आर्थर बंदर’ होते. सन १८३८ मध्ये कुलाबा बेटं ‘कुलाबा कॉजवे’ बांधून मुंबई बेटाशी जोडण्यात आली आणि मोठा कुलाबा, मधला कुलाबा आणि सर्वात शेवटी म्हणजे आर्थर बंदर आहे तो धाकटा कुलाबा अशी तीन वेगळ्या असलेल्या बेटांमध्ये भराव टाकून सलग जमीन तयार करण्यात आली. भरावामुळे तयार झालेल्या या जमिनीचा उपयोग बोटींतून बंदरावर येणार माल साठवणुकीसाठी उपयोग करण्यास सुरुवात झाली. . ब्रिटीश काळात मुद्दाम राखलेल्या अशा मोकळ्या जागांना ‘ग्रीन’ असा शब्द होता. आताच्या एशियाटिक सोसायटीच्या समोर असलेल्या हॉर्निमन सर्कलला पूर्वी एल्फिन्स्टन सर्कल व त्याही पूर्वी ‘बॉम्बे ग्रीन’ असा शब्द होता तो या अर्थानेच. तर, आर्थर बंदराच्या समोरच्या मोकळ्या ‘ग्रीन’मध्ये कापूस उतरायचा व म्हणून हळूहळू त्या मैदानाचे नाव ‘कॉटन ग्रीन’ पडले व पुढे कायम झाले. अर्थात या ठिकाणी फक्त कापूसच यायचा असं नाही तर इतरही समान उतरवल जायचं पण त्यात कापसाचं प्रमाण खूप मोठं असायचं व म्हणून या भागाला ‘कॉटन ग्रीन’ असं नाव मिळाल (सोबत नेटवरून घेतलेला जुना फोटो पाठवत आहे.). हा सर्व कुलाबा बेटाचा भाग. आजही या भागाला कुलाबा असंच म्हटलं जातं.

1-usethisया आर्थर बंदरात देशभरातून कापूस यायचा व इथून पुढे तो जगभरात निर्यात व्हायचा. कापसाच्या मोठ-मोठ्या गाठी मोठ-मोठ्या जहाजांतून आर्थर बंदरात उतरल्या की बंदराच्या समोरच तेंव्हा मोकळ्या असलेल्या मैदानात ठेवल्या जायच्या. त्यांच्या दलालांच्या जागा ठरलेल्या असायच्या पुढे व्यापार वाढू लागला तसं हा व्यापार रेग्युलेट करण्यासाठी सन १८४४ साली या ठिकाणी ‘कॉटन एक्स्चेंज’ बांधण्यात आल. नेमकं सांगायचं म्हणजे कुलाबा येथे आता जी ‘बधवार पार्क’ नावाची रेलवे अधिकाऱ्यांची कॉलनी आहे ना, तिथंच हे ‘कॉटन एक्स्चेंज’ होतं. आपण आज जे पाहतोय ते हार्बर रेलवेवरच ‘कॉटन ग्रीन स्टेशन व तिथ असलेलं कॉटन एक्स्चेंज खूप पुढे, म्हणजे १९२४च्या आसपास निर्माण करण्यात आला. १९४४-४५च्या दरम्यान हे एक्स्चेंजदेखील इथून हलवून पुढे काळबादेवीस नेण्यात आल. ते काही असलं तरी खर ‘कॉटन ग्रीन’ म्हणजे कुलाब्यातील आर्थर बंदराच्या समोरचा भाग.

सन १८६१ साली अमेरिकेत यादवी झाली आणि मुंबईतून होणाऱ्या कापसाच्या व्यापाराला प्रचंड गती मिळाली. इंग्लंडमधल्या कापड गिरण्यांना मुख्यत्वे करून अमेरिकन कापसाचा पुरवठा व्हायचा तो तेथील यादवीमुळे पूर्ण थंडावला आणि मग भारतीय कापसाला अतिप्रचंड मागणी येऊ लागली..अमेरिकेच्या मानाने आपला कापूस तसा दुय्यम दर्जाचा परंतु जिथे कापूसच मिळण्याची मारामार तिथे दुय्यम दर्जाचाही कापूस चालेल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मुंबईतून होणाऱ्या कापसाची मागणी वाढली..१८६१ ते १८६५ अशी चार-पाच वर्षे मुंबईतून होणाऱ्या कापूस व्यापाराचे सुवर्णयुग होते असं इतिहासात नोंदलेलं आहे. या पाच वर्षांनी मुंबईला जागतिक आर्थिक जगतात स्वतःची ओळख मिळवून दिली.

पुढे मुंबईचा सर्वच व्यापार मुंबईच्या पूर्वेस असलेल्या विविध बंदरातून व्हायला सुरुवात झाली आणि कुलाब्याचं कॉटन एक्स्चेंज ‘कॉटन ग्रीन’ या ठिकाणी हलवलं गेल. कुलाब्यातील बंदरं, ‘ग्रीन’ची जागा व समुद्रातील भरणीमुळे तयार झालेली जागा मानवी वस्तीसाठी खुली करण्यात आली.

हार्बर रेलवे मार्गावर सध्याच्या ‘कॉटन ग्रीन’ स्टेशनच्या पूर्वेस आजही एक ब्रिटीश कालीन बांधकाम असलेली इमारत दिसते, तेच कुलाब्याहून १९२४ सालात इथे हलवलेलं ‘कॉटन एक्स्चेंज’. हे कॉटन एक्स्चेंजही पुढे १९४५च्या आसपास काळबादेवी येथे हलवण्यात आल (याचीही आता विक्री झाली असे ऐकण्यात आले.).

जाता जाता –

‘कॉटन ग्रीन’ हा शब्द कसा आला या साठी आणखी एक वेगळी कथाही सांगण्यात येते. सध्याच्या ‘कॉटन ग्रीन’ स्टेशनच्या पूर्वेस असलेली कॉटन एक्स्चेंजची आर्ट-डेको शैलीतली ब्रिटीशकालीन इमारत पूर्वी हलक्या ग्रीन रंगत रंगवलेली होती व म्हणून या परिसराला ‘कॉटन ग्रीन’ म्हणत असंही सांगितलं जातं, परंतु हे न पटणार आहे.. आणखी एक हकीकत सांगितली जाते ती म्हणजे, या कॉटन एक्स्चेंज इमारतीच्या परिसरात अन्नधान्याची गोडाऊन्स होती, आजही आहेत. धन्याला इंग्रजीत ‘ग्रेन’ असा शब्द आहे. या ‘ग्रेन’चाच अपभ्रंश पुढे ‘ग्रीन’असा झाला व ‘ग्रेन’च्या गुदामांना डाव्या-उजव्या बगलेत घेऊन उभी असलेली ‘कॉटन’ची इमारत म्हणून हा परिसर ‘कॉटन ग्रीन’..! हे थोडं पटण्यासारखं असलं तरी ‘कॉटन ग्रीन’चा वरच्या लेखात दिलेला अर्थ आणि इतिहासच खरा. आताचं ‘कॉटन ग्रीन’ हे स्टेशनचं नांव पुराण्या कुलाब्याच्या ‘कॉटन ग्रीन’ची आठवण म्हणून दिलं आहे यात शंका नाही..

— गणेश साळुंखे
9321811091

मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणा लेखमाला..भाग १३ वा..!

संदर्भ –
१. मुंबईचे वर्णन – ले. गोविंद मडगावकर – १८६२
२. मुंबईचा वृत्तांत – ले. मोरेश्वर शिंगणे – १८९३
३. मुंबई नागरी – ले. न.र. फाटक – १९८३
४. स्थल-काल – ले. डॉ. अरुण टिकेकर – २००४
5. फोटो – इंटरनेट

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..