नवीन लेखन...

अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग ६

Country Music in America - Part 6

केवळ मराठीचा विचार करायचा झाला तर आपल्या तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वर – नामदेवांचे अभंग, जनाबाईंच्या ओव्या, भीमसेन जोशी, आशा भोसले, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात ऐकणे म्हणजे भक्ती रसात पूर्णपणे बुडून जाणे. पण हे भक्ती संगीत जेव्हा खर्‍या अर्थाने लोकसंगीत होतं तेव्हा त्याचा जनमानसावरचा प्रभाव समजून येतो. मग ते गावातल्या देवळातले कीर्तन असो, दमल्या भागल्या कष्टकर्‍यांचा संध्याकाळचा भजनाचा विरंगुळा असो किंवा मिरवणुकांमधलं झांजा, लेझीम आणि ढोलकीच्या तालावरचा नाच असो.

कंट्री म्युझिकचे तिसरे महत्वाचे अंग म्हणजे देशभक्ती. ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकनांमधे देशभक्ती नव्याने उसळून आली. त्याचे प्रतिबिंब संगीतात पडणे साहजिकच होतं. गेल्या ८-९ वर्षात बहुतेक सर्व मुख्य कंट्री कलाकारांची देशभक्तीपर गाणी लोकप्रिय झाली आहेत. त्यात आपल्या आसेतुहिमालय भारताप्रमाणे, अटलांटिक पासून ते पॅसिफिक पर्यंत पसरलेल्या अमेरिकेचे, त्यातल्या रॉकी पर्वतराजीच्या हिमाच्छादित हिमशिखरांपासून नेवाडाच्या वाळवंटापर्यंत असलेल्या नैसर्गिक विविधतेचे, विविधतेतल्या एकतेचे कौतुक केलेलं असतं. आपल्या शहीद आणि सरहद्दीवर देशासाठी प्राण देणार्‍या जवानांसारखंच, त्यांच्या जवानांबद्दल कृतज्ञता, अभिमान, प्रेम उचंबळून आलेलं असतं. जरी आपल्याकडे सैनिकांबद्दल कितीही आदर, प्रेम अभिमान असला तरी तो सहसा गणवेशातल्या सैनिकांबद्दल दिसतो. एकदा गणवेश उतरवला आणि सैन्यातून निवृत्ती घेतली की सर्वसामान्य नागरिकांच्या रूपात, सैनिकांना फारसं काही महत्व मिळत नाही. पण इथे मात्र सैन्यातल्या माजी सैनिकांना (veterans) भरपूर मान असतो. Veterans Day, Memorial Day अशा दिवशी हे सगळे जुने सैनिक (दुसर्‍या महायुद्धापासून ते कोरियन युद्ध, व्हिएतनाम युद्ध ते अगदी आताच्या इराक युद्धापर्यंत ) आपले ठेवणीतले गणवेश घालून, शौर्यपदके छातीवर लावून, मोठ्या अभिमानाने गावातल्या परेडच्या अग्रभागी संचलन करून जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. एकंदरीत इथे माजी सैनिकांना समाजात मोठं मानाचं आणि आदराचं स्थान आहे. त्यामुळे कंट्री म्युझिकमधे देशभक्तीपर गाण्यांमधे सैनिकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त व्हावी, त्यांच्या त्यागाचे, बलिदानाचे वारंवार स्मरण केले जावे यात काही नवल नाही.

कंट्री म्युझिकचं शेवटचं महत्वाचं अंग म्हणजे आचरटपणा किंवा खोडसाळपणा. यात सगळंच आलं – दारू पिऊन घातलेला धिंगाणा, तरूण पोरींची घेतलेली फिरकी किंवा एखाद्या फटाकड्या पोरीला पटवण्याची धडपड वगैरे. मग त्यात एखाद्या बाजारात जाणार्‍या रंगूची छेड काढली जाते किंवा ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?’ अशी सरळ सरळ विचारणा केली जाते. कधी दादा कोंडक्यांच्या सोंगाड्या चित्रपटातल्या ‘माळ्याच्या मळ्यामधी कोन गं उभी?’, किंवा एकटा जीव सदाशिव चित्रपटातल्या ‘काल रातीला सपान पडलं, सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले’ अशा गाण्यांची आठवण व्हावी, अशी गाणी असतात. तर काही वेळा, सुलोचना चव्हाणांच्या ‘कसं काय पाटील बरं हाय का, काय काय ऐकलं ते खरं हाय का ?’ अशा टाइपची गाणी असतात.

पण या आचरट आणि सवंग गाण्यांच्या कलकलाटात, आणि ‘देव, देस अन धर्मासाठी’ टाइपच्या गाण्यांच्या गर्दीमधे, अनेक नितांत सुंदर गाणी ऐकायला मिळतात. गार्थ ब्रुक्स, ब्रॅड प्रेसली, ऍलन जॅकसन, मार्टिना मॅकब्राइड अशा दिग्गजांची कैक गाणी इतकी हळूवार, हळवी आणि कोमल आहेत की ती ऐकताना भाषा, शब्द, सुरांच्या माध्यमातून आपण भावनांच्या देशात जाऊन पोहोचतो. तिथे कुठली देश विदेशाची बंधनं? शेवटी भावना सगळ्या सारख्याच! त्यातलं गहिरेपण भावलं की देशांच्या सीमा पुसल्या जातात, काळ वेळाची गणितं अदृश्य होतात, जाती वंशाच्या खुणा धुसर होतात आणि धर्माचा जयघोष बंद होऊन नादब्रह्माचा साक्षात्कार व्हायला लागतो.

शेवटी लोकसंगीत म्हणजे काय? सामान्यांच्या दिनक्रमाचा एक अविष्कार! कष्टकर्‍यांच्या कष्टाचं ओझं हलकं करणारं, पीडितांना दोन घटका आपल्या दु:खाचा विसर पडून रिझवणारं, प्रेमिकांना जगाकडे व्याकूळ, भावुकतेनं बघायला लावणारं, पहाटेच्या सूर्याकडे बघून जीवनाबद्दल आश्वस्त करणारं, संध्याकाळच्या कातरवेळी अस्वस्थ करून सोडणारं, देशभक्तीने अंगावर रोमांच उभं करणारं, परमात्म्याशी संवाद साधू पहाणारं….. ते सारं लोकसंगीत !
भारत काय, अमेरिका काय, साउथ आफ्रिका काय, भाषा वेगळ्या, वाद्यं वेगळी, सूर वेगळे पण उगम मात्र एकच ! तोच तो गर्भातून आलेल्या हुंकारासारखा ! आदिम आणि अनंत !

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..