नवीन लेखन...

क्रिकेट फिक्सिंग लिग

आयपीएल ६ दोन गोष्टींसाठी नेहमीच लक्षात राहिल. त्यातील एक तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने, आयपीएल मधून निवृत्ती घेत यापुढे आयपीएल खेळणार नाही अशी घोषणा केली. कदाचित मुंबई इंडियन्स टिमला यशाची ट्रॉफी मिळवून देण्याची आकांक्षा त्याच्या मते पूर्ण झाली असावी. पण त्यासोबतच सचिन तेंडुलकरने हे सुद्धा स्पष्ट केले की हीच योग्य वेळ आहे आयपीएलमधून बाहेर पडण्याची. का हे पाऊल उचललं असावं याच घटकेला सचिनने ? कारण आयपीएल ६ हा स्पॉट फिक्सींग, सट्टा, लाचखोरीच्या प्रकरणात प्रचंड अडकला. या खेळामधील खेळकरपणा हरवून अनावश्यक कनेक्शन्सच जास्त पुढे येत राहिली. अर्थात हे दुसरं कारण खुप व्यापक अगदी खोलवर रुजलं असून, त्याचे खुलासे नव्याने होणार. कारण कोर्टानेच हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटल्यावर तपासालाही वेग येणार. आणि यामध्ये समुद्रातले मोठे मासेही (घोटाळेबाज) जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

सेमी फायनल्स, फायनल्स बघताना खरंतर यावेळी क्रिकेटप्रेमींचा मुड ओसरलेला वाटला. कारण ज्या निष्ठेने आपण क्रिकेट मॅच पाहिली, आज त्याच खेळांडूंनी एका अर्थी त्यांच्या चाहत्यांचा विश्वासघात केला. एवढेच नव्हे तर या देशाशीही गद्दारी केली. पण एकटे खेळाडूच या सर्व बाबींना कारणीभूत आहेत का?.. अर्थात अनेक मास्टर माईंडस् यापाठीमागे दडलेत यात तिळमात्र शंका नाही. कदाचित या मंडळींमध्ये बॉलीवुड, उद्योग, राजकारणींसारख्या हस्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आयपीएलची बॉडी बीसीसीआयच्या अखत्यारीत असली तरीपण सर्वच संघांचे कोणीतरी मालक आहेतच. त्यामुळे खासगी संस्थेप्रमाणे तिची चालना होत असून कोणाच्याही हस्तक्षेपाचा प्रश्न उद्भवलाच नाही. त्यामुळे वाट्टेल ते करण्याची मुभा असल्याने वाट्टेल ते करुन क्रिकेट या खेळाचा खेळखंडोबा मांडला गेला.

पहिल्याच सीजनपासून वादाच्या भोवर्‍यात असणार्‍या आयपीएल क्रिकेट २०-२० ने संशयाची, वादग्रस्ताची सुई ही कलाकार, राज्यकर्ते यांच्याकडे वळवली होतीच. कारण मॅचेसच्या झगमगाटाकडे, भव्य दिव्य रुपड्याकडे आणि चियर गर्ल्सकडे पाहिल्यावर बड्या व्यक्तींचा वरदहस्त असल्याशिवाय अशा बाबी शक्यच नाहीत.

आणि आता भरीस भर म्हणून स्पॉट फिक्सींग, सट्टेबाजांचा सुळसुळाट. आणि खेळांडूंचा वाढता चंगळवाद.

अयाश्शीत राहण्याची चटक यामुळे श्रीसंत, चंडिलासारख्या खेळाडूंनी तर आपल्याच संघाशी गद्दारी केली. तर तिथे क्रिकेटशी जवळीक वाढवून विंदूनी ही बेटिंगसाठी नवा धंदा शोधला. आणि त्यासाठी थेट चेन्नई सुपर किंग्जचा फ्रॅंचायजी मयप्पनशीही संपर्क साधला. मयप्पन हा चेन्नईतील प्रख्यात उद्योग घराण्यातील व्यक्ती तर आहेच पण बीसीसीआय चे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावईसुद्धा. त्यामुळे घोटाळ्याचे कनेक्शन आख्ख्या क्रिकेटवर आरुढ झाल्याचं दिसतंय. श्रीनिवासन यांच्या पदाचा त्याच्या जावयाने पुरेपुर दुरुपयोगही करुन घेतला. त्यामुळेच सारं काही फिक्स झालं. श्रीनिवासनही दोषी आहेत किंवा नाहीत हे तपासाअंती लक्षात येईलच. जावयाने मात्र सासर्‍याला गोत्यात घातलं हे मात्र तितकंच खरं.

बेटिंग प्रकरणानंतर बेटिंगला कायदेशीर करा, बेटिंग करण्यात गैर काहीच नाही तोही एक गेम आहे, असं अगदी दबक्या स्वरात म्हटलं जातंय. पण बेटिंग कायदेशीर केल्यावर फिक्सिंग होणारच नाही हे कशावरुन. याआधी आयपीएल नसतानाही क्रिकेटच्या इतर मॅचेसमध्येही बेटिंग झालंच होतं. मोहम्मद अझरुद्दिनसारख्या बड्या खेळाडूंनाही जेलची हवा खावी लागलीच होती. आता आयपीएलच्या रुपाने पैशांचा अगदी पाऊस पडतो तेव्हाही फिक्सींग होतच आहे. मग काळा धंदा अजून वेगळा तो काय?..कारण यामध्ये बेकायदा व्यवहार आहे. छुपा पाठिंबा आहे तो राजकर्त्यांचा आणि उद्योग जगताचा. यात अंडरवर्ल्डशी लिंक असल्याचं बोललं जातंय. या चक्रव्युहात क्रिकेटचा मात्र पुरता फज्जा उडताना दिसतोय.

यासर्वामध्ये आता क्रिकेटरच्या निवडीपासून ते पैसा गुंतवणार्‍या फ्रॅंचायझीपर्यंत सारं काही विवादास्पदच वाटतंय. यापुढे तरी क्रिकेड रसिकांना कोणी गृहीत धरु नये कारण मॅचेस फिक्स्ड असल्याचं कळल्यावर त्यांचं खेळातील स्वारस्यही कमी झालेलंच आहे. आणि होत जाणार आहे. म्हणजे ज्यांच्यासाठी खेळायचं त्यांनीच नाकारलं म्हटल्यावर खेळायचं तरी कोणासाठी असा विचार करण्याची वेळ आता क्रिकेट आयोग, खेळाडू आणि याखेळाच्या कमिटीवर बसलेल्या मातब्बर मंडळींवर आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून तरी भारतीय क्रिकेट आयोग बोध घेऊन, क्रिकेटच्या मलीनतेला बाजूला सारून पारदर्शी व तटस्थ भूमिकेचा पायंडा पाडेल आता एवढीच काय ती किमान अपेक्षा.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..