१७ जानेवारी १९५८ रोजी कॅरिबिअन बेटांवरील बार्बडोसमधील ब्रिजटाऊनच्या केन्सिंग्टन ओवल मैदानावर वेस्ट इंडीज वि. पाकिस्तान हा सामना सुरू झाला होता. वेस्ट इंडीजचा कर्णधार (आणि यष्टीरक्षक) गेरी अलेक्झांडरने नाणेकौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर चार्ल्स हंटच्या १४२ धावा आणि अवघ्या तीन धावांनी द्विशतक हुकलेल्या एवर्टन विक्सच्या जोरावर दुसर्या दिवशी अखेरच्या सत्रात यजमानांनी ९ बाद ५७९ धावांवर डाव घोषित केला.
१९ जानेवारी हा विश्रांतीचा दिवस होता. खेळाच्या तिसर्या दिवस-अखेर पाकिस्तानच्या १ बाद १६२ धावा झालेल्या होत्या (दरम्यान पाकिस्तानला फॉलोऑन मिळाला होता) आणि हनीफ मोहम्मद ६१ धावांवर नबाद होते. खेळाच्या चौथ्या दिवस-अखेर हनीफ मोहम्मद १६१ धावांवर नबाद होते ! पाकिस्तान : २ बाद ३३९. अजूनही डावाचा पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानला १३४ धावांची आवश्यकता होती.
पाचव्या दिवस-अखेर हनीफ मोहम्म्मद २७० धावांवर नबाद होते ! पाकिस्तान : ३ बाद ५२५. बावन्न धावांची आघाडी !
अखेर सहाव्या दिवशी (हा सामना सहा दिवसांचा होता) यष्टीरक्षकाच्या हातून डेनिस अॅटकिन्सनच्या गोलंदाजीवर हनीफजी बाद झाले तेव्हा पाकिस्तानच्या ६२६ धावा झालेल्या होत्या आणि त्यात हनीफजींच्या तब्बल ३३७ धावा होत्या. सुमारे चोपन्न टक्के धावा एकट्या हनीफजींच्या ! २४ चौकार, एकही षटकार नाही.
पु-र-ते सो-ळा ता-स आणि दहा मिनिटांची फलंदाजी ! पूर्ण पाच विसविशीत सामने आणि वर प्रेझेंटेशन सिरेमनी एवढा किंवा जाहिरातींसहित कौन बनेगा करोड़पतीचे सोळा भाग आणि वर दहा मिनिटे एवऽऽऽऽढी प्रदीर्घ खेळी ! उंची कमी असल्याने हनीफ मोहम्मद हे लिटल मास्टर म्हणून ओळखले जात – त्यांच्या खेळाची उंची मात्र प्रचंड होती.
३३७ धावा ही त्याकाळी कसोट्यांमधील दुसर्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या होती आणि मिनिटांच्या गणतीत सर्वात लांब डाव होता. पुढे १९९९-२००० च्या हंगामात हिमाचल प्रदेशसाठी खेळताना जुन्या लिटल मास्टरहून पाऊण तास जास्त वेळ फलंदाजी केली. कसोट्यांमधील आजही कालावकाशाबाबतीत हा सर्वात मोठा डाव आहे.
आज(ही) ३३७ धावा ही कसोट्यांमधील परदेशी मैदानावरील फलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे. सामन्याच्या तिसर्या डावातील हे आजवरचे एकमेव त्रिशतक आहे. तिसर्या डावातील फलंदाजाच्या सर्वाधिक धावांच्या डावांमध्ये दुसर्या क्रमांकावर आहे न्यूझीलंडचा मार्टिन क्रो – २९९ धावा. (चौथ्या क्रमांकावर आहे आपला लक्ष्मण २८१ धावा).
दुर्दैवाने आमच्या पिढीला हनीफजींचा खेळ पाहावयास मिळाला नाही. जावेद मियाँदादचे अब्बाजान हनीफजींना ओळखत होते. नशीबाने त्यांना हनीफजींची एक बॅट भेट म्हणून मिळाली आणि ती बॅट पाहून ते थक्क झाले : बॅटवर चेंडूच्या ज्या काही खुणा उठल्या होत्या, त्या केवळ मध्यभागातच होत्या – बॅटच्या कडा पूर्णपणे अस्पर्शित राहिलेल्या होत्या !
फॉलोऑननंतरच्या डावात त्रिशतक काढणारा आजवरचा एकमेव कसोटीवीर : हनिफ मोहम्मद्जी.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply