नवीन लेखन...

रामनाथ पारकर – क्रिकेट मैदानावरचा वाघ

( मुंबईचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांच्या निधनाला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने स्मरणांजली )


आजवर भारताच्या पहिल्या कसोटीतील सोराबजी कोला, फिरोज पालिआ पासून आताच्या यशस्वी जयस्वाल, सरफराज खान पर्यन्त मुंबईच्या अनेक खेळाडूंनी भारतासाठी क्रिकेट मैदान गाजवलं आहे. त्याचप्रमाणे जनार्दन नवले, दत्ता हिंदळेकरांपासून हल्लीच्या शार्दुल ठाकूर, ऋतुराज गायकवाड पर्यन्त (अर्थात via – वाडेकर, सुनिल, वेंगसरकर, सचिन अश्या अगणित) कित्येक मराठी क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा फडकवला आहे. या नामावलीतील गुणवान पण कमनशिबी मराठमोळा, मुंबईकर क्रिकेटपटू म्हणजे – “रामनाथ धोंडू पारकर”.

पारकर यांचा जन्म मुंबईत ३१ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला. मुंबईतल्या कुठल्याही लहान मुलाप्रमाणे त्यांना क्रिकेटची गोडी लागली. गिरणगावात वाढलेल्या पारकर यांनी वरळीतील जांबोरी मैदानावर क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. एक फलंदाज म्हणून छाप पाडत असतानाच, अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणूनही ते ओळखले जाऊ लागले. त्यांच्या खेळातली चमक पाहून पी.जे.हिंदू जिमखान्यामधील ‘तेरसी’ नेटसमध्ये सरावाची आणि प्रशिक्षण घेण्याची संधी पारकरना मिळाली. तेथे साक्षात विनू मंकड यांच्याकडून त्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाले. सुप्रसिद्ध प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडे ते नियमित प्रशिक्षण घेतच होते. त्यामुळे एक दर्जेदार सलामीचा फलंदाज म्हणून ते मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात नावारूपास आले. त्याकाळी हैद्राबाद मध्ये ‘मोईन ऊद-दौला सुवर्णचषक’ ही मानाची प्रथमश्रेणी क्रिकेटस्पर्धा खेळवली जात असे. १९६४-६५ मध्ये या स्पर्धेद्वारे पारकरनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

क्रिकेटमधील सातत्यपूर्ण खेळामुळे त्यांना लवकरच ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरी मिळाली. तसेच मुंबईच्या रणजी संघातही त्यांची लवकरच निवड झाली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण क्षमतेमुळे अंतिम ११ खेळाडूंची निवड होण्यापूर्वीच १२ वा खेळाडू म्हणून पारकरांची आधीच निवड होत असे. १९७०-७१ मध्ये रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दिल्लीविरुद्ध मुंबईला चौथ्या डावात त्यांनी कर्णधार सुधीर नाईकच्या साथीने १० गडी राखून विजय मिळवून दिला. बंगालविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पारकरनी १०१ धावांची खेळी केली आणि मुंबईने डावाने विजय मिळवत सहज अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राविरुद्धच्या अंतिम सामन्यात पारकरनी पहिल्या डावात सर्वाधिक १०८ धावा केल्या आणि पद्माकर शिवलकरच्या अफलातून फिरकी गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने केवळ ४८ धावांनी विजय मिळवला.

पुढच्या मोसमात बडोद्याला वेगवान खेळपट्टीवर अब्दुल इस्माईल आणि अजित नाईक यांनी ४२ धावांवर गुंडाळले आणि याच खेळपट्टीवर पारकरनी १४४ धावांची खेळी केली. त्यानंतर लगेचच पारकरनी पूर्व विभागाविरुद्ध दुलीप करंडक स्पर्धेत पदार्पणाच्या सामन्यात १३१ धावांची खेळी करताना गावसकर यांच्यासोबत पहिल्या विकेटसाठी २२५ धावांची भागीदारी केली. तर रणजीच्या उपांत्य फेरीत पारकरांनी प्रसन्ना आणि चंद्रशेखर यांच्याविरुद्ध ८९ आणि ९६ धावांच्या खेळी केल्या. मुंबईने अंतिम सामन्यात बंगालला पराभूत करत पुन्हा एकदा आपले विजेतेपद कायम राखले. ४२.३० च्या सरासरीने ९७३ धावा करणाऱ्या पारकरना वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेट क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. इराणी चषकात पारकरनी दर्जेदार आक्रमणाविरुद्ध ७० आणि १९५ धावांच्या खेळी केल्या. तर पुढच्याच सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध १०० धावांची खेळी केली. या धावांच्या धडाक्यामुळे त्यांची दौऱ्यावर आलेल्या ‘एमसीसी’विरुद्ध आपल्या ‘बोर्ड प्रेसिडेंट’ संघासाठी निवड झाली. या सामन्यातील त्यांच्या रोहन कन्हाय स्टाईलने खेळपट्टीवर लोळण घेत मारलेल्या स्वीप फटक्यांनी गोरे पाहुणे चकित झाले. पारकरनी ५९ धावांची खेळी करत गावसकर यांच्यासोबत १०० धावांची भागीदारी केली आणि त्या जोरावर दिल्लीत होणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी त्यांची निवड झाली.

कसोटी पदार्पणाच्या मालिकेत अर्नोल्ड, ओल्ड, कॉटम, अंडरवूड आणि टोनी ग्रेग यांचा सामना करणे सोपे काम नव्हते. पारकरनी पहिल्या डावात अवघ्या ४ धावा केल्या तर दुसऱ्या डावात गावसकर लवकर बाद झाल्यावर संघर्ष करत ७२ चेंडूत ३५ धावा केल्या. इंग्लंडने हा सामना ६ गडी राखून जिंकला. कलकत्ता येथील दूसरा सामना भारताने चंद्रा, बेदी, प्रसन्ना या त्रिकूटाच्या जोरावर २८ धावांनी जिंकला. पण गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर सर्वच फलंदाजांना झगडावे लागले आणि पारकर याला अपवाद नव्हते. त्यांना केवळ २६ आणि १५ धावा करता आल्या. मद्रासमधील पुढील कसोटीसाठी पारकरच्या जागी चेतन चौहानला संघात स्थान देण्यात आले आणि दुर्दैवाने पारकर यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द दोन कसोटीतच संपुष्टात आली.

यानंतर भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या दृष्टीने पारकरनी स्थानिक क्रिकेटमध्ये मेहनत घेणे आणि धावा करणे चालू ठेवले. फलंदाजीच्या आक्रमक शैलीमुळे आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे १९७५ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी त्यांची निवड निश्चित होईल असे मानले जात होते. विशेषत: निवडीच्या आधीच्या सामन्यात त्यांनी हैद्राबादविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्तम १९७ धावा केल्या होत्या. पण कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक आणि ते इंग्लंडला वर्ल्ड कपसाठी गेले नाहीत. यानंतर मुंबईसाठी स्थानिक क्रिकेटमध्ये निरंतर योगदान देणे चालूच होते. मात्र भारतीय संघात निवड होण्याची शक्यता मावळल्याने १९८०-८१ चा हंगाम अखेरचा असेल असे त्यांनी ठरवले. अंतिम फेरीत दिल्लीला डावाने मात दिली आणि मुंबईला रणजी विजेतेपद मिळवून देत त्यांनी मानाने निवृत्ती घेतली. त्यांनी एकूण ८५ प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये ८ शतकांसह ४,४५५ केल्या आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची छाप पाडत ६४ झेल घेतले.

रामनाथ दोनच कसोटी खेळले असले तरी त्यांचे सहकारी, समीक्षक आणि चाहते त्यांच्याविषयी भरभरून बोलतात. १९७० च्या दशकात जेव्हा मुंबईचे मुख्य तारांकित खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी मुंबईसाठी उपलब्ध नसत तेव्हा अनेकदा रामनाथनी संघासाठी अमूल्य योगदान देत विजय मिळवून दिले आहेत. अवघ्या सव्वापाच फूट उंचीचे रामनाथ वेगवान गोलंदाजांविरुद्ध कट,  हुक, पूल हे फटके लिलया व आकर्षकपणे खेळत. फिरकी गोलंदाजांविरुद्ध उत्तम पदलालित्य दाखवत फ्रंट फूटवर येऊन आक्रमकपणे खेळत. क्षेत्ररक्षण करतानाही फलंदाजाजवळ असो, कव्हर क्षेत्रामध्ये किंवा सीमारेषेजवळ; कुठेही त्यांचा असामान्य दर्जा नजरेत भरत असे. अनेकदा लांबून केलेल्या अचूक थ्रो मुळे यष्टींचा अचूक वेध घेतला जाई आणि बेसावध फलंदाज धावबाद होत. अनेकांच्या मते ते एकनाथ सोलकरच्या तोडीचे असामान्य क्षेत्ररक्षक होते. अजित वाडेकर, सुनिल गावसकर, मिलिंद रेगे, अशोक मंकड, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर यांच्यासारखे अनेक मोठे खेळाडू त्यांचे कौतुक करताना थकत नाहीत. संघासाठी सर्वस्व देणारे ते पूर्णत: ‘टिम-मॅन’ होते. संघहिताला प्राधान्य देणारे रामनाथ प्रत्येक कप्तानासाठी ‘ड्रीम-मॅन’ होते. चंद्रशेखर यांच्या फसव्या, वेगवान फिरकीला त्यांच्याइतके चांगले क्वचितच कोणी खेळू शके. अनेकदा ते इतकी आक्रमक फलंदाजी करत की गोलंदाजांना वन-डेप्रमाणे बचावात्मक पवित्रा घ्यावा लागे. अनेकांच्या मते ते एक दशक नंतर जन्मले असते तर भारताच्या वन-डे संघासाठी त्यांनी निश्चितच नेत्रदीपक कामगिरी केली असती.

निवृत्तीनंतर पारकर क्रिकेटसोबत संलग्न राहण्यासाठी प्रशिक्षणाकडे वळले. फोर्टमध्ये ‘एल्फ-वेंगसरकर अकादमी’त ते प्रशिक्षण देऊ लागले. पारकर हे प्रशिक्षक म्हणूनही अतिशय समर्पित होते. ते अकादमीत मुलांना केवळ प्रशिक्षण द्यायचे नाहीत तर त्यांच्यासोबत क्षेत्ररक्षण करायचे, त्यांच्याबरोबर लहान होऊन खेळायचे. तिथे मुलांच्या फलंदाजी व गोलंदाजीतील कौशल्यवृद्धीबरोबरच त्यांना क्षेत्ररक्षणाची गोडी लागावी व त्याचा दर्जा सुधारावा म्हणून विशेष परिश्रम घेत. त्याशिवाय काही काळ त्यांनी ‘टाटा केमिकल्स’ कंपनी आणि ‘दादर युनियन’ क्लबसाठी देखील खेळाडू व प्रशिक्षक म्हणून दुहेरी भूमिका बजावली.

अश्या या गुणी, लढाऊ खेळाडूचा अंत मात्र दुख:द झाला. ३१ डिसेंबर १९९५ रोजी पारकर आपली मुलगी सुचित्रा हिला स्कूटरवरून कुलाबा येथील ‘सी कॅडेट कॉर्प्स’मध्ये सोडून ‘एल्फ-वेंगसरकर’ क्रिकेट अकादमीकडे जात असताना एका टॅक्सीने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला खोल जखम झाली. पारकर यांचा जीव वाचवण्यासाठी मेंदूच्या दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि त्यांना दीर्घकाळ रुग्णालयात राहावे लागले. तब्बल ४३ महिने ते कोमामध्ये अंथरुणाला खिळून होते. मैदानावर वाघाप्रमाणे लढणाऱ्या पारकरनी यमराजाशीही कडवी झुंज दिली. अखेर ११ ऑगस्ट १९९९ रोजी पारकर यांचे कोमातच निधन झाले. या वर्षी त्यांच्या निधनाला २५ वर्षे झाली असताना या गुणवान, मराठमोळ्या क्रिकेटवीराला विनम्र आदरांजली !

(छायाचित्र : इंटरनेटवरून साभार)

गुरुप्रसाद दि पणदूरकर,

(माहीम, मुंबई)

Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 6 Articles
माजी बँकर, मुक्त लेखक. विविध संकेतस्थळे, दिवाळी अंकांतून क्रिकेटविषयक, बँकिंगसंबंधी व व्यक्तिचित्रणात्मक लेखन. विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद. या शब्दकोड्यांना विशेषत: अनेक दिवाळी अंकांमधून प्रसिद्धी. मराठी साहित्य, खेळ (क्रिकेट), भारतीय इतिहास यांमध्ये विशेष रुची.
Contact: Twitter

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..