ज्येष्ठ क्रिकेट कसोटीपटू व प्रशिक्षक वसंत रांजणे यांचा जन्म २२ जुलै १९३७ पुणे येथे झाला.
वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजीला खेळपट्ट्या अनुकूल असण्याच्या काळात अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ख्यातनाम असलेले रांजणे यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रांजणे यांनी १९५६-५७ च्या मोसमात रणजी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी सौराष्ट्राविरुद्ध एकाच डावात ३५ धावांमध्ये हॅटट्रिकसह नऊ बळी घेतले. द्रुतमध्यमगती गोलंदाज असलेल्या रांजणे यांनी या सामन्यात केवळ ७१ धावांमध्ये १३ बळी घेतले. त्यांच्या लक्षवेधक कामगिरीमुळे त्यांना १९५८ मध्ये कानपूर येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याद्वारे कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. त्यावेळी कर्णधार आणि निवड समिती चेंडूची शाईन घालवण्यासाठी वेगवान गोलंदाजांना संधी देत असत. त्यामुळे थोडीच षटके वेगवान गोलंदाजांच्या वाट्याला येत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला अवघे सात कसोटी सामने आले. भारताकडून ते १९५८ ते ६४दरम्यान सात कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ३४.१५ च्या सरासरीने १९ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध कानपूर येथे १२ डिसेंबर १९५८ मध्ये त्यांनी कसोटीत पदार्पण केले. शेवटचा कसोटी सामना ते १९६४ मध्ये चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या अव्वल खेळाडूंविरुद्ध त्यांनी अचूक गोलंदाजी केली. प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी महाराष्ट्र आणि रेल्वेकडून खेळताना आपला दबदबा राखला. प्रतिस्पर्ध्याच्या फलंदाजाला धडकी भरविणारे गोलंदाज म्हणून ते ओळखले जात. अचूक टप्पा व दिशा ठेवीत गोलंदाजी करणे ही त्यांची हुकमत होती. इंग्लिश वातावरणात चमक दाखविण्याची शैली त्यांच्याकडे होती. वेस्ट इंडिज, इंग्लंडच्या फलंदाजांवर प्रभुत्व त्यांनी गाजविले होते. त्यांची भेदक शैली पाहून फलंदाजीच्या वेळी त्यांना जखमी करीत त्यांना गोलंदाजीस येऊच द्यायचे नाही हे तंत्र विंडीजने यशस्वी केले होते तरीही रांजणे यांनी मिळेल त्या संधीचा पुरेपूर उपयोग करीत शानदार कामगिरी केली. प्रथम श्रेणीच्या ६४ सामन्यांत त्यांनी २७.७३च्या सरासरीने १७५ विकेट्स घेतल्या आहेत. ५३ धावांत ९ विकेट्स ही त्यांची सवोर्त्तम कामगिरी आहे. डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी त्यांनी सहा वेळा केली आहे. त्यांनी १९५६-५७ मध्ये सौराष्टविरुद्ध प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्यांनी हॅट्ट्रिकसह ३५ धावांत ९ विकेट्स घेतल्या. या सामन्यात दुसऱ्या डावातही त्यांनी ३६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. रांजणे यांनी रेल्वेकडून नोकरी करताना उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन केले. रांजणे अकादमीतील खेळाडूंनाही त्यांनी प्रशिक्षण दिले.
त्यांचा नातू शुभम रांजणेने महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
वसंत रांजणे यांचे २२ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply