चंद्रकांत गुलाबराव बोर्डे म्हणजे चंदू बोर्डे यांचा जन्म २१ जुलै १९३४ रोजी पुण्यामध्ये झाला. बोर्डे सर म्हटले की डोळ्यासमोर एक नाव येते ते म्हणजे विजय हजारे यांचे कारण विजय हजारे यांच्या शैलीमध्ये ते खेळाचे . गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांच्यामध्ये मात्र फरक होता . बोर्डे हे लेग ब्रेक आणि गुगली टाकायचे ते मंदगती गोलंदाज होते तर विजय हजारे हे मध्यमगती गोलंदाज होते. बोर्डे ह्यांची क्रिकेट कारकीर्द १९५४-५५ मध्ये बडोद्याच्या विरुद्ध खेळले तेव्हा सुरु झाली. वयाच्या १७ व्या वर्षीच ते रणजी ट्रॉफी सामन्यात ते प्रथम खेळले. त्यांचा पहिला समान होता मुंबईबरोबर . त्यांनी महाराष्ट्राकडून खेळताना दोन्ही डावांमध्ये अर्धशतके केली. पहिल्याच डावामध्ये त्यांनी ५५ धावा तर दुसऱ्या डावामध्ये नाबाद ६१ धावा. त्यावेळी महराष्ट्राच्या संघाने मुंबईवर १९ धावांनी मात केली. गुजरात विरुद्ध त्यांनी नाबाद ३८ धावा केल्या. तर होळकर या संघाविरुद्ध त्यांनी ० आणि २१ धावा केल्या. मात्र पहिल्या डावांमध्ये त्यांनी ६० धावा देऊन होळकर संघाच्या ३ विकेट्स घेतल्या. बोर्डे यांनी पुढील रणजी हंगामामध्ये गुजराथविरुद्ध १३४ धावा करून आपले पाहिले शतक झळकावले.
पाच रणजी सामन्यानंतर त्यांची निवड १९५५ साली पाकिस्तानला जाणाऱ्या संघामध्ये झाली. परंतु या दौऱ्यामध्ये त्यांच्या वाट्याला फारच थोडे सामने आले.
पुढे १९५८-५९ च्या हंगामामध्ये त्यांना पहिला कसोटी सामना मिळाला तो वेस्ट इंडिज विरुद्ध. वेस्ट इंडिजच्या संघामध्ये त्या वेळी अक्षरशः आग ओकणारे तुफानी गोलंदाज होते . परंतु त्यांच्या जबरदस्त तुफानी हल्ल्याला एकट्या चंदू बोर्डे यांनी तोंड दिले. कारण आधीच्या वर्षी इंग्लंडमधील लँकशायर सामन्यांमध्ये चंदू बोर्डे यांनी गिलख्रिस्टच्या तोफखान्याला तोंड दिले होते तो अनुभव त्यांना वेस्ट इंडिजच्या ह्या दौऱ्यामध्ये कामी आला. परंतु त्यांचे कसोटी समान्यांमधील पदार्पण तितके चागले झाले नाही. मुंबईच्या कसोटी सामन्यामध्ये ते सात धावा काढून धावबाद झाले होते. दुसऱ्या सामन्यामध्ये कानपूरला त्यांनी ० आणि १३ धावा केल्या. त्यावेळी त्यांची गोलंदाजीही प्रभावी झाली नाही. त्यानंतर त्यांना मद्रासच्या कसोटी सामन्यांमध्ये बारावा खेळाडू म्हणून घेतले. परंतु विजय मांजरेकर जखमी झाल्यामुळे त्या सामन्यामध्ये खेळू शकले नाहीत आणि त्यांच्या जागी चंदू बोर्डे यांना परत संधी मिळाली. पहिल्या डावामध्ये ते भोपळाही फोडू शकले नाहीत. परंतु दुसऱ्या डावामध्ये ते अत्यंत आत्मविश्वासाने खेळले. त्या मद्रासच्या कसोटीमध्ये त्यांनी ५६ धावा केल्या ते सर गारफिल्ड सोबर्सकडून बाद झाले. त्यांच्या त्या ५६ धावा अत्यंत महत्वाच्या होत्या कारण भारतीय संघ १५१ धावांमध्ये वेस्ट इंडिजने गुंडाळला होता. आपला संघ तो सामना हरला होता परंतु त्या हरलेल्या भारतीय संघाला चंदू बोर्डे नावाचा खेळाडू दिला असेच म्हणावे लागेल.
१९६४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात आला असताना चंदू बोर्डे आणि पतौडी हे भारतीय संघाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यावेलची त्यांची चिवट आणि दमदार फलंदाजी बघून विजय हजारे आणि विजय मर्चंट यांची आठवण येत असे. चंदू बोर्डे यांची फलंदाजी जुन्या पठडीमधील होती. त्यांचा सर्व भर चेंडूला सामोरे जाण्यावर होता कारण ते डावा पाय पुढे टाकून पुढचे फटके मारत असत. चंदू बोर्डे यांचे कव्हरमधील क्षेत्ररक्षण खूपच चागले होते आणि त्यांचा मिड-ऑफच्या जागेवरील थ्रो अचूक असे.
त्यावेळी ३००० च्या वर कसोटी सामन्यांमध्ये धावा करणारे तीनच फलंदाज होते पॉली उम्रीगर यांनी ५९ कसोटी सामन्यांमध्ये ३६३१ धावा केल्या , विजय मांजरेकर यांनी ५५ कसोटी सामन्यांमध्ये ३२०९ धाव केल्या तर चंदू बोर्डे यांनी ५५ सामन्यांमध्ये ३०६४ धावा केल्या.
हल्ली जे खेळाडू धावा करतात त्यांच्याशी तुलना कधीच करू नये कारण त्यावेळी जे भेदक प्रतिस्पर्धी गोलंदाज होते त्यांना हेल्मेटशिवाय तोंड देणे म्हणजे आह अंगावर गेहण्यासारखे होते आणि त्यावेळी कसोटी सामनेही कमी होत असत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
पुढे पुढे चंदू बोर्डे यांनी गोलंदाजीपेक्षा फलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रित केले कारण त्यांना झालेल्या दुखापतीमुळे शेवटीशेवटी त्यांनी गोलंदाजी बंदच केली होती. विजय हजारे , चंदू बोर्डे ह्यांनी ज्या शैलीने खेळ केला त्यामुळॆ प्रेक्षकांना खेळाचा खरा आनंद दिला आणि पुढे सुनील गावस्कर यांनी तसाच प्रेक्षकांना आनंद दिला. चंदू बोर्डे यांनी ५५ कसोटी सामन्यांमध्ये ३०६१ धावा केल्या त्यामध्ये त्यांची ५ शतके आणि १८ अर्धशतके आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या सर्वोच्च धावसंख्या आहे नाबाद १७७ धावा आणि ५२ विकेट्स घेतल्या. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यानी २५१ सामन्यांमध्ये १२,८०५ धावा केल्या त्यामध्ये त्यांची ३० शतके आणि ७२ अर्धशतके असून त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद २०७ धावा तर त्यांनी ३३१ विकेट्स घेतल्या. चंदू बोर्डे यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १९६४-६५ ह्या कँलेंडर वर्षात १६०४ धावा केल्या आत्तापर्यंत त्यांचा रेकॉर्ड अबाधित होता परंतु २०१६-१७ मध्ये तो रेकॉर्ड चेतेश्वर पुजाराने तो तोडला .
चंदू बोर्डे हे भारतीय संघाचे टीम मॅनेजर म्हणून पाकिस्तान, आयर्लंड आणि इंग्लंडला गेले . त्यांना १९६८ मध्ये अर्जुन अवॉर्ड भारत सरकारने दिले. तर १९६९ मध्ये पदमश्री आणि २००२ मध्ये पदमभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. २००६ मध्ये त्यांना भारतीय क्रिकेट बोर्डाने सी. के. नायडू अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव केला.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply