सय्यद मुश्ताक अली यांचा जन्म १७ डिसेंबर १९१४ रोजी मध्यप्रदेश मधील इंदोर येथे झाला. वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांनी हॅट्रिक घेऊन आणि ६५ धावा करून फर्स्ट क्लास क्रिकेटची सुरवात केली. हैद्राबाद येथे होणाऱ्या क्रिकेट सामन्यांमध्ये त्यांनी खेळण्याची सुरवात वयाच्या २० व्या वर्षांपूर्वीच सुरवात केली. कसोटी सामना खेळले ते वयाच्या १९ व्या वर्षीच. १९३६ साली ते इंग्लंडच्या टूरवर गेले तेव्हा ते २१ वर्षाचे होते. मुश्ताक अली पहिला कसोटी सामना ५ जानेवारी १९३४ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळले. त्यावेळी त्यांनी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर ११२ धावा केल्या. सामना संपल्यावर लेखक सर नेव्हिल कार्डस यांनी लिहिले,’ मुश्ताक अली यांची खेळी सर्व फटक्यांनी परिपूर्ण होती आणि त्या फटक्यात जे लखलखणारे तेज होते त्यावरून भारतीयांच्या डोळ्यातील तीक्ष्णता जाणवली. मुश्ताक यांनी आपल्या हातातल्या बॅटचे रूपांतर जादूगाराच्या कांडीत केले !’ याच ओल्ड ट्रॅफर्ड वरती मुश्ताक अली आणि विजय मर्चन्ट खेळायला गेले तेव्हा ३६८ धावांनाच डोंगर समोर होता. पराभव समोर दिसत असताना त्यांनी आक्रमकपणे खेळून शतक पुरे केले. त्यावेळी गबी अॅलनच्या पहिल्याच षटकामध्ये क्रीज सोडून चेंडूवर हल्ला चढवला होता. विजय मर्चन्ट यांनी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुश्ताक अली म्हणाले, ‘ हे पहा, विजयभाई अशा डावपेचामुळे फलंदाज दबून जातो.’ विजय मर्चन्ट त्यांना समजावत होते आता आपल्या सामना वाचवायचा आहे, अनिर्णित ठेवायचा आहे. परंतु मुश्ताक अली यांच्या उतावीळपणाला आवर काही बसला नाहीच. त्यावेळी विजय मर्चन्ट आणि त्यांनी एका तासाला ८० धावा प्रमाणे १९० पर्यंत धावा केल्या. त्यांची जोडी फुटली तेव्हा २०३ धावा झाल्या होत्या. मुश्ताक हे वॉल्टर रॉबिन्स यांच्या गोलंदाजीवर त्यांच्याच हातात झेल देऊन बाद झाले. २०३ पैकी त्यांच्या ११२ धावा होत्या आणि त्यामध्ये १७ चौकार होते. विरुद्ध संघाचा गोलंदाज कितीही आक्रमक असो, भीती निर्माण करणारा असो मुश्ताक अली त्याला ते दबून जात नसत.
मुश्ताक अली म्हटले की अनेक गोष्टी आठवतात त्यापैकी एक म्हणजे मुश्ताक अली जेव्हा फलंदाजीला आले की पंचाकडून ‘ गार्ड ‘ घ्यायचे आणि गोलंदाज गोलंदाजी करायला समोर येत असतानाच घेतलेला ‘ गार्ड ‘ सोडून आक्रमकपणे पुढे होऊन उभे रहात. मग मुश्ताक अली यांनी ‘ गार्ड ‘ का घेतला यांचे सगळ्यांना कुतूहल वाटे. खेळताना अत्यंत आक्रमक होते, फलंदाजी करताना सर्व तंत्र वगैरे धाब्यावर बसवून कसोटी खेळणारा फलंदाज म्हणून त्यांच्याकडे बघीतले जाई.
फलंदाजी करताना मुश्ताक अली काय करतील यांचा नेम नसे कधीकधी क्रीज सोडून बाहेर येऊन षटकार ठोकायचे तर कधी हाफ व्हॉलीज वर येऊन चेंडू सीमापार करत असत. त्यांची फलंदाजी तशी अनाकलनीयच म्हणावी लागेल. ते चेंडू ग्लान्स करायचे तर कट अत्यंत अचूकतेने करायचे. खेळताना त्यांचा डिफेन्सही चांगला, आकर्षक असायचा.
१९४५ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी होळकर संघाकडून मुंबईविरुद्ध दोन्ही डावांमध्ये त्यांनी शतक केले होते. त्यांचे फटके साहसी असायचे.
तडाखेबाज फलंदाजी करणारे मुश्ताक अली खूप हळवे. मला आठवतंय काही वर्षांपूर्वी ते एक वानखेडे स्टेडियमला आले होते. त्यावेळी एक कसोटी सामना चालू होता. ते आलेले बघीतले आणि काही वेळाने परत जायला निघाले ते त्यांच्या गाडीत बसले होते. तितक्यात मी त्यांची ऑटोग्राफ घेण्यासाठी डायरी पुढे केली. त्यांनी मला विचारले मी कोण आहे ते माहीत आहे का. मी बोलत असताना जरा लांब उभे असले मीडियावाले होते आमच्याकडे बघत होते, मी त्यांना म्हणालो आपण मुश्ताक अली सर आहात. तशी ते हसले ऑटोग्राफ दिली आणि मी बाजूला गेलो. तशी गाडी स्टार्ट झाली होत असताना गाडीतून उतरले, माझ्याजवळ आले आणि म्हणाले तू मला ओळखलेस बरे वाटते. मी पार खजील झालॊ. नमस्कार केला. तशी ते गाडीतून निघून गेले. मग मिडियावाले आणि मला विचारू लागले कोण होते ते. ‘ मी जाम भडकलो, म्हणालो तुमचा बाप मुश्ताक अली.’ कधीही वाचन न करणाऱ्या मंडळींना फक्त बाईट घेण्याची आणि नुसता लेख लिहिण्याची सवय असणाऱ्यांना काय कळणार मुश्ताक अली कोण ते, कसे दिसतात ते.
खरे तर मुश्ताक अली हे सी. के. नायडू यांचे शिष्य होते त्यांच्या गुरूप्रमाणे धाडसी. अनेकांना वाटायचे मुश्ताक अली आणि वझीर अली यांची सर्वोत्तम आघाडीची जोडी परंतु अनेकांना खरी जोडी ही विजय मर्चन्ट आणि मुश्ताक अली हीच होती असे वाटत वाटत असे. मुश्ताक अली यांच्या धडाकेबाज खेळण्यामुळे ते अनेकदा बाद होत असत तेव्हा ते म्हणत अरे पुढला सामना आहेच ना.
मुश्ताक अली यांनी ११ कसोटी सामन्यांमध्ये ६१२ धावा केल्या त्यामध्ये त्यांनी २ शतके आणि ३ अर्धशतके काढली. त्याचप्रमाणे त्यांनी ३ विकेट्सही घेतल्या. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती ११२. त्यावेळी कसोटी सामान्यांपेक्षा फर्स्ट क्लास क्रिकेट सामने जास्त होत असत. मुश्ताक अली यांनी २२६ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये १३, २१३ धावा केल्या त्यामध्ये ३० शतके आणि ६३ अर्धशतके असून त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २३३. त्यांनी १६२ विकेट्स घेतल्या. त्यांची सर्वोत्तम गोलंदाजी एक डावात ७ बाद १०८ धावा अशी होती.
मुश्ताक अली शेवटचा कसोटी सामना ६ फेब्रुवारी १९५२ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळले. मुश्ताक अली यांना भारत सरकारने १९६४ मध्ये ‘ पदमश्री ‘ देऊन त्यांचा सन्मान केला होता.
मुश्ताक अली यांचे १८ जून २००५ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply