सर डॉन ब्रॅडमन यांचा जन्म २७ ऑगस्ट १९०८ रोजी झाला.
द डॉन सर. डॉन ब्रॅडमन हे ऑस्ट्रेलियन खेळाडू कसोटी क्रिकेटच्या इतिहासातले सर्वश्रेष्ठ फलंदाज मानले जातात. क्रिकेट हा खेळ नाही तर जीवनाचा आनंद लुटण्याचे एक उत्तम माध्यम असल्याची जाणीव सर्वप्रथम सर डॉन ब्रॅडमन यांनी क्रिकेट रसिकांना करून दिली. ब्रॅडमन यांचा प्रत्येक डाव म्हणजे फलंदाजीची एक मैफल असायची. क्रिकेट या खेळात रस नसलेलेही त्यामुळे मैदानावर यायचे. दोन दशकांची ब्रॅडमन यांची कारकीर्द म्हणूनच क्रिकेट या खेळासाठी एक सांस्कृतिक सोहळा ठरली. कव्हर्स नसलेल्या खेळपट्ट्या, ओलसर खेळपट्ट्या, उसळते चेंडू टाकण्याचे निर्बंध नाहीत, क्षेत्ररक्षकांवर मर्यादा नाहीत, आतापेक्षा अधिक टणक चेंडू आणि फलंदाजांसाठी कोणतीही संरक्षक आयुधे नसलेल्या युगात ब्रॅडमन यांच्या फलंदाजीची मैफल रंगली. महायुद्धाने ऐन उमेदीच्या काळात क्रिकेटमध्ये खंड पाडल्यानंतरही ब्रॅडमन यांच्या कौशल्यात तसूभरही कमतरता आली नाही. गावाकडून शहरात आलेला एक अतिसामान्य कुटुंबातील मुलगा केवळ क्रिकेट कौशल्याच्या बळावर इस्टेट एजंट, रिटेल असिस्टंट, स्टॉक ब्रोकर ते कंपनी डायरेक्टर अशा पाय-या चढत गेला.
क्रिकेट या खेळाला त्याने वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाची वेगळी प्रतिमा निर्माण केली. वैयक्तिक पातळीवरील यशापेक्षाही त्यांनी देशाला मिळवून दिलेला मानसन्मान मोठा होता. क्रिकेट या खेळाला दिलेले प्रतिष्ठेचे वलय प्रखर होते. तमाम देशवासीयांच्याच नव्हे, तर अन्य देशांच्या क्रिकेट रसिकांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन ब्रॅडमन मैदानावर उतरायचे. क्रिकेट या खेळाचा निखळ आनंद त्यांनी सर्वार्थाने क्रिकेट रसिकांना दिला. कसोटीतील त्यांची ९९.९४ ही सरासरीच त्यांच्या नि:स्वार्थी क्रिकेट योगदानाचे प्रतीक आहे. ब्रॅडमन यांनी स्टेडियमवरील प्रेक्षकांच्या थेट नजरा अंगावर घेतल्या. कौतुकाचे क्षण स्वत: अनुभवले. सारा रोखीचा व्यवहार होता. चांगल्या खेळाची पोचपावती तत्काळ मिळत होती. खेळाचा निखळ आनंद एवढीच पुंजी जमत होती. आज सचिन तो आनंद लुटतानाच सर्वार्थाने समृद्धीची कोठारेही भरून घेत आहे. त्या ‘डॉन’च्या अप्रतिम खेळीला टाळ्यांची, कौतुकाची पोचपावती मिळत होती. वृत्तपत्रात कोडकौतुक होत होते. शरीरवेधी गोलंदाजीच्या आक्रमणाने गाजलेल्या ‘बॉडिलाइन’ मालिकेतही तो डॉन बोलण्यास प्रवृत्त झाला नाही. तेच तत्त्व आचरणात आणणा-या सचिनने आपल्या टीकाकारांना गप्प करण्यासाठी आपल्या बॅटला बोलते केले. ब्रॅडमन यांना त्यांच्या पालकांनी सर्वप्रथम मैदानाबाहेरच्या सभ्य वागणुकीचे धडे दिले होते. ९९.९४ या सरासरीने त्यांनी ५२ सामन्यांमध्ये ६९९६ धावा काढल्या.
क्रिकेट खेळत असतानाच ‘डॉन ब्रॅडमन्स बुक’, ‘माय क्रिकेटिंग लाईफ’ आणि ‘हाऊ टू प्ले क्रिकेट’ या पुस्तकांचे लेखन ब्रॅडमन यांनी केले. निवृत्त झाल्यावर इ.स. १९५० साली त्यांनी ‘फेअरवेल टू क्रिकेट’ हे आत्मवृत्त लिहिले. १९५८ साली त्यांनी क्रिकेट खेळाची शास्त्रोक्त माहिती सांगणारा ‘दि आर्ट ऑफ क्रिकेट’ नावाचा ग्रंथ लिहिला.
सर डॉन ब्रॅडमन यांचे २५ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply