सोनी रामाधीन याचा जन्म १ मे १९२९ रोजी झाला. सोनी रामाधीन हा वेस्ट इंडिजचा १९५० च्या दशकामधील अत्यंत आक्रमक गोलंदाज होता , तो ऑफ ब्रेक गोलंदाजी करत असे. रामा धीन याचा जन्म त्रिनिनाद अँड टोबॅको मधील एस्पेरेन्स ह्या गावामध्ये झाला. त्याच्या जन्मदाखल्यावर त्याचे पहिले नाव नव्हते फक्त ‘ बॉय ‘ हे लिहिले होते. पुढे त्यामुळे त्याचे नाव ‘ सोनी ‘ हे सहजपणे करता आले. डंकन व्हिलेजमधील कॅनडियन मिशन स्कुलमध्ये असताना त्याचा क्रिकेटमध्ये शिरकाव झाला. तेथील शाळेमध्ये ऑस्कर रोच हा कप्तान आणि त्याचा कोच होता , ऑस्करचाही जन्म एस्पेरेन्स व्हिलेज येथे झालेला होता. त्यानंतर रामाधीन पालमिस्ट क्लबकडून आणि त्रिनिनाद लीझहोल्ड्स टीमकडून खेळला . तेथे त्याने स्वतःच्या गोलंदाजीचे कसब दाखवले आणि दोन फर्स्ट क्लास सामन्यामध्ये त्याने १९.२५ च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या. हा त्याचा क्रिकेटमधील पराक्रम वेस्ट इंडीजच्या निवड समितीपर्यंत पोहोचला आणि १९५० च्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याची निवड झाली तेव्हा तो २० वर्षाचा होता.
सोनी रामाधीन याने त्याचा पहिला कसोटी सामना ८ जून १९५० रोजी इंग्लडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला . त्याने आणि त्याचा सहकारी अल्फ व्हॅलंटाईन या दोघांनी १९५० मध्ये इंग्लंडच्या क्रिकेट संघाला पार डॉमिनेट केले आणि दोघांनी मिळून ५९ विकेट्स घेतल्या. ती सिरीज वेस्ट इंडिजने ३ – १ ने जिंकली. वेस्ट इंडिजने इंग्लंडमध्ये ती पहिलीच सिरीज जिंकली होती . जेव्हा इंग्लंडची टीम परत १९५४ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये आली तेव्हा रामाधीनने पहिल्या दोन कसोटी सामन्यामध्ये १३ विकेट्स घेतल्या.
सोनी रामाधीन याची गोलंदाजी सरळ स्टॅम्पवर पडत असे आणि त्या फसव्या चेंडूमुळे फलंदाज बीट होत असे. रामधींन कसा चेंडू स्पिन करतो यांचे इंग्लंडमधील सिनियर खेळाडूंना नीट आकलन होत नसे. रामाधीन हे उकृष्ट ‘ फिंगर स्पिनर ‘ होते. १९५७ च्या इंग्लंडच्या टूरमध्ये त्याने एडिनबर्ग येथील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये ४९ धावा देऊन इंग्लंडचे ७ खेळाडू बाद केले . परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना त्याला स्ट्रगल करावा लागला होता. पुढे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये मात्र त्याने १३.८३ च्या सरासरीने १२ विकेट्स त्यानंतर घेतल्या होत्या हे महत्वाचे. १९५८-५९ रामाधीनने इंग्लंडविरुद्धच्या सिरीजमध्ये २३ विकेट्स घेतल्या . तर पाकिस्तानविरुद्ध त्याने १३.४४ च्या सरासरीने नऊ विकेट्स घेतल्या होत्या.
पुढे मात्र लान्स गिब्जने १९६०-६१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध विकेट्स घेतल्या तेव्हा सोनी रामाधीन हा वेस्ट इंडिज क्रिकेटमधून बाजूला फेकला गेला. १९६० साली अल्फ व्हॅलेंटाइन आणि रामाधीन यांची ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध झालेल्या सामन्यामधील दोघांची गोलंदाजी आजही चित्रफितीमध्ये बघताना कमाल वाटते कारण त्या दोघांनी किती प्रभावी गोलंदाजी त्यावेळी केली होती. तो सामना ‘ टाय ‘ झाला होता. सोनी रामधीन हा वेस्ट इंडिजचा पहिला गोलंदाज होता की ज्याने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये लागोपाठ पाच-पाच विकेट्स इंग्लंडविरुद्ध घेतल्या पुढे २०१६ मध्ये बांगलादेशच्या मेहंदी हसनने त्याची बरोबरी केली.
सोनी रामाधीनने त्याचा शेवटचा कसोटी सामना ३० डिसेंबर १९६० रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबोर्नवर खेळला .
सोनी रामाधीनने ४३ कसोटी सामन्यामध्ये ३६१ धावा केल्या त्यामध्ये त्याने सर्वात जास्त म्हणजे ४४ धावा केल्या. त्याचप्रमाणे त्याने २८.९८ च्या सरासरीने १५८ विकेट्स घेतल्या. एक इनिंगमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स त्याने १० वेळा घेल्या तर त्याने एका इनिंगमध्ये ४९ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या आणि ९ झेल पकडले. सोनी रामाधीनने १८४ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये १०९२ धावा केल्या आणि २०.२४ च्या सरासरीने ७५८ विकेट्स घेतल्या. त्याने एका इनिंगमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स ५१ वेळा घेतल्या तर एका सामन्यामध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त विकेट्स १५ वेळा घेतल्या. तसेच त्याने एका इनिंगमध्ये १५ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या आणि ३८ झेलही पकडले . त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून १९६५ मध्ये निवृत्ती घेतली. त्यानंतर तो इंग्लंडमध्येच कायमचा स्थाईक झाला.
सोनी रामाधीन १९५० नंतर इंग्लंडमध्येच रहात होते. १९६४-६५ मध्ये ते लँकेशायरकडून खेळले. १९६८ पासून १९७२ पर्यंत ते लिंनकोलिनशायर कडून खेळले. त्याचा नातू कायले हॉग हा मध्यम गती गोलंदाज म्हणून २००१ ते २०१४ लँकेशायर कडून खेळत होता.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply