नवीन लेखन...

क्युटशी गोष्ट – भाग १

सकाळच्या वेळी बाजारात भाजी घेत असताना सारिकाच्या खांद्यावरती एका हाताची थाप पडली. सारिका मागे वळून बघतल आणि आनंदाने आश्चर्यचकित होत म्हणाली

“अय्या! मीरा तू, अगं किती दिवसांनी भेटते आहेस…”

“दिवसांनी वर्षांनी म्हण वर्षांनी. कशी आहेस..?”

“माझं काय गं चालू आहे. तू काय म्हणतेस? मुंबईत कधी आलीस? कुठे होतीस ग इतकी वर्ष?

“ह्यांच्या रेल्वेच्या नोकरीच काही खरं नाही ग. इकडे पोस्टिंग, तिकडे पोस्टिंग, नुस्ती फिरती. पण आता झालं बाई, दोन वर्षे राहिली शेवटची आता मात्र मुंबईत.”

“अगदी बर झालं. अमितच काय चाललय ग सध्या..?”

“अमित बँकेत आहे. ए.व्ही.पी.”

“अरे वा! छानच की…”

“आणि आपली वैदू ग…?”

“सॉफ्टवेअर इंजिनिअर झाली ती, एका आय टी कंपनीत आहे..”

“हम्म… बर आपण इथे अश्या कितीवेळ उभ्या राहणार आहोत. चल ना कुठेतरी बसूया जरा. ए, तुला वेळ आहे ना? नसेल तरी चलच.”

मीराने आग्रहच केला सारिकाला,  आणि दोघी तिथल्याच एक हॉटेलमध्ये गेल्या. दोघींमध्ये बराच गप्पा झाल्या.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सारिका स्वयंपाक घरात स्वयंपाकाची तयारी करत असताना वंदिता तीच काम संपवून किचनमध्ये आली.

“संपला का आजचा दिवस..?”

“हम्म..”

पाण्याचा घोट घेत वंदिताने उत्तर दिलं.

“चला आता दोन दिवस बघायला नको..”

“हो ग… शुक्रवारची वाट बघत असते बघ. वर्क फ्रॉम होम असलं ना तरी कामाच प्रेशर तितकंच असत. ट्रॅव्हलिंग नाही एवढंच काय ते वेगळं. ए आई, मस्तपैकी गरम गरम कॉफी दे ना प्लीज! म्हणजे फ्रेश वाटेल जरा.”

“देते.”

अस म्हणून आईने फ्रीजमधून दूध बाहेर काढाल.

कॉफीसाठी वाडग्यात दूध ओतत असताना ‘हीच संधी आहे.’ असा विचार डोक्यात येऊन आठवल्या सारख करत सारिका म्हणाली.

“अग, काल त्या सरनाईक काकू भेटल्या होत्या मार्केटमध्ये…”

“कोण ग, सरनाईक…?”

“अग, तो तुमच्या शाळेत नव्हता का अमित सरनाईक…. त्याची आई.”

“ओहोहो..! अग त्या मलाही भेटल्या होत्या 2 3 दिवसापूर्वी. काय झालं मी दुकानातून…”

“कळलं मला. तिने सांगितलं मला तुमची भेट झाली ते. बऱ्याच गप्पा मारल्या आम्ही. तिचा अमित म्हणे बँकेत ए.व्ही.पी. आहे.”

“हो का? अमित एवढा शिकला..?”

अस म्हणून वंदिता हसायला लागली.

“वंदू, काय..?”

“मजा ग जरा.. शाळेत कसा होता.”

“शाळेत कसा का असेना. पण आता फार छान दिसतो”

“तुला ग कस माहिती..?”

“अग, मीरा सांगत होती आणि तिने दाखवला ना मला फोटो.”

फोटो तर कोणाचाही बघूच शकतो ना अश्या विचारात सारिकाने काय ते सांगून टाकल.

“अच्छा!” वंदिता म्हणाली

“वंदू, बाळ मीरा म्हणत होती, ती अमितसाठी मुली पाहत आहे”

“मग..?”

आईच्या बोलण्याचा अर्थ कळवून घेण्याच्या उद्देशाने आईवर नजर रोखत वंदिताने विचारलं.

“मग मला असं वाटत की आपण एकदा अमितचा…”

“ए आई, अग काहीही काय..?”

वंदिता कट्यावरून खाली उतरत म्हणाली.

“तो शाळेत होता माझ्यासोबत.”

“अरे! अस काय ते, म्हणजे शाळेत असलेल्या मुलासोबत लग्नाचा विचार करू नये अस कुठे लिहिलं आहे का? की कोणी दुसरं आहे तुझ्या मनात?”

सरीकच्या कपाळावर तिच्याही नकळत हलकी आठी पडली.

“तस काही नाहीए ग. पण अमित… मला नाही वाटत… किती भांडकूदळ होता तो. कायम भंडायचा माझ्याशी.”

“अग, शाळेत ना… आता मोठे झालात की तुम्ही.”

“हो, पण..”

इतक्यात बाहेरून डोअरबेलचा आवाज येतो.

“जा बघ तर..” सारिका म्हणाली.

तोंडाने पच असा आवाज करून वंदिता दार उघडायला गेली पण जाता जाता ही ती बोलतच होती.

“तुमच्या पण डोक्यात कसलेही विचार येतात. मला नाही वाटत असे काही होऊ शकत.”

अस म्हणत तिने दार उघडलं आणि ती दोन क्षण बघत राहिली. दारात साधारण ५  फूट ११ इंच उंचीचा, मध्यम बांध्याचा, गव्हाळी रंगाचा देखणा मुलगा उभा होता.

“हाय..”

वंदिता कडे बघत तो म्हणाला.

“हाय..?”

वंदिता प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होती.

“अमित… अमित सरनाईक…”

“ओह! हाय…”

चेऱ्यावरचे भाव झटक्यात बदलत वंदिता म्हणाली. पर्पल कलरचा शर्ट आणि ब्लॅक फॉर्मल मध्ये खरोखर अमित खूप देखणा दिसत होता.

“कोण ग आलाय वंदू..?”

आतुन आलेल्या प्रश्नाने जिने दार उघडलं तीच वंदिता आहे हे कळताच अमितही तिच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागला.

‘ही वंदिती..?’

निळ्या रंगाचा शॉर्ट कुडता, हलक्या गुलाबी रंगाची पटियाला आणि अर्ध्या केसांचा अंबाडा बांधून समोर उभ्या असलेल्या वंदिताकडे बघून

‘किती वेगळी दिसायला लागली ही, आपल्याला ओळखतात आलं नाही.’

असे विचार अमितच्या डोक्यात घुमू लागले.

“अरे, अमित…. ये ना बाळ. आत ये.”

किचनमधून बाहेर आल्यावर अमितकडे बघून सारिकाने म्हंटल. तसा बूट काढून अमित आत आला. वंदिता तशीच दाराला रेलून उभी होती.

“बस ना…”

“नको काकू. मी ऑफिस मधून डायरेक्ट इथेच आलोय. बसत नाही मी. ते मला आईने पाठवलं होत. म्हणाली तुम्ही… ते पत्रिका… देणार होतात.”

बोलतानाही त्याला आलेला अवघडलेपणा अगदी साफ जाणवत होता.

“हो, हो, वंदूची पत्रिकाना. आणते हो मी. आलेच.”

सारिकाने एक नजर वंदितावर टाकली. वंदितानेही डोळे मोठे करत रागाने आईकडे पाहिलं पण त्या नजरेकडे कानाडोळा करत आई आत निघून गेली.

काही काळ शांतच गेला. दोघांनाही काय बोलाव कळेना. त्यांच्या आयांनी हा विषय काढून त्यांच्यावर एक प्रकारे बॉम्बच टाकला होता. त्यात मुलीची पत्रिका घ्यायला मुलानेच यावं आणि त्यासाठी मुलीनेच त्याला दार उघडाव ह्यापेक्षा दुसरी अवघड परिस्थिती असूच शकत नाही असा विचार दोघांच्याही मनात आल्याने दोघेही अगदी अवघडून उभे होते.

“बऱ्याच वर्षांनी भेट झाली नाही…”

कुठेतरी ही शांतता थोडायला हवी ह्या विचाराने अमित बोलायला लागला.

“हो ना. शाळेनंतर आत्ताच…”

वंदूही दार सोडून पुढे येत म्हणाली.

“कोण कोण आहे मग अजून कॉन्टॅक्टमध्ये?” अमितने विचारलं.

“आहेत एक दोन जण. बाकी बरेचसे कुठे गायब झाले पत्ताच नाही.”

“खरंय. आपलीसुद्धा ही अशी भेट होईल वाटलं नव्हतं कधी.”

अमित पटकन बोलून गेला आणि झटक्यात त्याची नजरानजर झाली. वातावरण पुन्हा अवघडल.

“म्हणजे, शाळेत भांडणापलिकडे आपण कधी बोललोच नाही ना म्हणून म्हंटल मी.”

वाक्य पूर्ण करून अमित मान खाली घालत गप्प झाला. स्वतःवर वैतागत तो बसलाच आणि त्याने एकदा डोळे बंद करून घेतले.

त्याच्या एकूण चालल्या प्रकाराने वंदिताला हसू आलं. ती हसताना बघून अमितही हसू लागला. थोडस हलकं वाटू लागलं.

थोड्यावेळाने आई बाहेर आली.

“हे घे बाळ..”

अमित पटकन उठून उभा राहिला. सारिकाच्या हातातून पत्रिका घेऊन त्याने सरळ दार गाठलं. तो बाहेर जाताच वंदितानेही दार लावून घेईल. आणि एक दीर्घ श्वास घेतला.

“काय ग, कसा वाटला..?”

आईने उत्साहात विचारलं.

“अग, हलू बोल की तू. तो बाहेरच असेल तर.”

“एवढा का वेळ थांबतोय तो? सांग की, कसा वाटला?”

“बराय…”

स्वतःच हसू दाबत वंदिता म्हणाली.

“बरा..?”

तिच्या नजरेतली चमक ओळखून आईने पुन्हा विचारलं.

“छान..”

अस म्हणत लाजून वंदिता आत निघून गेली. ती गेली त्या दिशेने सारिका अगदी समाधानाने पाहत होती.

त्या दोघींचं ते संभाषण, बुटाच्या लेस लावताना अमितच्याही कानावर आलं आणि मनात ओसंडून वाहणारा आनंद ओठावर घेऊन तो घराच्या दिशेने निघाला.

फ्लॅशबॅक…

हॉटेलमध्ये बसून सारिका आणि मीरा ह्यां अगदी मनमोकळ्या गप्पा मारत होत्या. बोलता बोलताच मीराने एकदम गंभीर आवाज करत विषय काढला.

“सारिका, आज मी ह्या मार्केटमध्ये एका उद्देशाने आले होते आणि खर सांगू कदाचित माझ्या मनातली ती गोष्ट बाप्पालाही मान्य असावी म्हणून आज तुझी न माझी भेट झाली बघ.”

“हो, अस आहे तरी काय तुझ्या मनात?”

“सारिका, दोन तीन दिवसापूर्वी मला इथेच वंदिता भेटली होती.”

“काय सांगतेस..? गधडी, काही बोलली नाही मला.”

“बरच झालं नाही बोलली. अग, त्या दिवशी ती दुकानातून बाहेर आली तिथेच मी एका गाडीवर भाजी घेत होते. तिथेच भेटलो आम्ही. पोरीनेच ओळख दाखवली बर. मला तर वंदू ओळखताच आली नाही. किती वेगळी, किती गोड दिसायला लागली पोर. पण त्याहून गोड होत तीच ते आपुलकीने बोलणं. सारिका, माझ्या अमितला ह्यापेक्षा चांगली मुलगी शोधूनही सापडणार नाही. पण तिच्याशी बोलताना, मनात ह्या गाठी बांधताना तिच्याकडून तुमच्या कोणाचाही नंबर घेण्याचं साफ विसरले मी. काय करावं कळेना. अखेरीस शेवटचा पर्याय म्हणून पुन्हा इथेच खेप मारायचं ठरवलं. आणि म्हंटल तस बाप्पालाही हेच मंजूर असणार म्हणून त्याने आपलीच भेट घडवून दिली. आता तुला आणि तुमच्या घरच्यांना काही हरकत नसेल तर आपण आपल्या ह्या नात्याला एक वेगळं नाव देऊ शकतो.”

“मीरा अग, आज का ओळखते तुला मी? तुझ्या घरी जर माझी लेक जाणार असेल तर ह्या शिवाय दुसरा आनंद नाही मला. पण आज कालच्या मुलांचं वागणंच गौण आहे बघ. आपण सांगावं की बरोबर त्याच्या उलट असत ह्यांच वागणं.”

“अग, मग आपण काही सांगायचंच नाही. फक्त कानावर घालायचं आणि त्यांना एकमेकांसमोर उभं करायचं. पुढे त्यांनाचं ठरवू देत.”

मीरा म्हणाली आणि दोघींनी मिळून पत्रिकेच्या नावाखाली आपल्या मुलाच्याही न कळत त्याची भेट घडवून दिली.

साध्यस्थीती…

अमित पत्रिका घेऊन घरी आला. इतक्यात आईला काही कळू द्यायच नाही ह्या उद्देशाने शक्य तेवढ नॉर्मल राहायचा निर्णय अमितने घेतला. चावीने दार उघडून अमित आत आला. आई समोरच वाचत बसली होती.

“अरे वा! आज निवांत दिसताय.” अमित सोफ्यावर बसत म्हणाला

“हम्म..” मिराने रिप्लाय दिला

‘आता ही पत्रिकेबद्दल विचारणार.’ असा विचार अमितच्या डोक्यात येऊन गेला पण तसं काहीच घडलं नाही. ती पुस्तक वाचत होती. वाचत असलेलं पान संपवून आईने अमितला विचारलं.

“बर. तू काय देऊ चहा की कॉफी?”

“कॉफी चालेल.”

“कॉफी? म्हणजे आज दिवस चांगला गेलेला दिसतोय.”

“कशावरून..?”

“सवय आहे ना तुझी. खुश असलास किंव्हा दिवस चांगला गेला तर अशी कॉफीची डिमांड करतोस.”

“छ्या, छ्या! असच काही नाही. मी सहज म्हंटल कॉफी दे, चहा पण चालेल मला.”

“असुदेत रे. कॉफी हवी न. आणते.”

म्हणत आई आत गेली

“कमाल झाली. स्वतःच पत्रिका आणायला पाठवते आणि आता विचारत पण नाही” अमित स्वतःशीच पुटपुटला. शेवटी त्याचा पेशन्स संपला आणि तो बॅगेतली पत्रिका काढुन किचनमध्ये गेला.

“मातोश्री, आपलं काम केलं आहे. ही घे वंदिताची पत्रिका.”

“अरे, आणलीस तू? विसरलेच होते बघ मी. आण इकडे.”

अमितच्या हातून मीराने पत्रिका घेतली. त्याच्या हातात कॉफीचा कप दिला आणि बाहेर निघून गेली.

आईच्या एकूण वागण्याने अमित कोड्यात पडला. घरी आल्यापासून वंदिता बद्दल एकही शब्द तिने विचारला नव्हता. ह्या सगळ्यात प्रसंगात मिराच्या फोनवर मात्र एक मॅसेज येऊन गेला.

“आमच्याकडून ग्रीन सिग्नल आहे. तुमचं काय? अमितला आवडली आहे का?”

त्यावर रिप्लाय म्हणून मीराने पाठवले.

“अजून मी विचारले नाही. योग्यवेळी आपोआपच मला कळेल. कळलं की फोनच करेन.”

आणि मोबाईल बंद करून पुन्हा वाचण्यात गुंग झाली.

इकडे अमित मात्र आईच्या अनपेक्षित वावण्याने गांगरून गेला होता. त्याला आतून फारच अस्वस्थ वाटत होतं. खरतर त्याला आईकडून बऱ्याच प्रश्नांची अपेक्षा होती पण तसं काहीच न घडता ती एकदम शांत होती. काल त्यांच्यात झालेल्या संभाषणात

“मी तुला पत्रिका आणून देईन पण ह्या विषयावर बोलून उगाच मला प्रेशराईज करायचं नाही” हे आपलं बोलणं तिने जरा जास्तच सेरिअसली घेतलं की काय अस ही त्याला वाटू लागलं. ह्या विचारांत तो स्वतःशीच बोलू लागला.

“कमाल आहे ह्या आया पण. इथे ही, एवढी जाऊन मी पत्रिका घेऊन आलो तर एक शब्द विचारला नाही. आणि तिथे तिची आई, मी गेलो आहे की नाही ह्याची खात्री न करताच मुलीला पसंती विचारून मोकळी.”

क्षणातच, अमित त्या प्रसंगात अडकला आणि वंदिताने आईला दिलेलं “छान..” हे ऊत्तर आठवून एक हलकं हसू त्याच्या ओठावर उमटलं.

“शाळेत किती वेगळी दिसत होती वंदिता आणि आता किती वेगळी वाटली. तिच्याकडे बघून अस वाटलंच नाही की ही तीच मुलगी आहे जिच्याशी आपण शाळेत कचाकचा भांडायचो. मुली मोठ्या झाल्या की किती वेगळ्या दिसतात नाही.”

हातातल्या हेडफोनशी खेळत, मनातल्या विचारांनी अमित स्वतःशीच हसत होता. एकदम त्याला वंदिताला बघण्याची इच्छा झाली. त्याने फेसबुक उघडलं. तिला शोधलं पण तिने अकाउंट लॉक केल्याने त्याला तिचा फोटो पाहता आला नाही. इतक्यात त्याला आठवलं की सारिका काकूने पत्रिकेसोबत वंदिताचा फोटो ही पाठवला आहे. हे आठवताच मगाशी घाई घाईत आईला पत्रिका नेऊन दिल्या बद्दल त्याने स्वतःलाच शिव्या दिल्या. आता आईकडून फोटो मागणं म्हणजे आपण आयते तिच्या हातात सापडणार.

शेवटी धीर करून अमित रूमच्या बाहेर आला. आई सोफ्यावरच वाचत बसली होती. बाहेर येताच काही न झाल्यासारख भासवत तो हॉलच्या शोकेसमध्ये शोधा शोध करू लागला.

“काय रे काय शोधतोयस?”

“आ..! अग, ते माझे इअरफोनस् मिळत नाहीयेत तेच बघतोए. तू ठेवलेस का कुठे?”

“चुकीच्या जागी शोधतो आहेस तू. तुला जे हवंय ते तिथे नाहीए.”

“मला जे हवंय ते..?” अमित गडबडला. “काय… हवंय मला?”

“इअरफोन ना..?”

“हा… हो, हो इअरफोनच…”

“पण तुझ्या गोष्टी इथे कधीच नसतात बाळा! त्या कायम तुझ्या खोलीतच असतात. तिथेच बघ मिळतील.”

आईच्या बोलण्याने शोधण्याचा चान्स गेला म्हणून चेहऱ्यावर उसनं हसू आणत अमित खोलीत जायला निघाला तर आईने त्याला पुन्हा हाक मारली.

“अमित, अरे! कुठे निघालास? जे शोधत होतास ते घेऊन तरी जा.”

अस म्हणत आईने खालच्या ड्रोवरमधून वंदिताच्या पत्रिकेत ठेवलेला तिचा फोटो काढला. आपली चोरी पकडली गेली हे कळल्याने अमितला अतिशय ओशाळल्या सारख झालं. त्याच्याजवळ येत मीरा म्हणाली.

“आई आहे मी तुझी. तुला बोलताही येत नव्हतं ना तेव्हा तुझी ही नजर सांगायची मला सगळ. आजही तिनेच सांगितलं मला तुझ्या मनातलं.”

आईच्या बोलण्याने अमितच्या मनातला आनंद चेहऱ्यावर आला. त्याने आईला कडकडून मिठी मारली आणि त्याच्या खोलीत निघून गेला. जाताना मात्र आईच्या हातून वंदिताचा फोटो घ्यायचा मात्र तो विसरला नाही…

— रेणुका दीक्षित जोशी

Avatar
About रेणुका दीक्षित जोशी 3 Articles
मी एम. ए. मानसशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. वाचनाची आवड लहानपणापासून होती पण कधी लिखाणाचा विचार केला नव्हता. कोरोनाच्या काळात माझ्यातील ह्या गुणास वाव मिळाला. मधुरा वेलणकर ह्यांच्या मधुरव ह्या कार्यक्रमात माझी एक लघुकथा वाचण्यात आली होती. मी प्रतिलिपी ह्या अँपवर देखील माझ्या अनेक कथा प्रकाशित केल्या आहेत. आणि नुकतेच मला 'मुंबई मराठी ग्रंथसंपदा' (विलेपार्ले शाखा) ह्या ग्रंथालयाने आयोजित केलेल्या लघुकथा स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

2 Comments on क्युटशी गोष्ट – भाग १

  1. कथा छान आहे. आवडली. फ्लॅशबॅकच्या तंत्राचा वापरही कथेचा ओघ न तुटता चालू ठेवतो ते छान वाटले.

    • खूप खूप धन्यवाद! ह्याचे पुढील भाग ही तुम्हाला आवडतील अशी आशा करते..

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..