काल असाच कामानिमित्त घराबाहेर पडलो.कामासाठी वेळ लागणार होता. बराच वेळ घालवूनही वेळ होताच. तेव्हाच रस्त्याच्या बाजूला एक टपरी दिसली.मस्त पातेल्याबाहेर चहाच्या वाफा येताना दिसल्या.चला म्हटलं एक चहा घेऊ या. एकटाच होतो आणि केवळ वेळ घालवायचा होता तशी चहाची वेळ झाली होती. सायंकाळचे चार वाजले होते तिथल्या पो-याला ए.. एक कटींग चहा घेऊन म्हणून ऑर्डर दिली तशी तेवढ्याच तातडीने मालकालाच ए.. एक कटींग चाय भरा. अशी जोरात ऑर्डर दिली.
मालकानेही त्याचा आदेश तातडीने पाळला व माझ्यासमोर टेबलावर चहा आला आणि मी या कटींग चहाच्या अनेक कडूगोड आठवणीत बुडून गेलो. काॅलेज जीवनातील याचं महत्त्व फार होतं. आमचा एक नियम होता बाहेर फिरायला आम्ही चार पाच मित्र बाहेर पडलो आणि कुणाचे पै पाहुणे वाटेत भेटले,त्यांनी चहासाठी विचारलं तर नाही म्हणायचं नाही आणि नाही नको कोणी म्हटलं तर त्याने चहाचे बील द्यायचं 1990 – 91 ची गोष्ट आहे,सोलापूरला स्वागतनगरला एका संस्थेत काम करताना पगार फार तुटपुंजा होता,तोही वेळेवर मिळत नव्हता.
मार्च महिन्यात सकाळची शाळा असायची दुपारी आराम केल्या नंतर चहासाठी बाहेर पडायचो.चहा घेणे व वेळही जावा म्हणून आणि आमच्या भागात चहा 75 पैशाला होता तर मौलाली चौक शास्त्री नगर येथे गरिबी हटाव चहा टपरी होती. चार पाच किलो मीटर अंतर चालून कटींग चहा घ्यायला यायचो कारण इथं चहा 50 पैशाला होता आणि आणि सर्वांची परिस्थिती सारखीच होती.पण त्याची लज्जत व त्याचा आनंद काही औरच होता.
हा चहा माणुसकी,आदरातिथ्य,पाहुणचार,मैत्री जपण्याचं प्रतिक मानलं जातं. हा कटींग चहा भूक भागवतो.याची इतकी तलफ जडलेली असते काहीना की, त्यांना जेवण नसले तरी चालते पण चहा लागतो, अनेकांचे संसार,उद्योग चालवतो हा कटींग चहा.कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरतं चहा. दिवसाची सुरुवात चहाने होते.
खरंच एका कटींग चहाने अनेक नाती घट्ट होतात. अशाच टपरीवर अनेक व्यवहार होतात.या आणि अशा अनेक आठवणीसोबत चहा घेतला.चहाची चव आणि आठवणीची उजळणी दोन्ही गोष्टी मनात रेंगाळत राहिल्या.. अशी आहे कटींग चहाची फुल्ल मजा. नक्कीच आवडेल व आपल्याही काही आठवणी या कटींग चहाच्या जाग्या होतील.
श्री.रवींद्र कल्याणराव देशमुख ,गुरुजी
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक श्री.रवींद्र कल्याणराव देशमुख ,गुरुजी ह्यांनी लिहिलेला हा लेख
Leave a Reply