सह्याद्री वाहिनीचा इतिहास
२ ऑक्टोबर १९७२ साली मुंबई दूरदर्शनची स्थापना झाली आणि त्यावेळचे स्टेशन डायरेक्टर होते पी.व्ही. कृष्णमूर्ती.
डीडी दिल्ली केंद्रानंतरचे दुसरे डीडी केंद्र म्हणजे डीडी मुंबई केंद्र. त्या काळात, दिल्ली केंद्र वेगवेगळ्या बातम्या आणि राजकीय/राष्ट्रीय पातळीवरचे कार्यक्रम यांचे प्रमुख स्थान मानले जायचे. पण मुंबई ही मनोरंजनाची खाण आहे. या बॉलीवुड नगरीची गैरहजेरी दूरदर्शनमध्ये होती, म्हणून मुंबई दूरदर्शन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात, घराघरात, डीडी सह्याद्री हे नाव पोचले. नवनव्या कल्पनांनी नटलेले कार्यक्रम सादर केले गेले जे अधिक चैतन्यशील आणि खिळवून ठेवणारे होते.
या काळात मैलाचे दगड ठरतील असे अनेक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात कार्यक्रम चालू असताना फोन करता येणारा असा पहिलाच `हॅलो-डीडी’ हा कार्यक्रम आहे. तसेच सिने सतरंगी आणि टॉप टेन हे कार्यक्रम आहेत. चित्रपट-आधारित कार्यक्रम आहेत. `फूल खिले है गुलशन गुलशन’ या कार्यक्रमात तबस्सुम सिनेकलाकारांच्या मुलाखती घेत असे. हा तुफान लोकप्रिय कार्यक्रम होता. डीडी मुंबई केंद्राने याचबरोबर गाजलेल्या मालिका, सिनेआधारित कार्यक्रम,, सांगीतिक कार्यक्रम, रिऍलिटी शोज, पाककला कार्यक्रम, बातम्या आणि चालू घडामोडी यांवरचे कार्यक्रम, माहितीपर कार्यक्रम, सार्वजनिक चर्चा असे विविध कार्यक्रम सादर केले.
कृषि, शिक्षण, माहिती आणि मनोरंजन कार्यक्रम हा दूरदर्शनच्या डीएनएचा भागच आहे. बालिका शिक्षण, स्त्री सबलीकरण, आरोग्य जाणीवजागृती, तरुणाईसाठी स्फूर्तिदायी कार्यक्रम आणि ग्रामीण भारतातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी डीडी सह्याद्री अनेक कार्यक्रमांची निर्मिती करत आली आहे.
राष्ट्रीय वाहिनी आणि दूरदर्शनच्या हिंदी पट्ट्याच्या जाळ्यातील केंद्रे यावर प्रक्षेपित झालेले सर्व चित्रपट मुंबई केंद्र प्रक्षेपित करते. बायोस्कोप, रंगोली आणि चुलबुली फिल्मे, चटपटी गपशप यासारखे राष्ट्रीय वाहिनीवरील चित्रपट आधारित कार्यक्रम मुंबई केंद्र निर्माण करते आणि प्रक्षेपित करते. यंग-तरंग, कृषि-दर्शन, आमची माती आमची माणसे, आस्वाद, सखी सह्याद्री, हॅलो डॉक्टर, स्वस्थ भारत, पटलं तर घ्या, क्रीडांगण, म्युझिक मस्ती गप्पा गाणे (एम2 जी2) यासारखे मालिका आधारित कार्यक्रम, तसेच सह्याद्री अंताक्षरी, धिना धिन धा, दम दमा दम, नाद भेद, आजचे दावेदार – उद्याचे सुपरस्टार यासारखे विविध स्पर्धात्मक, रिऍलिटी शोज यासारख्या अनेकानेक कार्यक्रमांनी प्रेक्षकांचे वर्षानुवर्षे मनोरंजन तर केले आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संपन्न संस्कृतीचे आणि परंपरांचे जागरणही केले आहे.तरी पण इतर चॅनलच्या भाऊगर्दीत सह्याद्री चॅनेल कुठेतरी कमी पडत आहे असे दिसते.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply