नवीन लेखन...

दाम करी काम…

देशात पुरेसा पैसा चलनात असला तर उपभोगासाठी त्याचा वापर करून काही रक्कम बचत केली जाऊ शकते. या बचतीने बँकातील ठेवी वाढतात आणि त्यामुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतात. उपभोक्ते, उद्योजक, शेतकरी, व्यापारी यांना अधिक कर्ज मिळाल्याने अधिक उत्पादन, अधिक विक्री आणि अधिक निर्यात शक्य होते.आणि त्यातू देशाची आर्थिक प्रगती साधता येते.


आपल्या वैयक्तिक आयुष्यात जसे पैशाचे महत्व आहे तसेच ते देशाच्या अर्थव्यवस्थेत सुद्धा आहे. अर्थव्यवस्थेत असणारा  पैसा आणि  त्याची कॉस्ट यावर अनेक बाबी अवलंबून असतात. म्हणून त्यासाठी एक धोरण आखावे आणि राबवावे लागते. हे काम देशाची मध्यवर्ती बँक करते आणि त्या धोरणाला नाणे व पत धोरण असे म्हणतात.

पैसा आणि पैशाचे स्रोत

देशात पैसा चलनात असतो. देशातील एकूण पैसा म्हणजे देशवासीयांच्या हातात असलेले सरकारी चलन, बँकातील चालू व बचत खात्यातील शिल्लक, तसेच बँका आणि पोस्ट खात्यातील मुदत ठेवी यांची बेरीज. या सर्व पैशाचा बाजार म्हणजे नाणे बाजार. याला मुद्रा बाजार किंवा चलन बाजार असेही म्हणतात.

अर्थव्यवस्थेत असणारा पैसा तीन मार्गानी येतो – मध्यवर्ती बँकेने अधिकृतपणे प्रसृत केलेले प्रत्यक्ष चलन, बँकांनी कर्ज देऊन निर्माण केलेला कृत्रिम पैसा (पत पैसा) आणि परदेशातून परकीय चलनात आलेला पैसा.

अर्थव्यवस्थेतील काही घटकांकडे त्यांच्या उपभोगापेक्षा जास्त पैसा असतो म्हणून ते पैशाची बचत करू शकतात आणि असा वाचवलेला पैसा गुंतवू शकतात. या उलट काही घटकांकडे उपभोग व गुंतवणूक यांच्या गरजेपेक्षा कमी पैसा असतो. सबब ते पैसा कोठून मिळू शकतो का याचा शोध घेत असतात. म्हणजेच काही घटक बाजारात आपल्याकडील जास्तीचा पैसा पुरवतात, तर काही घटक पैशाची मागणी नोंदवतात. या मागणी आणि पुरवठ्याच्या आंदोलनांवर व्याजाचा दर ठरतो. पैशाची मागणी वाढली, तर ज्यांच्याकडे गुंतवणूकयोग्य जास्तीचा पैसा आहे, ते जास्त व्याज दराची अपेक्षा करतात व त्यामुळे बाजारातील व्याजदर उंचवतात. या उलट परिस्थितीत व्याजदर घटतात. परकीय गुंतवणूकदार कोणत्या देशात गुंतवणूक करायची हे ठरवताना अन्य घटकांबरोबर व्याजदराचाही विचार करतात. जास्त व्याजदर असणाऱ्या देशात (अन्य घटक समान असतील तर) विदेशी गुंतवणुकीचा ओघ सुरू होतो. व्याजदर कमी झाले तर, ही गुंतवणूक देशा बाहेर जाऊ लागते. म्हणजेच पैशाचा ओघ दुसऱ्या देशाकडे वळतो.

शासन अनेक वेळा आपल्या महसुलापेक्षा जास्त खर्च करते. ही तूट भरून काढण्यासाठी मध्यवर्ती बँकेला अधिक चलन छापावे लागते. किंवा शासनास कर्ज उपलब्ध करून द्यावे लागते. अशा स्थितीत देशातील एकूण चलनात वाढ होते.

नाणे/ मुद्रा पत धोरण

अर्थव्यवस्थेतील चलनाचा पुरवठा, बँकांनी कर्ज रूपाने तयार करायचा पतपैसा, परकीय पैशाचा ओघ आणि व्याजदर या चार गोष्टींवर मध्यवर्ती बँकेला नियंत्रण ठेवावे लागते आणि त्या संदर्भात एक नीती/ धोरण ठरवावे लागते. अशा धोरणाला मुद्रा व पत धोरण म्हणतात. थोडक्यात, मध्यवर्ती बँक काही उपाय योजून अर्थव्यवस्थेतील प्रत्यक्ष चलन आणि उपभोक्ते, शेतकरी व उद्योजक, व्यापारी यांच्यासाठीचा पतपैसा नियंत्रित करते, हे उपाय ज्या धोरणात जाहीर केले जातात त्याला नाणे व पत धोरण म्हणतात.

पैशाची उपलब्धता हा जसा नाणेधोरणाचा एक पैलू आहे तसाच दुसरा पैलू आहे ‘मुद्रा बाजाराची संरचना’. मुद्राबाजारात कार्यरत असणारे विविध घटक , पैसा उभारणीचे विविध प्रकार, व त्यासाठीचे स्वातंत्र्य इत्यादि बाबी मुद्रा बाजारच्या संरचनेत येतात. नाणे व पत धोरणाने या बाबतही दिशा निश्चित केली जाते.

पैशाच्या मात्रेचा (quantity) अर्थव्यवस्थेवरील परिणाम  

वस्तु आणि सेवा यांची मागणी ही जनतेच्या हातात असणाऱ्या पैशाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. हातातील हा पैसा जनतेची क्रयशक्ति ठरवत असतो. आणि जनतेची मागणी देशातील मंदी किंवा भरभराट ठरवत असते. देशात पुरेसा पैसा चलनात असला तर उपभोगासाठी त्याचा वापर करून काही रक्कम बचत केली जाऊ शकते. या बचतीने बँकातील ठेवी वाढतात आणि त्यामुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतात. उपभोक्ते, उद्योजक, शेतकरी, व्यापारी यांना अधिक कर्ज मिळाल्याने अधिक उत्पादन, अधिक विक्री आणि अधिक निर्यात शक्य होते.आणि त्यातू देशाची आर्थिक प्रगती साधता येते. कर्जावरील व्याजदर माफक असेल तर कर्ज घेण्याकडे कल वाढतो. थोडक्यात, पुरेसा पैसा चलनात असणे, बँकांमध्ये योग्य प्रमाणात बचत होणे आणि व्याजदर माफक असणे या बाबींमुळे सर्व क्षेत्रास कर्ज पुरवठा व्यवस्थित होऊ शकतो. या बाबी नाणेधोरणाचा भाग आहेत.

देशातील मंदी दूर करण्यासाठी नाणेधोरण उपयोगी पडते. मध्यवर्ती बँक स्वतःहून मंदी हटवू शकत नसली तरी उपभोक्ते, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक यांना पुरेशी आणि कमी व्याजदराने कर्जाची उपलब्धता करून देता येते. त्यातून जनतेची क्रयशक्ती वाढून मंदी दूर होऊ शकते. शासन विकास कामांचे काही प्रकल्प (उदा. रस्ते बांधणी पूल बांधणी इ.) हाती घेते. त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करते. शासनाने असा खर्च केला की जनतेचे उत्पन्न वाढून हातात पैसा येतो. जनतेची क्रयशक्ती वाढते, त्यामुळे मागणी वाढते, उत्पादन वाढते, रोजगार वाढतो आणि मंदीतून वाट काढता येते.

बाजारातील किंमतवाढ रोखण्यासाठी पैशाची मात्रा कमी करणे हा जालिम उपाय आहे. वस्तु आणि सेवा यांची मागणी त्यांच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असली तर त्यांच्या किमती वाढतात. ही मागणी ग्राहकांच्या क्रयशक्तीवर अवलंबून असते आणि क्रयशक्ती त्यांच्याकडील पैशावर अवलंबून असते. बाजारातील प्रत्यक्ष चलन आणि पतपैसा कमी केला की क्रयशक्ती कमी होऊन मागणी घटते आणि किंमत वाढीला आळा बसू शकतो. नाणे धोरणाने हे शक्य होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर एका देशाच्या चलनाचे दुसऱ्या देशाच्या चलनाशी मूल्य निर्धारित होत असते. त्यास ढोबळ मानाने विनिमय दर म्हणता येईल. विदेशी चलनाची देशांतर्गत मागणी आणि त्या चलनाचा पुरवठा यावर हा विनिमय दर अवलंबून असतो. आयात व निर्यात यासाठी प्रामुख्याने विदेशी चलनाचा वापर होतो, तसाच परकीय गुंतवणुकीचा प्रवाह सुद्धा विदेशी चलनाच्या साठयास कारणीभूत होतो. विदेशी व्यापार तूट आणि देशाबाहेर जाणारी विदेशी गुंतवणूक येणाऱ्या गुंतवणुकीपेक्षा जास्त असणे या कारणाने चलनावर ताण पडतो व विनिमय दर अस्थिर होतो. अस्थिर विनिमय दराने आयात, निर्यात आणि विदेशी गुंतवणूक, तिची परतफेड यावर परिणाम होत असतो. म्हणून विनिमय दर स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा नाणे धोरण महत्त्वाचे असते. स्थिर विनिमय दर हा देशाच्या आर्थिक स्थिरतेचा एक मापदंड आहे.

समन्वय

थोडक्यात देशातील भाव पातळी, उत्पादन पातळी, रोजगार पातळी, निर्यात पातळी, विदेशी चालनाची आवक- जावक, कर्जपुरवठा, शासनाचे विकास धोरण या साऱ्या बाबीवर नाणे आणि पत धोरणाचा परिणाम होत असतो. देशातील पैशाची मात्रा आणि पैशाची कॉस्ट या गोष्टी मध्यवर्ती बँक नाणे धोरणातून ठरवते आणि त्यावर बाजारातील वस्तू आणि सेवा यांची मागणी अवलंबून असते. परंतु केवळ नाणे धोरण पुरेसे नाही. देशाचे राजकोषीय धोरण शासन ठरवते. राजकोषीय धोरण बेशिस्तीचे असेल तर तूट सतत राहते, ती वाढत जाते. अशी तूट भरून काढण्यासाठी शासन मध्यवर्ती बँकेकडून सोयीचे नाणे धोरण राबवून घेते. त्यामुळे चलन पुरवठा वाढतो. महागाई वाढते. शासनाची कर्जे वाढतात. व्याजदर चढे राहतात.  सबब मध्यवर्ती बँकेचे नाणे धोरण आणि शासनाचे राजकोषीय धोरण यात सुसूत्रता हवी, समन्वय हवा. अर्थव्यवस्थेच्या भल्यासाठी हे दोन स्तंभ अतिशय महत्त्वाचे आहेत.

(बँकिंग विषयाचे अभ्यासक)

–डॉ. विनायक गोविलकर

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..