गुजरात – मंचावरील थोडा घटनाक्रम व घोटाळे:
१७२३ मध्ये बादशहानें सरबुलंदखानास गुजरातचा सुभेदार नेमले. परंतु तो प्रत्यक्ष गुजरातेत येऊन तेथें कारभार सुरू करण्यांस १७२५ सालाचा डिसेंबर महिना उजाडला. निजामाच्या मनांत तो प्रांत सोडण्याचें अजिबात नव्हतें. त्यामुळे, सरबुलंदखान गुजरातमध्ये येईतो, सरबुलंदखानाचा सरदार सुजायतखान (व सुजायतखानाचा भाऊ रुस्तमअलीखान) एका बाजूस, तर निजामाचा मामा हमीदखान दुसऱया बाजूस, अशा लढाया चालू झाल्या. शाहूचा एक सरदार कंठाजी कदम बांडे हा गुजरातेत मुलुखगिरी करत होता. त्याची मदत घेऊन हमीदखानानें सुजायतखानाला ठार मारलें. तेव्हां रुस्तमअलीनें पिलाजी गायकवाडाची मदत घेऊन हमीदखानावर चाल केली. शाहूचा सरदार उदाजी पवार व इतर सरदार हमीदखानाच्या मदतीला आले. १७२५ मधील पेटलाद जवळील लढाईत पिलाजीनें रुस्तमअलीचा पक्ष सोडला. त्या लढाईत रुस्तमअली मारला गेला. हमीदखानानें मही नदीच्या उत्तरेकडील प्रदेशाची चौथाई कंठाजीला व दक्षिणेकडील भागाची पिलाजीला कबूल केली. मुघलांना अडचणीत गाठून चौथाईचा अधिकार मिळवणें ही मराठ्यांची जुनी, शाहूपूर्वकाळापासूनची, पद्धतच होती.
कंठाजी व पिलाजी यांची १७२५ एप्रिल महिन्यात खंभात जवळ जोराची लढाई झाली. ( हें पहा मराठ्यांच्या सरदारांची आपसातील एक युद्ध !). या लढाईत पराभव पावून पिलाजी खेडा भागात गेला. कंठाजीनें खंभात मधून पैसे वसूल केले. उदाजीला बाजीरावानें चौथाई वसुलीसाठी पाठवलें, व त्यास पिलाजीनें विरोध केला. डभई येथें उदाजी व पिलाजी यांची लढाई होऊन तिथला कोट उदाजीनें ताब्यात घेतला. त्यावर कंठाजी व पिलाजी एक होऊन उदाजीवर चालून आले. तेव्हां उदाजीनें गुजरातचा नाद तात्पुरता सोडला व माळव्याला प्रयाण केलें. कंठाजी व पिलाजी यांनी बडोदे व डभई येथें आपापला बंदोबस्त केला. १७२५ डिसेंबर मध्ये सरबुलंदखान अहमदाबादेस येऊन पोचेतो कंठाजी व पिलाजीनें आपला जम बसवून ठेवला.
हमीदखानानें अहमदाबाद सरबुलंदखानाच्या हवाली केलें, पण इतरत्र मात्र त्याला विरोध केला. सरबुलंदखानाच्या मराठ्यांशी लढाया झाल्या. कपडवंज येथील लढाईनंतर मराठे मागे सरत छोटा उदेपुर येथें आले. १७२६ च्या उन्हाळ्यात कंठाजीनें वडनगर शहरावर चाल केली व तें लुटलें. पिलाजीनें बडोद्यावर चाल केली, व नंतर लगोलग खंभात आणि सुरतवर चाल करून ती शहरें लुटली. हमीदखानानें गुजरातेस रामराम ठोकला खरा, पण मराठ्यांच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी सरबुलंदखानालाही त्यांच्या मागण्या कबूल केल्याखेरीज गत्यंतर राहिलें नाहीं व त्यानेंही चौथाईचे हक्क मराठ्यांना कबूल करून दिले. (मुघलांकडील माणूस बदलला, पण मराठ्यांचा चौथाईसाठी दबाव कायम राहिला, त्याचा हा परिणाम). शाहूनें एप्रिल १७२६ ला कंठाजी व पिलाजी यांना लिहिलेल्या एका आज्ञापत्रातही याचा उल्लेख आहे. हें पत्र महत्वाचें आहे. ‘प्रांत गुजरात व माळवा येथील तह. रा. अंबाजी त्रिंबक, मुतालिक दिम्मत पंतप्रधान, यांनी सरबुलंदखानाशी चौथाई व सरदेशमुखीचा तह केलेला आहे. तरी तुम्ही प्रांत मजकूरचा चौथाईचा आकार होईल त्या वेळी बाबती वजा करून राहिला ऐवज मोकासबाब निमे चिमणाजी बल्लाळ यांजकडे व निमे त्रिंबकराव दाभाडे यांजकडे पाठवावे.’ (चिमणाजी बल्लाळ म्हणजे चिमाजी आप्पा).
१७२६ चा पावसाळा संपताच कंठाजी उत्तर गुजरातेत कडी भागावर चालून गेला. तेव्हां तो व सरबुलंदखान यांच्यात तडजोड होऊन कंठाजीनें चौथाईचा तह लिहून घेतला, व अहमदाबाद शहराखेरीज मही नदीच्या पश्चिमेकडील सर्व भागावर चौथाई वसूल करण्याचा हक्क मिळवला.
पेशवे व दाभाडे यांच्यातील वाढतें वितुष्ट:
सरबुलंदखानाने केलेला तह कंठाजीचा त्रास तात्पुरता मिटवण्यासाठी होता. पण त्यायोगानें पेशवे-दाभाडे कलह वाढत गेला. सेनापतीस गुजरातच्या मुलुखगिरीची ब बाजीराव पेशव्यास माळव्याच्या मुलुखगिरीची, अशी वाटणी शाहूनें केलेली होती. परंतु बाजीरावानें सेनापतीला कळवलें की, ‘गुजरातेतील निम्मे महाल (स्थानें/इलाखे) तुम्ही आम्हांकडे द्यावे, व माळव्यातले महाल आम्ही सर करू त्यातले निम्मे तुम्ही घ्यावे’. एक प्रकारें हा प्रस्ताव राज्याच्या दृष्टीनें चांगला होता. परंतु, सेनापतीनें बाजीरावाला उत्तर दिलें की, ‘महाराजांनी तुम्हांस माळव्याची मोहीम व आम्हांस गुजरातची सांगितली. तुमचा कारभार तुम्ही करावा, आमचा आम्ही करू. वाटणी मागू नये’. येथेंच पेशवे व दाभाडे यांच्यामधील तंट्याचें खरें बीज आहे. बाजीरावाला वाटत होतें की, सरदारांमध्ये मुलखांच्या अशा वाटण्यांनी मराठ्यांच्या एकजुटीवर अनिष्ट परिणाम होईल, जो तो सरदार आपलें वेगळें राजकारण करेल, आणि त्यामुळे राज्य बलहीन होईल. दाभाड्याला गुजरातमध्ये पेशव्याचा कसलाही हस्तक्षेप नको होता. प्रत्येकाला आपलें वागणें योग्यच वाटत होतें. शाहूचें तंटा मिटवण्याचे प्रयत्न अपुरे ठरले.
दाभाडे व पेशवे यांच्या तात्कालीन तंट्याचें मुख्य कारण म्हणजे, शाहूनें गुजरातचा निम्मा मोकासा (वाटणी) चिमाजी आप्पाकडे दिला होता. वस्तुत, शाहूनें गुजरातची मोहीम दाभाड्याला सांगितली याचा अर्थ गुजरातचें सारेंच उत्पन्न दाभाड्यानें घ्यावें असा नव्हता. (शाहूनें स्वत, कांहीं मुलुखांचा ३४ टक्के हिस्सा स्वतकडे व ६६ टक्के वेगवेगळ्या सरदारांमध्ये, असा वाटून दिलेला होता. नंतर माळव्यातही पेशव्यानें होळकर, शिंदे, पवार व स्वत पेशवे अशी विभागणी केलेली आपल्याला दिसून येते). तरीही, तंटा टळावा म्हणून शाहूनें चिमाजीचा तो मोकासा दाभाडे याच्याकडे बेगमीस दिला. त्याउफ्परही दाभाड्यानें पेशव्याचें क्षेत्रात हात घालायला कमी केलें नाहीं. १७२८ मध्ये बाजीराव व निजाम यांचें युद्ध निकरावर आलें असतांना दाभाड्यानें माळव्यावर जाऊन खंडण्या वसूल केल्या. शाहूनें या आगळिकीबद्दल (१७२८ च्या मे महिन्यात) दाभाड्याला स्पष्ट समज दिली की, ‘तुम्हांस माळवे प्रांतीं जाऊन धामधूम करून पैका घ्यावयास, मुलूख खराब करावयास गरज काय? या उपर तुम्ही पैका घेतला आहे तो बाजीराव पंडित यांजकडे फिराऊन देणें. या उपर माळवे प्रांतीं उपसर्ग न देणें, फिरून बोभाटा होऊ न देणें ’. पण अशा जरबेनें कलह मात्र थांबला नाहीं.
१७२८ मध्येच बाजीरावानें आपला वकील शामराव याला सरबुलंदखानाकडे पाठवून बोलणें सुरू केलें होतें की, (दक्षिणी मुलखाप्रमाणेंच) गुजरातची चौथाई आम्हाला द्यावी, म्हणजे आम्ही सर्व शत्रूंचा बंदोबस्त करून बादशहाचा कारभार सुरळीत चालवू. या वेळी बाजीरावाचा निजामाशी मुंगीशेवगावचा तह ठरत होता. कंठाजी व पिलाजी गुजराती मुलुखात लुटालूट करत होते. सरबुलंदखानाला दिल्लीहून मदत आली नाहीं, व चौथाईचे हक्क कबूल केल्याशिवाय मराठ्यांचा उपद्रव बंद होईना.
१७३० च्या फेब्रुवारीत चिमाजी आप्पा उदाजी पवारासह गुजरातेत आला, आणि सरबुलंदखान अधिकच अडचणीत आला. चिमाजी बांसवाडा, आलोद, दाहोद या मार्गानें आला. दाहोद, चांपानेर वगैरे शहरें त्यानें घेतली. १७३० च्या मार्च महिन्यात पेटलादमधून खंडणी घेऊन त्यानें धोलका शहर लुटलें, आणि सरबुलंदखानाकडे चौथाईची मागणी केली. बाजीरावानेंही सरबुलंदखानास कळवलें की, चौंथाई-सरदेशमुखीचा करार करून देत असलात तरच आमच्या फौजा परत येतील. नाइलाजास्तव सरबुलंदखानानें, पेशव्याच्या वकिलामार्फत, सुरत शहर खेरीज तमाम गुजरातचे चौथाई-सरदेशमुखीचे हक्क शाहूस लिहून दिले ; व अहमदाबाद शहराच्या उत्पन्नावर पाच टक्केच घ्यावे, असा त्या करारात उल्लेख होता. मराठ्यांनी २५०० फौज गुजरातेत कायमची ठेवून बादशहाच्या शत्रूंचा बंदोबस्त करावा, व त्याबद्दल हे हक्क त्यांना मिळावे, असा हा करार होता. पिलाजी गायकवाड हा सुरुवातीपासूनच भिल्ल,कोळी, देसाई, चावडा वगैरे स्थानिक लोकांच्या सहकार्यानेंच मोहिमा काढत असे. त्यामुळे, पिलाजी अशा लोकांना सामील करून घेऊन प्रांतास उपद्रव देईल, तर त्याचा बंदोबस्त करण्यांची हमी बाजीरावानें या करारात लिहून दिली होती. शाहूतर्फे पेशव्यानें पूर्ण गुजरातच्या चौथाई करार लिहून घेतला खरा, पण सरबुलंदखानाला हवें म्हणून पिलाजीचा बंदोबस्त करण्यांची हमी घेण्याची आवश्यकता होती काय, ही बाब विचारणीय आहे. (मात्र एक गोष्ट नक्की, की दाभाड्याची एकूण वृत्ती पहातां, त्याचा हस्तक पिलाजी नक्कीच कुरापती काढेल, याची पेशव्याला खात्री असणार). मार्च १७३० चा पुढील उल्लेख आढळतो – ‘सरदेशमुखीच्या अमलाविशी गुजरात सुभ्याची पत्रें सरबुलंदखान याची की गुजरातचे चवेताळीस महाल खंडेराव यांजकडून तगीर करून (बदलून) बाजीराव यांजकडे करार केले. हिशेब प्रमाणें देत जाणें’. हा करार दिल्लीच्या बादशहाला पसंत पडला नाहीं, व त्यानें सरबुलंदखानाऐवजी मारवाडचा राजा अभयसिंह याला गुजरातच्या सुभ्यावर नेमलें.
छत्रपतीला मिळालेले हे चौथाईचे हक्क बाजीरावानें सालीना दोन लाख रुपये शाहूला देण्याच्या बोलीवर आपल्याकडे वळवून घेतले. बाजीरावानें शाहूला लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख आहे, ‘. . प्रांत गुजरात व माळवा येथील जिल्हा बाबती व सरदेशमुखीचा अंमल (महाराजांनी) आमचे स्वाधीन केला – – ’. याचा स्पष्ट अर्थ असा झाला की, राजाराम-ताराबाईच्या वेळेपासून दाभाडे-गायकवाडांनी गुजरातेत केलेलें राजकारण व मिळवलेले हक्क त्यांच्यासाठी निरर्थक झाले व ते हक्क पेशव्याला मिळाले. (हें ध्यानांत घेतां, बाजीरावाच्या गुजरातेसंबंधीच्या राजकारणाचें व कृतींचें समर्थन करणें कठीण आहे).
— सुभाष नाईक.
Leave a Reply