पेशवे–दाभाडे संघर्षाचा उच्चांक, शह–काटशह, युद्धाचे पडघम:
गुजरातच्या क्षेत्रात पेशव्यानें हस्तक्षेप केल्यामुळे त्रिंबकराव दाभाडे संतप्त झाला, आणि निजामाशी संधान बांधून, बाजीरावाचें वर्चस्व नाहींसें करण्याच्या उद्योगाला लागला. उदाजी पवारादि विरोधकांना त्यानें पेशव्याकडून आपल्या पक्षात आणलें. (बघा. उदाजी हा शाहूचा सरदार, कसा अंतर्गत-पक्ष बदलतो तें!) . उदाजी आपल्याविरुद्ध वागतो आहे असें कळल्यामुळे त्याचे मोकासे बाजीरावानें (१७३१च्या जानेवारीत) काढून घेतले.
१७३० मध्ये शाहू कोल्हापुरच्या संभाजीच्या पेचात अडकलेला होता (त्याचें संभाजीशी त्या वर्षी युद्धही झालें होतें). संभाजाची भानगड शाहूच्या अंगावर असतांना निजाम व दाभाड्यांचे स्वतंत्र डाव चालले होते. (पुढे १३ एप्रिल १७३१ ला, म्हणजे डभईची लढाई झाली त्याच सुमारास, शाहू व संभाजी यांचा, ‘वारणेचा तह’ म्हणून ओळखला जाणारा, तह झाला. पण ती थोडी नंतरची घटना आहे). तशातही, त्या पावसाळ्यात शाहू समजुतीच्या मार्गानें दाभाडे-पेशवे तंटा मिटवण्याची शिकस्त करत असतांनाच त्यांच्यातली चुरस वाढू लागली. बाजीरावानेंही जशास तसें वागून भेदनीतीचें वर्तन चालवलें ; दाभाड्यांच्या पदरची खानदेश-बागलाणातील कवडे, ठोके,आरोळे इत्यादि मंडळी फोडून त्यांच्याकरवी निजामाच्या प्रदेशात व त्रिंबकराव याची आई उमाबाई हिच्या मुलुखात उच्छाद उडवून दिला. (यात बाजीरावाचें चातुर्य दिसून येतें. पण त्याचबरोबर, लहानमोठ्या सरदारांची स्वतच्या फायद्यासाठी पक्ष बदलण्याची वृत्तीही चांगलीच दिसून येते).
पेशव्यांनी चालवलेले उद्योग हाणून पाडण्यासाठी निजाम लष्कर व तोफखाना घेऊन खानदेश-बागलाणाकडे १७३० च्या पावसाळ्यानंतर कांहीं काळानें चालून गेला. (त्याकाळचा खानदेश-बागलाण भाग म्हणजे, आजच्या खानदेशासह आजच्या नाशिक जिल्हातील सटाणा, सुरगाणा, पेठ हा भाग, सध्या मध्यप्रदेशात असलेला हंडिया वगैरे भाग, सध्या गुजरातेत असलेला डांग भाग, इत्यादि). या भागात येण्याचा निजामाचा मुख्य हेतू दाभाड्यांचें संरक्षण करून बाजीरावाची सत्ता तिकडून नाहीशी करावी, असा होता. निजामाचा हा डाव लक्षात येतांच बाजीरावानें चिमाजी आप्पाला खानदेशच्या बाजूला रवाना करून त्याच्या हाताखाली शिंदे-होळकरांना नेमून दिलें.
त्रिंबकराव दाभाडे ऑक्टोबर १७३० ला त्याचें मुख्य ठिकाण तळेगाव येथून निघाला होता. तो नारायणगाव, संगमनेरावरून पुढे गेला, व त्यानें चाळीसगावाजवळ निजामाची गाठ घेतली. (मागाहून, मुल्हेरवरून तो गुजरातेत गेला).
बाजीराव १७३० चा पावसाळा संपल्यावर पुण्याहून निघाला होता व तो नाशिक, पेठ, बासदा मार्गानें (१७३० डिसेंबरमध्ये) सुरतेला पोचला. त्याच सुमारास चिमाजीही त्वरेनें खानदेशामधून गुजरातेत आला. मात्र शिंदे होळकर इत्यादि मंडळी नर्मदेच्या प्रदेशात फाकलेली होती. (या धोरणाचा पुढे बाजीरावाला चांगला उपयोग झाला. दिल्लीच्या बादशहानें १७३० मध्येच महंमदखान बंगश याला माळव्यावर पाठवलें होतें, व तो उज्जयनीजवळ आला होता. त्याला निजामानें डिसेंबर १७३० मध्ये निरोप धाडला, आणि १७ मार्च ते २३ मार्च १७३१ अशी बंगश व निजाम यांची नर्मदेवरील एका ठिकाणी खलबतें झाली. नंतर बंगश माळव्यात परत गेला. निजामाला दाभाड्याच्या सहाय्याला गुजरातेत यायचें होतें. मात्र होळकरानें, केव्हां समोर तर केव्हां आडरस्यानें, हल्ले करून निजामास गुंतवून ठेवलें, व निजाम स्वत दाभाड्याच्या मदतीस वेळेवर येऊ शकला नाहीं ).
कंठाजी कदम बांडे (व त्याचा भाऊ रघूजी कदम बांडे) बाजीरावाच्या विरुद्ध वागू लागला होता. (कंठाजी हाही शाहूचा सरदार. यानेंही पक्ष बदलला!). कंठाजीला त्रिंबकराव दाभाडे व पिलाजी गायकवाड अनुकूल झाले. या त्रिवर्गानें पेशव्याच्या खानदेशच्या भागात धामधूम मांडली. त्याबद्दल शाहूनें (१७३० च्या नोव्हेंबरात) त्यांचा निषेध केला. कोल्हापुर दरबारचा पेशवा चिमणाजी दामोदर हाही दाभाड्याच्या व निजामाच्या कटात सामील झाला. मराठी राज्याचे दोन हिस्से करून कोल्हापुरच्या संभाजीला पुढे आणायचें असें हें कारस्थान होतें. हें कारस्थान बाजीरावानें शाहूला कळवलें.
दाभाड्यांची समजूत काढायचें शाहूनें बरेच प्रयत्न केले. त्यानें वजनदार माणसांना उमाबाई दाभाडे हिच्या व त्रिंबकरावाच्या भेटीला पाठवलें होतें, पण दाभाडे वाटाघाटांचा घोळ घालत बसले. उमाबाईनें आधीच्या काळीं शाहूकरता स्वत तलवार गाजवून लढाई मारलेली होती. आतां तिचे म्हणणें होतें की, ‘पुरातन जें आहे, तें एकही खेडें उणें न होतां, आमचें आम्हांकडे देऊन सेवा घ्यावी’. शाहूचा मंत्री नारो राम याला भीति वाटत होती की चंद्रसेन जाधवाप्रमाणें दाभाडेही राज्यातून फुटून निघतील. तें सर्व पाहून, बोलणी वायदे पुष्कळ झाले अशी वृत्ती धरून, व सावधगिरी म्हणून, बाजीरावानें युद्धाची तयारी चालवली.
गुजरातचा निम्मा मोकासा चिमाजीला दिला होता, तो शाहूनें दाभाड्याला बेगमीस दिला होता. सारें गुजरात दाभाड्याच्या हवाली करून कज्जा वारावा असें शाहूनें बाजीरावाला सुचवलें. बाजीरावानें चिमाजीचा अभिप्राय विचारला. चिमाजीनें (नोव्हेंबर १७३० मध्ये) बाजीरावाला कळवलें की, ‘दाभाडे जर निजामाला जाऊन मिळाले तर त्यांचा हुद्दा दूर करावा. एवढी गोष्ट महाराजांशी पक्की ठरवून मग दाभाड्यांना गुजरातच्या सनदा द्याव्या’. डिसेंबर १७३० मध्ये, शाहूनें चिमाजीकडील मोकासा काढून घेऊन दाभाड्याला संतुष्ट करण्यासाठी तो त्रिंबकरावाला दिला, व तुम्ही प्रांतमजकुरीं दखल न करणें अशी ताकीद दिली.
शाहूनें त्यावेळी आपल्या पत्रात दाभाड्याला लिहिलें – ‘.. काय मनसबा योजला आहे हें कळत नाहीं. तुम्ही साहेबांचे एकनिष्ठ कार्याचे ..सेवक, यास्तव साहेब तुम्हांवरी सदयचित्तें कृपा करीत असतां हल्ली चित्तात विपर्यास आणून दुसऱयाचा आश्रा करून राज्यास अपाय करावा, आपले एकनिष्ठेस बोल लावून घ्यावा, यात फायदा काय? हें तुम्हां
लोकांस उत्तम नव्हे. जे विश्वासघातकी स्वामिद्रोही जाले त्यांचा परिणाम कळतच आहे. – – तुम्ही साहेबांचे विश्वासू सेवक इतबारी आहां. आपल्या थोरपणांस उचित तें स्वामिकार्य करून साहेबांस संतोषवाल हा भरंवसाच आहे. – – ’.
सेनापति आपल्या विरुद्ध वागतो आहे अशी शाहूची खात्री झाली होती. म्हणून, गुजरातेतून बाजीरावानें युक्तीनें सेनापतीला शाहूकडे घेऊन यावे, असा शाहूचा व बाजीरावाचा बेत ठरला होता. शाहूचें बाजीरावास आज्ञापत्र असें आहे -‘तुम्ही सेनापति यांस बुद्धिवाद करून समजोन सांगून येतां बरोबर घेऊन यावे. येथें उभयतांचा तह करून देऊन एकविचारें चालेल असें करतां येईल’.
डिसेंबर १७३० मध्ये सुरतेला आलेला बाजीराव तेथून भडोच मार्गानें बडोदा टाळून नडियादला १७३१ च्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस आला. खानदेशमधून गुजरातेत आलेला चिमाजी आप्पा मेहमदाबाद येथें पोचला. नंतर पुढील कांही महिने दोघे बंधू बरोबरच होते.
अभयसिंह सुभेदार म्हणून गुजरातेत पोचलेला होता, त्यानें ऑक्टोबर १७३० मध्ये अहमदाबादजा कब्जा घेतलेला होता.
पिलाजी गायकवाड बडोद्याला बंदोबस्त करून रहात होता. त्याला तेथून हुसकून द्यावे अशी अभयसिंहाची इच्छा होती. बाजीरावाचीही तीच इच्छा होती. फेब्रुवारी १७३१ मध्ये अभयसिंह व बाजीराव यांची भेट झाली. तेव्हां असें ठरलें की, बाजीरावानें अभयसिंहाला सहाय्य करावें, आणि अभयसिंहानें मराठ्यांना चौथाईचा हक्क पुरा करून द्यावा.
(ही गंमत पहा. सरबुलंदखानानें केलेला चौथाईचा करार बादशहाला पसंत नव्हता, म्हणून त्यालें सरबुलंदखानाच्या जागी अभयसिंहाची नियुक्ति केली. आणि आतां, अभयसिंहालाही चौथाईचा करार करावा लागला! ).
हा करार निश्चित ठरून बाजीराव बडोद्याला वेढा घालण्याच्या तयारीनें अभयसिंहाची मदत घेऊन निघाला.रस्त्यात
२५ मार्च १७३१ ला त्याला बातमी कळली की दाभाडे, पिलाजी, कंठाजी व उदाजी हे एकत्र होऊन चालून येणार आहेत, व निजामाची फौज पोचतांच हल्ला करणार आहेत. म्हणून, निजाम त्यांना येऊन मिळण्यापूर्वीच, बाजीरावानें
१ एप्रिल १७३१ रोजी, भिलापुर-डभईच्या मैदानात सेनापति दाभाडे याच्या तळावर हल्ला चढवला.
डभई सोयीचें स्थळ पाहून, आणि विरुद्ध पक्षाचे बळ वाढण्याआधीच, बाजीरावानें हल्ला करून प्रतिपक्षाला चकित केलें, यावरून युद्धातील स्ट्रटेजी व टॅक्टिक्स या दोन्ही अंगांवरील त्याचें प्रभुत्व दिसून येतें.
डभईची लढाई ; सेनापति दाभाड्याची घटका भरली:
सेनापतीची फौज होती ३००००-४००००, तर बाजीरावाची २५०००. पण त्रिंबकरावाचे भाऊ मागे २० कोसांवर फौजेच्या मोठ्या भागासह होते, व त्रिंबकरावाचा तळ पुढे होता. बाजीरावाची आघाडीची तुकडी आबाजी कवडे याच्या हाताखाली होती. त्याच्यावर पिलाजीचा मुलगा दमाजी गायकवाड यानें हल्ला केला व आबाजीचा पराभव झाला. हें बघतांच बाजीरावानें स्वत दाभाड्यावर चाल केली. तें पहातांच, कंठाजी दाभाड्याचा पक्ष सोडून चालता झाला. त्रिंबकराव स्वत ५००० सेनिकांसह युद्धाला उभा राहिला.
युद्ध अटीतटीचें झालें. बाजीरावानें जातीनें घोड्यावरून युद्ध केलें, तर त्रिंबकरावानें हत्तीवरून लढाई केली. सूर्योदयापासून तिसऱ्या प्रहरापर्यंत मोठ्या शिकस्तीने त्रिंबकराव लढला. हत्तीवरचा माहूत पडल्यावर, पायानें हत्ती चालवून त्यानें तिरंदाजी केली. तिरंदाजी करतां करतां त्याच्या बोटाची सालें गेली. पेशव्याकडचे पुष्कळ सैनिक त्यानें मारले. बाजीरावानें सांडणीस्वारासोबत निरोप पाठवला,‘अशी लढाई शत्रूशी करून महाराजांस संतुष्ट करावे. आम्ही लढाई तहकूब करतो व भेटीस येतो’. पण त्रिंबकरावानें तें न ऐकतां वीरश्रीनें आपला हत्ती तसाच पुढे चालवला. बाजीरावानें आपल्या लोकांन ताकीद केली की सेनापतीस कोणी जाया करूं नये. परंतु तेवढ्यात, त्रिंबकरावास गोळी लागून तो ठार झाला. (‘दाभाड्यांची बखर’ सांगते की, दाभाड्यांच्या फौजेत फितुरी झाली होती ; त्यामुळे पेशव्याची सरशी झाली व फितुरानें त्रिंबकरावाला गोळी मारली). त्रिंबकराव पडला असें पाहून बाजीराव मागे सरला. ‘लूटमार करू नये, हत्ती घोडे पाडाव झाले असेल तें सोडून द्यावे’ असें सांगून तो निघाला. त्रिंबकरावाचा देह त्याच्या बंधूंकडे पाठवून दिला.
या लढाईत दोन्ही बाजूंचें बरेंच नुकसान झालें. (बाजीरावानें त्याचे गुरू धावडशीकर ब्रम्हेंद्रस्वामी यांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे). त्रिंबकजीखेरीज, दाभाड्यांकडील जावजी दाभाडे, मालोजी पवार, पिलाजी गायकवाडाचा पुत्र संभाजी गायकवाड असे ठार झाले ; उदाजी पवार व चिमणाजी दामोदर पाडाव झाले ; आनंदराव पवार, पिलाजी गायकवाड इत्यादि जखमी होऊन पळून गेले. बाजीरावाकडील नारायणजी ढमढेरे पडले, आणखीही बरेच पडले वा जखमी झाले.
— सुभाष नाईक.
Leave a Reply