दादर पश्चिमेस “प्रारंभ” या इमारतीत, १९६७ रोजी सुरेश चाळकर या गृहस्थाने परिसरातील होतकरु तरुणांसह, सामाजिक बांधिलकी आणि एकोपाच्या भावनेनं “बाळ गोपाळ सार्वजनिक गणेश मंडळाची” स्थापना केली; अगदी सुरुवातीला या मंडळाचं स्वरुप ही लहान होतं, गणेश मुर्तीचा आकार साधारणत: ५ फूट होता, आणि ५ दिवसांपर्यंत येथे गणेश विराजमान असायचे, सुरुवातीपासुनच भक्तांचं आणि रहिवाशांचं मनोरंजन तसंच प्रबोधन व्हावं या उद्देशानं मंडळ विविध उपक्रम कलानुरुप राबवते आहे.
पर्यावरण, स्त्री भ्रुण हत्या, मुंबई बॉम्बस्फोटांमुळे झालेली हानी, शिक्षणाचं महत्त्व, इत्यादी विषयांवर मंडळानं आजपर्यंत अनेक कार्यक्रम या उत्सवातून राबवले आहे, काही वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीवर आधारीत संपूर्ण पठण, दुर्गप्रेमींकडून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची केली जाणारी जपणूक याचं प्रक्षेपण, अशा अनेकविध संकल्पना या मंडळातर्फे राबवल्या गेल्या आहेत. दरवर्षी मंडळातर्फे नाविन्यपूर्ण कलाकृती मांडण्याचा मानस राहिला आहे, आणि गेल्या ४७ वर्षांत वैविध्यपूर्ण देखावे, नेपथ्य साकारण्यात आलेलं आहे; तसंच “श्री शतकर्ते प्रतिष्ठान” यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रम जसे की रक्तदान, नेत्र तपासणी, हेल्थ चेकअप सारखे समाजोपयोगी कार्य राबवली जात आहेत.
या वर्षीच्या भीषण दुष्काळाच्या चर्चा सर्वत्र रंगल्या पण दुष्काळग्रस्तांसाठी मदत करणार्यांची संख्या ही कमी नव्हती. “बाळ गोपाळ…” मंडळानं तिथल्या जनतेसाठी नित्योपयोगी वस्तु, कपडे यांचं वाटप केलं व कोणाच्याही अपेक्षा व सरकारी मदतीची आशा न बाळगता.
सध्या मंडळाची वाटचाल सुवर्ण महोत्सवाच्या दिशेनं सुरु असून अनेक समाजोपयोगी कार्य राबवण्याचा मानस असल्याचं मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितलं.
— सागर मालाडकर
Leave a Reply