व्हाट्सअपच्या माझ्या एका ग्रुपवर चर्चा सुरु होती ज्यामध्ये आजूबाजूच्या तालुक्यातील मित्रांचा समावेश आहे. सर्वजण गाववाले किंवा स्थानिक आणि भूमिपुत्रच आहेत. त्यापैकी बरेच जण हेच रडगाणं रडत असतात की आमच्या गावातले रस्ते, पिण्याचे पाणी, आणि अतिक्रमणे याच्यावर कोणी काहीच करत नाही. सगळे जण ग्रामपंचायत, पंचायत समिती, ज़िल्हा परिषद यांच्या सदस्यांना नावं ठेवत होते. मग एकाने मुद्दा मांडला की हे लोकं एवढे कशामुळे निर्ढावतात. गावातले सगळे लोकं यांच्याकडून अपेक्षा ठेवून असतात. त्या अपेक्षा जाऊ द्या रस्त्यांवर असलेले खड्डे ट्राफिक चा त्रास पाण्याअभावी होणारे व पावसात गटाराच्या पाण्यामुळे होणारी घाण व पसरणारी रोगराई या सर्वांचा त्रास या लोकप्रतिनिधीना किंवा त्यांच्या घरातल्या तसेच कुटुंबदार मंडळीला होत नाही का. सगळे जसं काहीच बिघडलं नाही हे असंच असतं बोलून ताठ मानेने कसे काय फिरतात.
यावर अजून एकाने प्रतिक्रिया दिली ती अशी, की ताठ मानेने निर्लज्जा सारखं फिरतात कारण त्यांना रस्त्यांची दुरवस्था आणि मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी तुम्ही नालायक आणि अकार्यक्षम आहात असे कोणी तोंडावर बोलत नाही.
आता याच्यावर आणखी एकाने प्रतिक्रिया दिली ती अशी, या लोकप्रतिनिधीना तोंडावर बोला नाहीतर चार लोकांच्या देखत बोला त्यांना काहीच फरक पडत नाही कारण त्यांना माहिती आहे ते कसे निवडून येतात आणि एकदा पाच वर्षं निवडून आल्यावर कोणाचा बाप पण त्यांचं काही करू शकत नाही.
आता या सर्वांवर एकाने अशी प्रतिक्रिया दिली की सगळे एकदम चिडीचूप. तो सांगू लागला आपल्या तालुक्यांमध्ये जोरदार बांधकामे चालू आहेत, सरकारी योजना, रस्त्यांची कंत्राट या सगळ्यात कामं कोणाला मिळतात तर ह्याच लोकांना किंवा फारफार तर त्यांच्या स्वकीयांना. मग ते रस्त्याचं कामं असू दे नाहीतर बांधकाम साईट, मी देईन तोच सप्लायर आणि मी लावेन तोच रेट. बाहेरच्याने किंवा गावातल्या इतर कोणी तिथे काम नाही केलं पाहिजे. तुम्ही सगळे बोलता हे लोकप्रतिनिधी काही करत का नाहीत, त्यांनी काही करण्यासाठी त्यांना कोणी विचारलं पाहिजे एवढी तरी किंमत पाहिजे की नको. हल्ली निवडून कोण येतात अनधिकृत बांधकाम करणारे, दारूचा धंदा, दुकानं चालवणारे, मटका किंग नाहीतर हातगाडया लावणाऱ्या भय्यांकडून हफ्ता वसुल करणारे गाव गुंड, त्याच्यामुळे अशा सर्वांचे हात दगडाखाली असतात, ही लोकं कशी काय मोर्चा काढतील किंवा कसं काय एखादं आंदोलन करतील. असं काही करायला गेले की पोलीस आणि प्रशासन लगेच त्यांना त्यांच्या भाषेत दम देतात. हल्ली गावोगावी हेच चित्र बघायला मिळत आहे. सगळे जण मूलभूत सोयीसुविधा देण्याऐवजी सण, उत्सव साजरे करण्यात, शुभेच्छा व भावपूर्ण संदेश देऊन एकमेकांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.
शेवटी एकाने मेसेज टाकलाच, शिकलेली लोकं फक्त उंटावरून शेळ्या हाकण्याच्याच कामाची असतात, आपण हे केले पाहिजे आणि ते केले पाहिजे असं बोललं म्हणजे झालं.
हा मेसेज कोणाला टोमणा किंवा वयक्तिक टीका करण्यासाठी नाही आहे. गांभीर्याने न घेता ही वस्तुस्थिती गावोगावी आहे की नाही याचा प्रत्येकाने जरूर शोध घ्यावा.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरिन इंजिनियर.
B. E. (mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply