शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात.परंतु शिक्षकांच्या शिकवण्याच्या प्रयत्नांना अनेक वेळा मर्यादा असतात.कधी कधी अशा शिक्षकांमुळे मुलांच्या त्या विषयाचे नुकसान होते.माझ्या बाबतीत पण असेच झाले होते.माझ्या संस्कृत शिकवणा-या शिक्षिका यथा तथाच होत्या .एस एस सी ला संस्कृत हा भरपूर गुण मिळवून देणारा विषय.त्यामुळे काळजीत पडलो. मुख्य परीक्षेच्या आधी काही दिवस भीत भीत वडिलांना सांगितले .जानेवारी महिना होता.वडिलांनी मला एक पत्र दिले आणि कर्जत जवळच्या दहिवली गावात ठाण्याहून पाठवले.मला आठवतंय ,सकाळी ११ च्या गाडीने मी कर्जत ला दर रविवारी जायचो.कर्जत हून दहिवली पर्यंत चालत.दहिवली ला मुळे गुरुजींचे घर होते. घर कसले सुंदर वाडाच होता.सर्व प्रथम गुरुजी जेवायला बसवायचे.अतिशय सुग्रास जेवण त्यांच्या पत्नी करीत असत. मग जेवण झाल्यावर मुळे गुरुजी त्यांच्या सोप्यावर फे-या मारत मला संस्कृत वाक्य, संधींची फोड करून कसे वाचावे हे शिकवत .पांढरे शुभ्र धोतर,खांद्यावर शुभ्र पंचा आणि अतिशय प्रसन्न मुद्रेचे वयोवृद्ध मुळे गुरुजींचे ते शिकवणे अजूनही माझ्या डोळ्या समोरून हलत नाही. अतिशय कमी वेळात त्यांनी मला संस्कृत हा विषय माझ्या आवडीचा करून दिला. जवळ बसवून प्रेमानी जेवायला घालणे, त्यानंतर संस्कृतची शिकवणी हे चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. शिक्षक कसा असावा याचे मुळे गुरुजी मूर्तिमंत उदाहरण होते. मुळे गुरुजींनी माझ्या कडून एक पैसा न घेता मला शिकवले आणि त्यांची प्रतिमा माझ्या मनात कायमची कोरली गेली.
हे सर्व सांगण्याचे कारण असे कि –
खासदार परेश रावल यांनी सभागृहात चे कोचिंग क्लास कडे लक्ष वेधले .रावल म्हणाले, विविध क्षेत्रात झुंडशाहीच्या बळावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या माफियांची वर्णने आजवर सर्वांनी ऐकली आहेत. त्या यादीत आता पालकांचे शोषण करणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या दहशतवादाची भर पडली आहे. त्यांच्या विचित्र शोषणातून गरीब व मध्यमवर्गीय पालकांना भगवान काय रजनीकांतही वाचवू शकणार नाही. ( रावल यांनी अभिनेता रजनीकांतचा असा मजेशीर उल्लेख करताच सभागृहात हास्याची कारंजी उडाली )
परेश रावल पुढे म्हणाले-भारतात बालवाडीच्या प्रवेशापासूनच पालकांच्या शोषणाला प्रारंभ होतो. प्रवेशासाठी लाखो रूपयांच्या देणग्या उकळल्या जातात. ज्यांच्यामुळे सरकारी शाळांची गुणवत्ता खालावली त्यापैकी अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसचा आग्रह करतात. क्लासेसमधे जाणाऱ्या मुलांना अधिक चांगल्या गुणांनी पास केले जाते. भारतात कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी, शैक्षणिक अर्हता अथवा गुणवत्ता लागत नाही.
चिंतामणी कारखानीस —
Leave a Reply