MENU
नवीन लेखन...

दैवगती (कथा)

१९५५/५६ सालची गोष्ट. उन्हाळ्याचे दिवस. . तो शेतीच्या कामासाठी मुंबईहून दिवड्यासाठी निघाला.. दिवडा…. साठगांवच्या पुढचं त्याचं गाव. साठगांवहून बसने चार तास लागत. सकाळची एस्टी न मिळाल्याने त्याला रात्र साठगावात काढणं भाग होतं. ते फार मोठं गाव नव्हतं. प्रथमच संध्याकाळच्या एसटीने तो उतरला होता . रात्रीचे दहा वाजत होते. आता हॉटेल मध्ये राहणं भाग होतं. एस्टी स्टॅंडवरुन तो खांद्यावरची बॅग सांभाळीत हॉटेलच्या शोधात निघाला होता. सकाळशिवाय दिवड्याला जाणारी एस्टी नव्हती. हॉटेल मिळालं नाही तर स्टॅंडवरच झोपायचा त्याचा विचार होता…. वडिलोपार्जित घर आणि जेमतेम एकराची शेती असलेला तो . मुंबईत मिल मधे कामाला होता. लागून दोन-तीन वर्षच झाली होती. बायको आणि दोन्ही लहानग्या मुलींना घेऊन तो मुंबईत आला होता. तसं त्याचं बरं चाललं होतं. पगार चौघांना पुरत असे. मुंबईची महागाई तो सहन करीत होता. थोडे पैसे गाठीला जमले होते. पाच-सात वर्षांपूर्वी वडील गेले . लवकरच त्यांच्या मागोमाग आईही गेली होती. वर्ष दीड वर्षापूर्वीच तो भागीला आणि दोन्ही पोरींना घेऊन मुंबईत आला होता. भागी त्याची बायको. त्याची म्हणजे सदाशिवाची. त्यांचं नाव सदाशिव हे सांगायचं राहिलं. भागीरथी बऱ्या अंगलटीची तिशी ओलांडलेली स्त्री होती. ती अजूनही चांगली दिसायची. मोठाले डोळे, नाजुक नाक आणि जिवती, घट्टमुट्ट बांधा, पुष्ट गरगरीत उरोज , मागे झुकलेले मोठाले नितंब, पाहणाऱ्यांच्या डोळ्यात भरत. तशी ती काळगेलीशीच होती. पण तिचं ठाशीव शिसवी शरीर कोणालाही सहज आकर्षून घेई. निघताना त्याने भागीला जवळ घेतले. तीही त्याला बिलगली. तिचे उष्ण श्वास त्याला जाण्यापासून परावृत्त करण्यापूर्वीच त्याला निघणं भाग होतं.तिला लवकरच येण्याचं आश्वासन देऊन , मुलींकडे लक्ष ठेवायला सांगून तो निघाला होता. संध्याकाळची साडेपाचची एस्टी त्याने मुंबई सेंट्रल वरून पकडली.

रात्रीची वेळ होती. वारा सुटला होता. साठगांव जंगलाने वेढलेले असल्याने त्या अर्धवट शहरात तसा गारवा होता. बरोबर घेतलेला डबा केव्हाच संपला होता. आता त्याला परत भूक लागली होती. एस्टी स्टॅंडवर खाण्यासारखं फारसं काही नव्हतंच.तशी त्याला या गावाची फारशी माहिती नव्हती. कारण तो पूर्वी कधीच इथे फिरला नव्हता. समोरच एक हॉटेल दिसलं. खरंतर जुन्या वाड्यांची लॉज आणि हॉटेलं केली होती. तशी लोकांचीही चूक नव्हती. असल्या आडगावात अडलेल्या माणसांंशिवाय राहणार तरी कोण होतं. सदाशिव त्या हॉटेलच्या मळकट कळकट ऑफिस मधे शिरला. ऑफिस मधे एक साधारण कपड्यातला माणूस एका टेबलापलीकडील खुर्चित तंबाखू चोळत बसला होता . तंबाखू ची गोळी तोंडांत खुपशीत तो मिटल्या ओठांनीच म्हणाला, हॅं कॅंय पायजे ? रुम नाही , बोला…..” असं बोलल्यावर सदाशिव काय बोलणार ? त्याला खरंतर थोडंफार खाऊन अंथरुणावर पाठ टेकायची होती. काही न बोलता तो मागे वळला. त्याने रस्त्यावरुुनच विचारलं,” जवळपास एखादं हॉटेल आहे का ? ” आतल्या माणसानी हातानीच” चल चल” असा इशारा केला. ती काय मुंबई थोडीच होती. माणसाची गैरसोय न करण्याचा वसा घेतलेलं ते शहर नव्हतं. अर्धा किलोमीटर अंतर चालल्यावर असंच एक हॉटेल त्याला दिसलं. त्यांचं नाव होतं. “कमल लॉज. ” तिथेही तेच उत्तर. पण माणूस बरा होता. त्याने मात्र दोन तीन हॉटेलांची नावं सांगितली. आता सदाशिवचा चालण्याचा उत्साह संपत आला होता. त्याने घड्याळ पाहिलं. अकरा वाजत होते. एक दोन हॉटेलं पाहून त्याने एस्टी स्टॅंडवर झोपायचं ठरवलं. अशीच दोन हॉटेलं पाहून तिथला नकार पचवीत त्याला सांगितलेलं हॉटेल लीलावती मधे त्याने चौकशी केली. तिथला मॅनेजर चहा घेत होता. एकूण सदाशिवचा अवतार पाहून त्याला दयाआली असावी. त्याने त्याला चहा ऑफर केला. सदाशिवला जरा उत्साह वाटला. पण त्यानेही रुम नाही म्हंटल्यावर सदाशिव म्हणाला,” खरं सांगू का. मी एस्टी स्टॅंडला परत जाणार होतो. पण तो फार लांब आहे हो. मी असं करतो तिथे लॉबीमधेच झोपतो. सकाळी उठून जाईन. थोडासा चार्ज लावलात तरी चालेल. ” मग त्याची अडचण जाणवून तो म्हणाला ,” काय आहे ना भाऊ, आमच्याकडे एक रुम आहे. पण गेली पाच वर्षांपासून ती बंद आहे. ”

त्याला मधेच तोडीत सदाशिव म्हणाला ,” चालेल की राव. ” त्यावर आढेवेढे घेत मॅनेजर म्हणाला, ” काय आहे ना तिथे पाच-सात वर्षांपूर्वी खून झाला होता. मग गावात ही बातमी फिरल्याने आमच्या इथे काही दिवस कुणीच राहायला यायला तयार होत नव्हतं. आम्ही तीही रुम काही दिवस भाड्यावर दिली. पण राहणारा रात्री घाबरून पळून जाऊ लागला. मग तिथे भूत असल्याची वदंता गावात पसरली. नंतर मात्र आम्ही ती रुम बंदच ठेवायला लागलो. ”

आता मात्र सदाशिवची अगतिकता शिगेला पोहोचली. तो म्हणाला,” असं बघा, ती रुम मला तुम्ही द्याच. आणि काही खायाला भेटलं तर लय ब्येस व्हील. “…..त्यावर मॅनेजर काकुळतीला येऊन म्हणाला, ” भाऊ, एका माझं. मी तुमची खायची येवस्ता करतो. पन तेवढी” ती ” खोली मागू नका. फुकट पोलिसांचं लफडं होईल. ” पण सदाशिव ऐकायलाच तयार नव्हता. ते पाहून मॅनेजर म्हणाला , ” ठीक हाय. पन रिक्स तूमचं. चला जाऊ या. ” असं म्हणून चाव्यांचा जुडगा घेऊन मॅनेजर निघाला. दुसऱ्या मजल्यावर एका कडेला असलेल्या रुमकडे ते जाऊ लागले. बाहेर वाऱ्याला उधाण आलं होतं. सदाशिव त्याला म्हणाला,” तसं भूतबीत कायबी नसतं गाववाले. मानसाचा भरम हाय त्यो. ” उत्तरादाखल मॅनेजर काहीच बोलला नाही. लाकडी उभेच्या उभे रुंद जिने. त्यांच्या उंच पायऱ्या वाडा जुना असल्याचं सांगत होत्या. जिने फारसे स्वच्छ नव्हते. पण सदाशिवचं तिकडे लक्ष नव्हतं. कधी एकदा खोली उघडून आत जाऊन बिछान्यावर पडतो असं त्याला झालं होतं. दुसरा माळा चक्क लाकडी बांधणीचा होता. भिंतीना रंग द्यावा लागतो असं हॉटेल मालकाला स्वप्नातही वाटतं नसावं असं सदाशिवच्या मनात आलं. दोन चार पाली आणि एक दोन उंदीर ही इकडे तिकडे जाताना दिसले. त्यांच्याही बऱ्याच पिढ्या तिथे नांदल्या असाव्यात असं कुणालाही वाटलं असतं. ते एकदाचे त्या रुमजवळ पोहोचले. मॅनेजरने चाव्यांचा जुडगा काढून एकेक चाली तो कुलुपात घालून पाहू लागला. त्याबरोबर कंटाळलेला सदाशिव म्हणाला ,” चावी तर तुम्हाला म्हाईत असलंच की. ” त्यावर मॅनेजर त्याला न्याहाळत म्हणाला, ” काय आहे ना भाऊ गेल्या दोन-तीन वर्षांत रुम लागलीच न्हाई बगा. आनी मी सातवा मॅनेजर आहे. कोनी टिकायला तयार न्हाई. ” कोणतीच चावी लागेना म्हंटल्यावर त्याने जिन्याच्या कड्यावरुन खाली वाकत नोकराला हाक मारली, ” ए जनार्दन, लेका त्येलाची बाटली घेऊन ये की वाईच. ” पण जनार्दन. का कोण होता तो कशाला लक्ष देतोय . मग खालून एकजण ओरडला ,” जनार्दन घरी ग्येला. रोज‌ डबल ड्यूटी करनार नाय म्हनत व्हता. “. मॅनेजरचा पेशन्स संपला होता. तो खेकसला,” आरं तू घ्येऊन ये की त्येल. ” त्याने एक जोरदार शिवी हासडली.

मग थोडं थांबून म्हणाला, ” बसा हितंच धा मिंटं. ते दोघेही जिन्यावर बसले. सदाशिवला तर आता तिथेच झोप असं म्हंटलं असतं तरी चाललं असतं.

थोड्याच वेळात खालून धबधब पायऱ्या वाजवीत नोकर येऊ लागला. त्याला दहा मिनिटं लागली. तो आल्याबरोबर मॅनेजर त्याच्यावर राग काढू लागला. ” तुमी समदे सारखेच हाय. मायला त्या जन्याच्या, फोद्रिच्याला आजच लवकर जायचं व्हतं न्हाई का ? आं ! बायको रुसून बसली होती काय भडव्याची. ” एकाच वाक्यात दोन-तीन शिव्या दिल्यावर त्याला जरा बरं वाटलं. आलेला नोकर वळून जिना उतरुन जाऊ लागला, तशी मॅनेजर करवादून म्हणाला, ” थांब की ए ! तुझ्या आयला, ही बाटली कोन घ्येऊन जाईल ?”

” तुमीबी खाली ्येनारच हाय न्हवं ? आना की बाटली”. कु्लपात तेल ओतीत आणि चाव्यावर तेल ओतीत मॅनेजर वराडला, ” काय रे यांचा बिस्तर तयार नको करायला ? नवीन चादर आनी पांघरुन कोन आननार? ” . …” अवो मंग त्यापायी खाली जायालाच पायजे न्हवं ? ” …. ” बरं जा चल घेऊन ये, चादर आनी पांघरुन. ” तो पुन्हा कुरकुरत धबधब खाली उतरु लागला. दहा बारा किल्ल्यांनंतर एकदाची किल्ली लागली. आता गंजलेली कडी सरकावयची होती. ती निघेना तेव्हा त्याने सदाशिवला बोलावलं. “. पावनं जोर लावा माज्याबरोबर. मंजी लवकर उगडंल. ” दोघांनी जोर लावला. कडी उघडली. आणि दोनतीन वर्षांपासून बसलेलं दार मात्र अलगद उघडलं. आगदी सुध्या माणसासारखं.

जणू कोणी आत येत असल्याची वर्दीच दिली गेली. आतमध्ये मिट्ट काळोख होता. आतून मात्र एक प्रकारचा कुबट वास आला. तीन वर्षांपासूनची गुदमरलेली हवा तोंडावर आली. मॅनेजर एकदम आत जायला धजत नव्हता. त्याला तीन वर्षांपूर्वीचं पळालेलं गिर्हाइक आठवलं. त्या दिवशी रात्री साडे तीनच्या सुमारास घामाघूम होऊन भीतीने डोळे गरगर फिरवीत , थरथर सुटलेला कौंटरजवळ धावत आलेला तो मध्यमवयीन माणूस त्याला आठवला. त्याचं सामानही त्याने नेलं नव्हतं. अचानक सदाशिवचा आवाज येऊन तो भानावर आला. एक पाय आत टाकीत त्याने अंदाजानेच लायटाचं बटण दाबलं. मंद पिवळसर प्रकाशात ते दोघे आत उभे राहिले. खोली चांगलीच प्रशस्त होती. खोलीच्या समोरच्या भिंतीला लागून एक बंद डबल खिडकी होती. डबल म्हणजे वरच्या भागात लोखंडी गज नव्हते पण खाली होते. अशा उरलेल्या दोन्ही भिंतींमध्ये एकेक खिडकी होती. पडदा हा प्रकारच नव्हता. समोरच्या एका कोपऱ्यात अरुंद मोरीवजा भाग होता. दुसऱ्या कोपऱ्यात संडास असावा. खिडक्यांची लाकडी तावदाने आणि संडासाच्या दाराच्या किंचित चिरफळ्या निघाल्या होत्या. भिंती व खिडक्यांना कधीतरी रंगअसावेत असा भास होत होता . त्या पिवळसर प्रकाशात सदाशिवला फारसं काही दिसत नव्हतं. समोरचा पलंग पाहून, कधी मॅनेजर जातोय आणि मी पडतोय असं त्याला झालं होतं.मधेच पलंगाच्या समोरच्या भिंतीवरील बंद घड्याळ त्याला दिसलं. त्यात बंद पडल्याने साडेतीन वाजलेले दिसत होते. नक्की किती वर्षांपासून बंद पडलं होतं काय माहित, सदाशिवच्या मनात आलं. मग वैतागून, आपण कशाला डोकं खायचं ? असा विचार त्याने केला. मॅनेजर नुसताच उभा होता. म्हणून त्याने त्याला खायला देण्याची आठवण दिली. त्यावर ते म्हणाला,” ठीक आहे, मी खाली जातो आनी किचनमधी काय हाय पाहतो. आता नोकर आला का बिछाना लाऊन घ्या. येतो लगेचच.” असं म्हणून तो भराभर पायऱ्या उतरत तो गेला. सदाशिव खोलीत फिरला. त्याला पाय धुळीच्या जाजमात पडल्यासारखा वाटला. त्यानी प्रथम उजव्या बाजूची खिडकी उघडली. वाऱ्याचा वेगवान झोत तोंडावर आला. उघडायला जोर बेतानीच लावला. न जाणो खिडकी तुटली तर ? ग्रामपंचायतीच्या दिव्यांनी बाहेर अंधारच जाणवू लागला. अचानक त्याला वाऱ्यावर थोड्या थोड्या वेळाने जळक्या दुधासारखा वास आला. आणि दूर कुठेतरी आग लागल्यासारखी दिसली. इतकी छोटीशी आग कुठे लागली आणि कोणी विझवत का नाही त्याला कळेना. हो , ती शेकोटी नक्कीच नव्हती. मग काय होतं ते ? घाबरलेल्या मनाने ती चिता असल्याचं सांगितलं. तो तसा घाबरट नव्हता……पण शहारला. अंगावर किंचित काटा आल्यासारखं त्याला वाटलं.. कोणीतरी आणखीनही खोलीत आल्याचं त्याला जाणवलं. त्याने गर्कन मान वळवली. तो अंथरुण पांघरुण घेऊन येणारा नोकर होता. त्याने त्याला रामराम ठोकला. त्याच्या डोक्यावर वळकटी आणि हातात पाण्याची बाटली होती ..त्याच्या हातून ती घेऊन सदाशिवने घटाघटा पाणी प्यायलं.ते पाहून नोकर वळकटी पलंगावर ठेवीत म्हणाला, ” आवो असं पानी पियाल तर संपल की. हाटीलात पानी कमी हाय. आणखी येक बाटली आनावी लागंल जनू. द्येतो आनून.” नोकर धबधब पाय वाजवीत खाली गेला. सदाशिवची नजर दूरवरच्या चितेकडे गेली. आता तिथं आग कमी अन् धूर जास्त झाला होता. मग त्याने समोरच्या भिंतीवरील खिडकी उघडली.तिचं लाकडी तावदान मात्र अर्धवट तुटून लटकू लागलं. तो घाबरला . त्याचवेळी नेमका मॅनैजर आत येत म्हणाला, ” खिडक्या लय जुन्या झाल्यात. आता डावी खिडकी उघडून नका. हे घ्या.दोन भाकऱ्या , कांद्याची भाजी अन् फक्त चटनी हाय बगा. त्याच्यावरच भागवा. “. बाजूच्या जुनाट टेबलावर जेवण ठेवून मॅनेजर निघाला. त्याला थांबवून सदाशिव म्हणाला ,” पाच-सात वर्षांपूर्वी इथं खून कसा झाला सांगाल काय ? ”

त्याच्याकडे आपादमस्तक पाहात आणि खांद्यावर हात ठेवून मॅनेजर म्हणाला, ” काय आहे ना भाऊ, तुम्ही आत्ता लय थकलेलं दिसताय. इस्रांती घेवा. सकाळच्याला बोलू . ” …..आपण विचारण्याची जरा घाईचं केली असं त्याला वाटलं . एक वाजत होता.

सदाशिवने दरवाज्या लावला. पलंगावर वळकटी पसरुन त्याने जवळचीच खुर्ची टेबला जवळ ओढली. डिशमधली भाकर आणि तिखट लसनीचा घांस त्याने तोंडांत घातला. अन् त्याला जबर ठसका लागला. डोळ्यात जमणारं पाणी पुसत त्याने बाटली तोंडाला लावली. नक्कीच भागीनी आठवण काढली असणार. तो प्रथमच भागीपासून दूर राहत होता. खरंतर तो आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी भागीबरोबर मजा करीत असे. तीही त्याची इच्छा मनापासून पुरवीत असे. त्याला ,तिला जवळ घेतल्यावर तिच्या चेहऱ्यावर दाटणारी निराशा आठवली. तोंडातल्या घासामधे मग्न झाल्याने म्हणा किंवा भागीच्या विचारांमधे गुंतल्या मुळे म्हणा दार वाजल्याचे त्याला ऐकू आलं नाही. तशी त्याला शंका आली ही. पण त्याला भास झाला असावा असं वाटल्याने त्याने दुर्लक्ष केले. पण आता मात्र दरवाज्यावर जरा जोरातच थापा पडू लागल्या. तोंडातला अमृतासारखा घांस पटकन गिळून तो दरवाज्या उघडण्यासाठी उठला. मग त्याला आठवलं. पाणी घेऊन नोकर आला असणार. दरवाज्या हलकेच उघडला आणि थंडगार वाऱ्याचा झोत त्याच्या अंगावर आला. बाहेर एक पोरगेलेसा तरण उभा होता. त्याच्या अंगातले कपडे थोडे मळकट आणि चुरगळलेले होते.त्याने आत यावं म्हणून सदाशिव जरा बाजूला झाला. तो तरुण आत येत म्हणाला ,” माफ करा भाऊ,पण मी खालच्या माळ्यावरच्या चार नंबरच्या खोलीत राहतो. तुम्ही नवीन आलात कळलं. झोप येत नव्हती. म्हणून तुमाला भेटाया आलो. राग तर न्हाई ना आला ? ” सदाशिव म्हणाला, “न्हाई. या जेवायला. कोण्या गावचे तुमी. “असं म्हणून सदाशिवने त्याला अर्धी भाकर आणि चटणी दिली. त्याने गावाचं नाव सांगितलं नाही. तो जसजसा आत शिरला तसतसा खोलीत दूध जळल्याचा वास हळूहळू प्रकर्षाने जाणवू लागला. जणू चिता हॉटेलच्या जवळपासच पेटली होती. आता तो पलंगावर बसून भाकरी खाऊ लागला. सदाशिवला पाण्याची आठवण झाली. आता तर दोन बाटल्या लागतील. नोकराला सांगितलं पाहिजे. असं मनात येताच तो दरवाज्याकडे निघाला. त्याबरोबर पाव्हणा म्हणाला, ” अवो पानी मी आनतो की जाऊन. ” … सदाशिवच्या मनात याला न सांगता कसं कळलं , असं आलं. पण त्याने दरवाज्या उघडला आणि समोर नोकर बाटली घेऊन उभा दिसला. याचंही त्याला आश्चर्य वाटलं. मग त्याने नोकराला आणखी एक बाटली आणायला सांगितली. त्याबरोबर तो म्हणाला,” पियाचं पानी कमी येतं, हितं. ” असं म्हणून त्याला बोलायची संधी न देता तो जिन्यावरुन जाऊ पण लागला. जास्त न बोलता सदाशिवाने दरवाज्या बंद केला. पावणा म्हणाला, ” भाऊ पानी मी वाईच कमी पितो. ” असं म्हणून त्याने भाकरी संपवली आणि तोंड धुतलं. मग खिडकीतून बाहेर पाहात तो म्हणाला ” माझं नाव म्या सांगितलंच नाय. मी म्हादू. म्हंजी महादेव. सदाशिव मंजिच म्हादेव. आपलं जमंल. ” मग खिशातून त्याने सिगारेटचं पाकीट काढलं .मग म्हणाला,” वडता न्हवं ?” पाकिटातली एकेक सिगारेट दोघांनी शिलगावली. दोन-तीन खोल झुरके घेतल्यानंतर त्याने परत खिशात हात घातला. आणि पत्ते काढले आणि म्हणाला, ” खेळता ना , बसू की पलंगावर.” असं म्हणून खाल्लेली ताटली पलंगाखाली ठेवली. त्याने पत्ते पिसता पिसता विचारलं, काय करता तुमी मुंबईला . पुन्हा सदाशिवला धक्का बसला. याला आपण मुंबईला असतो ते कसं माहित . मग त्याने तो काय करतो विचारलं.त्यावर तो म्हणाला, “मिळेल त्ये काम करतो. हितं पोरगी बघाया आल्तो.” असं म्हणून तो थोडा लाजला. मग त्याने तेरा तेरा पत्ते वाटले. उरलेले बाजूला ठेवून पयलं पान फोडलं. ” रमीच खेळायची म्हना की ” सदाशिव म्हणाला…. ” आता दोघांत दुसरं काय खेळनार न्हाई का ?” … खेळ चालू झाला. काही डाव झाल्यावर ‌तो म्हणाला,
” बिगर पैशाची मजा नाय राव. किती लावनार ? एक रुपया पाइंट ? “… “चालंल की. ”

खेळ परत रंगू लागला. मधेच सदाशिव म्हणाला ,” गाववाले सरनाची घान कुठून येती. “….” सरनाची…. ? काय राव काय बोलता” तो पुन्हा मग्न झाला. आता सदाशिव चांगलाच जिंकू लागला…….

मधेच त्याने खिशातून नोटा काढून सदाशिवच्या बाजूला उशीच्या कोपऱ्याखाली ठेवल्या. त्या पन्नासच्या चार नोटा होत्या. दोन वाजून गेले होते. मधेच त्याने सदाशिवला टाइम विचारला. तशी सदाशिव बोलला ,” अडीच ” . त्याबरोबर झटका बसल्यासारखा तो उठला आणि म्हणाला, ” चला, भाऊ निघाया पायजेल. सकाळी गावी जायाचं हाय.” सदाशिव त्याच्याशी हात मिळवीत म्हणाला, ” एक दोन डाव आणखी मारले असते की . आधी आजची रात हितंच झोपला असता तर लय ग्वॉड वाटलं असतं…..”. ….. ‘”न्हाई न्हाई आता ग्येलंच पायजेल.” असं म्हणत तो उठला. मग सदाशिव दरवाज्याकडे निघाला. मित्राला निरोप तर द्यायला पायजे .पण म्हादू सदाशिवाच्या मागे न जाता खिडकीकडे वळला आणि पलंगावरच्या हालणाऱ्या नोटा पाहून म्हनला, ” त्येवढं पैकं नीट ठ्येवा.” एक हात उघडण्यासाठी दरवाज्यावर ठेवून सदाशिवने म्हादूकडे मान वळवली. …….

अचानक वाऱ्याचा जोर वाढला. आणि म्हादू हसत हसत तरंगत तरंगत खिडकीतून पिसासारखा बाहेर गेला……. सदाशिव अवाक होऊन पाहू लागला. असलं ” अघटीत” त्याने कधीच पाहिलं नव्हतं. त्याचं तोंड तसंच उघडं राहीलं.अंगाला सुटलेल्या थरथरीने दरवाज्या जवळच तो मटकन् खाली बसला. सगळी रुम भिंती खिडक्यांसहित त्याच्या भोवती फिरु लागली. काही वेळ तो डोकं धरुन तसाच बसला. त्याला भयंकर तहान लागली. पाणी उठून घेण्याइतकं त्राणही त्याच्यात आता उरलं नव्हतं. अजूनही तो शुद्धीत असल्याचे लक्षात आल्याने त्याला आश्चर्य वाटलं. बाटलीतलं पाणी संपल्याचे त्याला आठवलं. त्याचं लक्ष बाटली कडे गेलं.पलंगाखाली ती वाऱ्याने आडवी झाली होती. पण त्याला ती अर्धी भरलेली दिसली. म्हणजे ” तो ” पाणी प्यायलाच नव्हता. सदाशिव उभा न राहता सरपटत पलंगाकडे सरकू लागला. तेवढ्याशा श्रमानेही त्याला घाम फुटला. कशीतरी त्याच्या हातात बाटली आली. ती तोंडाला लावणार तेवढ्यात त्याची नजर बाजूच्या डिशकडे गेली.तीत अर्धी भाकरी आ णि चटणी तशीच होती. त्याला आत्ता संबंध लागला.म्हणजे म्हादू जेवला नव्हताच मुळी. आता त्याची खात्री झाली. मॅनेजर ही खोली का देत नव्हता. त्याने घाईघाईने बाटली तोंडाला लावली. पाणी खुपच गार होतं. अजून त्याने पलंगावरच्या नोटांना हात लावलाच नव्हता. पन्नासच्या चार नोटा उशीखाली होत्या. त्याना त्याने हात लावताच ‌त्यांची माती झाली. आपल्याबरोबर खेळलं ते म्हादूचं भूत होतं तर. परत त्याला थंडी भरु लागली.आणि ताप चढत असल्यासारखं वाटलं. खाली जाऊन मॅनेजरला बोलवायला हवं. त्याचे दात थंडीने वाजू लागले. अर्धा पाऊण तास तो तडफडत राहिला. मग अचानक त्याला छातीत कळ आल्यासारखं वाटलं. छातीत उठणारी कळ हाताने दाबत त्याने आजूबाजूला पाहिलं. आता सरण खोलीतच पेटल्याचं त्याला दिसू लागलं. आणि त्या प्रकाशात त्याचे गेलेले आई-वडील त्याला बोलवित असल्याचे दिसले. त्यांच्या पलीकडे म्हादू उभा होता. तो म्हणत होता, ” या तुम्ही, इकडे सगळं सोपं आणि सरळ आहे. सगळ्या गोष्टी आपोआप होतात. मनात आलेलं समदं मिळतं बगा………” आता त्याच्या छातीतल्या कळा थांबल्या होत्या. मग म्हादूचा लांऽऽऽबलचक हात त्याने धरला आणि विनासायास तोही तरंगत खिडकीबाहेर पिसाप्रमाणे उडू लागला…….

सकाळचे सहा वाजले होते. दिवसाचा मंद उजेड पसरला होता. बाहेर जनार्दन एका हातात चहाचा ट्रे धरुन दुसऱ्या हाताने दरवाज्या वाजवीत उभा होता……..पण सगळ्यांच्या पलीकडे गेलेल्या सदाशिवाला आता काहीही ऐकू येत नव्हतं आणि येणारही नव्हतं.
(संपूर्ण)

— अरुण कोर्डे
९००४८०८४८६

Avatar
About अरुण गंगाधर कोर्डे 4 Articles
मला सगळ्या प्रकारचं लेखन करण्याची आवड आहे. मी कथा, कविता, कादंबरी लिहीतो. माझा कंगोरे नावाचा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. एक कांदबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. इतर वैचारिक लेखही लिहायला मला आवडतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..