पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी रमेशसह कर्वे रोडने जात असताना ‘ओऽ नावडकर बंधू ऽ’ अशी हाक ऐकू आली. त्या दिशेला पाहिलं तर हिंदुस्थान बेकरीच्या एका दुकानातून ती व्यक्ती हात हलवून बोलावत होती. आम्ही दोघे दुकानात गेल्यावर पहातो, तो आमचा ‘पेंटल’च आम्हाला भेटला.
क्षणार्धात मन पंचेचाळीस वर्षे मागे भूतकाळात गेलं.. तो रमेशच्या वर्गातील राजशेखर होता.. महाराष्ट्र विद्यालयातील चार वर्षे, त्याच्याशी आमची घट्ट मैत्री होती. त्याला हिंदी चित्रपट पहाण्याचं जबरदस्त वेड होतं. राजशेखरच्या व विनोदी अभिनेता पेंटलच्या चेहऱ्यात कमालीचे साम्य आहे.. त्यामुळेच आम्ही त्याचे ‘पेंटल’ हे टोपणनाव ठेवले होते. त्याचे वडील पोस्ट खात्यात नोकरीला होते. रहायला तो गुलटेकडीतील पोस्टल काॅलनीमध्ये होता.
एखादा मॅटिनी पिक्चर टाकायचं ठरवलं की, तो रमेशला घेऊन, घरी जायचा व आईकडून परवानगी घ्यायचा. मग दोघेजण सायकलीवरुन टाॅकीज गाठायचे. राजशेखरचं पिक्चर बघणं अफलातून असायचं. त्या पिक्चरची ‘स्टोरी’ व ‘डायलॉग’ त्याच्या डोक्यात पक्के बसायचे..
त्या दोघांनी देव आनंदचा ‘जॉनी मेरा नाम’ पाहिला. घरी आल्यावर राजशेखरने चित्रपटातील देव आनंद स्वतःच्या घरी आईला भेटायला येताना पोस्टमनच्या वेशभूषेत येतो व काही संवाद बोलतो.. हे त्याने साभिनय करुन दाखवले! संपूर्ण चित्रपट त्याने त्याच्या शैलीने माझ्यासमोर हुबेहूब उभा केला..
पुढे योगायोगाने तीच देव आनंदची, पोस्टमनची भूमिका त्याने प्रत्यक्ष जीवनात साकारली..
रमेशने व त्याने असे अनेक मॅटिनीचे चित्रपट पाहिले. त्या चित्रपटाच्या कथा त्याच्या तोंडून मी ऐकलेल्या अजूनही लक्षात आहेत.
राजशेखर मॅट्रिक झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला पोस्ट खात्यात लावून घेतले.. आणि त्याची पोस्टमनची नोकरी सुरु झाली.
आमच्या भेटीसाठी कमी झाल्या. काही वर्षांनंतर तो घरी आला व लग्न ठरल्याचे त्याने आम्हाला सांगितले. भावी पत्नीचा फोटोदेखील त्याने पाकीटातून काढून आम्हाला दाखवला.
दरम्यान बरीच वर्षे निघून गेली. पाच वर्षांपूर्वी तो पुन्हा भेटला. गप्पा मारताना त्याने नोकरीतील अनेक किस्से सांगितले. या नोकरीमुळे त्याचा जनसंपर्क वाढला. अनेक मान्यवर कलाकारांशी त्याचा संपर्क आला. हा बोलघेवडा असल्याने, विक्रम गोखले व मुक्ता बर्वे बरोबर त्याने मैत्री संबंध जपले. या कालावधीत त्याचे आई-वडील गेलेले होते. त्याच्या दोन मुलांपैकी मुलीचं लग्न झालेलं होतं. मुलगा चांगल्या नोकरीत होता.
राजशेखर आता नोकरीतून निवृत्त झाला होता. घरच्यांचा विरोध असतानाही, वेळ घालविण्यासाठी कुठे कुठे पार्टटाईम नोकरी करीत होता. सुट्टीच्या दिवशी आम्हाला फोन करुन भेटण्यासाठी यायचा. चहापाणी व्हायचं. जुन्या आठवणींना उजाळा मिळायचा.
महिनाभर भेट झाली नाही तर आम्हीच त्याला फोन करायचो. तेव्हा कळलं की, तो घराचं बांधकाम करीत होता. दर महिन्याच्या फोन वरुन घराचं बांधकाम हळूहळू पूर्ण होत असताना समजत होतं.. बांधकामाकडं लक्ष देण्यासाठी त्यानं नोकरी सोडली होती.
वर्षभराने बांधकाम पूर्ण झालं. राजशेखर ऑफिसवर आला, गप्पा झाल्या. त्यानं घरी येण्याचं निमंत्रण दिलं आणि कोरोनाची महामारी सुरु झाली.
दोन वर्षे झाली.. आमची व त्याची भेट झालीच नाही. आम्ही फोनवर भेटतो.. कोरोना पूर्ण निवळल्यावर राजशेखरच्या घरी जायचं आम्ही नक्की ठरवलं आहे.. आणि त्याला गळामिठीची, ‘पोस्त’ नक्की द्यायची आहे..
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२४-७-२१.
Leave a Reply