भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या सालातील गोष्ट आहे.. सहावीत इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलीला वर्गातील खोडकर मुलं ‘डालडा’ म्हणून चिडवत होती. दहाच वर्षांनंतर ती मुलगी ‘डालडा’ नव्हे तर अस्सल ‘देसी घी’ च्या रूपांत चंदेरी दुनियेत झळकली…
माला सिन्हाचा जन्म १९३६ सालातील ११ नोव्हेंबरचा. तिची आई नेपाळी व वडील बंगाली. तिचं बालपण कलकत्यातच गेलं. तिचा आवाज गोड असल्याने तिने आकाशवाणीवर काही गाणी गायली. तिथे एका दिग्दर्शकाने तिला पाहिलं व मुंबईच्या मायानगरीत आणलं. तिचे पहिले तीन चार चित्रपट अपयशी ठरले.. नंतर गुरुदत्त यांचा ‘प्यासा’ व बी. आर चोप्रांचा ‘धूल का फूल’ या चित्रपटांनी तिला नावलौकिक मिळवून दिला…
एकदा यश मिळालं की, माणसं तुम्हाला शोधत येतात.. मालाचं तसंच झालं.. राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद या दिग्गज कलाकारांबरोबरच सुनील दत्त, मनोज कुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, शम्मी कपूर, इ. सोबत तिने अनेक चित्रपटांतून कामे केली..
देव आनंद सोबतच्या तिचा ‘लव्ह मॅरेज’ चित्रपट मला फार आवडला. ‘मेरे हुजूर’ हा जितेंद्र व राज कुमार सोबतचा तिचा चित्रपट मी मॅटिनीला पाहिला..
१९६८ च्या काळात ‘पिक्चरपोस्ट’ नावाचं एक पाॅकेटबुकच्या आकाराचं सिनेमासिक विकत मिळायचं. त्यामध्ये नवीन हिंदी चित्रपटांचे भरपूर फोटो व माहिती असायची.. त्यात ‘दो कलियाॅं’ चित्रपटाचे फोटो मी पाहिले होते.. विश्वजीत व माला सिन्हाचा तो एक सर्वोत्तम कौटुंबिक चित्रपट होता.. त्यामध्ये बेबी सोनियाचा (आत्ताची नीतू सिंग कपूर) डबल रोल होता.. ‘तुम्हारी नजर, क्यू खफा हो गई..’ सारखी अवीट गोडीची त्या चित्रपटात गाणी होती.. ‘बच्चेऽ मन के सच्चेऽ…’ हे गाणं बेबी सोनियाच्या तोंडी होतं…
ती माझ्या लक्षात राहिली ‘आॅंखे’ चित्रपटातील गुप्तहेरच्या भूमिकेतली.. धर्मेंद्र व तिची पहिली भेट सिंगापूरला होते.. ‘मिलती है जिंदगी में, मुहब्बत कभी कभी..’ या गाण्यात ती डोक्यावर हॅट घालून धर्मेंद्रला प्रेमाचे धडे देते… हे गाणं मला फार आवडलं… ते वयच तसं होतं की, असं एखादं गाणं मनावर बिंबायचं…
नंतर माला सिन्हाचा राजेश खन्ना बरोबरचा ‘मर्यादा’ चित्रपट पाहिला.. काॅलेज जीवनात ‘हरियाली और रास्ता’ चित्रपटातील ‘बोल मेरे तकदीर में क्या है.. मेरे हमसफर अब तो बता… जीवन के दो पहलूं है, हरियाली और रास्ता…’ हे गाणं जास्तच आवडायला लागलं…
कालांतराने नवीन हिंदी नायिका येत राहिल्या व माला सिन्हा क्वचितच दिसू लागली.. ‘३६ घंटे’ चित्रपटात तिला पाहिलं.. १९९४ पर्यंत पडद्यावर ती काम करीत राहिली..
आज तिचा पंच्याऐंशीवा वाढदिवस!! खरं तर अभिनेत्रीच्या वाट्यास, साधारणपणे वीस वर्षांची कारकिर्द येते… त्यातच तिला आपली छाप सोडायची असते.. नंतर लग्न, संसार वगैरे.. माला सिन्हा पडद्यावर आली १९५६ साली, लग्न केलं १९६६ साली.. लग्नानंतरही पुन्हा चित्रपटांतून ती कामं करीतच राहिली.. तीस वर्षांनंतर चरित्र भूमिका करु लागली..
तिच्या मुलीने, प्रतिभा सिन्हाने ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटातून नशिब आजमवायचा प्रयत्न केला, मात्र तिला यश काही मिळालं नाही..
१९९६ साली महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवाच्या समारंभाला तिला मी प्रत्यक्ष पाहिलं… अठ्ठावीस वर्षांनंतर ‘आॅंखे’ चित्रपटातील मीनाक्षी मेहताला मी पहात होतो.. मनात गाणं गुणगुणत होतो…
‘मिलती है जिंदगी में, मुहब्बत कभी कभी…’
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
११-११-२१.
Leave a Reply