नवीन लेखन...

दलाई लामा आणि तिबेटी स्वातंत्र्य लढ्याची  बिकट वाट

तिबेटच्या अस्मिता व संघर्षाचे प्रतीक असलेले आणि निर्वासित जीवन जगताना धैर्य, शांती व अहिंसेचा परिचय देणारे दलाई लामा यांचा  ६ जुलै रोजी ८४ वा जन्मदिन होता. त्यानिमित्याने त्यांच्या कार्याची आणी तिबेटी आध्यात्मिक स्वातंत्र्य लढ्याच्या सध्याच्या परिस्थितीची समिक्षा करणे जरुरी आहे.

चीनने ७ ऑक्टोबर १९४९ स्वतंत्र तिबेटवर आक्रमण केले. १७ मार्च १९५९ ला दलाई लामा ल्हासाहून पलायन केले व आपल्या ६० हजार तिबेटी शरणार्थीसोबत भारतात येउन राजनीतिक शरण घेतली.

दलाई लामा यांनी हिमाचल प्रदेशातिल धर्मशाळा मध्ये आपले सरकार स्थापन केले. परंतू त्याला जगातील कुठल्याही राष्ट्राने मान्यता दिली नाही. 201३ मध्ये दलाई लामा यांना वाटले की लोकशाही पद्धतीने निर्माण झालेले सरकार तिबेटी लोकांसाठी स्थापन करावे. यासाठी निवडणुका होऊन नव्या सरकारची निर्मिती करण्यात आली. त्याचे मुख्यालय धर्मशाळा इथे आहे.

तिबेटवर चीनची विविध आक्रमणे

आज तिबेटवर चीन विविध प्रकारे आक्रमण करतो. एक आक्रमण म्हणजे सांस्कृतिक आक्रमण, मूळ तिबेटन संस्कृतीला बरबाद करून चिनी संस्कृती रूजवायची. दुसरे आर्थिक आक्रमण, त्या प्रमाणे इथे मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरू आहे.तिबेटशी अर्थव्यवस्था ही शेती, मेंढ्या पाळणे आणि पर्यटन यावर अवलंबून आहे.  त्यामुळे इथल्या पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तिसरे तिबेटचे आणी ईतर देशांचे पाणी पळवण्याचे कारस्थान. तिबेट मधील पाणी चीन आपल्या दुष्काळी भागाकडे वळवण्याचा प्रयत्न करतो आहे.

तिबेटचे चीनीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. चीनी नागरिक तिबेटमध्ये रहायला जात आहेत. तिबेटची राजधानी ल्हासा याची लोकसंख्या 2 लाख हन चीनी आहेत आणि मूळ तिबेटन रहिवासी केवळ 1 लाखच आहेत.

चीनने तिबेटवर केलेल्या हल्ल्यात 10 लाखाहून तिबेटी लोक मारले गेले . 1980, 1990 आणि 2008 या वर्षांमध्येही चीन विरूद्ध उठाव झाला होता. परंतू त्याला चिरडून टाकण्यात आले. जागतिक स्तरावर त्याची फारशी दखलही घेतली गेली नाही.

तिबेट कब्जात का घ्यायचा?

चीनने तिबेट कब्जात घेतला आहे ,त्याला अनेक कारणे आहेत. तिबेट मधिल गोड पाण्यामुळे चीनच्या दुष्काळी भागात असलेल्या पाण्याची कमतरता दूर कऱण्याची क्षमता तिबेट कडे आहे. त्यासाठी ब्रह्मपुत्रा नदी चीनच्या बाजूला वळवावी लागणार आहे. तसेच पवनउर्जेतही जगातील सर्वात जास्त प्रमाणात तिबेटमध्ये ही उर्जा तयार केली जाऊ शकते. सौर उर्जेची निर्मिती करण्यासाठीही तिबेट हे उपयुक्त स्थान आहे. जगामध्ये जितकी सौर उर्जेची निर्मिती केली जाते तेवढी किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त सौरउर्जा निर्मितीची ताकद एकट्या तिबेटन पठारावर आहे. जिओ थर्मल म्हणजे जमिनीच्या पोटातील गरम पाण्याच्या/झर्याच्या मदतीने उर्जा निर्मिती करण्याची क्षमता सुद्धा तिबेटमध्ये आहे. तिबेटमध्ये विविध प्रकारची खनिज संपती आहे. चीनने या सगळ्या खाणकामाकरिता अनेक ठिकाणी खोदकाम सुरू केले आहे. ब्रोमाईड किंवा इतर खनिजांपासून चीनला तिबेट मधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते.

गोड पाण्याचे सर्वात मोठा स्रोत तिबेट

तिबेट पठारावर प्रचंड हिमवृष्टी होते, त्यामुळे त्याला थर्ड पोल असे मानले जाते. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव हे दोन ध्रुव आहे.मात्र गोड पाण्याचे सर्वात मोठा स्रोत म्हणजे तिबेट. जगाचे 22 टक्के गोड पाणी तिबेटमधे आहे. आशिया खंडातील जवळपास 3 अब्ज लोकसंख्या या पाण्यावर अवलंबून आहे. तिबेटच्या पठारावरून निरनिराळ्या नद्या उगम पावतात जसे ब्रह्मपुत्रा, गंगा आणि भारतात येणार्या अनेक नद्या. त्याशिवाय इरावती आणि इतर नद्या तिबेटच्या पठारावर उगम पावून साऊथ इस्ट आशियात प्रवेश करतात. तिबेट पठारावर सर्वाधिक प्रमाण हे ग्रास लँड आहे. काही नद्यांची खोरी वसलेली आहेत.

आत्ता आपण ज्याला तिबेटी ऑटोनॉमस रिजन या नावाने ओळखतो,तो मूळ तिबेट नाही. तिबेटचे इतर भाग चीनने आपल्या काही राज्यात सामील करून घेतले आहेत.

500 तिबेटीयन लोकांवर एक पोलिस कर्मचारी

आज चीन तिबेटमधील रहिवाशांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना चीन विरुध्द आंदोलने करण्याची परवागनी नाही. जे चीन विरुध्द बोलण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यांना पकडून शिक्षा केली जाते. शाळेतील शिक्षक, धर्मगुरू किंवा लेखक, आंदोलक किंवा पर्यावरणवादी कार्यकर्ते, तिबेटविषयी चांगले लिहिणारे कवी, गायक या सर्वांवर लक्ष ठेवले जात आहे. तिबेट मध्ये चीनी सैनिकांची संख्याही लक्षणीय आहे. त्याशिवाय प्रत्येक 500 तिबेटीयन लोकांवर एक पोलिस कर्मचारी लक्ष ठेवून आहे. तरीही तिबेटी लोकांची आंदोलने सातत्याने सुरू असतात. त्याचे दोन प्रकार आहे एक समुहाने केलेली आंदोलने, दुसरे अनेकवेळा तिबेटच्या विविध भागात एकेकटा माणूस हाती फलक घेऊन चीन विरूद्ध आंदोलन करतो. त्यापैकी एक मोठा दुर्दैवी प्रकार म्हणजे स्वतःला जाळून घेणे. आतापर्यंत 160 तरूणांनी तिबेट स्वतंत्र व्हावा म्हणून स्वतःला जाळून आत्म दहन केले आहे.

तिबेटच्या संस्कृतीवरही हल्ला होत आहे. तिबेटी भाषा पुढे वाढू नये यासाठी त्यावर बंदी आहे. तिबेटी गाणी, कविता, कथा यांच्यावर लक्ष ठेवले जाते. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचा फोटो लावण्याची परवानगी नाही. 6 हजाराहून जास्त तिबेटन मॉन्सेन्ट्रीज नष्ट करण्यात आल्या आहेत.

आण्विक युद्घ तिबेटमध्ये

चीनने तिबेट पठारावर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र आणि आण्विक शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. अमेरिका किंवा कुठल्याही महाशक्तीबरोबर आण्विक युद्घ झाले तर त्याला प्रतिकार हा तिबेट मध्ये केला जाईल. जिथे नुकसान तिबेटचे होईल आणि चीनच्या मुख्य भुमीचे नाही. आण्विक पऱीक्षण जमीनीच्या अंतर्गत आणि आकाशात  अशा दोन्ही प्रकारे केले जाते. आज चीनने तिबेटमध्ये 300 ते 400 आण्विक बॉम्ब ठेवले आहेत. चीनमध्ये आण्विक उर्जा रिअॅक्टरच्या मदतीने वीज निर्मिती केली जाते. त्यातून तयार होणारे आण्विक टाकाऊ पदार्थ नंतर जमीनीच्या आत गाडले जाते. हे टाकाऊ पदार्थ इतके ताकदवान असतात की पुढील 200 ते 300 वर्ष त्यातुन किरणोत्सर्ग बाहेर पडू शकतो.

स्वतंत्रता चळवळ कमजोर होत आहे?

तिबेटन्स शी संख्या वाढू नये म्हणून तिबेटीयन मुलींवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया लादली जाते. हजारो तिबेटन मुलींना परवानगीशिवाय ह्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. जे तिबेटी कार्यकर्ते रेझिस्टन्स चळवळीत भाग घेतात त्यांना राजकीय कैदी म्हणून अटक केली जाते आणि त्याना विकास कामांमध्ये जबरदस्तीने मजुरी कामास ठेवले जाते किंवा चीनी सैन्याकरिता काम करण्यास भाग पाडले जाते. ज्या तिबेटी लोकांना चीनने पकडून छळछावणीत ठेवले आहे त्यांची नेमकी संख्याही कोणालाही माहित नाही.

तिबेटी चीनविरूद्ध अमेरिका, भारत, युरोप या देशांत आवाज उठवत असतात. त्यासाठी समाज माध्यमे, युट्यूब यांचा वापर केला जातो अनेक ठिकाणी चीनी विरोधी घोषणा असलेल्या टोप्या, शर्ट वाटले जातात. तिबेट सरकारचे प्रतिनिधी देशा देशात फिरून चीनच्या आक्रमणाविषयी प्रचार करत असतात. परंतू या सगळ्यांना फ़ारसे यश मिळत नाही.जे तिबेटीयन पळून भारतात आले होते त्यांचा चीनशी असलेला संबंधही हळहळु तुटतो आहे व स्वतंत्रता चळवळ कमजोर होत आहे.

तिबेटी स्वातंत्र्य लढ्याची  बिकट वाट

थोडक्यात चीन तिबेटवर आक्रमण करत आहे ज्यामध्ये मोठी धरणे बांधली जात आहेत, नद्याचे प्रवाह बदलले जात आहेत. तिबेटमध्ये पर्यावरण आक्रमण होते आहे. एवढेच नव्हे तर दलाई लामा यांच्या निवृत्तीनंतर पुढच्या दलाई लामावर चीनचे नियंत्रण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही वर्षामध्ये तिबेटमध्ये नेमके काय होणार? चीनविरोधी लढ्यात त्यांना यश मिळेल का? समाजमाध्यमांचा वापर, भाषणे देऊन काही फरक पडेल का? तिबेटींना हवेसे असलेले स्वातंत्र्य चीन देऊ करेल का? ह्या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक असल्याचे दिसतात. इतर देशात राहुन तिबेटीयनच्या स्वातंत्र्य लढ्याला यश मिळेल असे वाटत नाही.

मात्र काही तज्ज्ञांच्या मते शांततेच्या मार्गाने तिबेटी देत असलेला लढा, त्यांची सॉफ्ट पॉवर, अध्यात्मिक शक्ती ही चीनमधील हुकुमशाही पेक्षा अधिक परिणामकारक ठरु शकेल. जेव्हा सोव्हिएत रशिया फुटला त्यावेळेला अशा प्रकारे देश वेगळे होतील अशी कल्पना कोणाच्याही मनात आली नसेल. त्यामुळे तिबेटी लोकांना असे वाटते की कधीतरी चीनच तुटेल आणि तिबेटला आपले स्वातंत्र्य मिळण्यास मदत मिळेल. मात्र तिबेटी स्वातंत्र्य लढ्याची वाट आज तरी बिकट दिसत आहे. त्यांना भारतीयांनी मदत करण्याची गरज आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..