दामोदराष्टक स्त्तोत्र, कृष्ण द्वैपायन व्यासांनी रचलेल्या पद्म पुराणात सत्यव्रत ऋषी व शौनक ऋषी यांच्या संवाद रूपात आहे. श्रीकृष्णाचे अत्यंत रसाळ चरित्र श्रीमद् भागवताच्या दशम स्कंधात येते. त्याच्या बालपणीच्या अनेक कथा सुप्रसिद्ध आहेत. त्यातीलच अध्याय ९ व १० मधील एक कथा – श्रीकृष्णाच्या खोड्यांना आवर घालण्यासाठी यशोदेने त्याच्या कमरेला दोर बांधून दुसरे टोक उखळाला बांधले. बालकृष्णाने उखळासकट हालचाल करून दोन अर्जुन वृक्ष पाडले व त्या तरूंमध्ये अडकून पडलेल्या कुबेराच्या मणिग्रीव आणि नलकूवर या दोन पुत्रांना मुक्ती दिली. [यामुळेच श्रीहरीला दामोदर (दाम- दोरी, उदर- पोट) असे नाव पडले]. या कथेवर आधारलेले, भुजंगप्रयात वृत्तात रचलेले हे स्तोत्र अत्यंत रसाळ व समजण्यास सोपे आहे.
नमामीश्वरं सच्चिदानंदरूपं
लसत्कुण्डलं गोकुले भ्राजमानं |
यशोदाभियोलूखलाद्धावमानं
परामृष्टमत्यं ततो द्रुत्य गोप्या ॥१॥
मराठी- जो सदैव आनंदस्वरूप आहे, ज्याची कर्णभूषणे तेजस्वी असून, जो गोकुळात देदीप्यमान आहे, यशोदेला घाबरल्यामुळे जो लाकडी उखळापासून दूर पळत असता ज्याला गोपीने वेगाने धाऊन पटकन पकडले अशा ईश्वराला मी नमस्कार करतो.
यशोदाभये ऊखळा संग धावे
झणी गोपिका धावुनी त्या धरावे ।
डुलांची प्रभा, गोकुळी दिव्य झाला
सदा मानसी मोद वंदू तयाला ॥०१॥
रुदन्तं मुहुर्नेत्रयुग्मं मृजन्तम्
कराम्भोज-युग्मेन सातङ्क-नेत्रम् |
मुहुः श्वास-कम्प-त्रिरेखाङ्क-कण्ठ
स्थित-ग्रैव-दामोदरं भक्ति-बद्धम् ॥२॥
मराठी- सारखा रडत, आपल्या दोन्ही करकमलांनी दोन्ही डोळे पुसणारा, ज्याच्या डोळ्यात भीती दाटलेली आहे, सारखा श्वास वरखाली झाल्याने ज्याचा शंखाप्रमाणे (सुकुमार) कंठ थरथरत आहे, ज्याच्या गळ्यातील माळ हालत आहे, अशा भक्तिरूपी दोराने बांधून ठेवलेल्या दामोदराला (मी नमस्कार करतो)
रडे सारखा नेत्र दोन्ही करांनी
पुसे, भीति नेत्री, थरारे दमांनी ।
गळा शंखजैसा, रुळे कंठ माला
गुणे भक्तिच्या बांधिले श्रीहरीला ॥०२॥ (गुण- दोरी)
इतीदृक् स्वलीलाभिरानंद कुण्डे
स्व-घोषं निमज्जन्तम् आख्यापयन्तम्
तदीयेशितज्ञेषु भक्तिर्जितत्वम
पुनः प्रेमतस्तं शतावृत्ति वन्दे ॥३॥
मराठी- अशा तर्हेच्या आपल्या लीलेच्या आनंदाच्या डोहात गोकुळवासियांना डुबकी देणार्या, त्याचा सर्वशक्तिमानपणा(च) जाणणार्यांना (आपण) भक्तीने जिंकले जातो असे सांगणार्या (दामोदरा) ला मी पुनः पुनः शंभर वेळा प्रेमाने नमस्कार करतो.
अशा मोद डोही स्वलीला स्वरूपी
डुबी देतसे गोकुळी गोप गोपी ।
वदे तज्ञ लोकां करी भक्ति राजी
मला, वंदने शेकडो त्यास माझी ॥०३॥
वरं देव ! मोक्षं न मोक्षावधिं वा
न चान्यं वृणेऽहं वरेशादपीह
इदं ते वपुर्नाथ गोपाल बालं
सदा मे मनस्याविरास्तां किमन्यैः ॥४॥
मराठी- हे देवा, मला मुक्ती नको, मोक्षाचे ठिकाण वैकुण्ठाची आवड नाही किंवा इतर कोणता वरही आवडत नाही. वरदायकाकडून एवढीच अपेक्षा की हे देवा तुझी ही सानुल्या गवळ्याची आकृती सदैव माझ्या मनी राहो, दुसरं काय!
नको मुक्ति, वैकुण्ठ वाटे नकोसे
नसे दान दूजे वराचे हवेसे ।
तुझी गोप बालाकृती नित्य राहो
मनी मानसी अन्य काही न लाहो ॥०४॥
इदं ते मुखाम्भोजम् अत्यन्त-नीलैः
वृतं कुन्तलैः स्निग्ध-रक्तैश्च गोप्या
मुहुश्चुम्बितं बिम्बरक्ताधरं मे
मनस्याविरास्तामलं लक्षलाभैः ॥५॥
मराठी- हे तुझे काळ्याभोर लालसर बटांनी वेढलेले, यशोदेने वारंवार चुंबिलेले, बिंबफळाप्रमाणे (तोंडल्याप्रमाणे) लालबुंद ओठ असणारे वदनकमळ माझ्या मनी वसो. मग इतर लाभांची काय कथा?
बटा लालशा-कृष्ण चर्यारविंदा
मुखा सारखी माय चुंबी यशोदा ।
वसो ओठ बिंबाजसे मानसी या
नफे अन्य लाखो तसे जात वाया ॥०५॥
नमो देव दामोदरानन्त विष्णो
प्रभो दुःख-जालाब्धि-मग्नम्
कृपा-दृष्टि-वृष्ट्याति-दीनं बतानु
गृहाणेष मामज्ञमेध्यक्षिदृश्यः ॥६॥
मराठी- हे देवा, दामोदरा, अनन्ता, विष्णो, दुःखरूपी समुद्रात जाळ्यात अडकलेल्या माझ्यावर, हे (सर्वांवर) कृपा करणार्या प्रभो, आपल्या दयाळू दृष्टीची वृष्टी करून, तू माझ्यासारख्या अत्यंत दीन दुबळ्याच्या नजरेसमोर दिसत रहा.
असे दुःख दर्यात जाळ्यात हा मी
हरी तू कृपाशील सर्वांस स्वामी ।
कृपादृष्टि टाकून दीनावरी या
दिठीच्या समोरी रहा तूच माझ्या ॥०६॥
कुबेरात्मजौ बद्ध-मूर्त्यैव यद्वत्
त्वया मोचितौ भक्ति-भाजौ कृतौ च
तथा प्रेम-भक्तिं स्वकां मे प्रयच्छ
न मोक्षे ग्रहो मेऽस्ति दामोदरेह ॥७॥
मराठी- स्थिर आकृतीमध्ये बंदिस्त झालेल्या कुबेराच्या दोन मुलांची तू ज्याप्रमाणे सुटका केलीस आणि आपल्या भक्तांमध्ये रूपांतर केलेस, तशा तर्हेचे तुझे प्रेम आणि भक्ती मला दे. हे दामोदरा, मला या जगात मुक्तीची कामना नाही.
जसे वृक्ष बंधातुनी मुक्त केले
कृपे सोम पुत्रांस त्वां भक्त केले । (सोम- कुबेर)
तसे प्रेभ भक्ती मला दे अनंता
जगी कामना मुक्तिची या न भक्ता ॥०७॥
नमस्तेऽस्तु दाम्ने स्फुरद्-दीप्ति-धाम्ने
त्वदीयोदरायाथ विश्वस्य धाम्ने
नमो राधिकायै त्वदीय-प्रियायै
नमोऽनन्त-लीलाय देवाय तुभ्यम् ॥८॥
मराठी- हे परमेश्वरा, जे सर्व विश्वाचे घर आहे (जेथून सर्व विश्वाची (निर्मिती करणार्या ब्रह्म्याची) उत्पत्ती झाली) , त्या तुझ्या पोटाला बांधलेल्या त्या चमकदार तेजस्वी दोराला माझा नमस्कार. तुझ्या प्रिय राधेला माझा नमस्कार. ज्याच्या लीलांना खंड नाही अशा देवा, तुला माझा नमस्कार.
जगाधार पोटा तुझ्या वेढणारी
अशी वंदितो दिव्य तेजाळ दोरी ।
नमस्कार वृंदेस कृष्ण प्रियेला
नमूं श्रीहरी चालता नित्य लीला ॥०८॥
— धनंजय बोरकर.
९८३३०७७०९१.
माझ्यासारख्या आडाण्याने या साहित्याविष्कारापासून
बोध तरी कय घ्यावा? —
एका शब्दात सांगायचे म्हणजे “प्रेम”.
या काव्यामध्ये वरून जरी कृष्णलीला
आणि त्यामुळे त्रासलेल्या यशोदामातेतील
संघर्ष दिसत असला तरी त्या संघर्षाखालून
वाहणाऱ्या प्रेमामध्ये काहीतरी शिकवणूक
दडलेली आहे.
काय आहे ती शिकवणूक? —
अनोख्या जगाशी अथवा
निकटच्या आप्तमित्रांशी
व्यवहार करतांना भले प्रसंगी
राग, कठोरता अथवा वैमनस्व
का दाखवावे लागेना,
त्याच्या खालून वाहणाऱ्या
प्रेमाच्या झऱ्याशी संबंधद
कधीही तोडू नका.
नमस्कार
अतिशय सुंदर आणि सुरेख भाषांतर
आज गोकुळ अष्टमिच्या शुभदिवशी हे भाषांतर वाचायला छान वाटले.