मूल जन्माला आलं की हल्लीचे पालक त्याचं पुढिल भविष्य ठरवायला जणू काही तयारच असतात. ही विचारसरणी सध्या सुशिक्षित पालकांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते. माझा मुलगा मोठा झाला की तो एखादा डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावा. नाही तर मग एखादी UPSC किंवा MPSC ची परीक्षा पास होऊन ऑफिसर बनून कमिशनर किंवा कलेक्टर तरी व्हावा अशी बऱ्याच पालकांची मनोमन इच्छा असते . त्यासाठी ते मुलांना तशा प्रकारचे वातावरण सुद्धा बहाल करत असतात.
साधारणतः बारावी झाल्यानंतर अशी पालक मंडळी स्पर्धा परीक्षांची जाहिरात व्हॉट्सअप वर मुलाला शेअर करत असतात, नाहीतर MPSC किंवा UPSC परीक्षेचे क्लासेस कुठे चांगले आहेत याची माहिती गोळा करतात. मुलांना रोज वर्तमान पत्र वाचत जा अस आवर्जून सांगायला ते विसरत नाहीत. आपल्या मुलाने चांगल्यात चांगल्या क्लास मध्ये प्रवेश घ्यावा असेही त्यांना वाटत असते. त्याप्रमाणे त्यांची मोहीम ही मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरांकडे वळते. MPSC साठी बहुतेक मंडळी पुणेच प्रिफर करतात. आणि UPSC साठी त्यांची मजल थेट दिल्लीपर्यंत जायला देखील मागेपुढे पाहत नाहीत. तिथे गेलेल्या मुलांसाठी रूम पासून तर मेस पर्यंतची सगळी जय्यत तयारी या महाशयांनी केलेली असते. काही मंडळी तर कर्ज काढून मुलांच्या क्लास ची फी आणि राहण्याची व्यवस्था करत असतात आणि मुलाला बजावून सांगतात की, ” हे बघ पैशाची कसलीही काळीज करू नको , लागेल तेवढा पैसा मी तुला पुरवीन तू फक्त अभ्यास कर. आमचे तसेच आपल्या गावचे नाव रोशन कर एवढंच.”
पण ही मंडळी साधा एव्हढाही विचार करत नाही की आपल्या मुलाची तेवढी कुवत आहे का ? UPSC किंवा MPSC च्या परीक्षेत आपल्या मुलाचा टिकाव लागेल की नाही. तो पास होईलच याची काय गॅरंटी. पण कसलाही मागचा पुढचा विचार न करता ही मंडळी आपल्या मुलाला थेट मुंबई पुणे किंवा दिल्लीला पाठवून देतात.
पाठवून तर दिलं पण तिथे गेल्यावर परिस्थिती काही औरच असते . दिल्लीच्या ठिकाणी मुलाला साधं रूम शोधण्या पासून तयारी करावी लागते . त्यातही जर रूम भेटला तरी तिथलं वातावरण अभ्यासासाठी पूरक असेलच असेही नाही. एकदाचा रूम भेटला की मग सुरू होतो योग्य तो क्लास शोधण्याचा प्रवास…
सगळ्यात मोठी गोष्ट हीच असते की इथे मोठमोठाली बॅनर लावलेली अनेक क्लासेस असतात. अनेकांच्या बॅनर वर बऱ्याच यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो लावलेले असतात. अश्यात योग्य क्लास कोणता हेच कळत नाही. मग अक्कड बक्कड .. करत कोणत्याही क्लास मध्ये ऍडमिशन घेतले जाते. नंतर कळते की अरे .. याच्या पेक्षा दुसराच क्लास चांगला होता. पण असो….
शेवटी अभ्यासाला सुरुवात होते . तिथे असलेले जुने विद्यार्थी आपल्या मुलांच्या संगतीत येतात आणि मग वेगळाच अभ्यास सुरू होतो. त्यातली काही मंडळी तिथे खूपच सिनिअर असतात . त्यांना घरी तोंड दाखवायला जागा नसल्यामुळे ही मंडळी अटेम्प्ट वर अटेम्प्ट देत तिथेच खितपत पडलेली असतात. फिल्मस, पार्ट्या, दारू, अशी अनेकविध प्रकारच्या सवयी त्यांना इथे जडलेल्या असतात. त्यात आपल्या मुलांची आणखी भर पडत असते.
मग अश्या परिस्थितीत मुलाचे 1 , 2 , 3, …. अशी अनेक अटेंमट्स होऊ लागतात. पण हा काही परीक्षा पास होत नाही.
हळूहळू त्याचं वय वाढायला लागतं. मुलगा निराशेच्या गर्तेत जाऊ लागतो. दुसरीकडे कुठेही त्याला नोकरी मिळत नाही. फक्त घरी बसून भाकरी मोडण्याशिवाय त्याच्याजवळ काही पर्यायच शिल्लक राहत नाही. इकडे पालकांना आता अचानक मुलाची काळजी वाटायला लागते. आपला मुलगा निराशेच्या गर्तेत बुडून आपल्या जीवाचं बरेवाईट तर नाही ना करून घेणार अशी भीती या पालकांना वाटू लागते. नाईलाजाने कंटाळून ते आपलं शेवटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढतात आणि शेवटी एकदाच त्याच लग्न लावून मोकळे होतात.
लेख: भैय्यानंद वसंत बागुल
######################
अश्याच प्रकारचं काहीस लिखाण डार्क हॉर्स या पस्तकात वाचायला मिळत..
लेखक हे स्वतः त्या परिस्थितीतून गेलेले असल्यामुळे त्यातील वर्णन अधिकच जिवंत आणि वास्तववादी वाटतात. लेखकाचं हे पहिलंच पुस्तक असलं तरी ही कादंबरी वाचताना खिळवून ठेवते. प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला वाटेल की हे सर्व माझ्याशी निगडित असंच लिखाण आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना ज्या अडचणी येतात त्याच नेमकं विवरण दिसून येतं. रुम शोधताना ज्या गमती जमती होतात त्याच वर्णन विनोदी पद्धतीने पण मार्मिकपणे करताना दिसून येतं. रूम मध्ये असणारी अस्ताव्यस्तता. बॅचलर लोकांची बेफिक्री लेखकाने अचूक वर्णिली आहे. नायकाला उत्तम असा क्लास मिळवून देण्यासाठी त्याच्या मित्रांची कळकळ नेमकी टिपली आहे. क्लास मध्ये काम करणारे चांगले शिक्षक कसे प्रसिद्धीपासून दूर असतात हे सुद्धा यातून प्रकर्षाने जाणवते. त्यांना त्यांचं जीवन रहाटगाडगे कसे चालवावे लागते याच वर्णन वाचताना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. अशा आणि अश्याच अनेक किस्यांनी भरपूर असे हे पुस्तक स्पर्धा परीक्षेची तयारी करण्या आधी एकदा नकीच वाचावे.
पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
पुस्तक : डार्क हॉर्स
लेखक : निलोत्पल मृणाल
Leave a Reply