पांडूरंगाचे दर्शन घेण्या, गेला पंढरपूरी ।
चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी ।।
आजपरी शरीर दुबळे साथ देईना ।
मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना ।।
आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी ।
भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी ।।
आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे ।
अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते ।।
चार दिवस पडून होता विठ्ठल विठ्ठल गजरी ।
फिरणे नाही मागे अशी मनीची तयारी ।।
गेला नाही कण अन्नाचा चार दिवस पोटी ।
ध्यास लागला मनी एकची त्याच्याच भेटीसाठी ।।
टाळ मृदुंग विठ्ठल नामी एक रूप झाला ।
नाचत नाचत प्रभू चरणी येऊन तो पडला ।।
विलीन झाला अनंतात तो फिरूनी नाही उठला ।
देह सोडूनी पांडूरंगी चरणी वैकूंठी गेला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply