दासगणू महाराज यांचा जन्म ०६ जानेवारी १८६८(पौष शुद्ध एकादशी शके १७८९,) रोजी झाला.
कोकणातील कोतवडे, जि. रत्नागिरी हे सहस्रबुद्धे घराण्याचे मूळ गाव. तथापि उदरनिर्वाहासाठी हे घराणे नगरला स्थायिक झाले. अंगभूत कर्तबगारीच्या बळावर मामलेदारीचे काम त्यांनी मिळवले. श्री दासगणू महाराजांच्या तीन पिढ्या आधीपासून त्यांच्या घरात मामलेदारी होती. त्यांच्या परिवाराला त्या परिसरात मोठा मान व प्रतिष्ठा होती. श्री. एकनाथ व सौ. सरस्वती हे दासगणूंचे आजोबा व आजी तर श्री. दत्तात्रेय व सौ. सावित्री हे त्यांचे पिता व माता !
या मंगल दिवशी सूर्योदयाच्या वेळी आकोळनेर येथे (आजोळी) दाभोळकरांकडे श्री दासगणू महाराजांचा जन्म झाला. सूर्योदयाच्या वेळी जन्म झाला म्हणून बाळाचे नाव “नारायण” ठेवले होते. तथापि बाळ जेव्हा आजोळहून नगरला सहस्रबुद्धे यांच्या घरी आला तेव्हा बाळाचे आजोबा म्हणाले, “याचे कान व पोट गणपती सारखे आहे. आपण याला ‘गणेश’ म्हणू या.” म्हणून ‘गणेश’ हेच नाव रूढ झाले. ‘गणेश’चे पुढे ‘गणू’ झाले. महाराज स्वतःला संतांचा दास म्हणवून घेत असत. म्हणून ‘दासगणू’ हे नामाभिधान प्रचलित झाले.
घरची श्रीमंती असल्याने बालपण खूप समृद्धीत व्यतीत झाले. पहिला-वहिला नातू म्हणून आजोबा व आजी यांनी त्यांचे खूप लाड केले. नवव्या वर्षी मुंज झाल्यावर चि.गणेशाचे नाव शाळेत दाखल झाले. सहस्रबुद्धे यांच्या घरातील वातावरण सुशिक्षितांचे होते पण सर्वसामान्यपणे समाजात आज आपण घेतो तशा शिक्षणाचे आकर्षण नव्हते. लिहिता-वाचता आले, थोडीफार बेरीज-वजाबाकी करता आली म्हणजे पुरे, अशी मनोभूमिका असणारा तो काळ होता. समृद्धी असल्याने नोकरीसाठी शिक्षण ही दृष्टीच नव्हती. शेतीवर पालन-पोषण व धार्मिक आचार-विचार यांनी मनाची मशागत त्या काळी होत असे. स्वाभाविकच योग्य वयात शाळेत न घातल्याने अभ्यासाची गोडी लागली नाही. चुलत्याने खूप प्रयत्न करूनहि इंग्रजी चौथी पर्यंतच दासगणू महाराजांचे शिक्षण झाले.
वर्गात इतर मुले लहान वयाची, त्यात वयाने मोठा असलेला मुलगा सामावू शकत नाही त्यामुळे समवयस्क मुलांत दासगणू मिसळू लागले. तसा दासगणुंचा स्वभाव आनंदी पण मिश्किल होता. मिश्किल स्वभावामुळे उनाडक्या करणे, टिंगल-टवाळी करणे याकडे त्यांचा कल वाढू लागला. शब्दांची जुळणी करून काव्यात्मक शैलीत एखाद्या विषयावर उपहासात्मक भाष्य करणे, ही कला त्याच्या अंगी उपजत होती. परिणामतः त्याकाळाचे मनोरंजनाचे एकमेव साधन ‘तमाशा’ या क्षेत्राकडे त्यांचे पाय वळले. त्या काळात राम जोशी, अनंतफंदी यांच्या बऱ्याच रचना तमासगीर सादर करीत असत. तमाशातील गाणी ऐकून त्यांच्याही जन्मजात काव्य प्रतिभेला पंख फुटले व ती ह्या लोककलेच्या नभांगणात मुक्तपणे विहार करू लागली. काधी ती प्रतिभा निर्भेळ शृंगाराचे उत्तान वर्णन करी, तर कधी निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत जोंधळा-बाजरीचे लग्न लावी. कधी संतांचे गुणानुवाद तर कधी लब्धप्रतिष्ठितांची कुलंगडी फटकळपणे चव्हाट्यावर आणून झुळझुळीत पडद्यामागचे अनाचाराचे दर्शन घडवी. अशी कितीतरी मनोरंजन करणारी कवने ते लिहू लागले अन् तमासगिरांचे ‘अन्नदाते’ बनले.
आपल्या मामलेदार घराण्यातील या तरण्याताठ्या मुलाचे तमासगिरात वावरणे दासगणू महाराजांच्या आईला पटत नव्हते. म्हणून लग्नाची बेडी (शके १८१३ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी बोरले आष्टा, जामखेड, येथील जहागीरदार श्री नारायणराव रानडे यांची कन्या सरस्वती यांचेशी पुण्यात त्यांचे लग्न झाले) पायात अडकवून दासगणू महाराजांची रवानगी बडोदा संस्थानात कारकुनाच्या जागेवर केली गेली. पण संस्थानिकांपुढे लाचारीने वागणे स्वाभिमानी स्वभावाच्या दासगणुंना आवडले नाही. नोकरी सोडून ते पुन्हा नगरला आले व तमासगिरांत मिसळू लागले. घरातील मंडळींना हे रुचले नाही व त्यातच एकदा जेवणावरून चुलतीने त्यांचा अपमान केला. तेव्हा स्वाभिमानी दासगणुंनी स्वतःच्या घरचाहि त्याग केला. आपल्या पोटापाण्याची सोय आता आपणच पहिली पाहिजे या विचारात भटकत असताना एका एम.केनेडी नावाच्या इंग्रजी पोलीस अधिकाऱ्याच्या ते दृष्टीस पडले. शरीराने सुदृढ व उंचपुऱ्या असलेल्या दासगणुंना त्या अधिकाऱ्याने पोलीस खात्यात रु.९/- इतक्या मासिक वेतनावर हवालदार पदावर भरती केले. ज्या घराण्यातील कर्त्या पुरुषांना पोलीस हवालदाराने सलाम ठोकायचा, त्याच घरातील तरुण मुलाने अशी हलकी नोकरी पत्करली, हे घरच्यांना मुळीच आवडले नाही. त्यामुळे आईवडिलांनी, चुलत्यांनी ही कमी दर्जाची नोकरी सोडून दुसरी चांगली नोकरी पत्करण्यासाठी व घरी परत येण्यासाठी मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. पण घरातील अपमानाने मन दुखावलेल्या स्वाभिमानी दासगणू महाराजांचा निश्चय मुळीच ढळला नाही. श्री. गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे, बक्कल नंबर ७२७ अशी सरकारी दरबारी नोंद होऊन महाराज नोकरीच्या ठिकाणी श्रीगोंदा येथे रुजू झाले.
श्री साईबाबांच्या आदेशान्वये नोकरीचे त्यागपत्र देऊन १९०५ साली दासगणू नांदेडकडे आले. प्रत्यक्ष ओळख नसताना पण जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असल्यागत नांदेडच्या पुंडलिकवाडीतील प्रतिष्ठित वकीलद्वय श्री पुंडलिकराव दत्तात्रेय नांदेडकर व श्री धोंडोपंत दत्तात्रेय नांदेडकर यांच्याशी त्यांचा संबंध जुळून आला. नंतर पुढच्या पिढीत नातेसंबंध जुळून येऊन हे ऋणानुबंध अधिकच घट्ट झाले. नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना, हिंगोली, मुखेड, देगलूर, कळमनुरी, वसमत, उमरी या गावात व त्या परिसरात दादांच्या कीर्तनाचा सुगंध झपाट्याने पसरू लागला व त्यांना गुरुस्थानी मानणारा एक मोठा वर्ग येथे तयार झाला.
१९३८ साली एकदा नांदेडच्या जवळ उमरी येथे एका मंदिरात श्रीरुक्मिणीपांडुरंगाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी दादांना आमंत्रित केले होते. त्यावेळी दादांची कीर्तनेंहि झाली होती. पंचक्रोशीतील आजूबाजूच्या गावातूनही बरीच मंडळी या कार्यक्रमासाठी जमली होती. त्यात एक होत्या गोरट्याच्या आदरणीय आनंदीबाई देशमुख ! संपूर्ण गोरटे गावाला त्या मातृस्थानी वंदनीय होत्या. त्यांच्या उदारवृत्तीची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या अडीअडचणीत त्या धावून जात. महाराजांची भक्तिरसपूर्ण कीर्तने एकूण त्या खूप भारावून गेल्या होत्या. त्यांनी महाराजांचा अनुग्रह स्वीकारला व पुढे स्वतःच्या मुलाला सांगून महाराजांना आग्रहाने स्वतःच्या घरी गोरट्याला आणले. महाराजांनाही छोटेसे, टुमदार, निसर्गरम्य, निरव शांतता असलेले हे गोरटे गाव खूपच आवडले. त्यांचे गोरट्यात येणे वाढले. ‘जेथे राजा, तेथे राजधानी’ या न्यायाने भाविकभक्तांचीहि गोरट्यात वर्दळ वाढू लागली. देशमुखांचा प्रशस्त मोठा वाडा कमी पडू लागला. या सर्वांची गैरसोय टाळण्यासाठी आनंदीबाईंनी गावाला अगदी खेटून असलेल्या स्वतःच्या शेतात दोन मोठ्या खोल्या बांधून दिल्या व पुढे दातृत्वाची परिसीमा गाठून ते सर्वच शेत महाराजांच्या नावे करून टाकले. त्याच जागी आज प्रतिष्ठानची भव्य वास्तु उभी आहे. प्रतिष्ठानच्या आवारात असलेल्या श्रीरुक्मिणीपांडुरंग व श्रीशनिदेवाची महाराजांच्या उपस्थितीतच प्राणप्रतिष्ठापना झाली आहे.
विजयादशमीच्या (दि.१५/१०/१९१८) दिवशी शिर्डीत श्रीसाईबाबांनी देह ठेवला. हा अजून एक मोठा आघात दासगणुंना पचवावा लागला. श्रीसाई भक्तांच्या आग्रहाखातर १९२२ साली शिर्डीत श्रीसाई संस्थान स्थापन झाले व या संस्थानच्या प्रथम अध्यक्ष पदाची जबाबदारी श्रीदासगणू महाराजांवर सोपविण्यात आली. पुढे हे दायित्व दासगणुंनी ३९ वर्षे श्रद्धापूर्वक सेवाभावाने यशस्वीरीत्या सांभाळले. तत्पूर्वी बाबांच्या उपस्थितीतच १८९७ साली श्रीराम नवमीचा उत्सव दासगणुंनी सुरु केला होता. आज श्रीसाई संस्थानच्या प्रमुख उत्सवांपैकी हा एक उत्सव आहे. तीन दिवस दासगणू परंपरेची कीर्तने येथे केली जातात व कीर्तन सादर करण्याची सेवा आजहि दासगणुंच्या परंपरेतील कीर्तनकाराला दिली जाते.
सन्नीती, सद्वासना व सद्विचार या सद्गुणांची समाजात जोपासना होऊन त्यांत वाढ होण्यासाठी कीर्तन हे माध्यम श्रीदासगणू महाराजांनी खूप प्रभावीपणे वापरले. आयुष्यभर दादांनी संतचरित्रे गायली. त्यासाठी त्यांनी भरपूर प्रवास केला, माणसं जोडली. पण जसे त्यांचे वय वाढत होते तसे त्यांचा प्रवास कमी होऊन गोरटे, पंढरपूर, पुणे व लोणावळा या गांवी मुक्काम वाढू लागला. १९३७ साली लोणावळ्यातील श्रीराममंदिरात त्यांनी गंगादशहराचा उत्सव सुरु केला. गोरटे संस्थानच्या प्रमुख उत्सवापैकी हा एक उत्सव आजहि अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. अपार श्रद्धेपोटी दासगणुंनी बऱ्याच संतांच्या जयंती व पुण्यतिथीला स्मरण उत्सव सुरु केले होते. ते सर्व उत्सव व महोत्सव त्याच प्रेमादरयुक्त श्रद्धेने प्रतिवर्षी श्रीदासगणू प्रतिष्ठानच्या वतीने साजरे केले जातात. दर तीन वर्षाने येणारा ‘पुरुषोत्तम मास’ दासगणू महाराज अत्यंत धार्मिकतेने संपन्न करीत असत. अप्पांच्या वेळीहि या पुरुषोत्तम मासाच्या उत्सवाचे अनन्यसाधारण महत्व असायचे. वर्तमान काळी गोरटे संस्थानचा हा एक प्रमुख उत्सव आहे.
श्रीदासगणू महाराजांचे सर्वच वाङ्मय भक्तिरस प्रधान आहे. संतांची चरित्रे गाण्यातच त्यांनी आपल्या प्रासादिक काव्यप्रतिभेचा वापर केला. त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथांपैकी अमृतानुभव भावार्थमंजिरी, पासष्टीभावार्थदीपिका, श्रीगुरूचरित्र सारामृत, श्रीगोदा महात्म्य, श्रीगौडपादकारिका, श्रीईशावास्य भावार्थबोधिनी व मंत्रार्थप्रकाशिका, श्रीनागझरी महात्म्य, श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी, श्रीमध्वविजय, श्रीमांगीशमाहात्म्य, श्रीशनिप्रताप, श्रीशंडिल्यभक्तिसूत्र भावदीपिका हे प्रमुख ग्रंथ त्यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेची साक्ष पटवितात. आद्यशंकराचार्यांच्या जीवनावरील रचलेला ओवीबद्ध चरित्रग्रंथ व घराघरात पोहंचलेला, शेगावच्या श्रीगजानन महाराजांच्या लीलाचरित्र वर्णन असलेला ‘श्रीगजाननविजय’ हा ग्रंथ म्हणजे श्रीशारदेच्या स्कंधावर रुळणारी दोन दैदिप्यमान रत्ने आहेत. ‘श्रीगजाननविजय’ हा ग्रंथ दादांनी वयाच्या ७२ वर्षी तर श्रीशंकराचार्यांचे चरित्र वयाच्या ७४ लिहून पूर्ण केले.
श्रीदादांचे ९४ वयोमानाचे अवघे जीवन म्हणजे कृतार्थतेचा एक उत्सवच होता. प्रसिद्धीपराङ्मुखता हा गुणविशेष त्यांनी आयुष्यभर जपला व स्वतःचा कधी उदोउदो होऊ दिला नाही. तथापि त्यांच्या वयाच्या ९०व्या वर्षी नगरच्या नगरपालिकेच्या वतीने १९५८ मध्ये त्यांचा सत्कार आयोजिला होता. तहयात प्रसिद्धीला दूर ठेवणाऱ्या श्रीदादांनी हा सत्कार मात्र सहर्ष स्वीकारला. “नगरच्या लोकांनी मला जोडे मारले तरी ते मला सत्कारा इतकेच प्रिय आहेत, आज तर तुम्ही मला हारतुरे घालीत आहात !” व तसेच “माझ्या ठायी ‘आयुष्यभरात एकही सत्कार मी स्वीकारला नाही’ ही अहंकाराची सुप्त भावनाहि शिल्लक राहू नये, यासाठी माझ्या जन्मभूमीने केलेला हा सत्कार मी नम्रपणे स्वीकारीत आहे”, अशी भावना त्यांनी या सत्काराच्या वेळी व्यक्त केली. जीवनातील एकमेव सत्कार स्वीकारण्या मागची त्यांची ही भावना त्यांच्यातील संतत्वाला प्रगट करते. लावण्या रचणारा एक शाहीर, श्रीवामनशास्त्री यांच्या कृपेने व श्रीसाईबाबांच्या आशीर्वादाने संतकवी होतो काय, संतांची चरित्रे गाताना त्यांच्या जीवनातील उदात्त दिव्यत्वाचा स्पर्श झालेली जीवनतत्वे अगदी सहजपणे स्वतःच्या जीवनात कशी उतरवावीत याचा जनसामान्यांसाठी एक आदर्श उभा करतो काय व स्वतःहि संतपदी पोहंचतो काय, सारे काही अलौकिक व दिव्य !
दादा आता खूप थकत चालले होते. प्राणप्रिय गोदेच्या काठी देह पडावा व श्रीपांडुरंगाने चरणी जागा द्यावी, इतकीच आस आता शिल्लक होती. श्रीविठ्ठलाची भक्ती करण्यासाठी व संतचरित्रांतील सुगंध सर्वांना वाटण्यासाठी स्वतःचे आयुष्य चंदनाप्रमाणे झिजविणाऱ्या आपल्या या लडिवाळ भक्ताची ही आस भक्तवत्सल श्रीपांडुरंगाने सानंद मान्य केली. शके १८८३, कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजेच संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांच्याच पुण्यतिथीच्या दिवशी २६ नोव्हेंबर १९६२ रोजी श्रीविठ्ठलाने आपल्या या निष्ठावंत भक्ताला पंढरपुरातच स्वतःच्या चरणी विसावा दिला. महाराज पंचतत्वात विलीन झाले.
— श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान,
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply