सहस्रनामनियमादम्भोरुहाण्यर्चय- न्नेकोनोपचितेषु नेत्रकमलं नैजं पदाब्जद्वये ।
सम्पूज्यासुरसंहतिं विदलयंस्त्रैलोक्यपालोऽभव- त्तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि ॥ ७॥
भगवान श्री शंकरांच्या आणि भगवान श्री विष्णूच्या अद्वितीय संबंधाचा विचार मांडणाऱ्या अनेक कथा पुराणांमध्ये पहावयास मिळतात.
अशाच एका कथेचा संदर्भ घेऊन भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज प्रस्तुत श्लोक सादर करीत आहेत.
सहस्रनामनियमादम्भोरुहाण्यर्चय- न्नेकोनोपचितेषु नेत्रकमलं नैजं पदाब्जद्वये ।
भगवान श्रीविष्णु नित्यनियमाने भगवान श्री शंकरांच्या सहस्रनामावलीचा उपयोग करीत श्री शंकरांच्या चरणकमलांवर एकेक कमलपुष्प अर्पण करतात.
मात्र एके दिवशी अशा स्वरूपात कमलार पण करीत असताना एक कमळ कमी पडले.
पूजास्थान सोडून उठायचे नसते. अन्य कोणाशी बोलायचे नसते. त्यामुळे आता करायचे काय? असा प्रश्न पडल्यानंतर श्री विष्णूंनी स्वतःचे एक नेत्र कमलच काढून भगवान शंकरांच्या चरणकमलावर समर्पित केले.
अशा कथा, पूजा करीत असताना आपल्याला पाळावयाचे नियम सांगण्यासाठी तसेच कितीही विपरीत परिस्थितीत पूजेचा नियम मोडू नये हे सांगण्यासाठी निर्माण केलेल्या असतात. सांगितलेल्या असतात.
सम्पूज्यासुरसंहतिं विदलयंस्त्रैलोक्यपालोऽभवत्- अशाप्रकारे अलौकिक पूजा केल्यामुळे संपूर्ण राक्षस समुदायाचा विनाश करण्याच्या क्षमतेने ते संपन्न झाले.
अर्थात भगवान शंकरांनी श्रीविष्णूच्या या अद्वितीय भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना असा अद्वितीय वर दिला.
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि – त्या परब्रह्मस्वरूप असणाऱ्या भगवान शंकरांच्या चरण कमला वर माझे हृदय सुखाने निवास करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply