शौरिं सत्यगिरं वराहवपुषं पादाम्बुजादर्शने चक्रे यो दयया समस्तजगतां नाथं शिरोदर्शने ।
मिथ्यावाचमपूज्यमेव सततं हंसस्वरूपं विधिं तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि ॥ ८॥
ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगटलेल्या भगवान शंकरांच्या दिव्य स्वरूपाचा अंतपार जाणण्याच्या, भगवान श्री विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव यांनी केलेल्या प्रयासाची कथा पुराणांमध्ये प्रचलित आहे. त्याचा संदर्भ घेत आचार्य श्री म्हणतात,
शौरिं सत्यगिरं वराहवपुषं पादाम्बुजादर्शने
सत्य वचनी भगवान विष्णू वराहरूप धारण करून त्या ज्योतिर्लिंगाच्या चरणाचे दर्शन घेण्यासाठी खाली गेले.
भगवान शंकर ज्यावेळी ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगटले त्यावेळी श्री विष्णूंनी चरणाच्या दिशेने तर ब्रह्मदेवांनी मस्तकाच्या दिशेने शोध घेण्याचा प्रयत्न केला.
अंतपार न सापडलेल्या श्री विष्णूंनी येऊन खरे खरे सांगितले.
चक्रे यो दयया समस्तजगतां नाथं – त्या सत्य वचनाने प्रसन्न होऊन श्रीशंकरांनी त्यांना संपूर्ण जगाचा नाथ बनविले.
शिरोदर्शने
मिथ्यावाचमपूज्यमेव सततं हंसस्वरूपं विधिं
दुसऱ्या बाजूला मस्तक पहावयास गेलेल्या श्री ब्रह्मदेवांनी मला अंत सापडला असे असत्य भाषण केल्यामुळे, भगवान शंकरांनी त्यांना कायम अपूज्य ठरविले.
ते मस्तक नंतर कापून टाकले.
त्याद्वारे सत्य वचनाचे महत्व ज्यांनी जगाच्या समोर अधोरेखित केले आहे,
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि – त्या परब्रह्मस्वरूप भगवान शंकरांच्या चरणकमलाशी माझे हृदय सुखाने नांदत राहो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply