नवीन लेखन...

दशश्लोकी निर्वाणदशकम्

दशश्लोकी निर्वाणदशकात श्रीमद् आदि शंकराचार्यांनी वेदांताचे सार सांगितले आहे. या रचनेच्या नावाशी साधर्म्य असलेले शंकराचार्यांचेच निर्वाण षटकही प्रसिद्ध आहे. नर्मदा तीरी एका गुहेत श्री गोविंदपादाचार्यांची भेट झाल्यावर त्यांनी विचारलेल्या ‘ तू कोण आहेस? ’ या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ही दोन स्तोत्रे !  परंतु दोघांची जन्मकथा एकच असली तरी त्यांच्या विषय मांडणीमध्ये फरक आहे.

निर्वाण षटकाची मांडणी मुख्यतः मानवी शरीर आणि भावभावनांशी जोडलेली आहे तर दशक मुख्यतः अद्वैताच्या बाजूने मांडले आहे. अनेक विद्वान हे दशक म्हणजे आत्म्याच्या अद्वैत स्वरूपावरील शंकराचार्यांचा अंतिम शब्द मानतात. केवळ दहा श्लोकांच्या माध्यमातून ते आत्म्याचे अद्वैत स्वरूप – गुणरहित सत्य, अविनाशित्व आणि परम आनंद आणि शुद्धता यांचा मूळ आधार – स्पष्ट करतात. इथे आत्म्याचे स्वरूप अत्यंत स्पष्ट, अनावश्यक शब्दजंजाळ न मांडता पण सोप्या शब्दात विशद केले आहे.

पहिल्या श्लोकात पंचतत्त्वांच्या माध्यमातून आचार्य चार्वाक, जैन, बौद्ध आणि इतर तत्त्वज्ञानांचे खंडन करतात. दुसर्‍या श्लोकात चारी वर्ण, चार  आश्रम व त्यानुसार वर्तन (धर्म) यांचा व आत्म्याचा काहीही संबंध नाही. या सर्व गोष्टी अविद्येतून निर्माण होतात असे ते असे निक्षून सांगतात. तिसर्‍या श्लोकात सांख्य व इतर शाखांचा समाचार घेतला आहे. जैनमत, पाशुपतमत आणि पांचरात्र सिद्धान्त (वैष्णवमत) या तिन्ही मतांत ईश्वर आणि जीव यांच्यामध्यें द्वैतभाव हा सत्यस्वरूपाचा असल्याचें प्रतिपादन केले आहे.

चार्वाक पृथ्वी, जळ, तेज आणि वायु ही चारच तत्त्वें मानतात आणि ती एकत्र येण्याचा परिपाक म्हणजे आत्मा होय असे प्रतिपादन करतात. कांहीं बौद्ध तत्त्वज्ञ क्षणिक विज्ञान (मन किंवा बुद्धि – अंतःकरणाच्या क्षणभंगुर वृत्ती) हे आत्म्याचे स्वरूप मानतात.

निर्वाण षटकाप्रमाणे हे दशकही भुजंगप्रयात वृत्तात (गण- य य य य) गुंफले असून ‘ विवेकाने अविद्येचे व भासमान विश्वाच्या आभासाचे निवारण होऊन अखेर जें अनिर्बंध एकमेव, मंगलमय, शुद्ध परमात्मतत्त्व शिल्लक राहील  तेंच मी आहे ’ या अर्थाचा पहिल्या नऊ श्लोकांचा “तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोऽहं” हा अतिम चरण एकच आहे.


न भूमिर्न तोयं न तेजो न वायुः
न खं नेन्द्रियं वा न तेषां समूहः ।
अनेकान्तिकत्वात् सुषुप्त्येकसिद्धः
तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोऽहम् ॥ ०१॥

मराठी- मी पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा किंवा आकाश नाही. मी कोणतेही गात्र किंवा त्यांचा गटही नाही.ती सर्व (इंद्रिये) अस्थिर असल्याने गाढ झोपेतच सिद्ध होणारा तो शिल्लक पवित्र आणि हितकारी (आत्मा) मीच आहे.

न मी नीर वारा धरा वा न वन्ही 
न आकाश, गात्रे उतावीळ नाही ।  
सुषुप्तीत माझी पटे खास खात्री
असे शुद्ध मी एकटा हीतकारी ॥ ०१   


न वर्णा न वर्णाश्रमाचारधर्मा
न मे धारणाध्यानयोगादयोऽपि ।
अनात्माश्रयोऽहं ममाध्यासहानात्
तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोऽहम् ॥ ०२॥

मराठी-  मी (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य,शूद्र या चार पैकी कोणताही) वर्ण नाहीं. या वर्णांचे तसेच (ब्रह्मचर्य,गृहस्थ,वानप्रस्थ,संन्यास या चारही) आश्रमांचे वर्तन पालन करणारा नाही. जप तप योग इत्यादींचा मी अवलंब करीत नाही. काहीतरी काल्पनिक गोष्टींचा आधार घेणार्‍या माझा  भ्रमनिरास झाल्याने शिल्लक पवित्र आणि हितकारी (आत्मा) मीच आहे.

न मी आश्रमी, चार वर्णात नाही 
जपीं, ध्यान, ना आचरी, योग, नाही ।
भ्रमाचा फुटे भोपळा कल्पनेचा
असा एकटा मी सर्वां हिताचा ॥ ०२

टीप- येथे ३ र्‍या चरणात ‘ अनात्माश्रयोऽहं ’ ऐवजी ‘ अनात्माश्रयाऽहं ’ असा पाठभेद आढळतो. तो घेतल्यास ‘ अहंकार आणि ममत्वाची भावना यांचा भ्रमनिरास झाल्याने ’ … असा अर्थ होईल.


न माता पिता वा न देवा न लोका
न वेदा  न यज्ञा  न तीर्थं ब्रुवन्ति ।
सुषुप्तौ निरस्तातिशून्यात्मकत्वात्
तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोऽहम् ॥ ०३॥

मराठी – ज्याला आई, बाप, कोणतेही देव किंवा प्रदेश (त्रिलोक) नाहीत, वैदिक धर्मग्रंथ किंवा होम हवन नाहीत; पवित्र  स्थळे नाहीत असे ज्ञानी लोक म्हणतात. कारण, गाढ झोपेच्या अवस्थेत, या सर्व दूर सारलेल्या असताना, अनुभवातीत पोकळी असते. तो शिल्लक राहणारा पवित्र आणि हितकारी (आत्मा) मीच आहे.

न आई पिता देव ना लोक कोणी
श्रुती सांगती याग स्थाने न ज्ञानी ।
सुषुप्तीत ते दूर, सारून शून्य   
असा शेष मी पुण्यकारी नि धन्य ॥ ०३

टीप- स्वच्छंदभैरवतंत्रानुसार, अतिशून्यता म्हणजे  “(पारलौकिक, अनुभवातीत) शून्य / पोकळी “. शिवाच्या या सर्वोच्च अवस्थेत जरी मन स्थिर करण्यासाठी जागा नाही – तरीही  स्वच्छंदभैरवतंत्र, ‘ ॐ ’ या पवित्र अक्षराच्या उच्चारातून या स्थितीच्या प्राप्तीचा मार्ग शिकवते. ही पूर्ण चेतनेची अवस्था आहे, जी अतींद्रिय, अव्यक्त आहे.


न साङ्ख्यं न शैवं न तत्पञ्चरात्रं
न जैनं न मीमांसकादेर्मतं वा ।
विशिष्टानुभूत्या विशुद्धात्मकत्वात्
तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोऽहम् ॥ ०४॥

मराठी- तेथे सांख्य, शैव, पंचरात्र, जैन, मीमांसक आणि इतरांच्या मतांची संकल्पना अस्तित्वात नाही. कारण, विशिष्ट प्रकारच्या अनुभवावरून निर्विकल्प अद्वितीय शुद्ध स्वरूपात प्रत्यक्ष जाणीव असणारा तो शिल्लक राहणारा पवित्र आणि हितकारी (आत्मा) मीच आहे.

नसे वैष्णवां, शैव जैनांस थारा
न मीमांसका सांख्य तत्त्वांस तोरा ।
विशिष्ट प्रचीती, विशुद्ध स्वरूपी    
असे एकटा, शुद्ध, आनंदरूपी ॥ ०४

टीप-  

  • सांख्य पद्धती पदार्थ (प्रकृती) आणि शाश्वत आत्मा (पुरुष), जे दोघे मूलतः वेगळे आहेत, त्यांचा सुसंगत द्वैतवाद स्वीकारते, कारण विश्वाचे स्पष्टीकरण देण्यासाठी पुरुष आणि प्रकृती पुरेसे आहेत.
  • शैव संप्रदाय : शिवदेवतेला एकमेव उपास्य दैवत मानणारे संप्रदाय. माधवाचार्य(इ.स. १२९६-१३८६) सर्वदर्शनसंग्रहात पाशुपत दर्शन,शैव दर्शन, प्रत्यभिज्ञादर्शन, रसेश्वरदर्शन अशा चार शैव संप्रदायांचे विवेचन येते ह्यांखेरीज कापालिक, कालामुख, हरिहर, मार्तंड-भैरव, अर्ध-नारीश्वर नाथ संप्रदाय, आणि वीरशैव संप्रदाय असे अन्य काही शैव संप्रदायही आहेत.
  • पंचरात्र आगम (‘पाच रात्री’) हे रामानुजांच्या श्रीवैष्णव पंथातील सर्वात महत्त्वाचे संस्कृत धर्मग्रंथ आहेत. त्यांतर्गत 200 हून अधिक ग्रंथ येतात, जे इ.स.पूर्व 3रे शतक ते 850 इसवी सन या काळात रचले गेले.
  • ‘मीमांसा’चा अर्थ कोणत्याही वस्तूच्या स्वरूपाचे यथायोग्य वर्णन. वेदवाङ्मयाचे मुख्यतः दोन भाग होतात. पहिला कर्मकाण्ड व दुसरा ज्ञानकाण्ड. मीमांसेचे दोन प्रकार आहेत.

१. कर्ममीमांसा किंवा पूर्वमीमांसा

२. ज्ञानमीमांसा किंवा उत्तरमीमांसा.

पूर्व मीमांसा तत्त्वज्ञानात, वेदांमधील कर्मकांड भागाचा विचार केला गेला आहे आणि उत्तर मीमांसा म्हणजेच वेदांतशास्त्रात, वेदांच्या ज्ञानकांड भागाचा विचार केला गेला आहे. कर्मकांड भागाचा विचार महर्षी जैमिनी यांनी तर ज्ञानकांड भागाचा विचार महर्षी बादरायण व्यास यांनी केला आहे.


न चोर्ध्वं न चाधो न चान्तर्न बाह्यं
न मध्यं न तिर्यङ् न पूर्वापरा दिक् ।
वियद्व्यापकत्वादखण्डैकरूप-
स्तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोऽहम् ॥ ०५ ॥

मराठी- जे ना वर आहे, ना खाली, ना आत आहे ना बाहेर. ना मध्यभागी किंवा न तिरके न आडवे, त्याला पूर्व किंवा पश्चिम दिशा नाही. कारण ते (अवकाशासारखे) सर्वव्यापी आहे. अखंड आणि एकसंध आहे. असा तो शिल्लक राहणारा पवित्र आणि हितकारी (आत्मा) मीच आहे.

नसे उंच खाली मधे आडवा वा
नसे आत बाहेर कोणी दिशा वा ।
उरे व्यापुनी पोकळी नित्य सारी
असे शुद्ध मी एकटा हीतकारी ॥ ०५  


न शुक्लं न कृष्णं न रक्तं न पीतं
न कुब्जं न पीनं न ह्रस्वं न दीर्घम्।
अरूपं तथा ज्योतिराकारकत्वात्
तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोऽहम् ॥ ०६॥

मराठी- तो ना पांढरा ना काळा, ना लाल ना पिवळा, ना वेडावाकडा, ना जाडा, ना छोटा ना लांब. कोणत्याही पदार्थाचे रूप नसलेला आकारहीन आणि स्वयंप्रकाशी असणारा असा तो शिल्लक राहणारा पवित्र आणि हितकारी (आत्मा) मीच आहे.

नसे पांढरा, लाल ना पीत, काळा
न जाडा न छोटा न लंबू न गोळा ।
स्वतः तो प्रकाशे नसे रूपधारी
असे शुद्ध मी एकटा हीतकारी ॥ ०६ 


न शास्ता न शास्त्रं न शिष्यो न शिक्षा
न च त्वं न चाहं न चायं प्रपंचः ।
स्वरूपाबवोधो विकल्पासहिष्णुः
तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोऽहम् ॥ ०७॥

मराठी- ज्याला गुरू नाही पुस्तके नाहीत (कोणी राज्यकर्ता नाही, नियम नाहीत,)  शिष्य किंवा प्रशिक्षण नाही. तू किंवा मी नाही. हे विश्व नाही. स्वतःच्या वास्तव स्वरूपाचा बोध होण्यासाठी जो कोणतेही (मी, तूं, माझें, तुझें, गुरु, शिष्य इत्यादि) भेद सहन करीत नाही असा तो शिल्लक राहणारा पवित्र आणि हितकारी (आत्मा) मीच आहे.

गुरू शिष्य ना पुस्तके सूचना वा
नसे मी नसे तू, नसे विश्व हे वा ।
बघण्या स्वरूपा, न भेदां तयारी
असे शुद्ध मी एकटा हीतकारी ॥ ०७  

टीप- शास्ता या शब्दाचा अर्थ गुरू किंवा राजा असाही घेतला जाऊ शकतो. ‘ राजा ’ असा अर्थ घेतल्यास ‘ शास्त्र ’ याचा अर्थ नीतिनियम असा घ्यावा लागेल.


न जाग्रन् न मे स्वप्नको वा सुषुप्तिः
न विश्वो न वा तैजसः प्राज्ञको वा ।
अविद्यात्मकत्वात् त्रयाणां तुरीयः
तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोऽहम् ॥ ०८॥

मराठी-  माझ्यासाठी जागेपण नाही, स्वप्नावस्था किंवा गाढ झोपही नाही. मी अविद्येचे परिणामस्वरूप असलेले तिन्ही – ‘विश्व’ [जागृतावस्थेत स्वानुभवाने ओळखले जाणारे],  ‘तैजस’ [स्वप्नावस्थेने ओळखले जाणारे], किंवा ‘प्राज्ञ’ [गाढ झोपेने ओळखली जाणारी अवस्था] – नाही. मी आहे (या तिघांच्या पलिकडे असणारा चौथा) तुरीया. असा तो शिल्लक राहणारा पवित्र आणि हितकारी (आत्मा) मीच आहे.

न जागा न स्वप्नात झोपेत गाढ्या
न वा विश्व, तेजाळ, वा प्राज्ञ, संज्ञा ।
अविद्या तिघी, तूरिया खास चौथी
हितैषी स्थिती, एकटा शुद्ध मी ती ॥ ०८


अपि  व्यापकत्वात्  हितत्त्व-प्रयोगात्
स्वत: सिद्धभावादनन्याश्रयत्वात्  ।
जगत्  तुच्छमेतत्  समस्तं  तदन्यत्
तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोऽहम् ॥ ०९॥

मराठी- आत्मा सर्वसमावेशक (अविभाज्य,सलग) असल्याने, सर्वांना प्रिय असल्याने, कोणाचाच आश्रय न घेणारा (याउलट) त्याचे अस्तित्व स्वतःच सिद्ध असणारा आहे, त्यामुळे हे सर्व विश्व कुचकामी आहे. असा तो शिल्लक राहणारा पवित्र आणि हितकारी (आत्मा) मीच आहे.

समाविष्ट सारे, जगा आवडे तो
कुणाचा न थारा, स्वतः सिद्ध होतो ।
पुढे विश्व ज्याच्या असे कूचकामी
हितैषी असे एकटा शुद्ध तो मी ॥ ०९


न चैकं तदन्यद् द्वितीयं कुतः स्यात्
न केवलत्वं न चाकेवलत्वम् ।
न शून्यं न चाशून्यमद्वैतकत्वात्
कथं सर्ववेदान्तसिद्धं ब्रवीमि ॥ १०॥

मराठी – जेथे एक (हा शब्दच लागू पडत) नाही,  (तेथे) त्याच्याहून) वेगळे दुसरे कोठून असू शकते? तेथे एकत्व (एकाकीपणा) आणि अनेकत्वही नाही. ते शून्य नाही आणि अ-शून्य (शून्याचा अभाव) ही नाही. सर्व वेदां (उपनिषदां) नी ज्याचे पूर्णपणे अद्वैत असे प्रतिपादन केले आहे त्याबद्दल मी कसं काय बोलणार ?

नसे एक तेथे दुजा येत केवी
न एकत्व तेथे अनेकत्व नाही ।
नसे शून्य तेथे अशून्यत्व कैचे
श्रुती सांगती मी वदूं तेथ कैसे ॥ १०

॥ इति श्रीमद् शंकराचार्यविरचितं दशश्लोकी निर्वाणदशकस्तोत्रं समाप्तं ॥

******************

धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

1 Comment on दशश्लोकी निर्वाणदशकम्

  1. नेहमीप्रमाणे उत्तम! सुलभ, सोपी भाषा. अर्थ पुरेसे स्पष्टीकरण देणारा व जिज्ञासा वाढविणारा. रूपांतर चपखल.
    …माधव धायगुडे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..