सण-उत्सवांच्या आपल्या भारतीय परंपरांचा मागोवा घेतल्यास असे लक्षात येते की प्रत्येक प्रथेमागे एक उदात्त हेतू आहे. कित्येक धार्मिक सणांचा संबंध निसर्गाशी जोडलेला आहे.
स्मिता दोडमिसे
लहानपणी दसऱ्याचे सोने वाटायला घ्यायचे आणि हेच सोने ही कल्पना रुजली. मी ती आपट्याची पाने बघून विचार करायचे, की याचे कानातले कसे होतील आणि मग ते कानात हातात घातल्यावर कसे चमकतील. कारण हे सोनं आहे, हे आईकडून कळाले होते आणि आईच्या तोंडून माझ्या सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे कानातले असेही ऐकलेले. मग माझ्या चिमुकल्या मेंदूला त्रास देत मी ते शोधायचे की या पानाच्या बांगड्या कशा होतील. थोडे मोठे झाल्यावऱ कळायला लागले की हे म्हणजे झाडाचे पान आहे. आपट्याचे पान याला सोन्याचे झाड म्हणतात आणि आई घालते ते सोने वेगळे. हे प्रथेतील सोने आहे.
आपल्या प्रत्येक प्रथेमागे कार्यकारणभाव आहे. निसर्गाने आपल्याला बहाल केलेला अमूल्य ठेवा जतन केला जावा, त्याचे उपयोग आपल्याला व्हावेत, यासाठी त्यांच्या या प्रथांमधील समावेशाला काही शास्त्रीय कारणे आहेत. निसर्गातील अगदी वनस्पतींचा विचार करायचा झाल्यास आपल्या अवतीभोवती अशा कित्येक औषधी वनस्पती आहेत की ज्यांचे जाणीवपूर्वक संवर्धन करणे आपल्याच फायद्याचे ठरणार आहे. तसे पाहायला गेले तर नुसते झाडे लावा, ही झाडे जपा असे सांगून कोणी त्या झाडांचे रक्षण केले नसते. केवळ उपदेश केला अन् महत्त्व सांगितले म्हणून त्याचे महत्त्व पटले, हा मनुष्यसुलभ स्वभाव नाहीच. मानवाच्या या स्वभाव वैशिष्ट्यांचा सूक्ष्म अभ्यास केलेल्या आपल्या पूर्वजांनी मग या सर्व गोष्टींचा संबंध सण-उत्सव, धार्मिकता यांच्याशी जोडला आहे. दैवीकोपाला माणूस घाबरतोच, त्यामुळे मानवी जीवनाला आवश्यक व उपयुक्त अशा गोष्टींच्या संवर्धनाचा संबंध सणावारांशी जोडलेला आहे. निसर्गातील विविध गोष्टी अन् सणांचा फार सुरेख परस्पर संबंध जोडलेला आपण बघत आलेलो आहोत, जसे गणेशोत्सवात पत्री, दूर्वा, श्रावणात बेल, गुडीपाडव्याला कडुनिंब; तर दसरा म्हणजे आपट्याचे पान! या सर्व बाबींचा इतका खोल संस्कार आपल्या मनावर झाला आहे की तो सण म्हटला की ती वनस्पती आपल्या नजरेसमोर येते. या पाठीमागची कारणमीमांसा केली असता, असे लक्षात येते की या सर्व वनस्पती औषधी आहेत, म्हणजेच या सर्वऔषधी वनस्पतींचे संवर्धन करावे, ही एक दूरदृष्टी या रुढींपाठीमागे दिसते. दसऱ्याला सोन्यासारखा मान असणारे, लुटता येणारे म्हणजे सोने म्हणजे “आपट्याची पाने’
शमी वृक्ष
अज्ञातवासात पांडवांनी शमी वृक्षाच्या ढोलीमध्ये आपली शस्त्रे लपविली व दसऱ्याच्या दिवशी ती बाहेर काढली. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी “शमीवृक्षाचे पूजन करायचे’ ही लहानपणापासून मनावर ठसलेली गोष्ट. मोठे झाल्यावर मग राजस्थानातील चिपको आंदोलनाची गोष्ट वाचनात आली. राजस्थानातील पर्यावरणप्रेमी लोकांनी “खेजडी’ या त्यांच्या आराध्यवृक्षाच्या रक्षणासाठी बलिदान केले. आजही अंगावर रोमांच उठावे अशी ही घटना. “खेजडी’ म्हणजे काय तर शमी वृक्ष. तेथील राजाने जेव्हा बांधकामासाठी झाडे तोडायचे फर्मान काढले तेव्हा सैनिकांनी झाडे तोडू नये म्हणून स्त्री-पुरुषांनी त्या वृक्षांना मिठ्या मारल्या व तीनशे एक लोकांनी प्राणार्पण केले; पण खेजडी वृक्ष वाचवले. असा हा “शमी’ वृक्ष तेव्हापासून खरंच मनाच्या तळाशी जाऊन बसला अन् मनापासून आराध्यवृक्ष वाटायला लागला. शमीच्या सालींचे अनेक औषधी उपयोग आहेत. आयुर्वेदामध्ये दमा, कुष्ठरोग, कोड, मनोविकार यावर शमीचे साल गुणकारी असल्याचे सांगितले आहे.
आपटा
संस्कृतमध्ये आपट्याला “अश्मंतक’ म्हणतात. अश्मंतकाचा शब्दशः अर्थ दगड किंवा खडक फोडणारा असा आहे. या अर्थाप्रमाणेच याची उपयुक्तता देखील आहे. पहिला उपयोग म्हणजे या वृक्षाची मुळे जमिनीत खोलवर जाऊन खडकाच्या फटीत देखील वाढतात, त्यामुळे खडकसुद्धा फुटतात. खडकाळ माळरानावर जिथे दुसरे झाड फारसा टिकाव धरणार नाही तिथे “आपटा’ तग धरतो. त्यामुळे उघड्या बोडक्या माळरानावर वृक्षारोपण करण्यासाठी “आपटा’ हा एक आदर्श वृक्ष आहे. या गुणधर्माप्रमाणे आपट्याचा औषधी गुणधर्म असा आहे की मूतखडा होऊ न देणे व झाला असेल तर तो जिरविण्याचे सामर्थ्य आपट्यामध्ये असते. म्हणजेच दोन्ही अर्थाने “आपटा’ उपयोगी आहे. याचबरोबर पित्त व कफदोषांवर तो गुणकारी आहे. त्याची साले, पाने, शेंगा, बिया औषधात वापरतात. या औषधी गुणधर्माबरोबरच त्याचे इतरही गुणधर्म आहेत. आपट्याच्या लाकडाचा उपयोग पूर्वीपासून शेतीची अवजारे करण्यासाठी होतो.जनावरांनी ही पाने खाल्ली तर त्यांच्या साठीही ती पौष्टिकच असतात. असा हा बहुगुणी “आपटा’!
परंतु पूर्वजांनी पाडलेल्या या पायंड्याचा अर्थ आपण समजावून न घेता केवळ अंधानुकरण करत आलो आहोत. त्यामुळे झाले काय तर दसऱ्याला आपटा हवा, या हव्यासापोटी आपट्याच्या पानांची, फांद्यांची वारेमाप तोड केली जाते. आपटा म्हणून आपट्याबरोबरच “कांचन’ या आपट्या सारख्या वृक्षाच्या पानांचीही तोड केली जाते. अशा तोडीमुळे आपण खूप प्रमाणात निसर्गाचे व पर्यायाने आपले नुकसान करत आहोत, हे कोणी लक्षातच घेत नाही; पण आता आपण हे सर्व थांबवायला हवे. दसऱ्याला सोने म्हणून आपट्याची पाने देण्याऐवजी आपट्याचे रोप द्यायला हवे. नुसते रोप देऊन घेऊन हा प्रश्न सुटणार नाही; तर त्या रोपाचे रोपण जवळच्या माळरानावर, मोकळ्या खडकाळ जागांवर करायला हवे. त्यामुळे जमिनीचे संरक्षण व त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे आपले संरक्षण असा दुहेरी हेतू साध्य करता येईल. तेव्हा निश्चय करा, या दसऱ्यापासून “आपट्याच्या झाडाची पाने, फांद्या न तोडता आपण एकमेकांना आपट्याची रोपे देऊया व या सोन्याचे रक्षण करूया! तरच खऱ्याअर्थाने आपला दसरा साजरा होईल. हे सगळे बघितले की पुनश्च प्रकर्षाने वाटायला लागते, की खरंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उत्सव, निसर्ग व पर्यावरणरक्षण यांची सुरेख सांगड घातली गेली आहे. पर्यावरण संतुलन; तसेच मानवी स्वास्थ्य आणि समृद्धी यासाठी महत्त्वाच्या वृक्षांना सांस्कृतिक महत्त्व दिले आहे. तेव्हा आपणही या झाडांची बेसुमार तोड न करता, उगाच पत्री तोडून कचरा निर्माण करण्यापेक्षा त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करूयात.
सोन्यासारख्या निसर्गाचे रक्षण करून सोन्यासारखे वर्तन करूयात.
— स्मिता दोडमिसे
Leave a Reply