जेष्ठ निरुपणकार व समर्थ संप्रदायाचे श्रद्धास्थान दत्तात्रय नारायण उर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी झाला. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराण्यात चारशे वर्षेपासुन समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव ‘शेंडे’असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने ‘धर्माधिकारी’अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आहेत आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले आहेत.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले आहे. त्यांचे पिता नारायण विष्णु धर्माधिकारी हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ व प्रसिद्ध समर्थ दासबोधाचे निरूपणकार, अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती क्षेत्रात निरलसपणे कार्य करणारे नानासाहेब यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत. धर्माचरणाविषयी बोलतांना त्या अनुषंगाने अज्ञान, अंधश्रध्दा, भेदाभेद, व्यसनासक्ती, स्त्रियांवरील अत्याचार आदि दुष्ट प्रवृत्तींचे उच्चाटन करून समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण ते देत आले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. या कामासाठी त्यांनी १९४५ साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही अथक परिश्रम घेऊन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांगीण पुरु षार्थाची ओळख त्यांनी, स्वत:ची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. बैठकांच्या मौखिक निरूपणाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसंपन्न समाजनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाने त्यांना डी लिट पदवी बहाल दिली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply