मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री, थोडी आधुनिक तर कधी हेखेखोर अशा भूमिकांची आठवण होताच डोळ्यासमोर नाव उभं रहातं ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे.
दया डोंगरे यांचा जन्म ११ मार्च १९४० रोजी झाला.
मा.दया डोंगरे यांना गायिका व्हायचे होते. नागेशबुवा खळीकर यांच्याकडे काही काळ शास्त्रीय संगीत तर मा.हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे त्या नाटय़संगीतही शिकल्या. त्या अवघ्या १२ वर्षांच्या असताना आकाशवाणी धारवाड केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात खास त्यांचे गाणे सादर झाले होते. आकाशवाणीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय सुगम संगीत स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी त्या १९ वर्षांच्या होत्या. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अभिनयाने त्यांच्या गाण्यावर मात केली आणि गाणे मागे पडले. तसे झाले नसते तर आज कदाचित मा.दया डोंगरे यांचे नाव ज्येष्ठ गायिका म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित झाले असते.
दया डोंगरे आजही दररोज सकाळी अर्धा ते पाऊण तास रियाज करतात. आपल्या वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे मा. दया डोंगरे यांचे शिक्षण काही काळ धारवाड, त्यानंतर पुणे व दिल्ली येथे झाले. शाळेच्या स्नेहसंमेलनात त्या उत्साहाने भाग घेत असत, पण ते तेवढंच. अभिनयाचा वारसा त्यांना आपल्या आई मा.यमुताई मोडक यांच्या कडून मिळाला. मा.यमुताई मोडक यांनी त्या काळात हौशी रंगभूमीवर ‘किचकवध’, हाच मुलाचा बाप’ आदी नाटकातून काम केले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मा. दया डोंगरे यांची आत्या मा.शांता मोडक या त्या काळच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी बालगंधर्वाच्या नाटक कंपनीत त्यांना नाटकातून काम केले होते. मा.शांता मोडक यांना त्या काळी दामुअण्णा मालवणकर यांनी एक हजार रुपये पगार दिला होता. त्यांचा वारसा चालवायची संधी मा.दया डोंगरे यांना होती. पण त्यांनी आत्याच्या ओळखीचा कधी शिडी म्हणून वापर केला नाही. महाविद्यालयीन जीवनात मा.दया डोंगरे यांनी विशेष चमक दाखविली. सरकारी नाट्यस्पर्धेत मो. ग. रांगणेकर लिखित “रंभा’ या नाटकात त्यांनी इतके अप्रतिम काम केले की त्यांना त्यासाठी प्रशस्तिपत्र मिळाले. पुण्यात आल्या नंतर मग मॉडर्न हायस्कूल व फर्ग्युसन महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. त्याच काळात त्यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धाही गाजवल्या होती. अर्थातच महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्या दिल्लीत “एनएसडी’मध्ये नाटकाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी दाखल झाल्या, पण त्या वेळी त्यांनी संसारातही प्रवेश केल्याने त्यांना आपले शिक्षण एका वर्षातच आटोपते घ्यावे लागले. याच काळात सई परांजपे, सुधा शिवपुरी आणि विनायक चासकर ही मंडळी “एनएसडी’मध्ये दाखल झाली होती. तेथील शिक्षणानंतर सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांनी नाट्यद्वयी या संस्थेमार्फत विविध नाटकांचे प्रयोग सुरू केले. त्यात मा.दया डोंगरे काम करत असत. तुझी माझी जोडी जमली रे, नांदा सौख्य भरे, याचसाठी केला होता अट्टहास, इडा पिडा टळो यांसारख्या नाटकांत दया डोंगरे यांनी आपली चमक दाखवली होती.
दया डोंगरे यांच्या घरात त्यांच्या वडिलांना गायन-वादनाची हौस होती. त्यांचे पणजोबा कीर्तनकार होते. १९६९ च्या सुमारास त्या मुंबईला आल्या आणि मग त्यांची व्यावसायिक रंगभूमीवर घोडदौड सुरू झाली. नाट्यमंदिर या संस्थेने विद्याधर पुंडलिकाचे “माता द्रौपदी’ हे नाटक रंगमंचावर आणले होते. यातील द्रौपदीची भूमिका विजया मेहता करत, तर गांधारीची भूमिका दया डोंगरे. दोन कसलेल्या अभिनेत्रींची ही झुंज पाहण्यासारखी असे. दुर्दैवाने या नाटकाचे फारसे प्रयोग झाले नाहीत. पण त्यानंतर आलेल्या “लेकुरे उदंड झाली’ या नाटकाने मात्र दया डोंगरे यांचा चाहता वर्ग वाढला आणि त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. श्रीकांत मोघे यांच्याबरोबर त्या यामध्ये काम करत. त्यानंतर आले ते “संकेत मीलनाचा’ हे वेगळ्या विषयावरची परकीय संकल्पनेवरचे नाटक तेही गाजले. मा.दया डोंगरे यांनी नाटक सुरू असतानाच दूरदर्शनवर काम करणे सुरू केले. त्या वेळी आजच्या इतक्याग वाहिन्या नव्हत्या. मात्र दिल्ली दूरदर्शनवरही त्यांनी हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. मुंबईत आल्यावर नाटकांची घोडदौड सुरू झाली होतीच, पण त्या वेळी मुंबई दूरदर्शनची सुरवात होती. मा.दया डोंगरे यांच्या अभिनयप्रवासात मुंबई दूरदर्शनवरील ‘गजरा’ या कार्यक्रमाला विशेष स्थान आहे. मा.सुरेश खरे यांचे लेखन आणि दया डोंगरे यांचे निवेदन त्यात असायचे. या कार्यक्रमानेही खूप प्रसिद्धी मिळवून दिल्याचे त्या सांगतात. मराठी प्रेक्षकांबरोबरच अमराठी लोकांमध्येही हा कार्यक्रम लोकप्रिय होता. निखळ विनोद आणि करमणूक असे त्याचे स्वरूप होते. या कार्यक्रमामुळे ‘गजरा क्वीन’ अशी त्यांना ओळख मिळाली. याबाबतची एक आठवण सांगताना त्या म्हणतात, एकदा ग्रॅण्ट रोड येथे जाण्यासाठी मी माटुंगा रोड स्थानकात आले. स्थानकातील पादचारी पूल उतरत असतानाच गाडी सुटली. मला ती गाडी मिळणे शक्यच नव्हते. पण काही क्षणातच गाडी थांबली आणि मला त्याच गाडीत चढायला मिळाले. ही किमया ‘गजरा’ कार्यक्रमाने घडविली होती. धावतपळत उतरूनही मला गाडी पकडता आली नाही हे गाडीच्या मोटरमनने पाहिले. त्या अमराठी मोटरमनला ‘गजरा’ कार्यक्रमामुळे मी परिचित होते. केवळ त्या ओळखीमुळे त्यांनी सुरू झालेली गाडी काही क्षण पुन्हा थांबविली आणि ‘मॅडम मैं आपका प्रोग्रॅम देखता हूँ, हमें अच्छा लगता हैं’अशी त्यांची दादही मिळाली. मा.ललिता पवार यांच्यानंतर महाराष्ट्रात ‘सासू’ म्हणून दया डोंगरे यांचेच नाव घेतले जाते. दया डोंगरे म्हणजे ‘खाष्ट सासू’ असे समीकरण तयार झाले. सचिन पिळगावकर यांच्या ‘मायबाप’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा ‘सासू’ साकारली. ‘खटय़ाळ सासू नाठाळ सून’ किंवा दूरदर्शनवरील ‘आव्हान’ या मालिकेतील त्यांची ‘सासू’ गाजली. करडा आवाज, डोळ्यांतील जरब आणि अभिनयकौशल्याच्या जोरावर सर्वसामान्य प्रेक्षकांना मनात आपल्याविषयी भीती, तिरस्कार निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या. ती त्यांच्या अभिनयाला मिळालेली पावती होती. ‘सासू’ साकारताना माझ्या डोळ्यांपुढे कोणीही नव्हते किंवा मी कोणाचे अनुकरणही केले नाही. मी माझ्या पद्धतीने ‘सासू’ साकारली, असे त्या आपल्या मुलाखतीत सांगतात. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने ‘मी लहान असताना मला तुमच्या डोळ्यांची खूप भीती वाटायची’ असे सांगितल्याची आठवण त्या सांगतात. ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘उंबराठा’, ‘कुलदीपक’, ‘आत्मविश्वास’ हे त्यांचे आणखी काही चित्रपट. दूरदर्शनवरच अधिकारीबंधूंच्या ‘बंदिनी’ मालिकेत तसेच ‘वेडय़ांचा बाजार’मध्ये मी वृद्ध स्त्रीची भूमिका केली. आजवर रंगविलेल्या खाष्ट, दुष्ट आणि कजाग ‘सासू’पेक्षा या भूमिका वेगळ्या होत्या. कोणतीही भूमिका करताना कलाकाराला त्या भूमिकेत शिरण्याबरोबरच बाहेरही पडता आले पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींच्या निरीक्षणातून मी माझ्या ‘भूमिका’ रंगविल्या असे त्या म्हणतात. दूरदर्शनवरच्या ‘स्वामी’ मालिकेत त्यांनी साकारलेल्या ‘गोपिकाबाई’ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन आणि गजानन जहागीरदार यांचे दिग्दर्शन यातून एक छान मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मराठीप्रमाणेच हिंदीत त्यांनी काम केले. जब्बार पटेल यांच्या ‘सुबह’ (मराठीतील उंबराठा), अमोल पालेकर यांच्या ‘आश्रय’मध्ये त्या होत्या. “मायबाप’ चित्रपट असो, की “खट्याळ सासू नाठाळ सून’ असो किंवा “उंबरठा’सारखा वेगळा चित्रपट असो या सगळ्यात दयाबाईंची भूमिका छोटी असो की मोठी त्या लक्षात राहायच्याच. तेच तर त्यांचे वैशिष्ट्य होते. सचिन दिग्दर्शित “आत्मविश्वाचस’ चित्रपटात तर त्या वेगळ्या भूमिकेत होत्याच, पण त्याच्या आधीच्या “नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटातील करारी स्त्रीचे त्यांचे रूप अनेकांच्या आजही स्मरणात आहे. गजानन जहागीरदार यांना दिग्दर्शित केलेल्या “स्वामी’ मालिकेत त्यांनी माधवरावांच्या आई गोपिकाबाईंचे काम केले होते. त्यातील त्यांचा करारीपणा अनेकांना आवडला होता. ‘नकाब’ चित्रपटात ऋषी कपूरच्या तर ‘दौलत की जंग’ चित्रपटात आमिर खानच्या आईची भूमिका त्यांनी केली. पण हिंदीत त्या विशेष रमल्या नाहीत. नाटक चित्रपट आणि मालिका यामधून त्यांनी लीलया काम केले असले तरी त्या रमल्या खऱ्या रंगभूमीवरच. वसंत कानेटकरांच्या “माणसाला डंख मातीचा’ या नाटकात त्यांनी सुप्रियाची भूमिका साकारली होती. ही अवघड भूमिका त्यांनी इतक्याट प्रभावीपणे केली, की खुद्द कानेटकरांनी माझ्या डोक्याातलं सुप्रियाचं पात्र तुम्ही सही सही उभं केलंत अशी पावती दिली. नाटकककाराने अशी पावती देणं हे सन्मानाचंच, दया डोंगरे यांनी असा सन्मान खूप वेळा मिळवला होता. कारण त्यांच्या अभिनयाची तेवढी ताकद आणि त्यांची तितकी गुणवत्ता आहे. आजच्या पिढीला मा.दया डोंगरे यांची ओळख आहे ती त्यांनी साकारलेल्या सासूच्या भूमिकेचीच. खाष्ट सासू किंवा करारी स्त्री अशाच भूमिका त्यांच्याकडे त्या काळात आल्या. खरं तर त्यांच्या अभिनयाची रेंज ही तेवढ्यापुरती मर्यादित नव्हती, तर विविध व्यक्तिरेखा समर्थपणे करणाऱ्या या अभिनेत्रीचे चीज मराठी चित्र आणि नाट्यसृष्टीने केले नाही. त्यांना मायबापमधील भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार, तसेच नाट्यदर्पण प्रतिष्ठानचा विशेष पुरस्कार मिळाला होता. १९९० मध्ये ‘चार दिवस सासूचे’ हा त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट. ‘एण्ड्रोपियॉन’ या डोळ्यांच्या आजारामुळे त्यांना सक्तीची निवृत्ती पत्करावी लागली. बसमधून एकदा प्रवास करताना बसच्या वाहकाने, ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक मी २५ वेळा पाहिले’ किंवा ‘काय दुष्ट बाई आहे ही, अशा बाईच्या घरात कोण मुलगी आपली सून म्हणून देईल,’ अशी पुण्यातील एका नाटय़प्रयोगाच्या वेळी मिळालेली प्रतिक्रिया त्यांना अधिक मोलाची वाटते. माझ्या सुदैवाने मला चांगले नाटककार, दिग्दर्शक आणि सहकलाकार मिळाले, याचाही त्या आवर्जून उल्लेख करतात.
‘मंतरलेली चैत्रवेल’ या नाटकाचा विषय निघाला की त्या आजही हळव्या होतात. सातारा येथील नाटकाचा प्रयोग आटोपून सर्व मंडळी कोल्हापूरला पुढील प्रयोगाठी बसने जात होती. या बसला भीषण अपघात झाला. अपघातातून दया डोंगरे वाचल्या पण त्यांचे सहकलाकार जयराम हर्डीकर आणि शांता जोग यांचा त्या अपघातात मृत्यू झाला. ही आठवण व तो प्रसंग आजही त्यांच्या अंगावर काटा आणतो.
दया डोंगरे यांना दोन विवाहित कन्या. संगीता व अमृता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दया डोंगरे यांची नाटके व चित्रपट – मंतरलेली चैत्रवेल, रंभा, वैदेही, लेकुरे उदंड झाली, संकेत मीलनाचा, चिं. सौ. कां. चंपा गोवेकर, अमानुष,
चित्रपट– नवरी मिळे नवऱ्याला, मायबाप, उंबरठा, आश्रय, जुम्बीष,
Leave a Reply