तुम्ही कधी ‘ दयाघन ‘ नामक संस्थेचं नाव ऐकलंय का ? मी हि काल पर्यंत ऐकलं नव्हतं . पत्रकारितेत अशा गोष्टी लवकर कानावर येतात . सध्या ती एक गुप्त संस्था आहे आणि काही निवृत्त मेडिकल संशोधक चालवतात इतकेच हाती आलंय . या ‘दयाघनावर ‘ माहिती काढून एखाद्या रविवारच्या पुरवणी साठी ढासू कव्हर स्टोरी करण्याच्या उद्देशाने मी जरा मागावर होतो . ‘ काही कळलेतर तर रिंग दे ‘ असे काही ‘ कॉन्टॅक्टस ‘ना सांगून ठेवले होते .
मोबाईल वाजला .
” हा ,बोल बाबू ”
” ‘दयाघन ‘ अन सेंट्रल जेलचा काहीतरी संबंध आहे ! जेलचा सेंट्री कोणाला तरी ‘ काल दयाघन वाला जेलमध्ये पुन्हा आला होता . ‘ असा संवाद शेजारच्या टेबल वरून ऐकलाय ! ” बुटक्या बाबूंची खबर पक्की असते हा आजवरचा माझा अनुभव आहे .
“थँक्स ”
सेंट्रल जेल ! आता तेथे ओळख काढावी लागेल ! रिपोर्टर म्हणून तेथे कधीही जाता येते ,पण अंतस्थ माहिती साठी ओळखीचा फायदा होतो . अरे हा , रव्या तेथेच आलाय कि ! लगेच रिंग मारली .
“रव्या ! मी एस . आर . ! कसा आहेस ?”
“अरे तू !? आज आठवण झाली का ?”
” तू येथे सेंट्रलला असिस्टंट जेलर म्हणून जॉईन झाल्याचं भास्कर सांगत होता . ”
” तूझ काय चाललंय ?अन कधी भेटतोस ?”
” माझं काय तेच ‘ रिपोर्टरच ‘ काम ! अन भेटीचं म्हणशील तर आत्ता येतो ! येवू ?”
“नको ! संध्याकाळीच ये क्वॉर्टरवर ! बायको ‘मायके ‘ गेलीय , बसू गप्पा मारत ! ”
” आलोच ! येताना 8PM आणू का ?”
तो फोनवर फक्त हसला .
०००
रात्री आठ ला रव्याचा बंगल्यावर पोहंचलो . इकडच्या तिकडच्या गप्पा , कॉलेजच्या आठवणी ,स्ट्रगल वगैरे बोलून झाल, तोवर दोन पेग पोटात गेले होते , मी विषयाला हात घातला .
“रव्या, तू ‘ दयाघन ‘ नाव एकलस काय ?”
“हो ! पण तुला कस कळलं ?” रव्या चचापल्याच माझ्या नजरेतून सुटलं नाही .
“मित्रा ,मी रिपोर्टर आहे ! आमचे हजार डोळे आणि हजार कान असतात ! ”
“ती एक गुप्त संघटना आहे ! ”
” ते तर मलाही माहित आहे .! अन गुप्त का ? काही बेकायदेशीर ——–”
” नो ,नो . ते खरतर कायद्याला मदतच करतात ! पण -पण त्यांचा मार्ग अजून कायदेशीर झालेला नाही !”
” यार !असे कोड्यात नको ना ! स्पष्ट बोल ! मला या ‘दयाघन ‘वर रविवारच्या पुरवणी साठी कव्हर स्टोरी करायची आहे . तेव्हा जास्ती ज्यास्त माहिती दे ! ”
” मग ,मला काहीच सांगता येणार नाही ! ” रवी एकदम आखडला .
“ओ . के . ! मी माझा ‘ पत्रकार ‘ बाजूला ठेवतो , तू तुझा ‘ जेलर ‘ बाजूला ठेव ! फक्त मित्र म्हणून बोलूयात . तुझी माहिती कायदेशीर असो कि बेकायदा असो , तुझ्या परवानगी शिवाय एक शब्द हि लिहिणार नाही कि बोलणार नाही ! हा एस .आर .चा शब्द !”
“ठीक आहे ! जंटलमन्स प्रॉमिस समजतो !”
” स्टॉप रव्या ! तू मला चांगला ओळखतोस ! तरी विश्वास नसेल तर नको बोलूस !”
“तस नाही रे , पण — हे बघ या ‘ दयाघन ‘चे उद्याच एक ऑपरेशन आहे . वरिष्ठांची लेखी परवानगी नसतेच , पण माझ्या रिस्कवर तुला तेथे घेऊन जातो . ते काय करतात ? कसे करतात ? आणि का करतात ते तुला तेथेच कळेल. ”
“हे ‘ दयाघन ‘ वाले कोण लोक आहेत ? आणि त्यांचा जेलशी काय सम्बन्ध ?”
” हि एक गुप्त संघटना आहे हे तुला माहीतच आहे . हि काही निवृत्त मेडिकल संशोधक मंडळी चालवते . आणि त्यांचा सम्पूर्ण जेलशी नाहीतर —-फक्त —फाशीच्या कैद्यानंशी सबंध आहे ! ”
“बापरे ! काही मानवी देहावर अभद्र प्रयोग —-!”
“स्टुपिड !! असलं कृत्य कायद्याच्या छता खाली कसे होऊ दिले जाईल ? आता ये तू उद्या संध्याकाळी पाच वाजता !”रव्या पुरता वैतागला होता . आता त्याला छेडण्यात अर्थ नव्हता . न पेलणार उछुकतेचं ओझं घेऊन मी बाहेर पडलो .
०००
मी वेळेवर रवीच्या जेल मध्ये पोहंचलो . रवीच्या टेबल समोर पांढऱ्या केसांचा तेजस्वी म्हातारा डॉक्टर सारखा ऍप्रॉन घालून बसला होता . रवीने माझी ओळख करून दिली .
” सर ,हा माझा बालमित्र सुरेश , इथल्या एका कम्पनित प्रोग्रामर आहे . आणि हे —-”
” मी डॉ .सहस्त्रबुद्धे ! सायकॉलॉजि आणि अनॉटॉमीचा प्रोफेसर होतो !” म्हाताऱ्याचा आवाज एकदम कुल होता .
“थेटर तयार असेल तर ,ऑपरेशनची तयारी सुरु करुयात !”डॉ रवी कडे वळत म्हणाले .
“तयार आहे सर , तुम्ही नजर टाका .” रवी अदबीने म्हणाला . खाकी कपड्यातली दुर्मिळ ‘अदब ‘ मी डोळ्यात साठवून घेतली .
०००
मी आणि रवी एकावन वे ग्लास वॉल समोर बसलो होतो . त्यातून सुसज्ज ऑपरेशन थेटर सारखी दिसणारी रूम स्पष्ट दिसत होती . लाल ,पिवळे इंडिकेटर्स, काही मोठाल्या पांढऱ्या मशीन्स , चार सहा मोनीटर्स आणि मध्यभागी एक दवाखान्यात असतो तसा बेड होता . वनवे ग्लास वॉल मुळे आतून बाहेरचे दिसणार नव्हते . काही क्षणात एक क्लीन शेव्ह (डोक्या पासून ते पायाच्या नखा पर्यंत )केलेला कैदी घेऊन डॉक्टर सहस्त्रबुद्धे प्रवेशिले .
“हा ‘ कालिया ‘ ! याला सुप्रीम कोर्टात फाशीची शिक्षा झालीयय !” रवी माझ्या कानाशी पुटपुटला . मी डोळेफाडून समोर बघत होतो !
“क्या ,बुढावु सचमुच मुझे रिहा करनेवाले है ?”कालियाने विचारले .
“पता नाही ! मुझे सिर्फ तुम्हारा हेल्थ चेक करनेको बोला है . परआपके रिहाईकी रवीसाब कुछ बात कर रहे थे !”
“ऐसा कैसा ?कोरट बोला लटगा दो ! और आज एकदम से रिहा ?!! साला क्या बेकूफ बनानेला है ?”
“ये कायदे कानून कि बाते हमे नही पत्ता !आज तो आपक हेल्थ चेक करेगा !”
” क्या होने वाला है पता नाही ? हलाल करनेसे पहिले तंदरुस्त करते है ,साले ! करो ,करो तुम क्या चेक करना है सो चेक करो ! ”
मग डॉक्टरांनी त्याची उंची ,वजन घेतलं . वय विचारून घेतले . मग त्याला बेड वर झोपवून ई सी जी साठी लावतात तसे वायर्स जोडले . मॉनिटर वर हार्टचे पल्सेशन रेकॉर्ड होत होते . बीपी चा आकडा , पल्स रेट दिसत होते . डॉक्टरांनी एक छोटेसे इंजक्शन दिले .
“ये क्या है ?”
” कितने दिन से तू सोया नही है ! हलकी निंद आयेगी . तकलिफ हो तो बता देना . ”
” कैसे सोयेगारे ? फासी का खोफ कहा सोने देता ? जर्रा आखा लागी तो , वो साला फ़ंदा नजर आता है !”
कालियाने डोळे मिटले . डॉक्टरांची बोटे हातातल्या रिमोट कंट्रोलच्या बटनावरून सावकाश पण सराईत पणे फिरत होती , आणि नजर मॉनिटवर स्थिर होती .
मला तो मॉनिटर स्पष्ट दिसत होता .
बापरे , हे काय ? ई सी जी ची नागमोडी रेष धीम्या गतीने धावत होती ! पल्सचा आकडा घसरत होता ! आणि मला काही आकलन व्हायच्या आत , मॉनिटर वरच्या सर्व इलेट्रॉनिक सिग्नल्स थांबले !
डॉ साहत्रबुद्धे सावकाश कालिया जवळ आले . मॉनिटर दाखवत असून हि त्यांनी त्याची नाडी तपासून पहिली . डोळ्यात बॅटरीचा झोत पडून खात्री करून घेतली !
” डेड !! ऑपरेशन सक्सेसफुल !”
स्वतःशीच पुट्पुटले .
०००
मी ,रवी आणि डॉ सहस्त्रबुद्धे जेलच्या एका निवांत कोपऱ्यात लॉनवर कॉफी घेत बसलो होतो . खरे तर हि क्रूर नसली तरी फाशीच होती ! मग हा मार्ग का ? तेही त्या कैद्याला अंधारात ठेऊन दिलेली ! मग ‘दयाघन ‘ हे काय ? मरण ते मरणच ! फाशीवर लटकवा कि गोंजारून झोपवून मारा ! मी माझी शंका विचारली . डॉक्टरांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल .
” खरे आहे ! पण ते तुमच्या माझ्या साठी ! जगात सर्वात मोठी भीती असते ती ‘मरणाची ‘असे आमचे शास्त्र सांगते .तो कायद्याने गुन्हेगार होता , त्याला मारायचेच होते ! आम्ही तेच केले ! सरकार त्याला ‘तू या दिवशी , या वेळी , या ठिकाणी , या या लोकांन समोर , आणि असा मरणार आहेस ! हे सांगून मारणार होती ! या पॉईंट वर ‘ दयाघन ‘ येतो ! आम्ही मृत्यू +भय या संकल्पनेतील भय कमी करून ‘फाशी ‘ची अंमलबजावणी करतो . कायद्याचा मान राखलाच जातो . एक जीव ,पापी ,नीच , गुन्हेगार असला तरी भय मुक्त मारतो !हीच आमची ‘दयाघन ‘ कल्पना आहे ! आमच्या पद्धतीचा ‘मृत्यू ‘ फाशी पेक्षा ज्यास्त स्वगतःहार्य आहे ! नियमा प्रमाणे त्याचा नातेवाईकांना आमच्या पद्धतीची पूर्ण माहिती दिलेली असते आणि यांची परवानगी पण घेतलेली असते ! यात आम्ही कुठे चुकतोय ? फक्त हि पद्धत अजून कायदेशी झालेली नाही .तुम्हास काय वाटत ? ”
खरे खोटे मला माहित नाही . कोणास ,कोणाचे ,दुःख , कोठे आणि कसे कमी करावे वाटते आणि तो त्यासाठी तो का धडपडतो माहित नाही ! पण कालियाच्या चेहऱ्यवर ‘रिहा ‘होणारे भाव विलसत होते ! तो ते सुखद ‘मरण ‘ एन्जॉय करत असल्याचे स्पष्ट जाणवत होते !
मी कव्हर स्टोरीची कल्पना सोडून दिली .
— सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय . पुन्हा भेटूच . Bye .