नवीन लेखन...

शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ : कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील हे आधुनिक महाराष्ट्राला घडविणारे एक महत्त्वाचे शिल्पकार आहेत. भाऊराव पाटलांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी स्वातंत्र्यपूर्व काळातील कोल्हापूर संस्थानातल्या हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगौंडा देवगौंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते. याकाळात भारतामध्ये इंग्रजांची राजवट होती. परंपरागत वर्णव्यवस्थेच्या प्रभावामुळे श्रेष्ठस्थानी बसलेल्या ब्राह्मणांचाच भरणा नोकर वर्गामध्ये अधिक प्रमाणात होता. वर्णव्यवस्थाधिष्ठित हिंदू धर्माने ब्राह्मणांनाच फक्त ज्ञानप्राप्तीचा अधिकार दिलेला होता.

त्यामुळे इंग्रजी विद्याही प्रथमतः ब्राह्मण वर्गच प्राप्त करू शकला. त्यामुळे याच वर्गाचे वर्चस्व भारतीय बहुजन समाजावर राहिले. या कालखंडामध्ये इंग्रजांनी सर्वांसाठी शिक्षण खुले केलेले असूनही शिक्षणाच्या सोईच उपलब्ध नसल्यामुळे बहुजन समाज हा दारिद्र्य आणि अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेला होता. ख्रिस्ती मिशनरी आणि पुण्यासारख्या ठिकाणी म. जोतीराव फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षण देण्याची सुरुवात केली होती. कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराजांनीही बहुजन समाजाला शिक्षण देण्याची सुरुवात केलेली होती. हे सर्वच प्रयत्न महत्त्वपूर्ण होते, तरीही प्रचंड मोठा बहुजन समाज लक्षात घेता ते तोकडेच होते. म्हणून अशा अवस्थेत खेड्यापाड्यातील जनतेला शिक्षण देण्याची खूप मोठी यंत्रणा उभी करणे फार गरजेचे होते. अशा अवस्थेत महाराष्ट्रामध्ये झालेला कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म हा महाराष्ट्राचे सामाजिक व शैक्षणिक चित्र बदलून टाकण्यास अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेला आहे.

कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म हा जैन कुटुंबात झालेला होता. अस्पृश्यतेसारखी हिंदू धर्मामधली चाल यांच्या कुटुंबालाही लागलेली होती. अशा चालीविरुद्ध तरुण वयातच भाऊरावांनी बंडखोरी केलेली दिसते. भाऊरावांचा स्वभावच मुळात बंडखोर होता. ज्या गोष्टी मनाला पटत नसत त्या गोष्टीला भाऊराव कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता स्पष्टपणे विरोध करत असत. १९०८ ची एक घटना नोंदवण्यासारखी आहे. इस्लामपूरमधल्या मराठी शाळेच्या शिक्षकाने एका महार विद्यार्थ्याला वर्गाबाहेर बसवून अभ्यास करायला लावलेले भाऊरावांनी पाहिले. याचा त्यांना फार राग आला. अशी कृती करणाऱ्या शिक्षकाशी ते भांडले आणि त्या मुलाला त्या शाळेतून काढून कोल्हापूरच्या मिस क्लार्क या वसतिगृहात ठेवण्याचे त्यांनी ठरवले. त्या मुलास कोल्हापूरला नेण्यापूर्वी ते आपल्या घरी घेऊन गेले. स्वयंपाकघरात स्वतःसोबत बसवून त्याला जेवू घातले. नंतर त्यांच्या आईला हा मुलगा महाराचा आहे हे कळले तेव्हा आई भाऊरावांवर फार रागावली पण त्या मुलाला भाऊरावांनी मदत केलीच. हा मुलगा शिकून पुढे ज्ञानदेव घोलप म्हणून नावारूपाला आला.

भाऊराव शिक्षण घेत असताना काही काळ जैन बोर्डिंगमध्ये राहत होते. या बोर्डिंगमधील चुकीच्या नियमांविरोधातही भाऊरावांनी बंड केले. जेवताना सोवळे नेसण्याची जैन लोकांमधली चाल या बोर्डिंगमध्येही पाळली जात होती. धुतले न जाणारे अस्वच्छ सोवळे नेसण्यापेक्षा रोज धुतले जाणारे धोतर नेसूनच जेवण केले तर काय बिघडते असे म्हणून तिथे या प्रथेविरुद्ध भाऊराव आपल्या मित्रांसह वागले आणि त्याबद्दल त्यांनी शिक्षाही भोगली. दुपारच्या जेवणापूर्वीच हजामत किंवा दाढी करावी असा एक या बोर्डिंगचा नियम होता. हा नियमही भाऊरावांनी तोडला आणि दुपारच्या जेवणानंतरही दाढी करू लागले. याबद्दल जाब विचारला असता ते म्हणाले, ‘जेवणानंतर दाढी केल्याने धर्म थोडाच बुडतो?’ अशा बंडखोरीबद्दलची किंमत मात्र त्यांना चुकवावी लागत होती तरी ते स्वतःच्या मनाला पटेल त्याप्रमाणेच वागत होते. या वसतिगृहात राहत असतानाच भाऊरावांनी केलेली आणखी एक बंडखोरी फार महत्त्वाची आहे. अस्पृश्य मुलांसाठी कोल्हापूरमध्ये सुरू केलेल्या मिस क्लार्क वसतिगृहाच्या उद्घाटन समारंभास भाऊराव गेले होते तसे इतरही लोक गेले होते. पण भाऊरावांनी मात्र अंघोळ केली नाही. अण्णासाहेब लठ्ठे हे त्या जैन बोर्डिंगचे व्यवस्थापक होते. यांच्यासारखी शिक्षण क्षेत्रामधली कर्ती माणसेसुद्धा अर्थहीन व अमानुष अशा अस्पृश्यतेला पूर्णपणे तडकाफडकी झुगारून देऊ शकत नव्हती. त्यामुळे मिस क्लार्क बोर्डिंगमध्ये जाऊन अस्पृश्य मुलांशी शिवाशीव करून आलेल्या भाऊरावांनी स्नान केले पाहिजे असे अण्णासाहेब लठ्ठे यांनाही वाटत होते. बोर्डिंगच्या उपव्यवस्थापकांनी भाऊरावांना स्पष्टच सांगितले की, ‘तुम्ही महारामांगांच्या मुलांना शिवून आलात. त्यामुळं तुम्ही स्नान केलंच पाहिजे. तुम्ही स्नान केल्याशिवाय तुम्हाला जेवण मिळणार नाही.’

भाऊरावांच्या बुद्धिवादी मनाला शिवाशीव केल्याने विटाळ होतो आणि तो स्नान केल्यानंतर जातो ही वेडगळ कल्पनाच पटणारी नव्हती. म्हणून त्यांनी स्नान करण्यास स्पष्ट नकार दिला. आपल्यापेक्षा वयाने मोठा आणि अधिकारपदावर असलेला माणूस जरी चुकीचा आदेश देत असला तर तो कदापिही पाळता कामा नये असा भाऊरावांचा विद्यार्थी दशेतलाच बाणा होता. भाऊरावांनी स्नान केले नाही म्हणून उपव्यवस्थापकांनी त्यांना जेवण दिले नाही. स्वयंपाकखोलीचे दार बंद करून घेतले. नंतर भूक जेव्हा अनावर झाली तेव्हा भाऊरावांनी स्वतः आतली कडी काढली आणि मध्ये जाऊन ते स्वतःच्या हाताने जेवण घेऊन जेवले. भाऊरावांच्या या सर्वच कृती त्यांच्या तत्त्वनिष्ठेच्या, बंडखोरीच्या आणि निर्भीडपणाच्या निदर्शक आहेत. तत्त्वासाठी निर्भीडपणे वागणाऱ्या माणसाला त्रास हा सोसावाच लागतो, तसा खूप मोठा त्रास भाऊरावांनाही सोसावा लागला. भाऊरावांचे या प्रकारचे वर्तन बेशिस्तीचे वाटले म्हणून अण्णासाहेब लठ्ठे यांनी भाऊरावांना त्या बोर्डिंगमधून काढून टाकले. ही घटना १९०७- ०८ ची आहे. त्यानंतर १९१४ साली एक घटना घडली. कोल्हापूरमधील भाऊसिंगजी रोड व स्टेशन रोडवरच्या मरहूम बादशहा एडवर्ड आणि महाराणी अलेक्झांडा यांच्या अर्धपुतळ्यांना कुणीतरी डांबर फासले आणि या घटनेत अण्णासाहेब लठ्यांना गोवण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी भाऊरावांचा वापर करायचे ठरवले. अण्णासाहेब लठ्ठ्यांविरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी भाऊरावांना पोलिसांद्वारे नानाविध पद्धतीने छळले; पण प्राण गेला तरी आपण खोटी साक्ष देणार नाही, अशी भूमिका भाऊरावांनी घेतली. भाऊराव असे तत्त्वनिष्ठ आणि निग्रही मनोवृत्तीचे होते म्हणूनच ते खेड्यापाड्यांतील सामान्य माणसांच्या जीवनातला अज्ञानांधकार नष्ट करून त्यांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्यासाठी अत्यंत मौल्यवान असे कार्य करू शकले.

कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कर्तृत्वाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे त्यांनी उभा केलेला रयत शिक्षण संस्थेचा प्रचंड मोठा वटवृक्ष. शिक्षणाच्या संदर्भात वाळवंटासारखी परिस्थिती असलेल्या परिसरात एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले भाऊराव संपन्न असे शैक्षणिक नंदनवन कसे निर्माण करू शकले हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. भाऊराव पाटलांच्या मनावर म. जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज,म. गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव होता. केवळ स्वतःसाठी जगणे हा त्यांचा स्वभावच नव्हता तर आपले जीवन समाजाच्या कामी आले पाहिजे, समाजाला दुःख-दारिद्र्य व अज्ञानांधकारातून बाहेर काढण्यासाठी आपण काहीतरी करत राहिले पाहिजे ही त्यांची जीवनवृत्ती होती. मूळ जैन धर्मात असलेल्या सत्य, अहिंसा या मूल्यांचाही त्यांच्या मनावर प्रभाव होता. त्यांच्यामध्ये एक त्यागी अशी संन्यस्त वृत्ती होती आणि ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी हवे ते कष्ट करण्याची जिद्द व चिकाटी त्यांच्यामध्ये होती. म्हणूनच सुरुवातीच्या काळात त्यांनी जी किर्लोस्कर कंपनीत मालाच्या प्रचारकाची व वितरकाची नोकरी केली ती केवळ स्वत:च्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याच्या भूमिकेतून केली नाही तर त्यातही शेतकऱ्यांच्या हिताची दृष्टी होती. शेतकऱ्यांनी अत्याधुनिक अवजारांच्या आधारे शेती केली पाहिजे. तशी नवनवी अवजारे त्यांना मिळाली पाहिजेत ही भूमिका घेऊन ते इथे वावरत होते. किर्लोस्कर कंपनीने शेतकऱ्यांना कमीत कमी किंमतीमध्ये नांगर उपलब्ध करून द्यावेत. आपल्या कामामुळे शेतकऱ्यांचे अधिकाधिक हित झाले पाहिजे असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. ही भूमिका ते किर्लोस्करांकडे आग्रहाने मांडत होते. परंतु किर्लोस्करांना जेव्हा नफ्याच्या लोभापुढे शेतकऱ्यांच्या हिताची काहीच किंमत वाटेनाशी झाली तेव्हा त्यांनी किर्लोस्कर कंपनीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी कूपर कंपनीमध्ये काही काळ काम केले. तिथेही त्यांनी शेतकऱ्यांना परवडतील अशा दरात शेतीची अवजारे पुरवण्याची विनंती केली. कूपरनी शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी अशी अपेक्षा भाऊरावांनी व्यक्त केली; परंतु आपली ही अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकत नाही हे लक्षात येताच त्यांनी कूपर यांची कंपनीही सोडून दिली.

भाऊरावांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सामान्य माणसाबद्दलची एक तळमळ होती म्हणूनच ते जिथे असतील तिथून आपल्या हातून जनतेचे हित कसे होईल याचा विचार आणि कृती करत होते. या मानसिकतेमुळेच ते म. जोतीराव फुल्यांच्या सत्यशोधक समाजाचे सदस्य झाले होते. इस्लामपूर परिसरात भाऊराव पाटाळे (भिलवंडी), तातोबा यादव (कासेगाव), साबळे (शिवधर), रामचंद्र घाटगे (काले) या मंडळींनी सत्यशोधकी जलसे सुरू केले होते. समाजप्रबोधनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या या जलशांमध्ये भाऊराव पाटील सहभागी झाले. जलशांसोबत गावोगाव ढोलकी वाजवत आणि भाषणे देत ते फिरले. याच काळात त्यांचे किर्लोस्कर कंपनीचे काम चालू होते. यानिमित्ताने त्यांनी जो जनसंपर्क केला त्यातून त्यांना समाजातील भयावह असा जातीभेद, प्रचंड मोठे अज्ञान हे तीव्रतेने लक्षात आले. जातीभेदामुळे असलेली फाटाफूट आणि अज्ञानाचा अंधार यामुळेच ही जनता पुरोहित व जमीनदार सावकार यांच्या गुलामगिरीमध्ये खितपत पडलेली आहे हे त्यांच्या तीव्रपणे लक्षात आले. त्यातूनच त्यांच्या डोक्यात या अज्ञानी रयतेच्या शिक्षणासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा विचार घर करू लागला. यातूनच रयत शिक्षण संस्थेच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. सत्यशोधक समाजातील उच्चवर्णीय व श्रीमंत लोकांना सत्यशोधक समाजाच्या मूळ उद्दिष्टानुसार शिक्षणाद्वारे समाजपरिवर्तन घडवून आणण्यापेक्षा राजकीय सत्ता मिळवणे महत्त्वाचे वाटू लागले. म्हणून अशा लोकांनी १२- १२-१९२० साली श्री. जगदेवराव ऊर्फ भाऊसाहेब महाराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली ब्राह्मणेतर पक्ष स्थापन केला आणि ही मंडळी राजकारणात गेली. भाऊरावांना राजकारणापेक्षा समाजकारण व रयतेचे शिक्षण महत्त्वाचे वाटत होते म्हणून ते त्या प्रवाहात सामील झाले नाहीत. २५ सप्टेंबर १९१९ रोजी काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी काले, ता. कराड इथे एक परिषद भरली होती. या परिषदेत भाऊरावांनी ‘रयत शिक्षण संस्था’ स्थापन करण्याचा ठराव मांडला आणि या ठरावानुसार रयत शिक्षण संस्थेचे पहिले वसतिगृह सुरू झाले. हे वसतिगृह चालवण्याची जबाबदारी काले येथील सत्यसमाजिस्ट दाजी पाटील, नारूकाका खोत, भाऊराव चौगुले व बंडोबा शेट्ये यांनी स्वीकारली होती. वसतिगृहाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून धनाजीशा कूपर यांची निवड केली होती. या कालखंडामध्ये भाऊराव खानबहादूर कूपर यांच्याकडे काम करत होते; परंतु शिक्षणप्रसारासाठी त्यांच्याकडून योग्य ते सहकार्य न मिळाल्याने भाऊरावांनी कूपर यांच्याशी असलेले आपले संबंध तोडले आणि अशी प्रतिज्ञा केली की, ‘मी माझे वसतिगृह शाहू महाराजांचे नावे काढीन आणि त्या वसतिगृहात माझ्या दाढीतील केसाइतकी मुले होईपर्यंत दाढी काढणार नाही व पायात वहाणाही घालणार नाही.’ इथूनच भाऊरावांच्या शैक्षणिक कार्याचा प्रचंड मोठा विकास होण्याची प्रक्रिया सुरू झाली. आपल्या प्रतिज्ञेनुसार सातारा इथे त्यांनी आपल्या घरातच चार मुलांना घेऊन वसतिगृह सुरू केले. यासाठी भाऊराव स्वत:च पदरमोड करत असत.काही दिवस असे वसतिगृह चालवल्यानंतर भाऊरावांनी सातारच्या महाराजांची पडीक असलेली धनिनीची बाग ५७५ रु. खंडाने घेतली आणि या बागेमध्ये त्या मुलांना आणून भाऊरावांनी छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे नव्या पद्धतीचे वसतिगृह सुरू केले. भाऊरावांनी चालवलेले हे वसतिगृह म्हणजे त्या काळातील एक आदर्शच होता. कमीत कमी खर्चामध्ये उत्तम बौद्धिक विकास घडवून आणणारे समतावादी व परिवर्तनवादी शिक्षण देणे, ग्रामीण भागातील हुशार मुलांना शिक्षण पूर्ण करण्यासाठीच्या सोई उपलब्ध करून देणे, सहजीवन व सहभोजनाच्या माध्यमातून कृत्रिम जातीभेदांच्या बंधनातून मुक्त करून मुलांना खऱ्या अर्थाने माणूस बनवणे, श्रम आणि स्वावलंबनाचे महत्त्व कृतीच्या माध्यमातून पटवून देणे, विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पाडणे व रयतेच्या शिक्षणासाठी त्यागी व सेवाभावी वृत्तीचे शिक्षक कार्यकर्ते व नेते तयार करणे ही या वसतिगृहाची उद्दिष्टे होती. ही उद्दिष्टे केवळ कागदापुरती नव्हती तर त्याची प्रभावी अशी अंमलबजावणी भाऊराव करत होते.

भाऊरावांच्या या वसतिगृहात सर्व जातीधर्माचे विद्यार्थी एकत्र राहत होते, एकत्र स्वयंपाक करून एकत्र जेवत होते. धनिनीच्या बागेतील जमिनीत श्रम करून भाजीपाला पिकवीत होते आणि अशा पद्धतीने सर्व दृष्टींनी स्वावलंबी बनून ते सामाजिक कार्यासाठी तयार होत होते.
भाऊरावांच्या या वसतिगृहातील हे चित्र पाहून म. गांधी अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाले होते, “साबरमती आश्रमात स्पृश्य-अस्पृश्य यांना एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाला नाही ते भाऊरावांनी करून दाखविले आहे. मी त्यांचे कौतुक करतो. ”
४ एप्रिल १९३३ रोजी सयाजीराव महाराजांनी छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसला भेट दिली तेव्हा शाहू महाराजांनी दिलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया भाऊरावांच्या कार्याचे मोल अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित करणारी आहे. ते म्हणाले होते, “या शाहू बोर्डिंग (हाऊस) चे काम पाहून मला विशेष आनंद होत आहे. हिंदुस्थानच्या प्रगतीस लागलेल्या अत्यंत जालीम जातीविशिष्टरूपी किडीच्या मुळावरच रा. भाऊराव यांनी कुऱ्हाडीचा घाव घातल्यामुळे ती या बोर्डिंगच्या व्यवस्थेमुळे मुळातूनच नष्ट होणार आहे. असे बोर्डिंग व याची तत्त्वे अमलात आणण्याची रीत हिंदुस्थानात कुठेच दिसून येत नाही. इतक्या थोड्या खर्चात नीटनेटकेपणा, टापटीप, मुलांची शिस्त, उत्साह, त्यांचा उत्कृष्ट अभ्यास, ऐक्य, परस्परांतील अकृत्रिम प्रेम पाहून वाटेल तितका खर्च करून एखाद्या राजा-महाराजाकडूनही असली संस्था इतक्या सुंदर व उपयुक्तपणे चालविणे कठीण आहे. याबद्दल रा. भाऊराव पाटलांना जितके धन्यवाद द्यावेत तितके थोडे. ही व अशा संस्था समाजाच्या जागृतीची चिन्हे असल्यामुळे त्यांचे मला कौतुक करावेसे वाटते. या संस्था कार्यकर्त्यांची बुद्धी, विचार, कला व आकांक्षा दर्शवितात व त्या वाढल्या म्हणजे देशाचे पाऊल पुढे पडण्यास मदत होते. त्यांना उत्तेजन देऊन त्यांना समाजाची सेवा करण्यास संधी देणे हे विचारी, विद्वान, धनिक व दूरदर्शी लोकांचे पवित्र कर्तव्य आहे असे मी समजतो. त्यांचा उत्साह अभंग ठेवण्याची सर्व पुढाऱ्यांवर जबाबदारी आहे.’ ”
वसतिगृहाद्वारे भाऊरावांनी सुरू केलेल्या शैक्षणिक कार्याचा पुढे प्रचंड मोठा विस्तार झालेला दिसतो. वसतिगृहानंतर प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये, महाविद्यालये अशा चढत्या क्रमाने कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेचा विस्तार झालेला आहे. त्या काळामध्ये सातारासारख्या ग्रामीण परिसरामध्ये गोरगरीब मुलांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची संधी मिळणे अत्यंत कठीण होते म्हणून कर्मवीरांनी छत्रपती शिवाजी महाविद्यालय सुरू करण्याचे ठरवले. हे महाविद्यालय सुरू करण्यामागे एक वैचारिक भूमिका होती ती अशी की, ‘जातीभेद, प्रांतभेद, भाषाभेद, संस्कृतिभेद इत्यादी भेदांमुळे आमच्या देशाची हानी झाली आहे. यापुढे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करता यावी व समाज एकजिनशी करता यावा यातून विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची आवश्यकता आहे. याकरिता संस्थेने सातारा येथे वसतिगृहयुक्त महाविद्यालय सुरू करण्याचे ठरविले आहे. या वसतिगृहयुक्त महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे चारित्र्य व शील संवर्धन या दोन महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष पुरविता येईल….. लोकशाहीच्या न्यायाने व्यक्तिगत विकासाची संधी राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला सारख्या प्रमाणात मिळणे जरूर आहे…. सुधारलेल्या राष्ट्रात सर्व शिक्षण शक्यतो मोफत देण्याची सोय आहे. म्हणूनच आम्ही आपले महाविद्यालय मोफत करण्याचे ठरविले आहे.” असा महाविद्यालय सुरू करण्याचा कर्मवीर भाऊरावांचा व्यापक उद्देश होता.शैक्षणिकदृष्ट्या उजाड असलेल्या भूमीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे रयत शिक्षण संस्थेचे रोपटे लावले त्या रोपट्याचा त्यांच्या हयातीतच वटवृक्ष झालेला होता. कर्मवीर अस्तित्वात होते तेव्हाच रयत शिक्षण संस्थेच्या ८५ माध्यमिक शाळा अस्तित्वात आलेल्या होत्या. त्यांनी आपल्या शिक्षण संस्थेमधून अनेक ध्येयवादी कार्यकर्ते निर्माण केलेले होते. त्यामुळे भाऊरावांच्या निधनानंतरही रयत शिक्षण संस्थेचा विस्तारच होत गेला. १९६० साली या संस्थेच्या माध्यमिक शाळांची संख्या १११ झाली. १९८४-८५ या शैक्षणिक वर्षापर्यंत या संस्थेच्या ४८१ शाखा निर्माण झालेल्या दिसतात. या संस्थेने या साली २ लक्ष ३३ हजार १७२ मुलांना शिक्षण दिलेले दिसते. या शिक्षण संस्थेचा कार्यविस्तार अजूनही अखंडितपणे सुरूच आहे.हे जे प्रचंड असे शिक्षण प्रसाराचे कार्य या संस्थेद्वारे होऊ शकले त्यापाठीमागे कर्मवीरांची रयतेविषयीची तळमळ, जिद्द, आपले शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची वृत्ती या गोष्टी आहेत. ग्रामीण भागातील अज्ञानी जनतेला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास प्रवृत्त करण्यासाठी भाऊरावांनी खेड्यापाड्यांमध्ये भरपूर पायपीट केली. सुरुवातीच्या काळामध्ये वसतिगृह चालवण्यासाठी भाऊरावांनी आपल्या पत्नीचे मंगळसूत्र मोडण्यासही मागेपुढे पाहिले नाही. भाऊरावांमध्ये शिक्षणप्रसाराचे पवित्र कार्य करण्यासाठी कोणताही त्याग करण्याची वृत्ती आहे हे त्या परिसरातील खेड्यापाड्यांमधल्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी जनतेला पटलेले होते. म्हणून वसतिगृहांच्या व विद्यालये- महाविद्यालयांच्या उभारणीसाठी जनतेने भाऊरावांना धान्य, इमारत आणि पैशांच्या रूपामध्ये स्वखुशीने मदत केली. सामाजिक जाणिवा बाळगणाऱ्या काही संस्थानिकांकडूनही भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेसाठी मदत मिळवली. एकूणच रयतेकडून आणि रयतेसाठी चालवलेली शिक्षण संस्थाच भाऊरावांनी उभी केलेली होती असे म्हणता येईल.

भाऊराव स्वतः काही विचारवंत नव्हते तर कर्मवीरच होते. किर्लोस्करवाडीमध्ये झालेल्या ग्रामोद्धार परिषदेनंतर जनतेनेच भाऊरावांना ‘कर्मवीर’ ही पदवी दिलेली दिसते. भाऊरावांना प्रत्यक्षात १९३४ पासूनच काही जण ‘कर्मवीर’ म्हणत होते; परंतु संस्थेच्या सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेजच्या सन १९४१-४२ च्या अहवालात लिखित स्वरूपात भाऊरावांच्या नावामागे कर्मवीर ही उपाधी लावलेली दिसते.
भाऊरावांची विचारधारा ही इहवादी स्वरूपाची होती. आध्यात्मवादी गोष्टींना त्यांनी फारसे महत्त्व दिलेले दिसत नाही तर माणसाचे ऐहिक जीवनच सुखी व चारित्र्यसंपन्न बनले पाहिजे ही त्यांची भूमिका होती. त्यासाठी शिक्षण प्रसाराच्या मार्गाने ते गेले. शिक्षणाद्वारे माणूस परकीयांच्या आणि स्वकीयांच्याही सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी तयार होऊ शकतो आणि शिक्षणाद्वारेच इथे सामाजिक समता, संधीची समानता आणि न्याय प्रस्थापित होऊ शकतो असे त्यांना वाटत होते. माधुकरी मागून शिक्षण घेण्याच्या कल्पनेला त्यांचा विरोध होता. उलट स्वावलंबनावर ते भर देत होते. म्हणूनच ‘कमवा आणि शिका’ या योजनेचा त्यांनी महाराष्ट्रात पाया घातलेला दिसतो. त्यांनी शोषणाला आणि जातीभेदाला सतत विरोध केलेला आहे. आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केलेला आहे. आणि अंधश्रद्धांनाही विरोध केलेला दिसतो. अशा प्रकारचे भाऊराव व त्यांचे कर्तृत्व म्हणजे शिक्षण क्षेत्रातला एक तेजस्वी असा दीपस्तंभ आहे. अशा या दीपस्तंभाला ९ मे १९५९ रोजी जग सोडून जावे लागले.

आजच्या शिक्षणसंस्थाचालकांनी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वच घटकांनी कर्मवीर भाऊरावांचा व्यापक ध्येयवाद आणि त्यांची कार्यपद्धती नीट समजून घेतली पाहिजे आणि शिक्षणसंस्था उभी करायची असते ती राजकारणासाठी किंवा पैसा कमावण्यासाठी नाही तर पवित्र अशा शिक्षणाचा प्रसार करून राष्ट्रसेवा बजावण्यासाठी ही गोष्टी गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये भ्रष्ट अशा दुष्प्रवृत्ती शिरणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. आज परिस्थिती बदललेली दिसते. भ्रष्ट प्रवृत्ती शिक्षणाच्या क्षेत्रात घुसलेल्या दिसतात. या प्रवृत्तींपासून शिक्षण क्षेत्राला मुक्त करण्यासाठी भाऊरावांच्या शैक्षणिक कार्याचे पुनः पुन्हा स्मरण करण्याची गरज आहे.

– डॉ.अनंत दा. राऊत

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..