डेंग्यू हा उष्णकटीबंधात आढळणारा तापाचा प्रकार आहे. हा आजार फ्लेविवायरस या प्रजातीच्या विषाणूंमुळे होतो. एडीस प्रजातीच्या डासांमुळे हा आजार माणसांमध्ये पसरतो. डेंग्यू ताप असलेल्या रुग्णाला चावल्यामुळे हा विषाणू डासात जातो. हे डास सकाळच्या वेळी माणसांना चावतात आणि आजार पसरतो. या तापाची लक्षणे निराळी आहेत. एके दिवशी अचानक खूप डोकेदुखी, हातपायदुखी, सांधे-| कंबरदुखी सुरू होते आणि नंतर ताप येतो. डेंग्यू तापात अंगावर लालसर पुरळही येते. दोन्ही हाता-पायांवर व छातीवरही हे पुरळ पसरू शकते. याबरोबर पोटदुखी, उलट्या, मळमळणे ही लक्षणेसुद्धा दिसू शकतात. खूप वेळा या लक्षणांमुळे हा आजार मलेरिया किंवा फ्लूसारखा समजून ओळखला जात नाही. सर्वसाधारणतः हा ताप ७ ते ८ दिवसांत ओसरतो पण थकवा व सांधेदुखी २ ते ३ आठवडे राहू शकते. या तापाचे निदान अचूक करण्यासाठी डेंग्यूविरुद्धच्या ॲण्टीबॉडीज (प्रतिद्रव्यांची) चाचणी गरजेची आहे. ही चाचणी तापाच्या ५ ते ७ दिवसांनंतर पॉझिटिव्ह येते. कधी खूप लवकर चाचणी केल्यास निकाल बरोबर येत नाहीत. डेंग्यूविरुद्ध निर्णायक अशी उपचार पद्धती नाही.
लक्षणांवर आधारित योग्य ती औषधे देऊन हा आजार बरा होऊ शकतो. रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमी न होऊ देणे व गरज लागल्यास रक्ताधान प्रयोग (ट्रान्सफुझन) देणे हे उपचार करावे लागतात. प्रत्येक आजारासारखे डेंग्यू हेम्हरेजीक ताप व डेंग्यू शॉक सिंद्रोम ही डेंग्यूची अतिउग्र रुपे आहेत. यात रक्तस्राव होणे, यकृताला सूज येणे, किडणीचे काम कमी होणे, श्वासोश्वासाला त्रास होणे (एआरडीएस) या सर्व समस्या जीवनाला धोका निर्माण करू शकतात. अशा रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवून अत्याधिक कालावधीसाठी उपचार लागतात. लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याने व योग्य उपचार केल्याने तुम्ही डेंग्यू तापावर मात करू शकतात. विशेषतः पावसाळ्यात कुठल्याही तापाला अंगावर न काढता लवकरात लवकर त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. डासांमुळे पसरणारे डेंग्यू व इतर आजार टाळण्यासाठी डासांची संख्या कमीत कमी ठेवणे आवश्यक आहे. डास विकर्षक (रिपेलण्ट) मच्छरदाणी वापरणे व घराच्या परिसरात स्वच्छता ठेवणे इत्यादी उपाय आपण मलेरियाच्या लेखात विस्तृतपणे दिले आहे.
डॉ. मंदार कुबल
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply