या पुरातन वृक्षाच्या जीवाश्मांचा शोध कॅनडाच्या पूर्व भागातील, न्यू ब्रन्सविक इलाख्यातल्या एका दगडांच्या खाणीत लागला. ही खाण सॅनफर्ड खाण म्हणून ओळखली जाते. इथले दगड हे मुख्यतः राखाडी रंगाचे, गाळापासून बनलेले खडक आहेत. या खडकांच्याच एका थरात या जीवाश्मांचा शोध लागला. हे खडक सुमारे पस्तीस कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. हा शोध जिथे लागला, तो परिसर म्हणजे त्या काळातल्या एका तलावाचा भाग असल्याचं दिसून येतं. हे जीवाश्म ज्या झाडांचे आहेत, ती झाडं या तलावाच्या काठावर वसलेली असावीत. एखाद्या भूकंपामुळे ती मुळापासून उखडली गेली असावीत व गडगडत तलावात पडली असावीत. त्यानंतर या झाडांवर गाळ जमा होऊन ती त्या गाळात गाडली गेली. कालांतरानं या गाळाचं खडकात व झाडांचं जीवाश्मांत रूपांतर झालं.
गाळापासून बनलेल्या या खडकांत जीवाश्मांचे एकूण पाच नमुने सापडले आहेत. हे सर्व जीवाश्म एकाच प्रकारच्या झाडाचे आहेत. यांतील पहिला नमुना हा सात वर्षांपूर्वी सापडला. उर्वरित चार नमुने सापडण्यास, त्यानंतरचा एकूण सुमारे चार वर्षांचा काळ जावा लागला. यापैकी सर्वांत शेवटी सापडलेला जीवाश्म हा संपूर्ण झाडाचा जीवाश्म होता. अमेरिकेतील वॉटरविल येथील कॉल्बी महाविद्यालयातील रॉबर्ट गॅस्टॅल्डो आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या सर्व जीवाश्मांचा तपशीलवार अभ्यास केला आणि त्यातूनच त्यांनी या वैशिष्ट्यपूर्ण झाडाचं संपूर्ण चित्र उभं केलं. रॉबर्ट गॅस्टॅल्डो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘करंट बायॉलॉजी‘ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे. या संशोधकांनी या झाडाला ‘सॅन्फर्डिआकॉलिस डेन्सिफोलिआ’ हे नाव दिलं आहे. हे नमुने ज्या दगडांच्या खाणीत सापडले, त्या खाणीच्या मालकाच्या नावावरून या झाडांना हे नाव देण्यात आलं आहे.
सॅनफर्ड खाणीत सापडलेल्या या झाडाच्या जीवाश्मांचं या संशोधकांनी सर्व दृष्टीनं तपशीलवार निरीक्षण केलं आणि त्यातून मिळालेल्या माहितीचा त्यांनी गणिती प्रारूपांच्या साहाय्यानं अभ्यास केला. या गणिती प्रारूपांद्वारे, झाडाच्या खोडाचा आकार, त्याचं स्वरूप, यासारखे घटक लक्षात घेऊन, पूर्ण वाढल्यानंतर हे झाड किती उंचीचं असू शकतं, त्याच्या पानांचा आकार जास्तीत जास्त किती असू शकतो, इत्यादी माहिती मिळू शकते. या सर्व अभ्यासावरून, पस्तीस कोटी वर्षांपूर्वीच्या या वृक्षाची रचना आगळी-वेगळी असल्याचं दिसून आलं. सॅनफर्ड खाणीत सापडलेल्या या जवळपास संपूर्ण स्वरूपातल्या जीवाश्मावरून, सदर झाड हे उभ्या आणि अरुंद खोडाचं असल्याचं स्पष्ट झालं आहे. या झाडाचं खोड हे आजच्या वृक्षांच्या खोडासारखं भरीव लाकडाचं नाही. या झाडाची एकूण उंची सुमारे सव्वादोन मीटर आहे. या खोडाच्या खालच्या बाजूचा व्यास सुमारे बारा सेंटिमीटर असून, वरच्या बाजूचा व्यास सुमारे सोळा सेंटिमीटर इतका आहे. या झाडाला सुट्ट्या फांद्या नाहीत. या झाडाची पानं खोडाच्या वरच्या बाजूकडील सुमारे ७५ सेंटिमीटरच्या भागात एकवटली असून, ती खोडावर सर्पिलाकृती स्वरूपात निर्माण झाली आहेत. या पानांची लांबी सुमारे पावणे दोन मीटर इतकी आहे, तसंच पानांची रचना अत्यंत दाट आहे. या झाडावरच्या पानांची एकूण संख्या ही अडीचशेहून अधिक असल्याचं दिसून येतं. ही पानं संयुक्त स्वरूपाची असून ती काहीशी नेचासारखी दिसतात – म्हणजे प्रत्येक पानाच्या मध्यभागी मोठं पातं व त्यातून बाहेर पडलेली छोटी पाती.
या वृक्षाची पानं नेचासारखी असली आणि वृक्षाची रचना ही पाम वृक्षासारखी असली, तरी हा वृक्ष नेचाच्या प्रकारातला नाही किंवा पामच्या प्रकारातलाही नाही. कारण नेच्याच्या बाबतीत आणि पाम वृक्षांच्या बाबतीत, त्यावरची पानं ही खोडाच्या अगदी वरच्या भागात एकवटलेली असतात व ती इतकी दाटीनं वसलेली नसतात. (पाम वृक्ष हे या वृक्षानंतर तीस कोटी वर्षांनी निर्माण झाले.) हे झाड पूर्ण वाढलेलं झाड नसावं. हे झाड, त्या काळातल्या इतर झाडांपेक्षा लहान आकाराचं झाड असल्याची शक्यता दिसून येते. या काळातील उंच झाडं ही साधारणपणे वीस मीटरपर्यंत वाढत असल्याचं ज्ञात आहे. परंतु हे झाड पूर्ण वाढल्यानंतर फारतर साडेचार मीटरपर्यंतची उंची गाठणार असल्याचं, या संशोधकांनी वापरलेली प्रारूपं दर्शवतात. या झाडाची पानं पूर्ण वाढल्यानंतर तीन मीटर लांबीची होत असावीत. असं असल्यास, हे झाड फक्त साडेचार मीटर उंच होणार असलं तरी, या झाडाच्या पानांनी तयार होणारं छत्र हे सुमारे सहा मीटर इतक्या मोठ्या व्यासाचं असावं. कदाचित तिथल्या परिस्थितीत, जास्तीतजास्त सूर्यप्रकाश मिळवण्याच्या आणि आजूबाजूच्या वृक्षांबरोबरच्या स्पर्धेला तोंड देण्याच्या दृष्टीनं, या वृक्षाची रचना अशी झाली असावी.
सॅन्फर्डिआकॉलिस डेन्सिफोलिआ हा वृक्ष ज्या काळातला आहे, त्या काळात वृक्षांचं स्वरूप बदलू लागलं होतं. या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या नवनव्या जाती-प्रजातींचे वृक्ष अस्तित्वात येत होते. वनस्पतींच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा या काळात गाठला जात होता. मात्र या संक्रमणाच्या काळातल्याच, ३६ कोटी ते ३४ कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडातील वनस्पतींचे फारसे जीवाश्म उपलब्ध नाहीत. त्यामुळे या काळातली जी माहिती उपलब्ध आहे, ती मर्यादित प्रमाणातच आहे. आता या सॅन्फर्डिआकॉलिस डेन्सिफोलिआ वृक्षाच्या जीवाश्मानं, या संक्रमणाच्या काळातल्या झाडांची, छोटीशी का होईना, पण एक झलक दाखवून दिली आहे. आणि तीही अगदी त्रिमितीय स्वरूपात!
(छायाचित्र सौजन्य – Tim Stonesifer / Matthew Stimson)
Leave a Reply