‘केल्याने देशाटन…’ हे वचन आपल्यात प्रसिद्ध असलं तरी, देशाटनाची पद्धत आपल्यात पूर्वी रुढ नव्हती. पूर्वी म्हणजे मी माझ्या लहानपणाचं, म्हणजे ४०-४५ वर्षांपूर्वीचं सांगतोय. त्यावेळी पर्यटन मुंबईतल्या मुंबंईत मामा-मावश्यांकडे राहायला जाणं किंवा मे महिन्याच्या सुट्टीत सहकुटूंब गांवाला जाणं इथवरच मर्यादीत असायचं. आणखी थोडी कक्षा वाढवून काही लोक पंढरपूरात जाऊन यायचे आणि मग घरी येऊन गंगापूजन घालायचे. या काळात मरणापूर्वी एकदा तरी काशीयात्रा करावी, हे लोकांचं स्वप्न असायचं, परंतू ते ही अनेकांना जमायचं नाही व मृत्यूसमयी तोंडात गंगातिर्थ पडावं म्हणून अनेक घरात गंगजलाचा गडू असायचा. अनेक कारणांमूळे गंगेकडे जाऊ शकत नाही म्हणून गंगाच घरात आणली जायची. हे भगिरथाचे कलियुगातील मर्यादीत अवतार म्हणायला हरकत नाही..
आणखी एका कारणाने देशाटन व्हायचं, ते म्हणजे शिक्षणाच्या निनित्ताने. पण हा प्रकार देशाटनात मोडत नसे. हे मुख्यत: तात्पुरतं स्थलांतर असे. कारण शिक्षणाच्या निमित्ताने परगांवी किंवा परदेशी जाणारे विद्यार्थी या सदरात मोडत आणि त्यांना त्या परक्या जागी शिक्षणापलिकडे फार काही पाहाणे परवडत नसे.
एकूणात गांव किंवा तिर्थयात्रा या पलिकडे त्या काळात देशाटन नव्हतं..परदेश तर खुप दुरची गोष्ट होती, आपला प्रान्त, आपला देश बघावा असंही काही फार जणांना वाटत नव्हतं. मुळात त्यावेळच्या बहुतेकांचं जग सिमित होतं. उत्पन्न मर्यादीत. एक जण कमावणार आणि दहा जण खाणार. महत्वाकांक्षाही सिमित, म्हणजे देन वेळचं जेवण, सणासुदीला एखादं लुगडं-कापड आणि मुलांची व गांवावरुन शिकण्यासाठी आलेल्यांचं शिक्षण, एवढीच. महत्वाकांक्षा सिमित असण्याचं आणखी एक कारण म्हणजे, त्या काळात टिव्हीचा जन्म झालेला नव्हता आणि त्यामुळे आपल्या आजुबाजूच्या जगाचं फारसं भान नव्हतं. जे काही बाहेरचं जग कळायचं, ते वर्तमानपत्रातूनच. पुन्हा त्यावेळी आपल्याला झगडून मिळालेलं स्वातंत्र्य ताजं होतं, देश प्रेम जागृत होतं, त्यामुळे देश घडवणं ही प्रथमिकती होती, जनताही ध्येयाने भारलेली होती व तशाच बातम्या पेपरात असायच्या. त्यामुळे बाहेरच्या जगाचं दर्शन घेणं कुणाच्या कल्पनेतही नसावं..परत वाहतुकीची साधनं अत्यंत मर्यादीत. होती ती ही अत्यंत कटकटीची. हिन्दीमध्ये वाहतुकीला ‘यातायात’ म्हणतात, त्या हिन्दी शब्दाच्या मराठी अर्थाच्या जवळ जाणारी. गांवी जायचं तर यश्टीचं तिकीट काढायला रात्रीपासूनच बाॅम्बे सेन्ट्रल डेपोला झोपायला जायचे लोक. खाजगी गाड्यांची मिजास तर फक्त टाटा-बिर्लांसारखे उद्योगपती किंवा चित्रपट तारे आणि तारका यांचीच असायची..विमानप्रवास तर स्वप्नातही नव्हता. किंबहूना विमान हे फक्त बड्या लोकांसाठी किंवा तुकारामादी संतांसाठीच असतं हा समज होता. फार फार तर सांताक्रुज विमानतळावर तेंव्हा तिकिट काढून बाहेरून विमान बघता यायचं, तेवढाच कायय तो त्या काळच्या लोकांचा विमानाचा संबंध.
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात मात्र ही परिस्थिती झपाट्याने बदलली. देशाने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्विकार केला आणि देशातील लोकांचा, विशेषत: मध्यमवर्गाचा, जगण्याचा आयामच बदलून गेला. मध्यम वर्गाच्या हातात पैसा खुळखुळू लागला. ‘हम दो-हमारे दो’ ही आता पूर्वीसारखी सरकारी घोषणा राहीला नसून, हे तत्व जगण्यात प्रत्यक्ष दिसू लागलं होतं. छोट्या कुटूंबाचं महत्व सर्वांनाच पटून लागून कुटुंबाचा आकार चौकोनाकडून त्रिकोणाकडे वाटचाल करु लागला होता. एव्हाना नवरा-बायको नोकरी करू लागले होतेच. दोघांचं उत्पन्न आणि खर्च तुलनेत कमी होऊ लागला होता.
याच सुमारास DD 1 आणि DD 2 टिव्ही चॅनलची सद्दी बाजूला सारून केबल टिव्हीचं राज्य सुरू झालं होतं. टिव्ही रंगीतही झाला होता व टिव्ही घेणाऱ्यांची संख्याही बरीच वाढली होती. टिव्ही अत्यावश्यक गरज झाली होती आणि सॅटेलाईट चॅनेल्सच्या आगमनानंतर तर २४ तास कार्यक्रम पाहाता येऊ लागले होते. या टिव्हीतून बाहेरचं कधी न पाहिलेलं जग, चक्क पडद्यातून घरात उतरू लागलं होतं. हे जग मध्यमवर्गाला साद घालू लागलं होतं. टिव्हीने अनेक आवश्यकता नसलेल्या आणि तोवर त्या नसल्याने काही बिघडत नसलेल्या वस्तूंची लोकांना चटक लावली. ही यादी बरीच मोठी होईल. त्याच सोबत टिव्हीवे लोकांना साक्षात दाखवलं जग. आजवर कल्पनेतच पहिलेलं किंवा प्रवासवर्णणातून वाचलेलं जग, लोकांना टिव्हीच्या पडद्यावर दिसू लागलं आणि हाती पैसा खुळखुळणाऱ्या मध्यम वर्गाचा कल ते जग प्रतिअक्ष पाहाण्याकडे होऊ लागला..इथून पुढे देशाटन हा शब्द हळूहळू नाहीसा होत गेला आणि त्याची जागा पर्यटन या शब्दाने घेतली. ही आपल्या देशातील पर्यटनाची आणि पर्यटन व्यवसायाचीही सुरुवात होती..देश-परदेशातील पर्यटनाच्या वाढलेल्या महत्वामागे टिव्हीच्या छोट्या पडद्याचं मोठं महत्व आहे, हे नाकारुन चालणार नाही.
आता नमनाला पिंपभर तेल झाल्यावर आता माझ्या मुख्य मुद्द्यावर येतो. आजवर मे महिन्याच्या सुटीत मामाच्या गांवाला जाणं किंवा एखाद्या तिर्थक्षेत्राला भेट देणारी लोकं, आता चक्क देश पाहायला बाहेर पडू लागली. परदेश प्रवासही हळुहळू आवाक्यात येऊ लागला होता. जग बघायची उत्सूकता वाढू लागली होती आणि ती उत्सुकता शमवण्याकडचा कल ही वाढत होता.
हे पर्यटन विविध कारणाने होऊ लागलं होतं. कुणी रुटीनमधे बदल म्हणून परगांवी जाऊ लागलं होतं, तर कुणी फक्त आरामासाठी म्हणून. कुण देश किंवा परदेशातली विविध प्रसिद्ध टिकाणं पाहायला म्हणून बाहेर पडू लगलं होतं, तर कुणाला निसर्गाच्या सानिध्यात चार दिवस घलवावे म्हणून पर्यटन करु लागले होते. कुणाला विविध ठिकाणचे समुद्रकिनारे साद घालत होते, तर कुणी पायी पायी डोंगर, दऱ्या-खोऱ्या पालथे घालत होते. कुणाला एखाद्या विवक्षित ठिकाणचा सुर्योदय तिकडे खेचून आणत होता, तर कुणाला सुर्यस्त..! प्रत्येक व्यक्तीची पर्यटनाची कल्पना वेगवेगळी असते आणि ती त्या व्यक्तीपुरती बरोबरही असते. शेवटी कुणाची आवड कशी आहे त्यावर हे सर्व अवलंबून असतं.
मलाही पर्यटनाला जायला आवडतं. गेलेल्या ठिकाणची प्रसिद्ध स्थळं पाहाणं तर आवडतच पण त्याच परिसरातलं एखादं अपरिचित ठिकाण पाहायलाही आवडतं. परंतू मला सर्वात जास्त काय पाहावसं वाटतं, तर विविध ठिकाणची माणसं, त्यांची भाषा, त्यांच्या जगण्याच्या पद्धती, वेशभुषा इत्यादी इत्यादी. मला हरिद्वार-ऋषिकेशच्या गंगातिरावर तासनतास गंगेकडे पाहात बसायला आवडतं. गंगेच्या तिरावर उमडलेल्या छोट्या भारताचा एक लहीनसा हिस्सा होऊन स्वत:च विशाल भारत झालेलं पाहायला आवडतं.
नदीला आपल्या संस्कृतीत स्त्रीरुप मानून तिला देवीचं स्थान दिलंय. नदी आणि वास्तवातल्या स्त्रीमधलं एक साम्य पर्यटनात अनुभवता येतं. सर्वच विवाहीत स्त्रीयांना, त्यांचं वय कितीही असलं तरी, माहेराची एक अनावर ओढ असते. स्त्री आणि माहेर हे नातं, नदीतही पाहायला मिळतं. सागराच्या दिशेने सासरी निघालेली सरीता, वाहताना मधेच एखाद्या ठिकाणी एका अनावर ओढीने ती तीच्या उगमाच्या, म्हणजे माहेराच्या दिशेने वळते, ते स्थान ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून पावन होतं. चंद्रभागेच्या हळुवार वळणात वसलेलं पंढरपूर किंवा गंगेच्या कुशीतलं हरीद्वार..! चंद्रभागेच्या तिरावर हात जोडू तिचं मनोभावे दर्शन घेणारी दक्षिणेतली स्त्री आणि हरिद्वारी गंगेच्या आरतीत भान हरपून सहभागी होणारी उत्तेरतली स्त्री, मला वेगळी वाटत नाही.. या स्त्रीया आणि गंगा-चंद्रभागा या दोघींच्याही मनातला, “कन्या सासुरासी जाये, मागे परतूनी पाहे..! तैसे झाले माझ्या जीवा, केंव्हा भेटसी केशवा..!!” हा साम्यभाव मला मोहवून जातो. नद्यांच्या तिरावरील वसलेली आपली आपली बहुतेक सर्वच तिर्थक्षेत्र, तिच्या तिरावरील वळणांच्या कुशीत का आहेत, याचं उत्तर इथं मिळतं. मी फिरायला जातो, ते हे अनुभवायला..नुसतं एखाद्या तिर्थक्षेत्री जाऊन देवदर्शनात रमायला मला नाही आवडत.
“अगर फ़िरदूस बार रुह-ए-झमीं अस्तो,
हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्तो” अशी काश्मिरची तुलना स्वर्गाशी करणाऱ्या मुघल सम्राट जहाँगिरच्या काश्मिरमधल्या श्रीनगरच्या माजिद हुसेनसारख्या अनेकांचं नरकमय झालेलं जीवन पाहून कासाविस व्हाय, तर एके काळी दहशतवादी असलेल्या, परंतू त्यातील राजकारणाची कडू चव घेऊन परत मुख्य प्रवाहात आलेल्या गुलमर्गच्या राजासाबशी गप्पा मारत त्याचं एक दहशतवादी ते आशावादीमधे झालेलं स्थित्यंतर अनुभवाचला आवडतं..
मेघालयात गेल्यावर त्या ठिकाणाला इंदीरा गांधींनी ‘मेघालंय’ का म्हटलं आणि अरुणाचलाला, ‘अरुणाचल’ का म्हणतात, हे समजून घ्याला मला आवडतं..! देव-देवतांपेक्षा त्यांच्या सभोवती असलेल्या अनेक लोककथा, आख्यायिका ऐकायला आणि त्याचा अर्थ लावत बसायला आवडतं..उत्तराखंडातल्या जिम काॅर्बेट अभयारण्यात असलेल्या प्रसिद्ध ‘गार्जिया माते’च्या मंदीरात गेल्यावर, वास्तवात ती अपभ्रंशीत ‘गिरीजा माता’ असल्याचा मला झालेला बोध, अंतिम सत्याचा बोध झाल्यानंतर गौतम बुद्धाना झालेल्या आनंदापेक्षा वेगळा नव्हता..
मला पर्यटनात तिकडचं लोकजीवन अनुभवायला आवडत आणि हजारो मैलांवरच्या त्या लोकांच्या आणि आपल्या जगण्यातला सारखेपण अनुभववासा वाटतो. ट्रेन-बसच्या सेकंड क्लासच्या प्रवासात भेटणारी-दिसणारी साधी माणसं आणि एसी टू-थ्री टायर व हवाई अड्यांवरच्या प्रवासातली एलिट माणसं यांच्या ‘माणुसपणा’तील तफावत अनुभवाचला मला नेहेमी आवडतं.
मला आश्चर्य वाटतं ते विविध ठिकाणी पर्यटनाला जाऊनही ‘घरच्या सारखं जेवण’ मिळालं पाहिजे या अनेकांच्या अटीचं..खरं तर ज्या ठिकाणी आपण धा-पाच दिवसांसाठी फिरायला जातो, तिकडच्या पद्धतीचं खाणं खाल्ल्याशिवाय तो प्रदेश नीट समजत नाही, असं आपलं माझं मत. थंड उत्तरेत राजम्याची चव काही वेगळीच लागते आणि उत्तरेतल्या गरम डोक्यांचं रहस्यही कळून येतं. तेच गुजरातेतील गुर्जर स्त्रीया आणि त्या भाषेतील अक्षरं गोलाकार का, याचा पत्ता गुजरातेतील दह्या दुधाने भरलेल्या थाळीतून लागतो..गोल आणि गोड गुजरातेत जाऊन अनुभवलं नाही तर गुजरात काय कळणार आपल्याला..! दक्षिणेतील प्रदेशात भात आणि भातांचे पदार्थ जास्त का, याचं उत्तर विज्ञान त्याच्या रुक्ष व्याख्येतून देईल कदाचित, पण तिकडच्या तुकतुकीत काळ्या वर्णाला पांढऱ्या भाताचं आकर्षण असतं, हे कुठल्याही पुस्तकात नसलेलं वेगळंच, परंतू पटणारं उत्तर तिकडची भाताची विविध पांढरी व्यंजनं अनुभवल्याशिवाय नाही कळणार..
‘केल्याने पर्यटन,पंडित मैत्री,सभेत संचार ! शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार..!!’ या मोरोपंतांच्या आर्येतलं चातुर्य गवसण्यासाठी ‘पर्यटन’ हेच एकमेंव क्षेत्र सध्या निर्मळ रुपात उपलब्ध आहे. पंडीतांची जागा खरी कमी आणि खोटी जास्त माहिती देणाऱ्या स्मार्ट फोनने घेतलीय, सभा फक्त गलिच्छ भाषेत एकमेकांवर आरोप करणाऱ्या राजकीय नेत्यांच्याच उरल्यात आणि शास्त्र-ग्रंथ वाचनाची सवयच राहीलेली नाही. या सर्व परिस्थितीत केवळ पर्यटन हेच एकमेंव क्षेत्र शहानपणा येण्यासाठी शिल्लक राहीलंय. पर्यटनातून नेमकं काय शिकायचं हे ही आपल्याच हातात आहे. आपण जातो त्या ठिकाणाबद्दल थोडंसं कुतुहल जागृत ठेवलं की, बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टी कळतात.
मी पर्यटन का करतो, हे सांगण्यासाठी या लेखाचं प्रयोजन. ठराविक कारणासाठी केलेलं पूर्वीचं देशाटन ते अनेक कारणांसाठी आपण करत असलेलं आधुनिक पर्यटन हा दीर्घ प्रवास करताना, आपण नेमकं त्यातून काय साधावं, हे ज्याचं त्याने ठरवावं.. !!
— नितीन साळुंखे
9321811091
13.06.2018
लेख चांगला जमला आहे फक्त सुवासिक तादळात मध्ये मध्ये खडे लागावेत तसे ‘अशुद्धलेखनाचे’ खडे टोचतात – दुरुस्ती करावी ही विनंती