नवीन लेखन...

देशभक्तीचा दीक्षामंत्र ‘वन्दे मातरम्’चे असाधारणत्व

‘वन्दे मातरम्’ ज्या ‘आनंदमठ’ कांदबरीचा भाग आहे, ती एका ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित कादंबरी आहे. ती ऐतिहासिक घटना ‘संन्याशांचा उठाव’ म्हणून भारतीय इतिहासात प्रसिद्ध आहे. हा उठाव वर्ष १७६२ ते १७७४ या काळात बंगालमध्ये झाला होता.

थोर वंग देशभक्त बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म २६ जून १८३८ या दिवशी बंगाल प्रांतात झाला. बंकीमचंद्र हे वन्दे मातरम् या राष्ट्रीयगीताचे रचयिते आहेत. वर्ष १८७६ मध्ये त्यांच्या ‘आनंदमठ’ या सुप्रसिद्ध कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी वर्ष १८८२ मध्ये प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले. त्याचा ब्रिटिश शासनाला किती तिटकारा होता, तो पुढील प्रातिनिधिक प्रसंगावरून आपल्याला सहज लक्षात येईल.

• ‘वन्दे मातरम्’चा जयघोष केल्यामुळे इंग्रज शासनाने अभियोग भरणे
• बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांचे जन्मस्थान : कंतलप्हरा, तालुका नेहटा, जिल्हा हावडा, बंगाल.
• स्वातंत्र्यलढ्यात उतरण्यासाठी असंख्य क्रांतीविरांना प्रेरणा देणारे परमपवित्र गीत ‘वन्दे मातरम्’ बंकीमचंद्रांनी रचले, ते याच खोलीत ! आता येथे संग्रहालय करण्यात आले आहे.
• बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या संग्रहालयाची वास्तू

‘२७ सप्टेंबर १९०६ या दिवशी दसर्‍यानिमित्त नाशिक येथील कालिकेच्या मंदिराकडून सीमोल्लंघन करून परतणार्‍या तरुणांनी ‘वन्दे मातरम्’चा जयघोष केला. तो ऐकून एका पोलिसाने ‘बोंब मारणे बंद करा’, असे म्हणत बाबाराव सावरकर यांच्या अंगावर हात टाकला; मात्र त्या पोलिसावरच पश्‍चात्तापाची पाळी आली. बाबांसकट सर्वांनीच त्या पोलिसाला ठोकून काढले.
या प्रसंगाने संतप्त झालेल्या ब्रिटिश सरकारने ११ तरुणांवर अभियोग भरला. ‘वन्दे मातरम् अभियोग’ या नावाने तो गाजला. यात बाबाराव मुख्य आरोपी होते. नाशिक जिल्ह्यात हा अभियोग निरनिराळ्या ठिकाणी सहा महिने चालला; कारण न्यायाधीश फिरतीवर असत आणि ते असतील तेथे हा अभियोग चालत असे. या अभियोगात बाबारावांना २० रुपये दंड होऊन मोठ्या रकमेचा प्रतिभू (जामीन) मागण्यात आला. अन्य तरुणांनाही अशाच प्रकारच्या शिक्षा झाल्या.’

या प्रातिनिधिक घटनेतून आपल्याला ‘वन्दे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा अविभाज्य घटक झाल्याचे लक्षात येईल, किंबहुना ‘वन्दे मातरम्’शिवाय भारतीय स्वातंत्र्यलढा हा अपूर्णच म्हणावा लागेल. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीयगीत आजही म्हणजे ते रचल्यानंतर १५० वर्षांनीही राष्ट्राभिमान्यांमध्ये जाज्वल्य राष्ट्रभक्ती, भारतभूमीविषयी असामान्य प्रेम निर्माण करण्यात सिंहाची भूमिका निभावते. त्यामुळे हे गीत रचणार्‍या बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांच्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ती न्यूनच आहे, हे अधोरेखित करण्याजोगे सूत्र !

देशभक्तीचा दीक्षामंत्र : वन्दे मातरम् आणि बंकिमचंद्र

वन्दे मातरम् हे राष्ट्रगीत वर्ष १८८० मध्ये बंगाली देशभक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या आनंदमठ या एका ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित कादंबरीत लिहिले आहे. ही कादंबरी ज्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे, ती घटना संन्याशांचा उठाव म्हणून भारतीय इतिहासात प्रसिद्ध आहे. हा उठाव वर्ष १७६२ ते १७७४ या काळात बंगालमध्ये झाला होता. यासंबंधीचे ऐतिहासिक पुरावे आजही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

१. अन्यायी-अत्याचारी मुसलमान आणि इंग्रज यांच्या पिळवणुकीने हिंदु प्रजेवर त्राही भगवानची स्थिती आणणे

वर्ष १७६२ ते १७७४ हा संन्याशांच्या उठावाचा काळ ऐतिहासिकदृष्ट्या लक्षात घेतला पाहिजे. वर्ष १७६२ मध्ये कलकत्त्याचा नबाब मीर कासिम अली याच्याशी ईस्ट इंडिया कंपनीचा एक व्यापारी ठराव (करार) झाला होता. वर्ष १७६३ मध्ये इंग्रजांनी मीर कासिमला गादीवरून पायउतार केले आणि आपल्याला सोयीस्कर अशा मीर जाफरला गादीवर बसवले. याच वर्षी बक्सरची लढाई होऊन इंग्रजांनी शहा आलमचे अधिकार काढून घेऊन त्याला निवृत्तीवेतन चालू केले आणि बंगालच्या राजकीय नाड्या आपल्या हाती घेतल्या. वर्ष १७६५ मध्ये कलकत्त्याच्या नबाबाने इंग्रजांपुढे शरणागती पत्करली (१२ ऑगस्ट १७६५) आणि रॉबर्ट क्लाईव्हने बादशाही आज्ञापत्राने (फर्मान) बंगालचे नागरी अधिकार (दिवाणी) मिळवले.

याचा अर्थ बंगाल, बिहार आणि ओडिशा या प्रांतांचे राजस्व गोळा करण्याचे (करवसुली) सर्व अधिकार इंग्रजांना मिळाले. त्यातूनच इंग्रजांनी आपली अधिसत्ता (अंमल) या प्रदेशावर स्थापन केली. ही परिस्थिती अशी विलक्षण आणि विचित्र होती की, कर गोळा करायचे अधिकार इंग्रजांकडे; पण प्रजारक्षणाचे उत्तरदायित्त्व मात्र नबाबाकडे म्हणजे स्थानिक मुसलमानी सत्तेकडे ! त्यामुळे इंग्रजांच्या नवीन आणि मुसलमानांच्या जुन्या पारंपरिक अन्यायी-अत्याचारी (जुलूम जबरदस्ती) पिळवणुकीने हिंदु प्रजेला त्राही भगवान करून सोडले. याचाच परिपाक म्हणून संन्याशांचा उठाव झाला. म्हणजेच तो एकप्रकारे स्वराज्याचाच लढा होता.

२. संन्याशांच्या उठावाने मुसलमानी अन् इंग्रजी अशा संयुक्त सैन्याचा पराभव करणे

या संन्याशांनी वर्ष १७६३ मध्ये उठाव करून बंगालमधील बकरगंजच्या आजूबाजूचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली घेतला आणि ढाक्याची इंग्रजांची वखार कह्यात घेतली. वर्ष १७६८ मध्ये त्यांनी इंग्रजांशी बिहारमधील सरन मंडलात (जिल्ह्यात) संघर्ष केला. वर्ष १७७० मध्ये हे स्वातंत्र्यसैनिक दिनाजपूर मंडलात उतरले. तेथून ढाका आणि राजशाही मंडलाचा उत्तर भाग त्यांनी पादाक्रांत केला आणि आपला दणदणीत प्रभाव निर्माण करून तत्कालीन सत्ताधार्‍यांना सळो कि पळो करून सोडले. वर्ष १७७२ मध्ये पूर्णिया, तिरहुत आणि दिनाजपूर या भागांत खोलवर चढाई करून रंगपूरजवळ मुसलमानी अन् इंग्रजी अशा संयुक्त सैन्याचा मोठा पराभव केला. या पराभवापर्यंतचे वर्णन बंकिमचंद्र यांनी आनंदमठ मध्ये केले आहे.

३. आनंदमठात उठावासंदर्भातील असलेले वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख

अ. आनंदमठाच्या तृतीय खंडात पृष्ठ १११ वर संतानांच्या या उठावाविषयी म्हटले आहे, मुसलमानी राज्यातील अराजकता (बेबंदशाही) आणि स्वैराचार (अंदाधुंदी) यांमुळे सर्व लोक रुष्ट (नाराज) झाले होते. हिंदु धर्माचा लोप झाल्यामुळे हिंदु प्रजा हिंदुत्वाच्या पुनर्स्थापनेसाठी अत्यंत उत्सुक झाली होती.

आ. तिसर्‍या खंडात मुख्य मोठी लढाई संतांंनी जिंकल्याची माहिती आहे.

इ. त्यानंतर चालू होणार्‍या चौथ्या खंडाच्या आरंभी पहिल्याच प्रकरणात पृष्ठ क्र. १५२ वर या विजयाचे जे वर्णन आले आहे, त्यात म्हटले आहे, सर्वजण म्हणू लागले, मुसलमान पराभूत झाले. देश पुन्हा हिंदूंचा झाला आहे. सर्वजण मिळून मुक्तकंठाने हरिनामाचा जयघोष करूया.

४. आनंदमठात हिंदु राज्य स्थापनेचा अनेक ठिकाणी उल्लेख !

तत्कालीन अन्यायी, अत्याचारी मुसलमानी सत्ता नष्ट व्हावी आणि या देशाचे खरेखुरे स्वामी जे हिंदू त्यांच्या हाती राजसत्ता यावी, म्हणजेच स्वराज्य स्थापन व्हावे, हा विचार आनंदमठात अनेक ठिकाणी व्यक्त झाला आहे आणि तो न्यायही आहे, हे महाराष्ट्रातील शिवकालीन परिस्थिती लक्षात घेतली, तर सहजच पटेल.

देहलीच्या मोगली मुसलमानी सत्तेसह दक्षिणेतील ४ मुसलमानी पातशाह्या यांच्या कचाट्यातून हिंदूंची मुक्तता करावी आणि हिंदूंचे राज्य म्हणजेच स्वराज्य स्थापन करावे, यासाठीच छत्रपती शिवाजी महाराज कटिबद्ध झाले अन् रायगडावर हिंदूंचा छत्रपती म्हणून स्वतःला त्यांनी रीतसर राज्याभिषेक करून घेतला. हा महाराष्ट्रातील स्वराज्य स्थापनेचा इतिहास आहे, हे आपण सर्वजण गौरवास्पद, अभिमानास्पद, न्यायाला धरून आणि इष्ट मानतो. तसेच बंगालमध्येही तत्कालीन मुसलमानी राजसत्तेच्या अत्याचारी वरवंट्याखाली भरडल्या जाण्यार्‍या हिंदूंची मुक्तता करावी आणि त्यांच्याच सामर्थ्याने तेथे स्वराज्य संस्थापना व्हावी, हे उद्दिष्टही तितकेच न्यायसंगत, गौरवास्पद आणि इष्ट ठरायला आडकाठी नसावी. आनंदमठात अशा हिंदु राज्य स्थापनेचा म्हणजेच स्वराज्य स्थापनेचे उद्दिष्ट म्हणून उल्लेख अनेकदा आलेला आहे. अर्थात्च एका शतकापूर्वी घडून गेलेल्या इतिहासाशी याचा संबंध होता, म्हणजेच तो इतिहास होता आणि त्यातील उद्देशही स्पष्ट होता.

५. आनंदमठ हे अत्यद्भूत राजकीय परिणाम केलेले पुस्तक ! – एनसायक्लोपीडीया ब्रिटानिका

अशी ही आनंदमठ कादंबरी एका ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारलेली आहे; परंतु केवळ तो इतिहास सांगण्यासाठी ती लिहिली गेली नसून, इतिहास घडवू इच्छिणार्‍यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याकरता तिचा जन्म झाला आहे. ही कादंबरी आणि त्यातले ते अमर गीत वंदे मातरम् हे दोन्ही क्रांतीकारी ठरले. अत्यद्भूत राजकीय परिणाम केलेले पुस्तक, असे जे या कादंबरीचे वर्णन एनसायक्लोपीडीया ब्रिटानिकाने केले आहे, ते खरोखरीच यथार्थ आहे.

जय हिंद…!! वंदे मातरम्..!!

संदर्भ : आनंदमठ, मराठी अनुवाद-श्रीपाद जोशी.

— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..