नवीन लेखन...

देशोदेशींचे ज्ञानेश्वर

काही पोस्ट Whatsapp वर नियमितपणे फिरत असतात.  त्यातील एका पोस्टचा सारांश  असा.

“शास्त्र हे तर्क व सिद्धांत सिद्ध करण्याच्या कसोटीवर सिद्ध होते. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मारुती स्तोत्रातील सहा दाखले व विज्ञानातल्या संबंधित शोधांमधे साम्य आहे. अलीकडच्या काळातील या संकल्पना ३५० वर्षापूर्वी भारतातील संतांना माहीत होत्या. भारतीय विद्वानांना संतपदी बसविण्यात आले, त्यामुळे आपल्याकडील ज्ञानी लोकांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली नाही. फक्त मनन व चिंतनातून शोधनिबंधाच्या तोडीचे साहित्य विद्वानांनी निर्माण केले आहे. मग त्याला जगन्मान्यता का मिळत नाही?”

विज्ञान शाखा उदयाला येण्याआधी सर्व ज्ञान हे तत्वज्ञान या शाखेत मोडत असे. भारतात तसेच इतर देशात प्रसिद्ध तत्वज्ञ होऊन गेले. निसर्गातील प्रक्रियासंबंधीची त्यांची मते समाज मान्य करीत असे. किंबहुना अशा व्यक्तिंची वैयक्तिक समजूत समाजमनावर गारूड करीत असे. विज्ञान शाखेचा उदय झाला व शास्त्रज्ञ, वैज्ञानिक या उपाध्या अस्तित्वात आल्या.  तत्वज्ञ व वैज्ञानिक यांच्यातील मतभेदांचे निराकरण बहुतांशी तत्वज्ञाच्या कलाने होत असे. चर्च व गॅलिलीयो यांच्यातील पृथ्वीकेंद्री व सुर्यकेंद्री या प्रारुपांमधील वाद प्रसिद्ध आहे. विज्ञानपूर्व काळात पोप सुद्धा संतपदी होते. गॅलिलीयो सत्य सांगत होता हे मान्य करायला चर्चला ३०० हून जास्त वर्षे लागली. दरम्यानच्या काळात सूर्यकेंद्री प्रारुप जगाने स्वीकारले होते. तरी चर्चने मागासलेपणाचे प्रदर्शन केले. गॅलिलिओने सुरू केलेली प्रायोगिक विज्ञानाची परंपरा पुढे जात राहिली. आईनस्टाईन व स्टीफन हॉकिंग यासारखे सैद्धांतीक शास्त्रज्ञ तितकेच महत्वाचे आहेत. त्यांच्या संकल्पना व त्यातून निघणारे निष्कर्ष यावर प्रायोगिक शास्त्रज्ञ काम करीत आहेत.

भारताचा मूलभूत संशोधनातला वाटा फार कमी आहे. एखाद्या नैसर्गिक घटनेचा उलगडा पश्चात्यांनी करून दाखविला व नवीन संकल्पना रूढ होऊ लागली की आपण ‘Reverse Engineering’ सुरू करतो. शोध-शोध शोधून कुठल्यातरी पुराण वाङ्ग्मयातील उल्लेखांचा आधार घेतो. सदर संकल्पना आपल्या पूर्वजांना अगोदरच कशी माहीत होती या गृहीतकाच्या दिशेने पुराव्यांची व दाखल्यांची रचना करतो. आपल्या देशाने किती ज्ञानसाठा पुर्वीच करून ठेवला आहे याचा बोलबाला करतो. फक्त आपल्याच देशात हा विषय चर्चिला जातो. इतर कोणताही देश याची दखल घेत नाही. डॉ. जयंत नारळीकर यांनी या प्रकारला ‘Post-diction’ म्हटले आहे. आपल्या देशात ‘Pre-diction’ करणारांची उणीव आहे.

ज्ञानेश्वर प्रभ्रुति संतांनी सांगितलेले काही दाखले आज विज्ञान या शाखेत मोडतात. इतर प्राचीन भारतीय ग्रंथ आणि वेद याबद्दलही असे म्हणता येईल. त्या काळी तशी शाखा नसल्याने ते तत्वज्ञान ठरले. जर आपण असा दावा करीत असु की पाश्चात्यांनी आपले ग्रंथ पळवून नेले व त्याद्वारे विज्ञानात प्रगती केली, वा आपले ग्रंथ क्लिष्ट भाषेत लिहिलेले आहेत, तर, अशा दाव्यातून आपण आपला पराभव मान्य करत असतो. आपल्यापाशी जी ग्रंथसंपदा शिल्लक उरली आहे त्यात कोठेतरी आजवर न उकललेल्या कोड्याची, न समजलेल्या संकल्पनेची बीजे असु शकतील. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, विश्वरचनाशास्त्र या विषयांचे बरेच ज्ञान भारतीयांना पुर्वीपासून होते असे आपण म्हणतो, पण ते पाश्चात्यांनी शोधून जगापुढे मांडल्यावर, आधी नाही. एखादे नवीन भाकित पश्चात्यांच्या आधी करण्यासाठी चिंतन-मनन करणारे वैज्ञानिक भारतात तयार व्हायला हवेत. पुढे ते भाकित सिद्ध व्हायला हवे. या मेहनतीचे फळ स्वतःकडे घेताना आधारभूत ग्रंथ व त्याचे ग्रंथकार यांना त्यांचा वाटा मिळायला हवा. तेव्हा व तेव्हाच आपले ज्ञानदेव, समर्थ रामदास वगैरे जगन्मान्य पावतील.

आजच्या काळात वैज्ञानिक संशोधन हे एकट्याचे काम राहिलेले नाही. अनेक व्यक्ती, संस्था, देश यांचा सहभाग आवश्यक  झाला आहे. नवीन शोध, निसर्गाच्या नियमांची उकल ही क्षेत्रे वेगाने प्रगती करीत आहेत. या स्पर्धेत टिकणे हे एक आव्हान आहे. आपल्या विद्वानांना जगन्मान्यता मिळावी ही अपेक्षा रस्तच आहे. आपल्या आद्य संतांना आजच्या वैज्ञानिकांच्या पंगतीत बसविण्यासाठी आपल्या वैज्ञानिकांनीच प्रयत्न केले पाहिजेत.

या सगळ्यासाठी एकच पथ्य पाळावे लागेल. आम्ही कोण होतो याची टिमकी वाजविणे सोडून देऊन, आम्हीही कोणी आहोत हे सिद्ध केले पाहिजे.

— रविंद्रनाथ गांगल 

 

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..