नवं वर्षाच्या प्रथम दिनी सहज लेखा -जोखा घेत होतो. फेब्रुवारी १०, २०२० ला थिएटर मध्ये जाऊन ” शिकारा ” हा चित्रपट पाहिलेला आणि दुसऱ्याच दिवशी त्यावर ” चेहेरा-पुस्तिकेवर ” लिहिलं होतं. त्यानंतर आजपर्यंत चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघितलेला नाही, पण २०२० साली चित्र /नाट्य विषयांवर तब्बल ३६ नोंदीवजा लेखन झालंय चेहेरा-पुस्तिकेवर ! कोरोना च्या कृपेने दूरदर्शन आणि लॅपटॉप च्या पडद्याला डोळे डकवून घेतल्याचा परिणाम. त्याबद्दल कोरोना चे “आभार” (?)
दोन दिवसांपूर्वी सकाळी सकाळी धर्मेंद्र-माला सिन्हा वाला ” आँखे ” पाहिला. भुसावळला प्रिमियर रिलीज झालेला बहुधा पहिला चित्रपट होता तो ! किमान सर्वदूर जाहिरात तरी तशी केलेली ठळकपणे आठवते. ” अमरदीप ” टॉकीज ला ” आँखे” लागला होता आणि सकाळी सहा वाजता पहिला शो होता, हेही ध्यानात आहे. वेड्यासारखी गर्दी लोटली होती रामप्रहरात ! करमणुकीची मर्यादित साधने आणि प्यारा धरम एवढे पुरेसे होते. चित्रपट ५० आठवडे (अबब, आज चित्रपटांचे आयुष्य ” शुक्रवार ते रविवार” असण्याच्या पार्श्वभूमीवर हे आश्चर्यच ) धो धो चालला. नाही म्हणायला “राजश्री ” चे विभागीय वितरण कार्यालय चक्क भुसावळला होते, म्हणूनही भुसावळची निवड झाली असावी ” आँखे ” च्या प्रिमियर रिलीज साठी ! कोणास ठाऊक?
मी त्यावेळी अर्थातच तो पाहिला नाही. चित्रपट बघण्यावर कौटुंबिक रेशन असल्याने पांढरा पडदा क्वचितच डोळ्यांना दिसत असे. मोठेपणी ती कसर भरून काढली. २०२० चा वरील उल्लेख ( चित्रपट गृहातील पडद्यापासून दूर राहण्याचा ) हा आजवरचा लादलेला असह्य अपवाद ! मग मित्रांकडून युद्धकथा ( शत्रू, हेर वगैरे) “ऑ ” करून ऐकत बसायचो. त्या आसपास ” ललकार ” नामक दुसरा लष्करी चित्रपट आला. पुन्हा धर्मेंद्र/माला सिन्हा जोडगोळी.
पुढे कधीतरी ” आँखे ” पाहिला – ” मिलती हैं जिंदगी में मोहब्बत कभी -कभी ” मधला मधाळ , तलमपणा स्वप्नात येण्याच्या काळात ! आणि
” गैरों पे करम , अपनो पें सीतम
ए जाने -वफा, ये जुल्म ना कर !! ” हे तर फारच उशिरा समजलं.
आम्ही फक्त ” इंटरनॅशनल फकीर ” गुणगुणत राहिलो. असतं असं एकेक वय – मेहमूद , धुमाळ ची धमाल अनुभवण्याचं आणि त्या चित्रपटातील एका “अनाम ” राजकुमारीचं सौंदर्य गप्पांचा विषय करण्याचं ! तो चित्रपट यथातथाच असला तरी त्या काळातील देशप्रेमाला ( चीन- पाक, युद्ध ) चेतविणारा होता. त्याआधीचा ” हकीकत ” (पुन्हा धर्मेंद्र) अधिक वरच्या यत्तेतला होता. ( मला वाटतं “ही-मॅन धर्मेंद्र= लष्करातील जवान” असं इक्वेशन त्याकाळी फिट्ट असावं.)
आजकालचे ” उरी, मिशन मंगल, पोखरण ” अधिक सजीव आणि देशप्रेमाच्या वेगवेगळ्या पण गोळीबंद देशकथा आहेत. त्यामध्ये संगीत, नृत्य, अभिनय काहीसे दुय्यम आणि जाज्वल्य देशप्रेम पहिल्या फळीत. ” हाऊ इज द जोश ” वाले !
पण सगळेजण एकत्रितपणे देशभावना प्रज्वलित करणारे !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply