आपण माणसे हजारो वर्षापासून फक्त देवावर विश्वास ठेऊन जगत आलो. पण खरंच देव असं काही अस्तित्वात आहे का ? हा प्रश्न मला मी अगदी लहान असल्यापासून भेडसावतो ! आज आजूबाजूला जेव्हा मी करोडो रुपये खर्चून लोक देवाची मंदिरे बांधण्याचा अट्टहास करताना दिसतात तेव्हा त्याची कीव येते . स्वतःला समाजाचे सेवक म्हणवून घेणारे नेतेही यांच्यात मागे नाहीत. हा ! एकीकडे देशात लाखो लहान मुले कुपोषणाने मरत असताना आम्ही डिजिटल इंडियाच्या घोषणा करायच्या किती हा विरोधात भास. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कि त्यांची दखल घ्यायची ! स्त्रियांवर बलात्कार झाले मग स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणायचा . खरंच आजच्या जगात पाप – पुण्याचा हिशोब होतो की ती फक्त कल्पना आहे ? आम्हाला दोन वेळ पोटभर खायला मिळतंय तरी आम्ही दुःखी आहोत ! मग आम्ही त्या कुपोषित बालकांची व्यथा कशी जाणून घेणार ? मी , माझे कुटुंब, माझ्या गरजा, माझी स्वप्ने आणि माझे भविष्य जे आज जगात कोणालाच माहीत नाही त्याची काळजी करण्यात आम्ही आमचे आयुष्य खर्ची घालतोय . या पलीकडे पाहायला आम्हाला वेळच मिळत नाही उलट आजच्या स्वार्थी जगात चांगुलपणाने जगणाऱ्या लोकांनाच अधिक त्रास होताना दिसतोय ! मग लोक आपले आयुष्य लोकांच्या भल्यासाठी का खर्ची घालतील ? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर सापडत नाही देवाजवळ देऊळातही !
समाजासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्याची किंमत जर समाज त्याच्या जवळ असणाऱ्या संपत्ती वरून ठरविणार असेल तर समाजसेवेला काही अर्थच उरत नाही ! अजून किती दिवस आपण मंदिर, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम बांधत राहणार आहोत ? हा प्रश्न कधीच कोणाला स्वतःला का विचारावासा वाटत नाही ? देशाची लोकसंख्या गगनाला भिडत असताना फक्त धर्माच्या नावावर लोकांना अधिक पोर काढण्याचे सल्ले दिले जातात ! देशाचे जागरूक नेते यावर ब्र ! काढत नाहीत ! देशात दहा पोरं काढून देशात चांगले दिवस येणार आहेत का ? आपल्या देशात समस्या सोडविली जात नाही फक्त समस्येवर उपाय शोधले जातात दुदैवाने ! आज देशातील खेडी कमी करून नवीन शहरे वसाविण्याचा अट्टहास केला जातोय ! पण भविष्यात शेती कोण करणार ? आणि शेतीच झाली नाही तर करोडो लोक खाणार काय ? यंत्रे ! आपल्या देशातील लोकांनी यंत्रांना जवळ केले स्वतः यंत्रांचे गुलाम झाले पण तरीही त्या यंत्रांची पूजा करताना देव समरणातून जात नाही.
अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करणे हे सरकारचे आणि देवाचं काम आहे पण ते काम ते दोघेही करताना दिसत नाहीत दुर्दैवाने ! विमा योजना ही योजना ती योजना कशाला आणताय ? ज्याच्याकडे हक्कच घर नाही त्याला ते मोफत द्या ना ! विकायची तरतूदच ठेऊ नका ! सर्व वैद्यकीय उपचार शिक्षण मोफत करा ! सर्व जेष्ठ नागरिकांच्या उदरनिर्वाहाची सरकारी सोय करा देशातील भ्रष्टाचार, आरक्षणावरून होणाऱ्या मारामाऱ्या चोऱ्या लबाड्या आपोआप कमी होतील ! पण हे सारे होणार नाही कारण हजार लोकांना करोडो लोकांवर मग राज्य करता येणार नाही आणि लोक देऊळात रांग लावणार नाही. आपल्या देशातील चित्रपट म्हणजे मूर्खांचा बाजार आहे त्यात सर्व समस्यांचे समाधान देऊळात होतानाचेच चित्र उभे केले जाते आता तर त्यात सध्याच्या दैनिक मालिका ही मागे नाहीत.
आपल्या देशातील लोकांना लाटेवर स्वार होण्याची सवय लागलेय आपल्या देशात कधी ह्याची तर कधी त्याची लाट येतच असते ती लाट कधी कधी विचारांची असते. भूतकाळातील एखाद पात्र उकरून काढायचं त्याच्या विचारणा स्वतःच महान करायचं त्याला मोठं करायचं आणि मग लोकांना त्याला मोठं म्हणायला लावायचं अथवा म्हणायला भाग पडायचं आणि मग त्याच्या नावावर वर्षानुवर्षे आपला स्वार्थ साधत राहायचं ! त्यात कहर म्हणजे ज्याची लाट त्याला देवत्व देऊन मोकळं व्हायचं कालांतराने त्यांची देऊळें बांधायची आणि आणि त्यांच्या देवत्वाची किंमत वसूल करायची. आपल्या देशातील देवांची संख्या वाढत चालली आहे त्यात काही माणसेही देव झाली आहेत.
देव या संकल्पनेला माझा विरोध नाही , देव अस्तित्वातच नाही असे मी म्हणतच नाही . देव नावाची एक अज्ञात शक्ती निसर्गात अस्तित्वात आहेच त्यामुळेच हे जग सुरळीत चालले आहे. पण त्या शक्तीच्या नावावर आज जी लूट चालू आहे, माणुसकीचा गळा घोटाळा जात आह, देवाबाबत विचार करताना माणूस आपली जी सारासार विचार करणारी बुद्धी गहाण ठेवतो ते मला मान्य नाही. एकीकडे मंगळावर जायची स्वप्ने पाहायची आणि मंगळावर जाणारे यान सुरक्षित जावे म्हणून त्याच्या समोर नारळ फोडायचा ! आपल्या देशातील निम्मी अधिक जनता देवभोळी आहे त्यामुळे आपला देश प्रगत राष्ट्र होऊ शकला नाही. आपल्या देशातील लोक कमालीची हुशार आहेत पण आपल्या यशाच श्रेय प्रत्येक वेळी ते त्या देवाला देतात. त्यात गैर काही नाही पण आपल्या
देशात देवावर किती अवलंबून राहावे याला काही मर्यादाच राहिलेली नाही.
महाभारताच युद्ध झालं त्यावेळी प्रत्यक्ष देव तेथे असताना त्यांनी महाभारतातील युद्ध होण्यापासून थांबवलं का उलट ते युद्ध टाळण्याचा प्रयत्नात असणाऱ्या अर्जुनाला गीता सांगून लढण्यास भाग पाडलं याचा अर्थ देवाला प्रत्येकाला त्याच्या कर्माचा फळ द्यायचेच असते पण आपल्या देशातील लोक ते घेणे टाळत असतात या सत्याचा स्वीकार करायला घाबरत असतात या घाबरणातूनच ते उठसूट देवाला शरण जात असतात आणि इतके शरण जातात कि माणुसकी विसरतात त्यांना वाटते देवाला खुश केले कि झाले सारे पण तसे काही नसते. देऊळ हि संकल्पना चुकीची नाही त्याची गरज आहे माणसाला आपली मने मोकळी करण्यासाठी ! पण आता देवळांची मटे झाली आणि श्रद्धेला बाजारीकरणाचे स्वरूप प्राप्त झाले. श्रद्धेत काहीच चुकीचे नाही पण जेव्हा श्रद्धेची अंधश्रद्धा होते तेव्हा ती इतर सामान्य माणसांना त्रासदायक ठरते. प्रत्येक माणसाला आपले मन मोकळं करण्यासाठी एक हक्काची जागा हवी असते आणि आपल्या आयुष्यात चांगल्या वाईट घडणाऱ्या घटनांचं खापर फोडण्यासाठी आणि श्रेय देण्यासाठी एक हक्काची जागा हवी असते ती जागा म्हणजे देऊळ असते. या जगात सारे नश्वर आहे त्यामुळे माणसाला काहीतरी अमर असणारे हवे होते आपल्यापेक्षा वेगळे म्हणून माणसाने देवाला जन्माला घातले असे म्हणणे धाडसांचे होईल देवाचे अस्तित्व पूर्णपणे अजून कोणीही या जगात नाकारलेले नाही. त्यामुळे मी हि ते नाकारत नाही कदाचित नाकरणारही नाही. पण आपल्या देशातील बहुसंख्य लोकांच जीवन या देवाभोवतीच गुंडाळलेले दिसते. देवळ बांधा ना पण त्यातूनही समाजाचं हित कसं साधत येऊ शकेल याचा विचार करा ना ! तो विचार जोपर्यत केला जात नाही तोपर्यंत फक्त देऊळेच वाढत राहणार पण देवत्व नष्ट होत राहणार यात शंका नाही…
लेखक – निलेश बामणे
202, ओमकार टॉवर, जलधारा (एस. आर. ए.) बी – विंग, गणेश मंदिर समोर, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर,
गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – ४०० ०६५.
मो. ८१६९२८२०५८ / ८६५२०६५३७५
Leave a Reply