नवीन लेखन...

देव भुकेला श्रद्धेचा कि प्रसिद्धीचा

एकदा मच्छिंद्रनाथ एका गावात भीक्षा मागायला आले. एका घरासमोर उभे राहून “अल्लख निरंजन” असे म्हणताच घरातून एक बाई चिमूटभर पीठ घेऊन आली. हे पाहताच नाथ म्हणाले “बाई शेरभर तरी पीठ दे ग”. त्यावर बाई रागावली व त्यांना निघून जायला सांगीतले. संपूर्ण गाव फिरले परंतु कुणीच त्यांच्याशी सन्मानाने बोलेना. काही मुले त्यांची टवाळी करु लागले. शेवटी वैतागून ते परतले. नाथ आलेत हे पाहून गोरक्षनाथ उभे राहिले. झोळी रिकामी होती. नाथ गोरक्षांना म्हणाले “गोरख आता जगाला आपली गरज राहीलेली नाही. भीक्षा तर मिळत नाही पण टवाळी मात्र होते.” नाथांनी झालेला प्रकार सांगितला. त्यावर गोरक्षनाथ म्हणाले “गुरुदेव, जगाला काय हवे आहे हे मला चांगले ठाऊक आहे. उगाच लोकांना दोष देऊन अर्थ नाही. आपणच बदलायला हवे. मीच त्या गावात जातो. थोडया वेळाने तुम्ही तिथे या आणि मी तुम्हाला दाखवेन लोकांना नेमके काय हवे आहे ते?” ठरल्याप्रमाणे गोरक्षनाथ गावाच्या मोठया चौकापाशी आले. तिथे बरीच गर्दी होती. ते चौकाच्या मध्यभागी आले आणि आपल्या काखेतली काठी हवेत भिरकावली ती तशीच हवेत स्थिर राहीली आणि स्वतः काठीच्याही वर जाऊन हवेत मांडी घालून स्थिर झाले. हे पाहून लोकांनी गर्दी केली. हार, नारळ, फळे घेऊन लोकांनी त्यांना नमस्कार केला. थोडया वेळात मच्छिंद्रनाथ तिथे आले व गोरक्षांनी नाथांना सांगितले की लोकांना हेच हवे आहे. चमत्कार तिथे नमस्कार.

सांगायचे तात्पर्य इतकेच की त्या काळी घडलेली ही घटना आजच्या काळातही तितकीच लागू पडते. चमत्कार तिथे नमस्कार. लोकांनी उगाच गैरसमज करुन घेतला आहे की साधू-संतांचा जन्म हा चमत्काराकरीता झाला आहे. साधू-संत चमत्कार करत नाही. त्यांचे असणे हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. लोकांची काय विपरीत श्रद्धा असते ते पहा? ज्याचे मठ मोठे तो खरा संत, ज्याचे भक्तगण जास्त तो खरा संत. महर्षी व्यास, ज्ञानेश्वर यांसारख्या सत्पुरुषांच्या भारत राष्ट्रात असे अधर्म घडणे म्हणजे खेदकारकच आहे. संत हे चारित्र्यवान असले पाहिजे चमत्कारीक नव्हे. जसे संतांच्या बाबतीत घडले तसेच देवाच्या बाबतीतही घडले. “प्रतिमेची पूजा करीता करीता. तो स्वतः पाषाण झाला.

मानवाचा छंद सारा. देवाचा बाजार झाला.” अहो, गणपती दुध काय पीतो? केरळमध्ये मेरीच्या मूर्तीच्या नेत्रांतून अश्रुपात काय होतात? मुंबईच्या समुद्राचे पाणी गोड झाल्यामुळे माहीमच्या दर्ग्यातील गर्दी वाढते. दर्ग्यातील कबरीवरच्या चादरीचे लोक चुंबन काय घेतात? अरेरे… असल्या विपरीत श्रद्धेच्या माणसांपेक्षा नास्तिक माणूस परवडला. पुराणांत असे वर्णन आहे की कलियुगात भोंदूपणा वाढेल, ज्यांचा अधिकार शून्य त्यांचे महत्व वाढेल. त्यामुळेच प्रसिद्धिच्या नादात अनेक लोक (जे स्वतःला संत म्हणवून घेतात) त्यांनी श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरु केली. लोकांच्या श्रद्धेच्या बळावर पैसा कमवला. यात प्रामुख्याने दोष लोकांचाच आहे. हिंदु धर्मात इतके विशाल ग्रंथ असताना भोंदूंच्या नादी लागण्याचे कारणंच काय? याचा अर्थ गुरु करु नये असे नव्हे. पण गुरु हा परंपरेतला असावा लागतो. तेव्हाच त्याला अनुग्रह देण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता कुणीही कुणाला अनुग्रह देत असतात. जणू गुरुंचा अनुग्रह म्हणजे निवडणूकीचे तिकीट वाटप आहे. कसला हा भोंदू कारभार आणि कुठे फेडणार ही पापं. आता मूर्तिपूजेचेच पहा ना. ईश्वराकडे जाण्यासाठी “मूर्तिपूजा” हा एक रामबाण उपाय आहे. निर्गुण निराकार ईश्वराच्या चरणी मनुष्य सहजासहजी एकरुप होत नाही. माणसाचे मन हे फ़ार चंचल असते. ते क्षणभरही स्थिर राहू शकत नाही. मानसपुजेने मन स्थिर होत नाही. मनाची एकाग्रता साधावयाची असेल तर समोर ईश्वराचे प्रतीक हवे म्हणून मूर्तिपूजा.

मुर्तिपूजा हे अज्ञान नसून अप्रतिम विज्ञान आहे. प्रतीके केवळ हिंदु धर्मातच नाही अन्य धर्मातही आहेत. ख्रिस्तांचा क्रूस असो, मुसलमानांचा पीर किंवा मंत्रयुक्त तसबीर असो (काही अल्पबुद्धि लोक उगाच हिंदुंना मूर्तिपूजक म्हणून हीणवतात). तात्पर्य मूर्तिपूजा हे साधन आहे साध्य नव्हे. परंतु या कलियुगात झाले काय? लोक मूर्तिलाच ईश्वर मानू लागले. उपायच अपाय ठरला आणि आपला “आधूनिक देव” प्रसिद्धिचा भूकेला झाला. अहो आज हिंदुंचे कितीतरी अनेक श्रीमंत देवस्थाने आहेत. पण उपयोग शुन्य. ईश्वर नि भक्ताचे पवित्र नाते नाही. केवळ पैशांची बाजार. काही लोक तर देवस्थानाला “पिकनिक पॉइंट” म्हणून भेट देतात. खरोखर ईश्वर पैशांचा, प्रसिद्धिचा भूकेला आहे का? नाही मुळीच नाही. ईश्वर अनंत अनादि आहे. हे सबंध विश्व त्यानेच निर्माण केले आहे. ही सगळी दौलत त्याचीच आहे. हा सगळा पसारा त्याचाच आहे.

ईश्वराचा पसारा फार मोठा आहे. कधी विचार करुन पहा. एवढं विशाल ब्रह्मांड. त्यात अनेक सुर्यमाला नि ग्रह आहेत. त्यापैकी पृथ्वी नावाचा एक ग्रह, ७०% पाण्याने व्यापलेल्या या ग्रहात केवळ ३०% भूभाग आहे. त्यात ५ खंड आहेत. त्यात आशिया नावाच्या खंडात भारत हे राष्ट्र. भारत राष्ट्राच्या कुठल्यातरी राज्याच्या एका जिल्ह्यांत छोट्याश्या शहराच्या एका अगदी लहान विभागात असलेल्या एका इमारतिच्या/चाळीच्या खोलीत आपण राहतो. पाहिलेत ना, ईश्वराच्या या विशाल पसार्‍यात आपले स्थान किती लहान आहे ते. मग हा ईश्वर प्रसिद्धिचा भूकेला कसा असेल? मग हा ईश्वर आपल्या नवसाला क्षणोक्षणी कसा काय पावेल? संतांनाही ज्याचे दर्शन दुर्लभ होते तो आपल्या सारख्या अति साधारण लोकांना कसा काय साक्षात्कार देईल? याचा अर्थ ईश्वर पावत नाही असे नाही. त्याचे ह्र्दय आईसारखे आहे. म्हणून तर आपण जगतोय ना? परंतु ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी योग्यता लागते. त्यासाठी साधना करावी लागते. तो आपल्याकडे येणार नाही. आपल्याला त्याच्याकडे जावे लागेल. जसे एखाद्दाला सावली हवी असेल तर तो झाडाखाली जातो. झाड स्वतःहून त्याच्याकडे येत नाही. विहीरीत प्रचंड पाणी आहे. परंतु तहान लागल्यावर आपल्याला विहीरीकडे जावे लागते. विहीर आपल्याकडे येत नाही. तसेच ईश्वर हा मायाळू आहे. त्याच्या मायेची उब हवी असेल तर आपल्याला त्याच्याकडे जावे लागेल. एकदा का आपली योग्यता वाढली तर तो स्वतःच आपल्या भेटीला येतो. जसा पुंडलीकेच्या भेटीला विठ्ठल आला. देव श्रद्धेचा भूकेला आहे. परंतु श्रद्धा डोळस हवी. नाहीतर वर म्हटल्याप्रमाणे विपरीत श्रद्धा घडली तर ईश्वर प्रसन्न तर होत नाही परंतु त्याचा नकळत अपमान मात्र आपण करीत राहतो. आपल्यावर भगवंताची कृपा होत नसेल तर आपले कुठेतरी काहीतरी चुकते, असे समजावे. आपल्यातले दोष, मत्सर काढून टाकावे. आपण नेहमी म्हणतो की देवावर माझी नितांत श्रद्धा आहे, मी त्याची मनोभावे पूजा करतो. तरीसुद्धा देवाची कृपा होत नाही. असे का? कारण आपल्या मनात कुठेतरी शंका असते. तांदूळ कितीही निवडले तरी खडा कुठेतरी राहतो व जेवताना कचकन चावला जातो. असेच काहीतरी आपल्या बद्धल होते. काही लोक ईश्वराचे अस्तित्व नाकारतात. हे लोक इतके विक्षीप्त असतात की तलवार म्यानात ठेऊन तर्क करतात आणि आपला तर्क खरा ठरविण्यासाठी म्यानातली तलवार बाहेर काढतात. म्हणे विज्ञानयुग आहे. खरा वैज्ञानिक ईश्वरावर कधीच शंका घेत नाही. एखादी गोष्ट नाकारणे सोपे असते कारण त्यात टाळकं खांजवावं लागत नाही. असो, ज्याचे त्याचे कर्म.

ईश्वराच्या साक्षात्कारासाठी संतांचा आधार मिळतो. संत हे ईश्वराचे दूत असतात. देवाचा संदेश ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. मी वर म्हटले आहे की संत चमत्कार करीत नाही. परंतु ज्ञानेश्वरांपासून तुकाराम, साईबाबांपर्यंत संतांची चरीत्रं वाचली तर त्यात चमत्कार वाचावयास मिळतात. मग ते खोटे आहे असे समजावे का? नाही मुळीच नाही. योगी अरविंद म्हणतात “परिपुर्ण माणसाच्या दृष्टीने जे तर्कशुद्ध असते, तेच अपूर्ण माणसाच्या दृष्टीने चमत्कारिक असते. ज्याने आयुष्यात कधीच विमान पाहिले नसेल, त्याला विमान दाखवल्यावर तो त्याच्यासाठी चमत्कारच ठरतो. तसेच आहे संत जे करतात ते त्यांनी अनुभवले आहे. पण आपण अनानुभवी आहोत. म्हणून आपल्याला ते चमत्कार वाटतात. चमत्कार चमत्कार म्हणजे काय हो? ईश्वराने निर्माण केलेले हे विश्व किती चत्कारिक आहे ते पहा. एवढूसं बीज परंतु ते पेरल्यावर केवढं अवाढव्य वृक्ष जन्माला येतं. सुर्य उगवतो मावळतो. हा वारा दिसत नाही परंतु जाणवतो. ही माणसं, झाडे, प्राणी, त्यांना जगण्यासाठीची केलेली सोय. प्रत्येक गोष्ट चमत्कारिक आहे. पण आपण त्याचा विचारही करत नाही. ईश्वराच्या व्यापकतेचा विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की तो किती दयाळू आहे. आपण ईश्वरापुढे नम्र होऊन भक्तिभावाने उभे राहिले पाहिजे. आचारः परमो धर्म. आचार शुद्ध ठेवावे. त्याची भक्ती करावी पण बुद्धीने. बुद्धी गहाण टाकून भक्ती करु नये. देवाला बुद्धिवान आणि चारित्र्यवान भक्त आवडतात. देवाशी वागताना आपले स्थान देवाच्या चरणापाशी आहे असा भाव मनी ठेवावा. त्याच्यावर नितांत श्रद्धा ठेवावी. तर तो आपल्याला नक्कीच त्याच्या कुशीत घेईल. कारण देव श्रद्धेचा भुकेला आहे, प्रसिद्धीचा नव्हे.

देव देव म्हणोनी I व्यर्थ का फिरसी I
निज देव नेणसी I मुळी कोण ? II
देवा नाही रुप I देवा नाही नांव I
देवा नाही गाव I कोठे काही II
ज्ञानदेव म्हणे I भजा आत्मदेवा I
अखंडित सेवा I करा त्याची II

— जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Avatar
About जयेश शत्रुघ्न मेस्त्री 12 Articles
हिंदूत्त्व या विषयावर परखडपणे लिहिणारे श्री जयेश मेस्त्री हे व्यवसायाने विमा (एल. आय. सी )आणि गुंतवणूक एजंट आहेत. ते हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..