नवीन लेखन...

देव ‘देवाघरी’ धावला

१९८६ सालातील गोष्ट आहे. आम्ही नुकतंच ‘सासू वरचढ जावई’ या चित्रपटाच्या डिझाईनचं काम केलेलं होतं. रमेश देव ‘सर्जा’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत असं आमच्या कानावर आलं होतं. ‘शेलारखिंड’ हे पुस्तक आम्ही वाचलेलं होतं. त्याच कथेवर आधारित हा चित्रपट असल्याने व शिवाजी महाराजांविषयी अत्यंत आदर असल्यामुळे या चित्रपटाची डिझाईन्स आपणच करावीत अशी आम्हाला प्रबळ इच्छा झाली.
बाळासाहेब सरपोतदार यांचे कडून, रमेश देव यांचा मुंबईतील पत्ता घेतला व ‘ सर्जा’ चित्रपटाची डिझाईन करण्याची इच्छा व्यक्त करणारं, एक आर्जवी पत्र सुंदर हस्ताक्षरात लिहिलं. पत्राच्या खाली, गडावरील दोन तोफांचं रंगीत चित्र काढलेलं होतं. पत्र पाठवलं व उत्तराची वाट पहात बसलो.
काही महिन्यांनी ‘सर्जा’, पुण्यातील ‘प्रभात’ थिएटरला प्रदर्शित झाला. थिएटर डेकोरेशनमध्ये बॅनरशेजारी मोठ्या तोफेची प्रतिकृती ठेवलेली होती. आमचं रमेश देव यांच्या चित्रपटासाठी काम करण्याचं स्वप्न, अधुरच राहिलं.
लहानपणी गणेशोत्सवात अनेक मराठी चित्रपट पाहिले. त्यातील मनात ‘घर’ करुन राहिलेला चित्रपट होता. ‘मोलकरीण’! १९६३ सालातील हा चित्रपट साने गुरुजींच्या, कथेवर आधारित होता. पटकथा संवाद व दिग्दर्शन यशवंत पेठकरांचे होते. या चित्रपटांतील सुमधुर गीतं लिहिली होती, गदिमांनी व संगीत होतं वसंत देसाई यांचं!
आपल्या मुलाला प्रेमानं वाढवून मोठं केल्यानंतर, त्याला अधिकार व संपत्ती प्राप्त झाल्यावर तो आई-वडिलांना विसरतो. त्यांना ओळख देण्याचीही त्याला लाज वाटू लागते. या मानसिक आघाताने वडील प्राण सोडतात व आई आधारासाठी स्वतःच्याच मुलाच्या घरी, मोलकरीण होऊन रहाते.
एके दिवशी अळूची भाजी खाताना, त्याला आईची आठवण होते. तसं तो बोलतोही. मात्र बायकोपुढे तो काही करु शकत नाही. नातू आजारी पडल्यावर आई ‘देव जरी मज कधी भेटला.’ गाऊन देवाला आळवणी करते. नातू आजारातून बरा होतो व मुलाला पश्र्चाताप होऊन तो आईची क्षमा मागतो. मुलगा, सून व नातवासह आई आनंदात रहाते.
यामध्ये मुलगा होता रमेश देव व आई सुलोचना. सूनबाई सीमा देव. सोबत इंदिरा चिटणीस, परशुराम सामंत, बर्चीबहाद्दर, शांता तांबे, राजा पंडित, इ. होते. सीमाने त्या काळातील फॅशनप्रमाणे सहा वार साडी नेसून, दोन वेण्या पुढे घेतलेल्या होत्या. ‘दैव जाणिले कुणी.’ या अप्रतिम गीतासाठी हा चित्रपट असंख्य रसिकांच्या, दीर्घकाळ स्मरणात राहिलेला आहे.
१९५१ साली सुरु झालेली रमेश देव यांच्या चित्रपटांची कारकिर्द, साठ वर्षांहून अधिक काळ चालू राहिली. मराठी सोबत हिंदी चित्रपटांतून विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या. मद्रासच्या अनेक चित्रपटांतून त्यांनी खलनायकही रंगविले. ‘आनंद’ चित्रपटातील डाॅ. कुलकर्णी हे रमेश देव व सीमा देव, दांपत्य कोण विसरेल?
‘आदमी सडक का’ या हिंदी चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा याने केलेली भूमिका, मराठीत ‘दोस्त असावा तर असा’ या चित्रपटात रमेश देवने साकारलेली होती.
या ‘मेड फाॅर इच आदर’ जोडीचे अनेक मराठी चित्रपट पुन्हा पुन्हा पहावेत, असेच सुंदर आहेत. लग्नाच्या पन्नास वर्षांनंतर त्यांच्या मुलांनी, पुन्हा त्यांच्या ‘लग्नसोहळ्याचं’ आयोजन केलेलं होतं.
चित्रपटांच्या पुरस्कार सोहळ्याला, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला रमेश देव आवर्जून हजेरी लावायचे. गेल्या वर्षी समजलं होतं की, सीमा देव यांची स्मरणशक्ती क्षीण झालेली आहे. त्यांचीच काळजी वाटत असताना, काही दिवसांपूर्वीच ९३ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर अचानक हृदयविकाराच्या झटक्याने, देव ‘देवाघरी’ गेले. आणि मन सुन्न झालं.
देव कधीही जात नाहीत, ते अजूनही आपल्यातच आहेत. फक्त सूर छेडले की, त्यांच्या असंख्य गीतांतून ते पुन्हा पुन्हा उमटत राहणार आहेत.
— सुरेश नावडकर. 
मोबाईल: ९७३००३४२८४
३-२-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..